तेजस्वी बाळासाहेब सातपुते ही आय पी एस पदी विराजमान झाली आहे आणि त्यामुळे ती शेवगावची सुकन्या ठरली आहे. तिने स्थानिक ज्ञानदीप विद्या मंदिरातून प्राथमिक शिक्षण, बाळासाहेब भारदे हायस्कूलमधून मराठी माध्यमातून माध्यमिक शिक्षण घेतले. तिला चौथी व सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तम यश प्राप्त झाले. तिने दहावीच्या परीक्षेत पुणे विभागीय मंडळाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तेजस्वीने पुढेही शेवगावच्याच न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. या प्रत्येक ठिकाणी स्वत:ची वाट व निवड ठरवताना तिने तिच्या स्वतंत्र विचारांची चुणूक दाखवली. अर्थात पालकांची साथ तिला होती.
तिने पदवी शिक्षणासाठी बी एस्सी (बायो-टेक) सारखे सर्वस्वी वेगळे क्षेत्र निवडले. तिने बारामतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेत पदवीचा अभ्यास केला. तिची शिक्षण घेत असताना, गुणवत्तेच्या जोरावर बंगलोर येथे जैव-तंत्र संशोधक म्हणून निवड झाली आणि ती बारामती सोडून बंगलोर येथे संशोधकपदी रुजू झाली. पण तिने तडकाफडकी ते क्षेत्र सोडले. तिच्या हातात फक्त बीएस्सी ही एकमेव पदवी होती. त्या टप्प्यावर तिने शांतपणे कायद्याच्या शिक्षणासाठी पुणे येथे प्रवेश घेतला. त्या सोबत तेजस्वीने महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ती पहिल्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून ती पोलिस उपनिरीक्षकपदी निवडली गेली. तिच्या आई प्राथमिक शिक्षिका आहेत. त्यांची शिस्त व शांत स्वभाव आणि संयमी पण तितकेच खंबीर असे व्यक्तिमत्त्व आहे असे तेजस्वी सांगते. तेजस्वीने घेतलेले निर्णय अचानक अनेकदा बदलले.
तेजस्वीची पोलिस-उप-निरीक्षकपदी निवड झाली तेव्हा आई-वडिलांसह सर्वांनाच आनंद झाला. पण तो आनंद औट घटकेचा ठरला, कारण तिने ते पद स्वीकारायचे नाही असा निर्णय घेतला. हा निर्णय का घेतला याचे स्पष्टीकरण देताना तिने वडिलांना जे वाक्य सांगितले ते तिच्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे- “मी आयपीएससुद्धा सहज होऊ शकेन पण मला फक्त एक वर्ष द्या मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होईनच!” खरोखरीच, तिने पुढच्या वर्षी आयपीएस ही पोस्ट मिळवली !
शेवगाव तालुक्यातून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिली व्यक्ती ! ती मुंबई शहर पोलिस उपायुक्तपदी कार्यरत आहे. या आधी ती सोलापूरला होती. तेथेही तिने तिच्या क्षमतेची चुणूक दाखवली. तेथील तिच्या कामगिरीचा उल्लेख करायचा तर सोलापूर ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्या जिल्ह्यातील हातभट्टी व्यवसायावर मोठ्या धाडसाने कारवाई केली. त्यातून तो प्रश्न सुटलाच, परंतु तेजस्वीच्या मनाची विधायकता अशी, की त्या व्यवसायात प्राधान्याने असलेल्या बंजारा समाजातील स्त्रियांना तिने पुनर्वसनाचे साधन उपलब्ध करून दिले. तेजस्वीने त्या महिलांना साड्यांवर कलाकुसर करण्याचे प्रशिक्षण दिले व पुढे जाऊन त्यांना Online बाजारपेठेतील मार्केट उपलब्ध करून दिले. तिने पुरुष मंडळींना विविध व्यवसाय सुरू करण्यास मदत केली. या सामाजिक परिवर्तनशील उपक्रमाचा गौरवाने उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केला.
तेजस्वीच्या या प्रवासाकडे पाहताना जाणवणाऱ्या ठळक गोष्टी म्हणजे, तिने ती ग्रामीण भागातील आहे आणि तिने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे याचा न्यूनगंड येऊ दिला नाही. तिने इंग्रजीचा सराव व्हावा यासाठी मैत्रिणींशी सतत इंग्रजी संभाषण केले. तिने युपीएससीची मुलाखतही मराठी माध्यमातून दिली. भाषा हे संवादाचे माध्यम आहे, तुमचे म्हणणे समोरच्याला कळणे महत्त्वाचे आहे हे तिचे सांगणे ! माणसाने त्याला मनापासून पटणारी गोष्टच करावी, लोक काय म्हणतील याचा विचार करू नये हे तिने तिच्या कृतीतून दाखवून दिले आहे.
तेजस्वीचा प्रशासकीय प्रवास सुरू झाला आहे, तिची कार्यपद्धत आणि चौकटीबाहेरचा विचार करण्याची पद्धत पाहिली तर ती या क्षेत्रात किरण बेदी यांच्याप्रमाणे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करेल यात तीळमात्र शंका नाही !
– उमेश घेवरीकर 9822969723
umesh.ghevarikar@gmail.com
—————————————————————–