कधीतरी, कसलीशी दुखापत होते आणि अनपेक्षितपणे आयुष्याचा सुकाणू पुढच्या दिवसांची वेगळीच दिशा दाखवतो. चालत्या-फिरत्या राजश्री पाटील या तरुण मुलीच्या आयुष्यात एका अपघातामुळे चाकाच्या खुर्चीला खिळून बसण्याचे दिवस आले, तरी मनाच्या पंखांना आकाश दिसत होतेच ! त्या एका बारीकशा धाग्याला घट्ट पकडून त्याचे सक्षम विचारप्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे, काम करण्याचे धारिष्ट्य आणि धमक या चमक नावाच्या गावातील मुलीत कशी आली असेल? वाचणाऱ्या वाचकांना सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या तिच्या कामाची ओळख. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.
– अपर्णा महाजन
———————————————————————————————————–
खुर्चीची चाके आणि मनाचे पंख
अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील चमक (बुद्रुक) या छोट्याशा गावातील, कृतिशील कार्य करणाऱ्या राजश्री पाटील या तरुण कार्यकर्तीला ‘स्नेहालय’ संचालित ‘स्नेहाधार, पुणे परिवारा’तर्फे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कार’ अपंगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी जाहीर झाला. समाजसेवकांचे खंदे पाठीराखे प्रकाश शेठ यांनी ही गोष्ट जेव्हा मला कळवली, तेव्हा मनापासून आनंद झाला. ‘निवेदिता प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा ‘ललना कलारत्न पुरस्कार’ही तिला नुकताच मिळाला आहे.
राजश्री पाटील हिचे चमक हे गाव. एका अपघातात मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे चाकांच्या खुर्चीला खिळलेली राजश्री सकारात्मकपणे स्वतःच्या पायांवर उभी आहे. ती इतरांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. ती नागपूरच्या ‘अंकुर सीड्स’मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने गावाकडे, घरी राहूनच नोकरी करत आहे. तिच्या गावाला लागून चमक (खुर्द) आणि सुरवडे ही दोन गावे आहेत. साधारण प्रत्येकी दोन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या त्या कोणत्याही गावात वाचनालय नाही. राजश्रीने तेथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रदीप लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ग्यान-की’ वाचनालय सुरू केले आहे. पंचक्रोशीतील तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वाचनालय असावे अशी तिची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही सुरू केले होते, पण तिला कोठूनच सकारात्मक प्रतिसाद मात्र मिळेना.
साधारण तीन वर्षांपूर्वी, म्हणजे जानेवारी 2020 मध्ये आमची मुंबईत भेट झाली, तेव्हा ती माझ्याशी या विषयासंदर्भात बोलली. मी पुण्याच्या स.प.महाविद्यालयाच्या, समाजासाठी ठोस कार्य करू इच्छिणाऱ्या ‘दिव्यझेप’ या विद्यार्थी-समूहाच्या प्रमुख योगिता काळे, त्यांची मैत्रीण स्वरूपा देशपांडे व काही विद्यार्थी यांच्याशी 26 जानेवारी 2020 रोजी चर्चा केली. त्यानुसार, आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. राजश्रीने तिच्या गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक पातळीवरील नियोजन व व्यवस्थापन करावे आणि आम्ही लोकांकडून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील पुस्तके गोळा करून तिच्याकडे पाठवावी असे ठरले.
निर्णय झाला तेव्हा, पहिल्याच दिवशी स्वरूपा देशपांडे यांच्याकडे दीडशेपेक्षा जास्त पुस्तके आली. ‘दिव्यझेप’च्या सर्व विद्यार्थ्यांनी मोबाइलवर स्टेटस ठेवून, फोन-कॉल्सद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटून, या प्रकल्पाबद्दल सगळ्यांना सांगण्यास सुरुवात केली. हळुहळू पुणे, मुंबई, ठाणे येथून स्वतःहून अनेकांचे फोन येऊ लागले. कोणाकडून एक, कोणाकडून दोन-तीन तर काहींकडून अनेक अशी पुस्तके येऊ लागली. स्वरूपा देशपांडे यांचे घर पुस्तकांनी भरू लागले. ‘दिव्यझेप’चे विद्यार्थी स्वतःचे लेक्चर करून, काम आवरून देशपांडे यांच्या घरी जमू लागले. तुषार, कुणाल, रोहित आणि अभिषेक कोठूनही पुस्तके आणण्याचे म्हटले, की लगेच जाऊन घेऊन येत. प्राची व अभिषेक, दोघेही जॉब करणारे, पण दोघेही ऑफिसनंतर न थकता लगेच कामाला लागत. ईश्वरी, समीक्षा, वैष्णवी, नेहा, अनिकेत, शार्दुल, ईर्षा, मृण्मयी, जान्हवी, चिन्मयी हे सगळे जण पडेल ते, असेल ते काम हाती घेऊन पूर्ण करत. त्या प्रकल्पात सहभागी झालेले बरेचसे विद्यार्थी वसतिगृहावर राहणारे; पण स्वरूपा देशपांडे यांच्या घरी आल्यावर त्यांना घरचे जेवण आणि आईचे प्रेम… दोन्ही मिळे. दुपारी थंड सरबत… पाचनंतर कडक चहासोबत बिस्कीट असा ‘ब्रेक’ ठरलेला. देशपांडे यांच्या घरातील सर्वच… स्वतः स्वरूपा, तिची कन्या प्राजक्ता, सासूबाई आणि पती आस्थेने लक्ष देत होते. पुस्तकांची संख्या शंभर, दोनशे, पाचशे अशी वाढत गेली. पुस्तके जशी येत गेली, तसे आम्ही त्याबाबत नियोजन करत गेलो. मुलांना सुरुवातीलाच कशा प्रकारे वर्गवारी करावी, याबाबत काही प्रमाणात कल्पना दिली. त्यानुसार पुस्तकांची कथा-कादंबरी, कविता, शैक्षणिक, माहितीपर, प्रेरणादायी, आध्यात्मिक, आहार, बालसाहित्य, धार्मिक अशी वर्गवारी करून त्यांची यादी तयार केली. शेवटी, जवळपास सोळाशे पुस्तके चमक-सुरवडा सार्वजनिक वाचनालयासाठी जमा झाली. वाचनालयात लागणारी ‘लायब्ररी कार्ड्स’ही छापून तयार झाली.
पुण्यात अशी तयारी सुरू असताना तिकडे राजश्री शांत बसली नव्हती. ती गावकऱ्यांशी त्याबाबत बोलत होती; वाचनालयाची आवश्यकता समजावून सांगत होती. तिचे म्हणणे गावकऱ्यांना पटले आणि गावातूनही मदतीचे हात पुढे आले. काही गावकऱ्यांनी वाचनालयासाठी लागणारी पुस्तकांची खास कपाटे घेऊन दिली. वाचनालय कोठे सुरू करावे असा जागेबाबतचा प्रश्न निर्माण झाला. ग्रामपंचायतीकडे जागा नव्हती. तेव्हा एक सहृदय गावकरी पुढे आले. त्यांनी स्वतःची जागा वाचनालयासाठी दुसरी सोय होईपर्यंत उपलब्ध करून दिली.
पुस्तके राजश्रीकडे चमक गावी पाठवायची होती. मुले म्हणाली, ‘आपण जाऊ या का ग्रंथालय सेट करून द्यायला?’ अर्थात, याचे उत्तर ‘होकारार्थी’ मिळाले. मग काय… लागले सगळे तयारीला. सोळा सीटर बस करून 13 मार्च रोजी तीन मुलगे व दहा मुली यांसह योगिता काळे आणि स्वरूपा देशपांडे या दोघी सगळी पुस्तके घेऊन अमरावतीकडे निघाल्या. ओंकारराव कोरडे आणि प्राजक्ता देशपांडे यांच्या हस्ते ‘चमक-सुरवडा सार्वजनिक वाचनालया’चे उद्घाटन 15 मार्च 2020 रोजी झाले.
तीन वर्षे त्या परिसरातील चाळीस शालेय विद्यार्थी व तरुण-तरुणी वाचनालयातील पुस्तके वाचण्याचा लाभ घेत आहेत. गावातील महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनकट्ट्यासारखे उपक्रम सुरू करण्याचे ठरले आहे. वाचनालयाचे काम नियमितपणे पाहण्यासाठी हर्षा या महिलेची नेमणूक केलेली आहे. तिला दरमहा ‘स्पर्शज्ञान’तर्फे मानधन दिले जाते. वाचनालयाची उपयुक्तता लक्षात आल्यावर ग्रामपंचायतीने एक छोटे वाचनालय बांधून देण्याचा ठराव मंजूर केला आहे. लवकरच, चमक-सुरवडा सार्वजनिक वाचनालय स्वतःच्या जागेत उभे राहील !
आचार आणि विचार यांत ओतप्रोत चांगुलपणा आणि सद्भाव भरलेली राजश्री तेथेच थांबलेली नाही. ती मणक्याचे आजार असलेल्या अनेकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. तिने अमरावती येथे ‘व्हीलचेअर बास्केटबॉल असोसिएशन फॉर रुलर डिसेबल्ड’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्यात ती चाकांच्या खुर्चीवर बसून बास्केटबॉल कसे खेळावे याचे प्रशिक्षण देते. तसेच, राज्यभरात जाऊन मणक्याच्या आजाराने किंवा दुखापतीमुळे अपंग झालेल्यांना रोजच्या जगण्यात येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जावे, याचेही प्रशिक्षण देते. तसेच, ती मणक्याच्या आजाराने किंवा दुखापतीमुळे अपंग झालेल्यांसाठी तिच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘अनाम प्रेम स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी पुनर्वसन केंद्रा’ची मार्गदर्शक म्हणूनही काम पाहत आहे. आमचे जेव्हा जेव्हा बोलणे होत असते, तेव्हा तेव्हा आपण अपंगांसाठी आणखी काय काय करू शकतो, हाच विषय असतो.
राजश्री पाटील 7350767075
– स्वागत थोरात 9223217568 sparshdnyan@gmail.com
—————————————————————————————————————
अशा अनेक मनांना पंख लाभतो आणि लहान गावांमध्ये अनेक ग्यानकी अस्तित्वात येवोत.
खूप प्रेरणादायी प्रवास आहे राजश्रीचा!
छान शब्दांकन
सुंदर आलेख मांडला.
एका छान स्वप्न पूर्तीचा.
त्यासाठी अनेक सुहृद मदतीला येतात हेही छान उमजले.
वाचाल तर वाचाल . राजश्री ताई तुमच्या ह्या प्रेरणादाई कमाला खुप खुप शुभेच्छा.
प्रेरक प्रवास
समर्पक शीर्षक, प्रेरणादायी लेख. चांगल्या कामासाठी मदत करायला अजूनही समाजात अनेक हात उभे आहेत हे वाचून समाधान वाटले. राजश्री आणि ‘दिव्यझेप’ च्या विद्यार्थ्यांना सलाम……
खुर्चीच्या चाकापेक्षाही मनाच्या पंखांची भरारी उत्तुंग ठरु शकते हे राजश्रीने सिद्ध केले… तिच्या पंखातले बळ दिवसेदिवस वाढत जावो या सदिच्छेसह तिचे खूप खूप अभिनंदन .. सहयोगी टीम अफलातून आहे …. निश:ब्द ….
समर्पक शीर्षक आणि प्रेरणादायी लेख. चांगल्या कामासाठी मदत करणारे लोक समाजात आहेत हे वाचून खूप समाधान वाटलं. राजश्री आणि ‘दिव्यझेप’ च्या विद्यार्थ्यांना त्रिवार सलाम……
राजश्री तुझ्या पंखांना असेच बळ मिळोत ही सदिच्छा. स्वागत दादा, खूप छान शब्दांकन.
राजश्री सारख्या व्यक्तींमध्ये समाज बदलवण्याची, इतरांचं प्रेरणास्थान होण्याची ताकद असते.. अश्या व्यक्ती सकारात्मक विचारांनी भारलेल्या असतात.. शरीराला इजा झाली तरी मनाला इजा होऊ देत नाहीत आणि “दिव्यझेप “सारखे समुह राजश्रीच्या मदतीला उभे राहून तिचे पंख अजूनच बळकट करतायेत त्याबद्दल सर्वांचेच विशेष कौतुक
राजश्री व दिव्यझेपला खरोखर सलाम. या माध्यमातून अनेक प्रेरणादायी व्यक्तीमत्वांची ओळख होते . अपर्णा एक नवीन ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. राजश्री व तुझ्याही कामाला खूप शुभेच्छा.
मनःपुर्वक अभिनंदन, शुभेच्छा.
राजश्रीची आणि माझी ओळख २०२० मध्ये पुस्तकांमुळे झाली.भेटल्यानंतर काही वेळातच खूप वर्ष जुनी मैत्री असल्यासारखे वाटले. सतत न थकता काम करत राहणे ही तिची आवडच. प्रचंड उर्जा आहे तिच्यात, अशी मैत्रीण असणं दुर्मिळच.
पुढील उत्तमोत्तम कार्यासाठी खूप शुभेच्छा राजश्री.💐
लेखाची खूपचं सुंदर मांडणी केली असल्याने असेच छान भरपूर लेख वाचायला मिळावेत ही स्वागत सरांना विनंती. 🙏🏻
खूप प्रेरणादायी प्रवास मांडला आहे ..
राजश्री व स्वागत सर .. दोघांनाही शुभेच्छा
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती
राजश्री च्या जिद्दीला सलाम. ईच्छा शक्ति आणि योग्य माणसांचे सहवासाने गावात लायब्ररी सुरू करणे शक्य. शिकेल तो वाचेल ची आठवण झाली
कितीही अवघड, अडचणीचं आपलं आयुष्य असेल जिद्द असेल तर काहीतरी चांगलं काम करण्यासाठी सापडतंच … हा मोलाचा धडा राजश्रीकडून मिळाला.
एखादी चांगली गोष्ट आपण करू शकत असू तर कुणाला तरी आपली गरज आहे हे लक्षात येतं आणि आयुष्याला अर्थ येऊ लागतो. आपल्याला जगण्याची उमेद राहत नाही तेव्हा आपल्यातला उमेदीचा झरा जिवंत करणाऱ्या, भक्कम पायावर उभ्या असलेल्या राजश्रीची ओळख करून दिल्याबद्दल स्वागत आणि अपर्णा महाजन यांचे आभार.
कौतुक…
राजश्रीच्या positive attitude चे आणि स्वतः बरोबर अनेजणांना motivate करण्याच्या जिद्दीचे !
स्वागत, लेख सुरेख.
ब्राव्हो झूलू.
पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आमच्या समुहाकडून शक्य ती मदत आम्ही निश्चित करत राहू.