टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी

carasole

भुजाईदेवीचे मंदिरकोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.

भुजाईदेवी हे जागृत देवस्थान मानले जाते. देवीचे मंदिर टिक्केवाडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या पायथ्याशी दाट निसर्गाच्या छायेत वसलेले आहे. देवीचे मूळ नाव अष्टभुजाईदेवी. गावकरी तिचा उल्लेेख ‘भुजाईदेवी’ असा करतात. भुजाईदेवीची यात्रा फेब्रुवारी महिन्यातील ‌‌‌‍‍पौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी भरते. टिक्केवाडीतून कराड, सातारा, सोलापूर, निपाणी, बेळगाव, गोवा, मुंबई इत्यादी ठिकाणी वास्तव्यास नोकरीस गेलेले लोक यात्रेला देवीच्या दर्शनाला येतात. जत्रेच्या कालावधीत गावात सासणकाठ्या, लेझीम, दांडपट्टा इत्यादी मर्दानी खेळ होतात. सासणकाठ्या खेळताना वेळूच्या काठीला देवीचा झेंडा लावून तो हलगीच्या तालावर गावात नाचवला जातो. तो झेंडा गावच्या एकोप्याचे प्रतीक मानले जाते.

जत्रेत देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे त्या जत्रेला पुरणपोळीची जत्रा असेही म्हणतात. जत्रेत पहिल्या दिवशी, मंगळवारी गावकरी देवीचे दर्शन घेतात. तिला नैवेद्य दाखवतात. गावातील गुरवांच्या घरी देवीची दोन फूट उंचीची तांब्याची मूर्ती आहे. ती मूर्ती मंगळवारी सायंकाळी मंदिरात नेली जाते. तिला साडी नेसवली जाते. दुस-या दिवशी, बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत देवीचा जागर असतो. त्या दिवशी सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. त्या दिवशी देवीला बक-याचा नैवेद्य दाखवला जातो. तो नैवेद्य दाखवताना देवीच्या मूर्तीसमोर पडदा लावून मंदिराच्या समोर बोकड कापला जातो. तो बोकड देवीसाठी नसून दैत्यदानवांसाठी कापला जातो असे गावकरी सांगतात. रात्री नऊ वाजता देवीची पालखी निघते. पालखी देवळाभोवती पाच फे-या घालते. मग पालखी मंदिरात आणून तेथे देवीची आरती होते. गुरुवारी गावात सर्वांकडे बक-याचे मटण असते. मंदिरात नेलेली देवीची तांब्याची मूर्ती गुरुवारी सकाळी गावात माघारी आणली जाते. मूर्तीची पूजा केली जाते.

भुजाईदेवीबाबत आख्यायिका सांगितली जाते. एका धनगराने देवी प्रसन्न होण्यासाठी तपश्चर्या केली. देवी प्रसन्न‍ झाल्यानंतर त्याने देवीला गावात येऊन वास्तव्य करण्याची विनंती केली. देवीने होकार दिला, मात्र गावात जाईपर्यंत धनगराला मागे वळून न पाहण्याची अट घातली. धनगराने गावापासून काही अंतरावर असताना मागे वळून पाहिले आणि तेव्हापासून देवीने गावाच्या अलिकडे डोंगरातच ठाण मांडले.

भुजाईदेवीचे जुने मंदिरटिक्केवाडीतील गावकरी दर तीन वर्षांतून एकदा गाव सोडून जंगलात राहण्यास जातात. त्या प्रथेला ‘गुळं काढणं’ असे म्हटले जाते. साधारणतः मे महिन्याच्या आसपास गावकरी भुजाईदेवीला कौल लावतात. देवीचा कौल मिळाल्यानंतर गावकरी घरातील सामान घेऊन जंगलात जातात. जंगलातील पंधरा दिवसांच्या वास्तव्यानंतर देवीला पुन्हाे कौल लावण्यात येतो. त्यानुसार गावकरी गावात परततात. गावात कोणतेही लग्न देवीला कौल लावल्याशिवाय होत नाही. देवीच्या निर्णयाविरुद्ध लग्न केले जात नाही. अशा प्रकारे झालेल्या लग्नांमध्ये कोणतीही समस्या उद्भवली नसल्याचा दावा गावक-यांकडून केला जातो. गावातील जी मुलगी गावाबाहेर दिली जाते, तिच्या नव-याला तीन वर्षातून एकदा देवीला बक-याचा नैवेद्य दाखवावा लागतो. फेब्रुवारी महिन्यातील ‌‌‌‍‍पौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी (यात्रेला) महिला माघारणी देवीसमोर बोकड कापतात.

गावातील गुरव हे देवांचे पुजारी आहेत. गावातील बारा बलुतेदार व सर्व जातिधर्माचे लोक देवीची पूजा करतात. देवी नवसाला पावते अशी गावक-यांची धारणा आहे. नवरात्रात गावातून घरटी एक अशा संख्येने लोक नवरात्राचा उपवास धरून नऊ दिवस भुजाईच्याा मंदिरात बसतात. त्या काळात ते केवळ फलाहार करून देवीची आराधना करतात. गुढीपाडव्याला भटजी देवळात जाऊन पंचांगाचे वाचन करतात. त्या वेळी भटजी चालू साल कसे जाणार याचे भाकीत करतात. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी खाली गावात येते. लोक भक्तिभावाने तिचे दर्शन घेतात व देवीची पूजा करतात. ते देवस्थान मंदिराच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. ग्रामपंचायतीने मंदिराजवळ दोन खोल्या बांधल्या आहेत. त्याचा वापर कधी पर्यटकांना राहण्यासाठी तर कधी मंदिराचे सामान ठेवण्याासाठी केला जातो.

भुजाईदेवीच्या मंदिरापासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगर आहे. त्यास टिक्केवाडीचा डोंगर असे संबोधले जाते. त्या डोंगरास भोंगिरा असे म्हणतात. डोंगरात दगडी भुयार असून त्यात महादेवाचे मंदिर आहे. तेथे गावकरी दस-याला आणि नवरात्रात, तसेच महाशिवरात्रीस पायी चालत जातात. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी जंगलातील सहा किलोमीटरची पायवाट तुडवावी लागते. तेथे कोणतेही वाहन; सायकलसुद्धा जात नाही. भोंगि-याजवळ पोचल्यानंतर थोडा चढ चढावा लागतो. त्यानंतर डोंगरातील गुहा नजरेस पडते. भोंगिऱ्यावरून परिसरातील चाळीस ते पन्नास किलोमीटर परिघातील, अगदी निपाणीपर्यंतचा परिसर पाहता येतो. भुयारातील शंकराचे मंदिर शिवकालीन असल्याची आख्यापयिका आहे. मंदिराचे भुयार तेथून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भुदरगड किल्‍ल्‍यापर्यंत जाते असा समज गावक-यांमध्ये  आहे. ते भुयार शिवाजीने खोदले असल्याचे म्ह‍टले जाते, मात्र त्या दाव्याला कोणताही पुरावा नाही.

शंकराच्या मंदिराच्या पलीकडे काही अंतरावर ‘भिमाचा अंगठा’ हे स्थळ आहे. तेथे जमिनीत दहा बाय सात मीटर आकाराचा ठसा जमिनीत उमटलेला आहे. तो भिमाच्या हाताचा अंगठा असून पांडव तेथून जात असताना भिमाने त्याचा अंगठा कापून तिथे टाकल्याचे म्हटले जाते.

भुजाईच्या मंदिरापर्यंत पोचण्यासाठी कोल्हापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कूर गावात एस.टी.ने पोचावे लागते. तिथून टिक्केवाडीला जाण्यासाठी वडाप (जीप) आणि रिक्षा उपलब्ध आहेत.

(माहिती संकलन सहकार्य – शांताराम पाटील आणि रणजीत गुरव.)

किरण क्षीरसागर

Last Updated On – 17th September 2016

About Post Author

3 COMMENTS

  1. खूप छान माहिती…

    खूप छान माहिती…
    पण….छत्रपती शिवरायांचा उल्लेख एकेरी केला आहे. त्याबद्दल थोडं वाईट वाटलं. कारण ज्या छत्रपती शिवरायांमुळे आपण इथे आनंदाने जगत आहोत. ज्यांनी आपले भविष्य जाणले त्यांचा उल्लेख एकेरी करतो आहोत. हिच मोठी शोकांतिका आहे. काही चुकल्यास क्षमस्व.
    जय शिवराय

    • प्रमोद पाटील, यात शोकांतिका
      प्रमोद पाटील, यात शोकांतिका कसली पोवाड्यांमध्‍ये शिवाजींचा उल्‍लेख एकेरी केला जातो. त्‍यात अवमान करण्‍याचा भाव नसतो. ज्यांच्‍याप्रती अतिव आदर असतो त्‍यांचा एकेरी उल्‍लेख होतोच. म्‍हणूनच – सचिन तेंडूलकर’ने’ शतक केलेले असते, सचिन तेंडूलकर यांनी शतक केले, असे वाचण्‍यात येत नाही. प्रतिसादासाठी आभार…

  2. आजपर्यंत भुजाई देवी बद्दल
    आजपर्यंत भुजाई देवी बद्दल माहिती नव्हते. कोल्हापूर ला जाऊ तेव्हा आवश्य दर्शन घ्यायला जाऊ. खरोखरच लेख वाचून माहिती मिळाली. धन्यवाद.

Comments are closed.