दसरा – विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक (Dasara)

_Dussehra_1.jpg

नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर येतो तो विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा दिवस. विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक असणारा दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. शुभकार्याची सुरूवात करण्यास आणि वास्तू, वाहन, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू अशा खरेदीकरता तो दिवस उत्तम मानला जातो. सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन हेदेखील दसऱ्याचे एक वैशिष्ट्य आहे.

शस्त्रपूजनाची परंपरा महाभारतापासून सुरू आहे असा समज आहे. पांडवांनी त्यांची शस्त्रे अज्ञातवासाच्या काळात शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. पांडवांनी ती शस्त्रे अज्ञातवासाच्या समाप्तीनंतर कौरवांबरोबरच्या युद्धसमयी बाहेर काढून त्यांची पूजा केली, तो दिवस दसऱ्याचा होता. केवळ शस्त्रे नाहीत तर उपजीविकेच्या प्रत्येक आवश्यक साधनाची, वस्तूची त्या दिवशी पूजा करण्याची प्रथा त्यानंतर रूढ झाली.

त्याच दरम्यान शेतातही नवीन धान्य आलेले असते. नव्या धान्याच्या लोंब्या देवाला वाहिल्या जातात आणि नवीन धान्यापासून बनवलेल्या सुग्रास अन्नाचा नैवेद्यही देवाला दाखवला जातो. नवी वस्त्रे, दागदागिने घालून आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना देऊन शुभचिंतन केले जाते.

दसरा म्हणजे सीमोल्लंघन. सीमोल्लंघनाची पद्धतही पूर्वापार आहे. मराठ्यांच्या राज्यात मराठे सरदार पराक्रम गाजवण्यासाठी बाहेर पडत असत. शत्रूवर विजय मिळवून शत्रूचे राज्य काबीज करण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन करत असत. तशा मोहिमांमध्ये त्यांनी विजय मिळवून प्रत्यक्ष सोने लुटून आणले होते. पराक्रमाचे स्मरण, पूजन आणि सीमोल्लंघनाची प्रेरणा देणारा असा ‘दसरा’ सण मानला गेला आहे. पौराणिक कथेनुसार अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे दहा दिवस देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध करून, त्याचा वध केला आणि विजय मिळवला म्हणून देवीला ‘विजया’ असे नाव पडले आणि तो दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जाऊ लागला. रामायण काळात प्रभू रामचंद्रांनीदेखील त्याच दिवशी रावणावर विजय मिळवून सीतामाईसह ते अयोध्येस आले. त्या आनंदाप्रीत्यर्थ प्रजेने आनंदोत्सव साजरा केला. त्या दिवशी दृष्ट प्रवृत्तीचे दहन करायचे अशा प्रतीकात्मक विचारातून रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.

दसरा हा सण धार्मिक आणि सामाजिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो. नवरात्र आणि दसरा या सणांच्या निमित्ताने समाज एकत्र येतो. त्यामुळे एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान होते. एकमेकांचे सुख-दुःख समजून घेतले जाते. परस्परांमधील नातेसंबंध दृढ होऊन आपुलकी व एकजूट निर्माण होते. आजच्या काळात, तसे एकत्र येऊन दुष्ट शक्तींविरुद्ध आवाज उठवून त्यांचा बीमोड करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशासमोर अज्ञान, अंधश्रद्धा, आतंकवाद, भ्रष्टाचार, महागाई, प्रदूषण आणि अस्वच्छता अशा गंभीर समस्या उभ्या आहेत. तशा दुष्ट शक्तीरूपी समस्यांचा बीमोड करण्यासाठी सीमोल्लंघन होणे अत्यंत गरजेचे आहे!

– प्रज्ञा कुलकर्णी, pradnyakulkarni66@gmail.com

About Post Author