‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)

0
144

माझे अवांतर वाचन शाळेत, पाचवीला असल्यापासून सुरू झाले होते… नववीची वार्षिक परीक्षा झाल्यावर उन्हाळी सुट्ट्या होत्या. तेव्हा मी वयाने चौदा वर्षांचा असेन. त्या सुट्टीत मला एका मित्राच्या घरी बार्इंडिंग केलेले एक जाडजूड पुस्तक दिसले. त्याच्या मामाचे गाव औरंगाबाद. त्याने ते पुस्तक मामाच्या घरी अडगळीत पडलेले म्हणून येताना बरोबर गावी आणले होते. पुस्तकाचे नाव होते, ‘मर्मभेद’. त्याची आधीची आणि नंतरची पाने गायब होती, तरी पुस्तक पूर्ण होते, पण पुस्तकाच्या लेखकाचे नाव समजण्यास मार्ग नव्हता. पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि पुस्तकात तुडुंब बुडालो. तहान, भूक आणि बाहेर बालमित्रांसोबत खेळणे विसरून, पूर्ण पुस्तक वाचूनच विसावलो ! पुस्तक जाडजूड असूनही मी ते तीनचार दिवसांत वाचून पूर्ण केल्याचे आठवते. त्या पुस्तकाने खूप वेगळा, निखळ आनंद दिला. तो तसाच कायम आहे. त्या पुस्तकाचा माझ्या मनावर झालेल्या गारुडामुळेच माझ्या पुतण्याचे नाव मी त्या कादंबरीतील राजपुत्राच्या नावावरून ‘कुणाल’ असे ठेवले आहे. मी एका नियतकालिकात लिहिलेल्या धर्म आणि राजकारण यांवरील उपरोधपर सदरालाही ‘मर्मभेद’ नाव दिले होते.

पुस्तकातील दमदार, कमावलेली सौष्ठवपूर्ण भाषा, जबरदस्त शब्दफेक, मोठमोठी संयुक्त वाक्ये, कथानकात गुंगवून ठेवणारी कौशल्यपूर्ण वातावरण निर्मिती, उपरोधिक-उपहासिक संबोधने, ढोंगी भाषणे, घटनांना कलाटणी देणारा नाटकीय ढंग, प्रचंड मोठ्या भौगोलिक क्षेत्रात घडणार्‍या घटनांचा पडसाद, राजकारणात टहाळबन (स्पष्टपणे) दिसून येणारे एकाहून एक मोठे लबाड नमुने आणि तशा वातावरणात तुरळक आढळणारे प्रामाणिक लोक… अशी काही बलस्थाने त्या कादंबरीची सांगता येतील. कादंबरीत उपयोजलेल्या अनेक शब्दांचे अर्थ मला माहीत नसूनही पुस्तकातील गहन शब्दांचे केवळ ‘भावन’ होत. ते शब्दधन माझ्या मनावर गारूड करून गेले होते. ती कादंबरी लिहिण्यापूर्वी लेखकाने केलेला अभ्यास (त्या वयातही) माझ्या लक्षात आला होता. लेखकाने राजघराण्यांचे खूप जवळून अवलोकन केल्याचे ध्यानात आले होते. पुस्तक वाचताना वाटत होते, की त्या वास्तव घटना असाव्यात आणि त्या घटना घडतेवेळी लेखक तेथे स्वत: उपस्थित असावा !

राजा, राजपुत्र आणि पाताळयंत्री (हा त्याच पुस्तकात मला पहिल्यांदा सापडलेला शब्द. अर्थ न समजूनही त्या कादंबरीतील असे अनेक शब्द मला भुरळ घालत गेले.) राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा त्या कादंबरीची असली, तरी मांडणी मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक- प्रतीकात्मक अशी. कथेचा मोठ्या आवाक्याचा विशिष्ट घाट आणि संस्कृतप्रचुर जड भाषाशैली. मात्र तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत जबरदस्त गुंतवून ठेवणारी.

‘मर्मभेद’ कादंबरी वाचून मला चाळीसहून जास्त वर्षे झाली, पण तितक्या ताकदीचे दुसरे पुस्तक अजून माझ्या हातात आले नाही. जी.ए. कुलकर्णी यांचा ‘पिंगळावेळ’ कथासंग्रह वाचताना मात्र ‘मर्मभेद’च्या तोडीचे मी वाचत आहे हे लक्षात आले. विशेषत: ‘स्वामी’ कथेशी त्या पुस्तकाच्या शैलीची तुलना महत्त्वपूर्ण म्हणून मनात नोंदली गेली आहे. त्यात साहित्यमूल्य, कलामूल्य यांची तुलना मनात नाही, तर वातावरण निर्मिती व संयुक्त वाक्यरचना अशा गोष्टी डोक्यात जास्त आहेत.

तेव्हापासून ते पुस्तक केव्हा ना केव्हा मला सारखे आठवते. मी अनेक साहित्यिक मित्रांशी, त्या पुस्तकाचा आणि त्याचा लेखक माहीत नसल्याचे बोललो आहे. अनेकांनी सांगितले, की ते शशी भागवत यांचे पुस्तक असावे. शशी भागवत यांची इतर पुस्तके माझ्या वाचनात आलेली नाहीत. कारण त्यांची इतर पुस्तकेही त्याच ताकदीची असतील का वगैरे शंका मनात असतात.

मी तरुणपणी काही मित्रांना सोबत घेऊन विरगावला ‘संदेश वाचनालय’ सुरू केले होते. मी माझी अनेक संग्रहित पुस्तके वाचनालयाला भेट दिली. ते पुस्तकही मित्राने वाचनालयाला भेट दिल्याचे आठवते. मी ते पुन्हा एकदा वाचावे असे वाटल्याने शोधण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण ते पुस्तक वाचनालयात सापडले नाही.

– सुधीर देवरे 7588618857 drsudhirdeore29@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here