चतुरस्र कर्तबगारी- विवेक मेहेत्रे (Vivek Mehetre – Multifaceted Personality)

0
493

विवेक मेहेत्रे हे अनेक रूपांत लोकांना भेटत असतात. व्यंगचित्रकार, कवी, लेखक, प्रकाशक, एकपात्री कलाकार, ट्रेनर, व्याख्याते, संपादक असे त्यांचे सप्तरंगी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे 2023चा स्व. बाळासाहेब घमाजी मेहेर स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवन प्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारा हा लेख…

विवेक मेहेत्रे यांच्या कामगिरीची अनेक क्षेत्रांतील घोडदौड स्तिमित करणारी आहे. हा एक माणूस इतकी विविधांगी कामे कशी करू शकतो याचे आश्चर्य वाटते. अर्थात त्यांना त्यांची पत्नी वैशाली यांची तेवढीच खंबीर व समर्थ साथ आहे. त्या दोघांनी ती कामगिरी स्वप्रतिभा आणि जगातील माहितीच्या साठ्याचा योग्य उपयोग या आधारे साधली आहे. नवनवीन माध्यमांचा तत्काळ व सदुपयोग करणारी त्यांच्यासारखी मराठी व्यक्ती विरळाच आढळेल. चॅट जीपीटी हे तंत्रज्ञान परिचयाचे होऊन केवळ सात महिने होत आहेत, तोच त्या विषयावरील त्यांचे पहिले इंग्रजी पुस्तक ‘उद्वेली प्रकाशना’ने प्रकाशित केलेदेखील ! माध्यम प्रभावामुळे मेहेत्रे यांचा थाट झगमगाटी वाटला तरी त्यांची वृत्ती मुळात अभ्यासू आहे.

ते हास्य व्यंगचित्रकार म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत. ते मुंबई विद्यापीठाचे इंजिनीयर, एम ई (पर्यावरण) आहेत. तसेच, त्यांनी एम बी ए आणि एम डी टी या पदव्याही संपादन केल्या आहेत. त्यांनी इंजिनीयर म्हणून नोकरी बारा वर्षे केली. पुढे, ते कलाक्षेत्रात रमले. त्यांची व्यंगचित्रे दिवाळी अंकांमधून, वर्तमानपत्रांमधून येऊ लागली. ते त्यांच्या तिरकस शैलीने व्यंगचित्रांमधून समाजातील ताज्या घटनांवर भाष्य करत. लोक त्यांना व्यंगचित्रांतून लोकजागृती करणारे व्यंगचित्रकार म्हणून ओळखू लागले. एकदा तर विमानात चक्क त्यांच्या शेजारची सीट बिग बी अमिताभ बच्चन यांची होती. मेहेत्रे यांनी अमिताभ यांना ‘हाय- हॅलो’ करून स्वत:चा परिचय देत असताना, अमिताभ त्यांना मध्येच अडवून म्हणाले, ‘मी तुम्हाला ओळखतो, तुमची व्यंगचित्रे मी पाहत असतो.’ मेहेत्रे आश्चर्यचकित झाले. बच्चन यांनी मेहेत्रे यांना त्याबद्दल छान कॉमेंट दिली.

मेहेत्रे यांनी मुख्यत: स्वत:चे विविध आविष्कार प्रकट करण्यासाठी ‘उद्वेली बुक्स’ नावाची प्रकाशन संस्था काढली आहे. ते आणि त्यांची पत्नी वैशाली यांनी एकत्र काम करून, ती नावारूपाला आणली. वैशाली याही इंजिनीयर आहेत. वैशाली मेहेत्रे या विवेक यांच्या सर्व कार्यात जातीने लक्ष घालतात. त्यांनी विविध विषयांवरील जवळजवळ पाचशे पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात माझ्याही कथा-काव्य अशा पुस्तकांचा समावेश आहे. त्यांचा झपाटा पुस्तके प्रकाशित करण्यातही जाणवतो.

विवेक मेहेत्रे हे ‘मोटिव्हेशनल ट्रेनर’ म्हणूनसुद्धा मार्गदर्शन करतात. त्यांच्या त्या वर्गात लेखक, पत्रकार, डॉक्टर वगैरे मंडळी विद्यार्थी असतात. मेहेत्रे यांची खासीयत तशा लोकांना सुद्धा माहीत नसलेली माहिती व कौशल्ये सांगणे ही असते. ते ‘चला, यशस्वी होऊया’ या दिवसभराच्या शिबिरात, जगातील यशस्वी लोकांची उदाहरणे देतात. ते त्यांचे व्याख्यान उदाहरणे- व्हिडिओ यांद्वारा सजवतात आणि श्रोत्यांना सकारात्मक विचारसरणीकडे वळवतात. त्यांना त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी घडावे, विद्यार्थ्यांनी काही अचाट काम सहज करावे, उत्तम व्यवसाय करून दाखवावा, प्रसिद्धी मिळवावी, न्यूनगंड असेल तर तो नाहीसा व्हावा आणि प्रत्येकाने आनंदी राहून मार्गक्रमणा करावी असे वाटत असते. मी त्यांच्या अनेकविध शिबिरांत विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण घेतले आहे.

एक आगळावेगळा रेकॉर्ड म्हणजे मेहेत्रे यांच्या उद्वेली प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या  ‘शिवाजी- द रियल हिरो’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन. ते त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये म्हणजे ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये घडवून आणले ! तेही बाबासाहेब पुरंदरे हयात असताना, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत. त्या पुस्तकाला पुरंदरे यांचीच प्रस्तावना आहे. पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला बाबासाहेब पुरंदरे आणि सु.ग. शेवडे हे दोघे स्वत: उपस्थित होते. ती कहाणी अशी –

शिवाजी द रियल हिरो या पुस्तकाचे लेखक ब्रिजेश मोगरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या शेजारी महाराजा ग्रूप ऑफ इंडस्ट्रीचे प्रवीण पारकर हेही होते.

चित्रकार ब्रिजेश मोगरे यांनी सोळा वर्षे खपून शिवाजी महाराजांचे चरित्र सांगणारी अनेक चित्रे काढली होती. त्या सुंदर चित्रांचे पुस्तक करावे अशी कल्पना विवेक मेहेत्रे यांना सुचली. पण त्यांचे पुस्तक खूप मोठे व खर्चिक होणार होते. म्हणून मेहेत्रे यांनी ते चित्रात्मक पुस्तक तीन भागांत प्रकाशित केले. पहिला भाग तयार झाला. योगायोग बघा, हं ! मेहेत्रे त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करत असताना, त्यांना वर्तमानपत्राच्या एका तुकड्यावर असलेला काही मजकूर दिसला. तो मजकूर लंडनच्या म्युझियमबद्दल होता. त्यात लिहिले होते, की ‘शिवाजी नावाच्या एका क्रूर दरोडेखोराने सुरत लुटली !’ मेहेत्रे यांनी तो खोटा इतिहास खोडून काढण्यासाठी ‘शिवाजी- द रिअल हिरो’चे प्रकाशन लंडनमध्ये करण्याचे ठरवले ! त्यासाठी ‘हॉटेल शेरेटन’चा हॉल दीड लाख रुपये खर्चून बुक केला. दरम्यान, ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे अभिजित पाटील यांना ती गोष्ट कळली. तेव्हा त्यांनी ते प्रकाशन ब्रिटिश पार्लमेंटमध्ये करावे असे सुचवले. त्याप्रमाणे त्यांनी तेथील तीन खासदारांशी बोलून ‘उद्वेली’साठी ब्रिटिश पार्लमेंट उपलब्ध करून घेतले.

मेहेत्रे यांच्यातील कुशल जाहिरातदार त्या टप्प्यावर जागा झाला. त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन इंग्लंडमध्ये करणार असे दिवाळी अंकातून जाहीर केले. मेहेत्रे यांना सत्तर शिवप्रेमींचा पाठिंबा मिळाला ! आणि मेहेत्रे त्यांना आणि पुरंदरे व शेवडे यांना घेऊन इंग्लंडला गेले. त्या सर्वांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पुस्तक प्रकाशनसाठी प्रवेश केला ! बाबासाहेब पुरंदरे यांना वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी इंग्लंडच्या प्रवासासाठी त्यांच्या घरून परवानगी मिळवण्यास राज ठाकरे यांची मदत झाली. बाबासाहेबांनी प्रकाशन समारंभात भाषणासाठी तेरा मिनिटांचा प्रोटोकॉल ठरलेला असताना, पन्नास मिनिटे मराठी व इंग्रजीत भाषण केले ! त्यामुळे प्रभावित होऊन तेथील पार्लमेंटच्या खासदारांनी शिवाजीराजांच्या चरित्राच्या पुस्तकाची मागणी केली. मेहेत्रे यांनी त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांवरील इंग्रजीतील भाषांतर असलेली पुस्तके दिली. प्रकाशन समारंभात वैशाली मेहत्रे यांनी तयार केलेले व्हिडिओ परिणामकारक ठरले. त्यामुळे शिवाजी महाराज म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे याचा अंदाज पार्लमेंटच्या लोकांना आला !

विवेक मेहेत्रे स्वतः लेखक आहेत. ‘आले ओठावर’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांचे लेख विविध विषयांवर विविध दैनिकांतून प्रकाशित होत असतात. ‘तुमचा नवा दोस्त- कॉम्प्युटर’ या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा मराठी वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांची संगणक व इंटरनेट या विषयांवरील तेरा पुस्तके आणि त्यांच्या लोकसत्ता, नवाकाळ या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या उपयुक्त लेखमाला वाचकप्रिय ठरल्या. तसेच, ‘हास्य कॉर्नर’ व ‘हास्यविवेक’ हे त्यांच्या हास्यचित्रांचे संग्रहसुद्धा वाचकांना आवडले आहेत. त्यांनी प्रबोधनात्मक व्हिडिओ लॉकडाऊनच्या काळात बनवले. काही रंजक युट्युब व्हिडिओ बनवले. त्यांचे दोन यूट्यूब चॅनेल्स- ‘विवेक मेहेत्रे’ आणि ‘अफलातून मराठी’ असे आहेत. त्यांनी युट्युब ॲकॅडमी 2020 मध्ये सुरू केली. ॲकॅडमीमार्फत ‘प्रभावी यूट्युबर व्हा’ असा, प्रात्यक्षिकांवर आधारित दोन महिन्यांचा, देशातील प्रभावी समजला जाणारा अभ्यासक्रम सुरू केला. बऱ्याच लोकांना त्यातून युट्युबमार्फत उत्पन्न मिळण्याचा मार्गही कळला.

विवेक मेहेत्रे यांनी अनेक लोकांना अनेक विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण 2019-20 च्या लॉकडाऊनमध्ये दिले. त्यांचा ‘व्यंगचित्र कसे काढावे’ या विषयावरील प्रशिक्षणक्रम आठ वर्षांवरील विद्यार्थ्यांपासून आजी-आजोबांपर्यंतच्या लोकांनी घेतलेला आहे. त्यांनी ‘चला वेगाने वाचुया’ हा जलद वाचनाचा कोर्स 2022 मध्ये सुरू केला आहे. ते प्रशिक्षण तीनच रविवारी दिले जाते. अनेक पुस्तके जलद गतीने कशी वाचता येतील हे शिकताना विद्यार्थ्यांना जगभरातील अनेक गोष्टींची विपुल माहिती मिळते. ‘राशिवर्ष’ हा त्यांचा चिनी भविष्यकथन पद्धतीवरील कार्यक्रम आहे. ते वेगवेगळ्या राशींच्या माणसांचे स्वभाव मनोरंजक पद्धतीने मांडतात. सोबत डिजिटल प्रेझेंटेशन असते ! ‘राशिवर्ष’ आणि ‘हास्य कॉर्नर’ या, व्यंगचित्रांवरील एकपात्री कार्यक्रमाचे गेल्या तीस वर्षांत देशा परदेशात अनेक प्रयोग झाले आहेत. त्यांनी ‘राशींच्या संगतीने- आयुष्य जगुया गमतीने’ हा नवा प्रयोग निर्माण केला आहे. त्यासाठी त्यांना राशींची वैशिष्ट्ये गाण्यांमधून दाखवायची होती. मी आणि माझे पती हेमंत साने, आम्ही दोघांनी त्या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत काम केले. मी राशींच्या वैशिष्ट्यांवर छोटी छोटी गाणी लिहिली. माझे पती हेमंत यांनी ती संगीतबद्ध करून, रेकॉर्डही करून दिली. वैशाली मेहेत्रे यांनी त्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ तयार केले. त्यातून एक सुंदर कार्यक्रम तयार झाला. लोकांनी राशींवरील गाणी पसंत केली हे कळल्यावर त्यांनी ती युट्युबवर टाकली. त्या गाण्यांना लोकप्रियता लाभली. लाखो फॉलोअर्स मिळाले. तो आमच्यासाठीही मोठाच उपक्रम ठरला !

मी व हेमंत, आम्ही दोघांनी त्यांच्याकडून ‘युट्युबर’ प्रशिक्षणही घेतले आहे. आम्ही लॉकडाऊनमध्ये वैशाली मेहेत्रे यांच्या मदतीने अनेक व्हिडिओ बनवले. ते व्हायरलही झाले.

विवेक मेहेत्रे हे अनेक रूपांत लोकांना भेटत असतात. व्यंगचित्रकार, कवी, लेखक, प्रकाशक, एकपात्री कलाकार, ट्रेनर, व्याख्याते, संपादक असे त्यांचे सप्तरंगी व्यक्तिमत्त्व आहे. ते सघन करण्यात जिज्ञासा व अभ्यास हे महत्त्वाचे गुण आहेत. मेहेत्रे मोटिव्हेशनल स्पीकर व कॉर्पोरेट ट्रेनर आहेत. त्यांनी मोटिव्हेशनल ट्रेनर म्हणून काम करण्यापूर्वी अनेक गुरूंकडून अनेक ‘टेक्निक्स’ शिकली. त्यासाठी ते ‘चिकन सूप फॉर द सोल’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जॅक कॅनफिल्ड यांना भेटले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळेचे प्लॅनिंग नीट केलेले होते. त्यांचे मार्गदर्शन शिबिर दिवसभराचे होते. मेहेत्रे यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करून, अनेक गोष्टी शिकून घेतल्या. तशी व्याख्याने आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणतात असा त्यांचा अनुभव आहे. जॅक कॅनफिल्ड यांचे व्याख्यान ऐकूनच मेहेत्रे यांनी त्यांचा ट्रेनिंग वर्ग सुरू केला ! मेहेत्रे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांनी चॅट जीपीटी या विषयाचा देखील सखोल अभ्यास करून त्या विषयावर कार्यशाळा सुरू केली आहे. ते चॅट जीपीटीवर कार्यशाळा घेणारे भारतातील पहिले ‘सक्सेस कोच’ आहेत !

विवेक मेहेत्रे यांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार अनेक मिळाले आहेत. त्यांना वर्षभरातील उत्कृष्ट हास्यचित्रकारांसाठी असलेला ‘किर्लोस्कर’ हा मानाचा पुरस्कार दोनदा लाभला आहे. ते ठाणे येथे 2018 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी हास्यचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना आनंद ट्रस्ट तर्फे ‘नवरत्न पुरस्कार’ मिळाला तर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ‘नेट मसीहा’ म्हणून त्यांचा गौरव त्यांच्या संगणक व इंटरनेट विषयांवरील त्यांच्या पुस्तकांसाठी केला. उद्वेली प्रकाशनाला ‘जपान – आठवणींचा कोलाज’ या पुस्तकाबद्दल अखिल भारतीय प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार 2023 मध्ये प्राप्त झाला आहे.

विवेक मेहेत्रे 9821739327 mehetre@gmail.com

मेघना साने 9892151344 / 98695 63710 meghanasane@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here