स्थलांतर करावे लागू नये म्हणून भारतीय पूर्वजांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचावर, पठारांवर तलावांची निर्मिती करून ठेवली. त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला आधार दिला. भारत देशात पाच लाख खेडी होती , म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला कमीत कमी दोन तलाव होते! भारतीय जीवन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्या काठी वाढलेले आहे…
ब्रिटिश मंडळी ही युरोपीय संस्कृतीत वाढलेली असल्यामुळे, त्यांनी लिहिलेल्या इतिहासात येते, की मानवी संस्कृती नदीकाठी वाढली. पण तो केवळ युरोपीयन समज आहे. भारताने इंग्रजीचा धागा अजूनही सोडलेला नसल्यामुळे भारतीय लोकांचा समज सर्वत्र तसाच आहे. भारतीय संस्कृती ही प्रत्यक्षात तलावांकाठी वाढली! युरोपीयन लोकांनी भारताचे वर्णन तसेही करून ठेवलेले आहे, की हा तलावांचा देश आहे! त्यांना त्या काळात तसे पाहण्यास मिळाले. ब्रिटिश मंडळी अठराव्या शतकात भारतात स्थिरावली, त्यावेळी देशात वीस लाख तलाव अस्तित्वात होते, वापरात होते. भारत देशात पाच लाख खेडी आहेत, म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला कमीत कमी दोन तलाव होते! भारतीय जीवन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्या काठी वाढलेले आहे. भारतीय लोक केवळ नदीकाठी राहणारे असते तर जेव्हा ग्रीष्म ऋतू येतो, नद्या आटू लागतात, तेव्हा त्यांना जनजीवनाचे स्थलांतर करावे लागले असते. तसे स्थलांतर करावे लागू नये म्हणून भारतीय पूर्वजांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचावर, पठारांवरसुद्धा तलावांची निर्मिती करून, त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला आधार दिला आहे.
भारतीयांच्या तीन देवता आहेत, त्यांपैकी पहिल्या दोन देवता म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी. वेरूळमधील कैलास लेण्यात सर्वात मोठे, जगात अवर्णनीय असलेले शिवलिंग आहे. कैलास लेण्यामध्ये दरवाज्यात पहिले चित्र कोणाचे दिसते? वस्तुतः ते लेणे म्हणजे भगवान शंकराला अर्पण केलेली कलाकृती आहे. पण शंकराचे दर्शन फार आत गेल्यानंतर घडते. पहिले दर्शन आहे ते लक्ष्मीचे. तिचे तेथे सुंदर शिल्पचित्र आहे. तेथे ती लक्ष्मी कशावर बसलेली आहे? तर ती एका तलावात बसलेली आहे. त्या तलावाचे सुरेख तरंग त्या दगडी शिल्पामध्ये दाखवलेले आहेत. त्यांच्यावर पाने लहरत आहेत आणि दोन हत्ती दोन्ही बाजूंनी शुंडेमधून त्या लक्ष्मीवर जलवर्षाव करत आहेत! पाण्याची विपुलता आणि तलाव ह्या दोन्ही गोष्टींचे निदर्शक असे ते चित्र कैलास लेण्यामध्ये पाय ठेवताच मनावर ठसते.
पुढे, डावीकडे भिंतीवर तीन देवतांची सुंदर रूपे आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती यांची देवतारूपाने त्या ठिकाणी मूर्तिचित्रे कोरलेली आहेत. प्रत्येक चित्रातील तपशील वेगवेगळे आहेत. प्रत्येक मूर्ती वेगळी आहे. तिचे वाहन वेगळे दर्शवले आहे. त्या त्या नदीची जी वैशिष्ट्ये आहेत, ती कलाकाराने कोरली आहेत. त्यांतील सरस्वती ही बुद्धीची देवता म्हणून परिचित आहे. पण तिचे नाव सरस्वती म्हणजे तलावांच्या काठी असलेली देवता. अनेक भारतीय गावांची नावे ‘सर’ हे उपपद लावून झालेली आहेत. कारण ती गावे तलावांच्या काठी असलेली आहेत. उदाहरणार्थ अमृतसर हे गाव. ते तलावाच्या काठी आहे. सरस्वती ही तलावांची देवता कशामुळे झाली? सरस्वती नदी लुप्त झालेली आहे. पण तिचा पूर्ण शोध लावलेला आहे. ती नदी मुळात कसकशी वाहत होती हे आधुनिक संशोधन शास्त्राचा आधार घेऊन शोधून काढले आहे. ऋग्वेदकालीन व त्याच्या पूर्वीची जी वर्णने आहेत त्यांत सरस्वती ही तलावा-तलावांची नदी आहे. ती नदी हिमालयातून वाहत आल्यानंतर अत्यंत सपाट, सखल प्रदेशातून वाहत असल्यामुळे वेगवेगळे तलाव भरत भरत प्रभासपट्टणच्या जवळ पश्चिम समुद्राला मिळते. संस्कृतीचा विकास त्या त्या ठिकाणी झाल्यामुळे, बौद्धिक विकास झालेला असल्यामुळे, वाङ्मयीन विकास झाल्यामुळे विद्यादेवतेचे पर्यायी नाव सरस्वती असे ठेवले आहे.
पाणी, पाण्याची साठवण आणि त्याच्याभोवती संस्कृतीची वाढ हे भारतामध्ये इतके दृढमूल आहे, की कोठलाही धार्मिक विधी हा अभिषेकाशिवाय होत नाही! मूळ भारतीय जर थंड प्रदेशातून आलेले असते तर अभिषेक करण्याची कल्पना कोणालाही सुचली नसती. परंतु भारताचा प्रदेश उष्ण कटिबंधाचा, कोरड्या हवामानाचा असल्यामुळे अंगणात सडा घालणे काय किंवा अंगावर अभिषेक करणे काय या गोष्टी भारतीय संस्कृतीत समाविष्ट झाल्या. भौगोलिक परिस्थितीचे जे संस्कृतीशी नाते असते, ते भारतीयांनी अभिषेकातून व्यक्त केलेले आहे.
अनुपम मिश्रा नावाच्या सर्वोदयवादी कार्यकर्त्यांनी पाण्याच्या बाबतीत भारतीय संस्कृती काय आहे हे समजावून घेण्यासाठी गांधी प्रतिष्ठानचा कार्यक्रम म्हणून तीन वर्षे भारतभर भ्रमण केले. ते अनेक ठिकाणी गेले – राहिले, लोकांशी बोलले, त्यांची जुनी दानपत्रे पाहिली, त्या ठिकाणचे शिलालेख पाहिले, ऐतिहासिक संग्रहालये पाहिली. नंतर त्यांनी त्या तीन वर्षांच्या भ्रमंतीचे सार संग्रहित करणारे एक पुस्तक लिहिले. ते पुस्तक इतिहासाचे पुस्तक आहे का? म्हटले तर आहे. ते पुस्तक ललित कलाकृती आहे का? तर ती लालित्यपूर्ण कलाकृतीही आहे; फार रसाळ लिहिलेले आहे. कादंबरी असावी असे लालित्यपूर्ण लिहिले आहे. ते सांस्कृतिक निवेदन आहे का? तर ते तसे सांस्कृतिकही आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘आज भी खरे है तालाब’. मुळात ते हिंदीत लिहिलेले आहे. प्रदीप भलगे यांनी भारतीय जलसंस्कृती मंडळासाठी त्याचा मराठी अनुवाद प्रसिद्ध केला आहे. त्याचे नाव मात्र ‘भारतीय तलावांची परंपरा’ असे दिले आहे. पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. त्यामध्ये तलावांबाबतचे अनेक तपशील दिलेले आहेत.
– माधव चितळे 9823161909
( ‘जलसंवाद’, डिसेंबर 2017 वरून उद्धृत. मूळ शीर्षक – भारताची जलसंस्कृती)
———————————————————————————————————————————–