अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी

अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये तेराव्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर तीन त्या ठिकाणी वास्तव्यास होते.

सुरुवातीला गावक-यांनी नीरा नदीच्या काठावर मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, कै. बाबासाहेब माने-पाटील, कै. सदाशिवराव माने पाटील या तीन बंधूंनी आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून देवीचे लहानसे मंदिर बांधले.

अकलाई देवीचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या उजवीकडे उत्तर दिशेला नीरा नदी वाहते. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणारा ओढा नीरा नदीस जाऊन मिळतो. त्यात सांडपाणी मिसळल्याने तो अस्वच्छ  झाला आहे. अकलाईच्या मंदिराच्या सभोवताली भिंतीचे कुंपण आहे. पूर्वेकडे असलेल्या  प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना एक पायरी खाली सखल भागात उतरावे लागते. बाजूला असलेल्या पाईपमधून पाणी पडते आणि भाविकांना तेथूनच जावे लागते. त्यामुळे पाय धुऊन आत गेल्याने परिसर घाण होत नाही. आत गेल्यावर हिरव्या कापडाचे आच्छादन आहे. मंदिरासमोर खाली चबुत-यावर गाभा-याकडे तोंड करून बसलेल्या नंदीचे शिल्प आहे. मंदिरासमोर आयताकृती सभामंडप आहे. सभामंडपाच्यात डाव्या आणि उजव्या भिंती जाळीदार आहेत. गाभा-याची इमारत अष्टकोनी असून, छत तसेच बाहेर काढून त्याचा सज्जा बनवला आहे. त्यावर उत्तरेला व दक्षिणेला गोमुखाचे शिल्प आहे. प्रकाश व हवा यांसाठी खिडक्या आहेत. पुढे उतरत्या क्रमाने तीन शिखरे आहेत. प्रत्येक शिखरावर नऊ असे सत्तावीस कळस आहेत. कोणत्याही दिशेने मंदिराच्या शिखराकडे पाहिल्यास एकापुढे एक चढत्या क्रमाने असलेल्या तीन शिखरांवरील तीन कळस  डाव्या बाजूचे एक व उजव्या बाजूचे एक असे पाच कळस दिसतात. त्यांपैकी मधला उंच कळस सामाईक असून, तो कोणत्याही दिशेने दिसतो. सत्तावीस कळस हे सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत डाव्या बाजूला भव्य दीपमाळ दिसते. त्यासाठी घडीव दगडांचा वापर केला आहे.

आषाढी पौर्णिमेनंतर प्रथम येणा-या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची यात्रा भरते. त्याला देवीचा भंडारा असे म्हणतात. त्या दिवशी अकलाई मातेस मंगलस्नान, पंचामृती अभिषेक झाल्यावर महावस्त्र परिधान केले जाते. देवीला शृंगार करून महालंकार, महापूजा, महाआरती झाल्यानंतर तोफांची (दिवाळीतील विशिष्ट फटाक्यांना तोफा म्हणतात.) आतिषबाजी करण्यात येते.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा या काळात देवी मातेची दुग्ध स्नान, सुगंधी स्नान आदी विधिवत पूजा करण्यात येते. दशमीला सायंकाळी सीमोल्लंघनास सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला देवीची महापूजा व अलंकारपूजा केली जाते.

अकलाई देवी मंदिराची प्रदक्षिणा करताना मंदिराच्या मागील बाजूस काही देवदेवतांचे स्थान नजरेस येते. मंदिराच्या परिसरात बगीचा तयार करण्यात आला आहे. मोठ्या वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यांच्या बुंध्यांभोवती पार बांधले असून तेथे भाविकांना विसावा घेता येतो.

मंदिराच्या उजवीकडून जुना दगडी घाट नीरा नदीपर्यंत उतरत जातो. भाविक त्या घाटावरून नदीच्या पात्राजवळ जातात. तेथे नदीची पूजा करतात. घाटावर उभे राहिले असता नदीच्या पलिकडील इंदापूर तालुक्यातील परिसर नजरेस पडतो.

अकलाई देवीच्या मंदिरामागून वाहणा-या ओढ्याजवळ मोठा पूल तयार करण्यात आला आहे. त्या पुलावरून थेट मंदिराच्या पश्चिम दिशेला असणा-या यादवकालीन भुईकोट किल्यापर्यंत जाता येते. त्या‍ किल्याची पडझड झालेली असताना त्या‍ची डागडुजी करण्यात आली. त्याचे बाहेरुन तटबंदी असलेल्या बागेमध्ये रुपांतर केले गेले. त्यानंतर 16 जून 2008 रोजी त्या किल्‍ल्‍याचे रुपांतर 'शिवसृष्टी'मध्ये केले गेले. तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे.

कराडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणा-या शेणोली या गावीदेखील श्री अकलाई देवीचे मंदिर आहे. विशेष म्हणजे तेथे अकलाई देवीची दोन मंदिरे असून, एक गावात कराड-सांगली रस्त्यालगत सपाट जागेवर आणि दुसरे तेथून पाच किलोमीटर अंतरावर डोंगरावर आहे. गावातील मंदिर उत्तराभिमुख असून, डोंगरावरील मंदिर पश्चिमाभिमुख आहे. देवीची यात्रा होळीच्या दुस-या दिवशी भरते. त्यावेळी गावाच्या मंदिरातून पालखी डोंगरावरील देवीच्या मंदिरात जाते.

(माहिती स्रोत – अकलाई देवी मंदिराचे पुजारी)

– विठ्ठल आहेरवाडी

Last Updated On 17th September 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. आताच्या अकलूज चे मोगल कालीन
    आताच्या अकलूज चे मोगल कालीन नाव असदनगर असे होते.

Comments are closed.