Home वैभव मराठी भाषा इंटरनेटवरील मराठी लेखनाबाबत (Writing Marathi for Internet few Tips)

इंटरनेटवरील मराठी लेखनाबाबत (Writing Marathi for Internet few Tips)

2

इंटरनेटवरील वाचनासाठी मराठीचे नवे रूप विकसित होणे गरजेचे आहे असे जाणवते. तेथे जगभरचे वाचक असणार, त्यामुळे लेखनातील स्थानिक संदर्भ व संपर्क आणि लकबी यांचे प्रमाण कमी करावे लागेल. जर तसा उल्लेख आवश्यक असेल तर तो पूर्ण तपशिलानिशी करावा. जे स्थानिकवैशिष्ट्यच आहे व टिकवण्याची गरज आहे त्याचे वर्णन सर्व खुलाशांसह लेखनात ठेवावे लागेल.

शब्दचित्र हा लेखनप्रकार यापुढे अधिक प्रभावी ठरेल का? असाही विचार मनात येतो. यथाकाल त्याला व्हिज्युअलची जोड द्यावी लागेल. अर्थात, त्यामुळे मराठीचे वाचन कमी होईल, पण तो काळाचा महिमा आहे. थिंक महाराष्ट्रवर गावगाथा नावाचे सदर आहे. वाचणारा माणूस त्या गावी जाणार नसतो. म्हणून तो जणू त्या गावी पोचल्यावर त्याला जसे दिसेल तसे गावाचे शब्दचित्र हवे. तीच गोष्ट व्यक्तिपर लेखनाचीदेखील आहे.

—————————————————————————–—————————————————————–

जग क्षणोक्षणी बदलत असते. तो अनुभव प्रत्येकाचा आहे. तो बदल माणसाला हवा तसा घडवून आणायचा असेल, तर त्याने वाचन केले पाहिजे. त्यामुळे तो स्वत: शहाणा होतो त्याची कल्पनाशक्ती जागृत होते. म्हणजेच प्रतिभा! होय. ती प्रत्येक माणसाजवळ असते. ती प्रत्येकाला व्यक्त करता येतेच असे नाही. म्हणून मग माणसाचे मन त्याचे त्याच्याशी, वाचता वाचता चालू-बोलू लागते. ते क्षणात सहा खंड आणि सात सागर फिरून येते स्वत:चे स्वत:ला काही सांगू लागते. त्याला चिंतन म्हणतात. चिंतन म्हणजे विचार नव्हे. विचार म्हणजे मुद्यांची संघटित शृंखला. ते सुचण्यासाठी भरपूर वाचत राहवे लागेल, त्याच्याशिवाय विचार निर्मिती व दर्शन यांसाठी माणसाच्या मेंदूची मशागत होणार नाही. विचारप्रकटन ही माणसाची शहाणपणाच्या पुढील पायरी आहे. ती माणसाला उन्नत अशा प्रगल्भावस्थेकडे नेते. माणूस वाचनाने प्रगल्भ होतो, मोकळा होतो, उदार होतो, समंजस होतो.

——————————————————————————————————————————

          समाजाला साहित्यसंस्कृतीतील नवा कंटेण्ट हवा आहे. त्याला आशय हा शब्द समजत नाही असे नाही. पण कंटेण्टची गंमत कंटेण्टमध्येच आहे हे जाणले पाहिजे. तो शब्द मराठी होऊन गेला आहे. मराठी (व एकूणच सर्व जागतिक भाषा) बिघडत आहे(त) व घडतही आहे(त).

कंटेण्ट कशा लेखनपद्धतीने सादर करावा हाही चर्चेचा एक मुद्दा असतो. काहींना त्यातील लालित्य महत्त्वाचे वाटते तर काहींना माहिती. थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमने गेल्या बारा वर्षांत या दोन्ही पद्धती अवलंबून पाहिल्या आहेत. लेखन वाचनवेधक असावे. त्यासाठी वाक्ये सुटसुटीत व छोटी करावी. उपमा, उत्प्रेक्षांचा बडिवार ठेवू नये. लालित्य शब्दांचे नसावे तर रचनेचे असावे व रचनेच्या माध्यमातून मजकूर वाचकास सरळ भिडावा असा प्रयत्न ठेवला गेला आहे. त्यास व्हिज्युअल्सची यथाशक्य सोबत असते. बदलत्या जमान्यात थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमचे सादरीकरण मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत असावे असे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमने मेमोरंडममध्ये नमूद केलेले आहे.

——————————————————————————————————————————

इंटरनेटवरील वाचक झपाट्याने वाचत जातो, तो वाचनप्रक्रियेत फार वेळ घालवत नाही, त्यामुळे लेखकाचे मुद्दे जाणून घेऊन ते वाचकांपर्यंत सुगम रीत्या पोचावेत ही त्या लेखनावरील संपादकीय संस्कारांमागे इच्छा असते. त्यामुळे इंटरनेटवरील लेखनशैली विकसित होत जाते.

——————————————————————————————————————————

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हे वेबपोर्टल संचिताचे डॉक्युमेंटेशन, समकालीन विषयांवरील चर्चा व भविष्यवेध अशा तीन अंगांनी चालवले जाते. समकालसुद्धा तिशीतील सजग तरुणांपासून नव्वदीतील ज्येष्ठांपर्यंतच्या लोकांनी व्यापला आहे. त्यांच्या भाषा-वर्तन संमिश्र आहेत अधिक संमिश्र होत जाणार आहेत हे ध्यानी घेऊन, आम्ही लेखनावर जरा वेगळे संस्कार करतो. कम्युनिकेशन, विशेषत: तरुणांशी सुगम करणे हा विचार सतत मनात असतो. मुद्रित व इंटरनेट या दोन माध्यमांतील फरकामुळेसुद्धा आम्हाला लेखनावर संस्कार करणे, त्यात सुटसुटीतपणा आणणे अशा गोष्टी गरजेच्या ठरतात.

मुद्रित लेखनाचे संकेत गेल्या दोनशे वर्षांत विकसित होत गेले आहेत. लेखनासाठी व पुढे मुद्रणासाठी प्रमाणभाषा गरजेची झाली. प्रमाणभाषा ही महत्त्वाचीच, कारण त्यामुळे लेखन विशाल जनसमुदायापर्यंत जाते. लेखन हव्यासाने, अभिमानाने बोलीभाषेत केले तर ते मर्यादित जनसमुदायापुरते राहते.

———————————————————————————————-——————————–

मराठी भाषा-संस्कृती संवर्धन हे महत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे सुधारणेची सतत जाणीव आणि त्यासाठी कष्ट ही गरजेची गोष्ट असते. विद्यार्थी असताना, परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिली, की ती परत वाचा असे शिक्षक बजावून सांगत असतात, विद्यार्थी ते कधीच ऐकत नाहीत. शिक्षकांच्या सांगण्याचे महत्त्व आता लक्षात येते. लेखनाचे पुन्हा वाचन जबाबदारीचेदेखील आहे, कारण लेखकाचे लेखन आमजनतेसमोर जाणार असते. स्वत:चे लेखन स्वत: परत वाचल्याने त्यात बरीच सुधारणा होऊ शकते. तसेच, संपादकांकडून संस्कारित होऊन आलेला लेख स्वत:च्या मूळ लेखनाशी ताडून पाहिला तरीही खूप गोष्टी कळून जाऊ शकतील.

लेखनाचे संस्करण म्हणजे काय केले जाते? तर त्याचे व्याकरण सुधारले जाते आणि त्याचे शैलीसातत्य व संदर्भ अचूकता तपासली जाते. भाषेकडे मधील एकेकाळी फार विशुद्ध व स्वयंभू रूपाने पाहिले जाई; शब्द आणि अक्षर यांचे मोल अपार गणले जाई, परंतु आधुनिक काळात भाषेकडे तिच्या रास्त महत्त्वाने पाहिले जाते. भाषा म्हणजे कम्युनिकेशन स्कील. ते प्रभावी व्हावे यासाठी सारा खटाटोप असतो. लेखकाचे लेखन वाचकाकडून औत्सुक्याने वाचले जावे व ते त्यास समजावे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी लेखनातील तपशील भरपूर व बिनचूक हवेत, त्यांची मांडणी संगतवार व वेधक हवी आणि ते वाचकास कळण्याच्या दृष्टीने सुगम हवे.

त्यासाठी काही दंडक सहज पाळता येतात : १. वाक्यरचना सहसा कर्ता-कर्म-क्रियापद अशी असावी. ती धाटणी सर्व वाक्यांना संगतवार अवलंबली जावी. २. विशेषणे-क्रियाविशेषणे असे वाक्य सजवणारे घटक योग्य त्यांच्या महत्त्वाने व योग्य ठिकाणी आहेत ना हे सतत तपासत राहवे. काही दिवसांनंतर तशी सवय लेखकाच्या हाताला व बुद्धीला होते.

लेखकाचा जो लेखविषय असेल त्यासंबंधातीलच लेखन करावे. त्याची कौटुंबिक माहिती, इतर छंद-वाचन, जीवनशैली वगैरे अशी माहिती द्यावी. काही कारणाने लेखनात नवीन विषय आला तर तो वेगळा लेख करावा. तो मूळ लेखास लिंकने जोडता येतो.

—————————————————————————————–————————————-

मराठी वाचकांची जिज्ञासा किमान पातळीवर आहे. तो रुढिबद्ध, सांकेतिक, परंपरानिष्ठ जे ती वाट चोखाळू पाहतो. त्याला बौद्धिक वातावरणाची झलक दाखवता येते. संकल्पित मराठी विद्यापीठात पारंपरिक ज्ञान व आधुनिक मुख्यतः व्यवसायज्ञान यांची सांगड घालायची आहे. थिंक महाराष्ट्र हे त्यासाठी पहिले पाऊल आहे. त्यामुळे तेथे सांकेतिक व आधुनिक यांचा समन्वय घालता येईल का असा प्रयत्न आहे.

——————————————————————————————————————————

पोर्टलवरील लेखन कोणत्याही काळी वाचले जाऊ शकेल. म्हणजे लेख प्रसिद्ध होताच- लगेच, दोन-चार वर्षांनी वा पंचवीस वर्षांनीही. तो दंडक लेखनाचे सादरीकरण, त्याची लेखनशैली व त्यातील कालनिर्देशन या तिन्ही मुद्यांबाबत मनी ठेवावा म्हणून

  • वाक्ये सुटसुटीत व छोटी असावीत. त्यात क्लॉझेस नसावेत.
  • मराठी लेखनाची धाटणी कर्ता-कर्म-क्रियापद अशी आहे. ती लेखकाच्या शैलीनुसार बदलता येते. परंतु ती रचना सहसा अधिक कम्युनिकेटिव ठरते.
  • लेखाची लांबी (शब्दसंख्या) हा मुद्दा चिकित्सकपणे वापरावा लागेल. वेबपोर्टलवरील लेखन अॅडलेडपासून नांदेडपर्यंत व अधिक खोलवर वाचले जाते असा अनुभव आहे. त्यांना वाचनीय वाटेल असा लेख हवा. तशी त्याची लांबी हवी. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यापासून गावच्या हार्मोनियमवादकापर्यंतचा लेख पोर्टलवर असणार. दोन प्रकारच्या लेखांची लांबी तारतम्याने ठरवलेली हवी. पुन्हा इंटरनेटवर लिंक्सची सोय असते. त्यामुळे मुद्यांनुसार, लेखाचे विभाजन करता येऊ शकते व ते परस्पर लिंक्संनी जोडता येतात.

 ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमचाही हा प्रयोगच आहे. इंटरनेटवर विशेषत: संमिश्र समाज वाचत असतो. त्यामुळे छोटी वाक्ये, रचना सुटसुटीत अशी झटापट चालू असते. त्यात कधी यश वाटते, कधी गुंता वाढल्यासारखे जाणवते. मराठी लेखनात आपण/आपले असे शब्द रूढपणे वापरले जातात. कित्येक अन्य भाषिक, अहिंदू किंवा धर्मविधी न मानणारे लोक कुतूहलापोटी वाचतात. इंटरनेटवर तर हे लेखन जगभरच्या अनेक देशांत वाचले जाण्याची शक्यता असते. त्यांना आपले/आपण हे शब्द खटकणार नाहीत का? त्यामुळे वाचक दूर लोटला जातो. लेखन धर्म-गट-जात-व्यक्तीनिरपेक्ष, वस्तुनिष्ठ हवे. वाक्ये छोटी करावी. आधीच लोक कमी वाचतात, त्यात कॉम्प्लेक्स वाक्य आले तर वाचक तिकडे फिरकणार नाही. लेखन रिडर फ्रेंडली व म्हणून कम्युनिकेटिव्ह ठेवावे. नेटवरील भाषाशैली सध्या तेथे क्रियाशील असलेल्या मराठी भाषी लोकांनी विकसित केली पाहिजे असे आमचे मत झाले आहे.

दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com

 

——————————————————————————————————————————————————————————-

 

 

About Post Author

Previous articleमुहूर्त मराठी विद्यापीठाचा – उद्देश संस्कृतिसंवर्धनाचा (Appeal for Marathi language university)
Next article(मराठी) भाषेला पर्याय आहे! (The Possibility of Visual Language)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

2 COMMENTS

  1. नमस्कार दिनकर गागंल हयानी इंटरनेटच्या वास्तवाचे भान नेहमीच ठेवले आहे. गोठलेले मराठी संस्कृतिचे अनेक ऊभे आडवे धागे इंटरनेट माध्यमाने मोकळे केले. जागतिक संपर्क व कम्युनिकेशन भौगोलिक सीमा तोडून नव्या संस्कृतीचे चांगले व वाईट दोन्ही दाखवत आहेत. थिक महाराष्ट्र डॅाट वेब हा मोठा संदर्भ जागतिक स्तरावर होणारं माध्यम हे गांगल ह्याचे व त्याच्या टिमचे योगदान आहे. अर्थात माहिती सुरक्षिततेसाठी सावध रहाणे वाचकांचे काम राहिल. सस्नेह रंजन र. इं . जोशी ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version