साधारणपणे स्मशानभूमी म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते चित्र म्हणजे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले पत्र्याचे शेड आणि त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे ! पण मृतदेहावर अंत्यसंस्कार स्वच्छ, सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणी जिल्ह्यातील झरी या गावी आहे. झरीतील त्या स्मशानभूमीला आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे…
‘एक गाव एक स्मशानभूमी’ ही चळवळ परभणी जिल्ह्यातील झरी गावातून प्रवर्तित होत आहे. तो प्रयोग त्या गावाने व्यवस्थित राबवला आहे. झरी गावात लोकसंख्या वीस हजार आहे. तेथे विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. त्यांच्या प्रत्येकाच्या स्मशानभूमी असल्या तरी त्यांपैकी बहुतांश स्मशानभूमी गैरसोयीच्या विळख्यात सापडल्या होत्या. तेथे माणसांची ‘मरणानंतरही छळातून सुटका होत नसल्याचे’ चित्र होते. ते गावकऱ्यांना अस्वस्थ करत असे. गावातील प्रगतिशील शेतकरी कांतराव देशमुख यांच्या मनात गावात चांगली स्मशानभूमी असावी असा विचार आला आणि त्यांनी ते चित्र बदलून टाकले ! अर्थात त्यासाठी वीस वर्षे लागली. कांत देशमुख यांनी स्वतः एक एकर जमीन त्याकरता 2001 साली विकत घेतली. ती गावापासून एक किलोमीटर दूर अंतरावर, नदीजवळ आहे. त्यांनी ती जमीन स्मशानभूमीसाठी दान केली ! जिल्हा परिषदेच्या निधीतून स्मशानभूमीला संरक्षक भिंत व आतमध्ये शेड बांधण्यात आली. त्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास सुरुवात मागासवर्गीय व्यक्तीपासून झाली. तेव्हाच कांतराव देशमुख यांना ‘एक गाव एक स्मशानभूमी’ ही कल्पना सुचली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जाती-धर्मींयांसाठी योग्य असा कायापालट स्मशानभूमीचा केला ! स्मशानभूमीचे स्वरूप सुसज्ज आहे. कांत देशमुख हे सरपंचपदी पंचवीस वर्षे होते.
स्मशानभूमीत एका वेळी तीन हजार लोक बसू शकतील अशी सिमेंटची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. स्मशानात बसण्यासाठी सिमेंटचे बेंच करण्यात आले आहेत. त्यांवर मृत पावलेल्या व्यक्तींची नावे टाकून त्यांच्या स्मृती जागवण्यात येतात. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत विजेची जोडणी आणि पाण्यासाठी हातपंप व बोअरवेल यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंत्यविधी रथाची (ट्रॅक्टर) सोय मोफत आहे. त्यास स्वर्गरथ असे म्हटले जाते. खाजगी कंपनीकडे तशा वाहनाचे भाडे पाच हजार रुपयांपर्यंत असते. तो सात लाख रुपयांचा रथ कांत यांची कन्या मेघा देशमुख यांनी उपलब्ध करून दिला आहे.
स्मशानभूमी केवळ अंत्यविधीसाठी न वापरता इतर काही सामुदायिक कार्यक्रमांकरता उपयोगात आणली जाते. देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा त्याच ठिकाणी साजरा करण्यात आला. स्मशानभूमीत राष्ट्रप्रेमाचा जागर घडवून आणला गेलेला तो पहिला कार्यक्रम असावा. स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतींवर घोषवाक्ये लिहिली आहेत. त्यामध्ये ‘मातापित्याची सेवा’, ‘वृक्षारोपण, ‘मानवता’, ‘अंधश्रद्धा’, ‘मुलगी वाचवा’ अशा आशयपूर्ण संदेशांचा समावेश करण्यात आला आहे. मृत्यू अटळ आहे आणि शरीर नश्वर आहे ही जाणीवदेखील तेथे करून देण्यात येते.
विशेष म्हणजे तेथे मृत व्यक्तीच्या नावे ‘ऑक्सिजन पार्क’ आहे. झाडेझुडपे बरीच आहेत. देशमुख यांनी सुमारे हजारभर मोठमोठी, ऑक्सिजन पुरवण्यासाठी प्रसिद्ध वृक्षांची लागवड केली आहे. तेथून हिंडणे-फिरणे हा अनुभव आल्हाददायक आहे. रखरखत्या उन्हात गर्द सावलीचा आनंद मिळतो ! त्यामुळे स्मशानभूमीत अनेक प्रकारचे पक्षीदेखील विसावा घेताना आढळतात. परिसरातील शाळांचे विद्यार्थी परिसर अभ्यासासाठी तेथे येतात. कांतराव देशमुख यांनी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रमदेखील हाती घेतला आहे ! अंधश्रद्धेला छेद देणे हा त्यांचा हेतू आहे.
कांतराव देशमुख यांनी ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ हा विचार प्रसृत करण्यासाठी त्याच नावाच्या उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट स्मशानभूमी स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम येणार्या स्मशानभूमीला एक लाख रूपये व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. स्पर्धा परभणी जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. स्मशानभूमी सर्व जाती-धर्मांसाठी असली पाहिजे असे काही नियम व अटी स्पर्धेसाठी आहेत. या स्पर्धेला ऐंशीहून अधिक गावांनी प्रतिसाद दिला आहे !
कांतराव देशमुख यांनी झरी स्मशानभूमीसाठी ‘आयएसओ’ (ISO) हे मानांकन मिळावे यासाठी रीतसर नोंदणी केली. त्यांनी त्याकरता लागणारे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे या स्मशानभूमीला ‘आयएसओ’ मानांकन मिळू शकले आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळवणारी झरी गावातील स्मशानभूमी ही देशातील पहिली स्मशानभूमी ठरली आहे. ती ग्रामविकास संकल्पनेतील क्रांतिकारक घटना आहे. या चळवळीला परभणीप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातही काही प्रमाणात यश मिळाले आहे.
कांतराव देशमुख यांच्या संकल्पित चळवळीला व्यापक परिमाण आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे एका समाजसमूहाला स्मशानभूमी नसल्यामुळे चक्क ग्रामपंचायतीसमोर मृतदेहाचा अंत्यविधी करण्याची वेळ आली होती ! कोरोना महामारीच्या काळात स्मशानभूमीच्या प्रश्नाचे दाहक वास्तव देशातच नव्हे तर जगभरात समोर आले होते. त्यासाठी प्रत्येक समाजाने, शासकीय यंत्रणेने काळजी घेण्याची व त्यावरील उपाय शोधण्याची गरज आहे. ती गरज ओळखून झरीसारख्या गावाने केलेला हा ‘एक गाव, एक स्मशानभूमी’चा प्रयोग अभिनंदनीय व अनुकरणीय ठरला आहे. हा प्रयोग अंगीकारला, तर प्रत्येक गावात ‘एक सुंदर, स्वच्छ स्मशानभूमी’ पाहण्यास वेळ लागणार नाही.
परभणी जिल्ह्यातील झरी गावाने स्वत: ‘एक गाव एक स्मशानभूमी’ स्थापन केलीच; त्या एकाच ठिकाणी सर्व जातिधर्मांचे अंत्यविधी होऊ लागले. त्याबरोबर झरी गावच्या कांत देशमुख यांनी ही चळवळ जिल्हाभर फोफावेल असे प्रयत्न केले. त्यांनी झरी गावच्या स्मशानभूमीस आयएसओ मानांकन मिळवले. ग्रामविकास संकल्पनेतील ही क्रांतिकारक घटना होय !
कांतराव देशमुख 9423776600 kantraodeshmukh@gmail.com
– विकास पांढरे 9970452767 Vikaspandhare3@gmail.com
(मूळ आधार –‘तरुण भारत’मधील लेख – 28 ऑगस्ट 2022; संस्कारित-संपादित)
———————————————————————————————————————————————————————