आमचे चेंबूरचे डॉ.विनोद करकरे हे जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत? अस्थिरोगांवरील उपचारांसाठी की त्यांच्या जुन्या फिल्म्सच्या गाण्यांसाठी? ते जनरल सर्जन आहेत व ऑर्थोपेडिक्स विशेषज्ञही आहेत. ते सर्व तऱ्हांच्या शस्त्रक्रियांत निष्णात आहेत आणि दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रियांतील त्यांचे विक्रम नोंदले गेले आहेत. गाण्यांच्या संदर्भात सांगायचे तर बैठक छोटी असो वा सभासमारंभ मोठा असो, करकरे तेथे असले की त्यांना गाणे म्हणण्याची विनंती केली जाते आणि तेही खुषीने, आढेवेढे न घेता गाणी म्हणतात.त्यांचा मोहवणारा आणखी एक तिसरा पैलू आहे. तो म्हणजे त्यांची गोंदवलेकर महाराजांबद्दलची नितांत भक्ती. डॉक्टर स्विमिंग चॅम्पियन आहेत आणि रोज सकाळी एक किलोमीटर जलतरण व अर्धा तास चालणे हे त्यांचे व्रत आहे. त्याशिवाय सरळ साधेपणा, आढ्यतेचा अभाव आणि मदतशील-स्नेहशील, स्वभाव ही त्यांची खासियत आहे. मला स्वतःला मात्र त्यांचे गाणे फार प्रिय आहे. माझ्या कानांत कायम घुमत असते ते त्यांनी गायलेले भुपेन हजारिकाचे, ‘दिल हूम हूम करे, घबराSSये’ हे गाणे. करकरे ते आर्ततेने व तन्मयतेने गातात. ते आवाजातील चढउतार अचूक पकडतात आणि त्यांचे गाणे म्हणजे जिताजागता अनुभव असतो – त्या गाण्यातील साऱ्या भावभावनांनिशी प्रकटणारा! मला खुद्द हजारिका यांच्या रेकॉर्डेड आवाजातही ते कमीपण काही वेळा जाणवते; इतके करकरे यांचे ते गाणे माझे आवडते आहे.
डॉ. विनोद करकरे आणि पत्नी नीला करकरे
स्वाभाविकच, विनोद करकरे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याच गाण्याचा जाहीर कार्यक्रम योजला तेव्हा पहिली हजेरी मी लावली. चेंबूरच्या फाईन आर्ट्सचे सभागृह पूर्ण भरून गेले होते. करकरे कुटुंब गेली कित्येक वर्षे चेंबूरचे रहिवासी आहे. डॉक्टरांचे हॉस्पिटल चेंबूरला मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यांचे हॉस्पिटल विविध सोयींनी सज्ज आहे व वेगवेगळ्या रोगांचे तज्ज्ञ डॉक्टर तेथे सेवा देत असतात. डॉक्टर या वयातही रोज चाळीस रुग्ण तपासतात, शस्त्रक्रिया करतात. मात्र सध्या वैद्यकीय क्षेत्रात विशेषता, तज्ज्ञता यांना फार महत्त्व आले आहे. त्यामुळे डॉक्टर ठरावीकच शस्त्रक्रिया करतात. करकरे म्हणाले, की रस्ते अपघात लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांत झाले नाहीत. त्यामुळे मला फार काम नव्हते. मी गरज असेल तेव्हा टेलिफोनवरून सल्ला देत होतो. हॉस्पिटलमध्ये अगदी तातडीची गरज असलेले रुग्णच येत होते. सगळ्या आरोग्यसेवेचा रोख कोरोनाला थांबवण्यासाठीच सध्या आहे.
करकरे यांनी अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात अफलातून मौज केली. ती म्हणजे जुन्या ज्या सिनेमातील गाणे म्हणायचे त्या सिनेमाच्या हिरोसारखा पेहराव चढवून ते गाणे गायला रंगमंचावर येत; त्या त्या हिरोसारख्या लकबी, हावभाव करत आणि स्टेजवर नाचत-फिरत गाणी म्हणत. त्यांनी एका गाण्याला त्यांच्या जुन्या डॉक्टर मैत्रिणीला बोलावून युगुलगीत सादर केले, त्यास अनुरूप असा जोडीचा डान्स केला. ती धमाल काही औरच होती. मी डॉक्टरांना नंतर विचारले, तर ते म्हणाले, की “मी कॉलेजात असताना रीतसर बॉलरूम डान्स शिकलो आहे. मला ताजमहाल हॉटेलात झालेल्या स्पर्धेत बक्षीसही मिळाले आहे.” हिरोसारखा पेहराव करून गाणी म्हणायची ही पद्धत हल्ली रूढ झाली आहे. काही मेकअप आर्टिस्ट त्यासाठीच प्रसिद्ध आहेत.
डॉक्टर स्वतः गरिबीत राहिले, गरिबीत शिकले. त्यांच्या आई प्रसिद्ध जोशी घराण्यातील. त्यांचे मामा प्रसिद्ध इंजिनीयर एस.बी.जोशी यांचा भक्कम पाठिंबा करकरे यांना लाभला. करकरे यांच्या आईदेखील उच्चशिक्षित होत्या. त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एमएससी पदवी 1944 साली प्राप्त केली. करकरे यांचे दुसरे मामा एल.बी.जोशी त्यांचे जोशी हॉस्पिटल पुण्यात प्रसिद्ध आहे. करकरे म्हणतात, की “एलबींनी मला शल्यक्रियेची मूलतत्त्वे समजावून सांगितली. एस.बी.जोशी यांची मुलगी शकुताई हिच्यामुळे माझे गुणविशेष जोपासले गेले.” शकुंतला जोशी या तत्कालीन व्हीजेटीआयमधून पदवी मिळवलेल्या पहिल्या मराठी ‘लेडी इंजिनीयर’. त्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीत गेल्या. त्या तेथून अभियांत्रिकीबरोबर पाश्चात्य गानकला घेऊन आल्या. करकरे म्हणतात, “शकुताई गायची तेव्हा तिच्याबरोबर आम्ही भावंडे गायचो. तेव्हाच सर्वांच्या लक्षात आले, की मला सूरतालाचे स्वाभाविक ज्ञान अधिक आहे. विशेषतः मी इंग्रजी गाणी ठेक्यात आणि ठसक्यात म्हणायचो. प्रसिद्ध गायिका नीलाक्षी जुवेकर या डॉक्टरांची दुसरी मामेबहीण. “त्यांनी मला गाणे शिकण्यास प्रवृत्त केले” असे करकरे कृतज्ञतेने म्हणतात.
करकरे यांचे डॉक्टरी शिक्षण संपल्यावर त्या व्यवसायात व संसारात स्थिरावणे या उद्योगात त्यांचे गाणे मागे पडले. ते एकदम उमटले, त्यांना नातू झाला तेव्हा. सारे कुटुंबीय त्या आनंदप्रसंगी ट्रिपला निघाले, तर डॉक्टरांनी गाणी म्हटली. तेव्हा सारी मंडळी म्हणाली, ” अरे, तुझा आवाज चांगला आहे. तू तालासुरात गातोयस. तर गाणी का म्हणत नाहीस?” डॉक्टरांना एकदम जाणीव झाली, की खरोखरीच, व्यवसायाच्या नादात त्यांच्या जीवनातील गाणे हरवून गेले आहे! मग त्यांनी ती दीक्षा जिद्दीने घेतली आणि गेली पंधरा-वीस वर्षे नियमाने तिचे पालन केले. त्यांनी दोन गुरूंची शिकवणी लावली. ते दर आठवड्याचे दोन तास नियमाने सराव घेतात, जेथे कोठे कार्यक्रम असतील तेथे गाण्यास जातात. ते म्हणाले, की माझी भाषणे निमित्तानिमित्ताने होत असतात. तेथेही मी हौसेने गाणे म्हणतो. अशा तऱ्हेने गळा सतत तयार राहतो. वेगळ्या रियाझाची गरज पडत नाही. विनोद करकरे त्यांच्या गुरूंविषयी हळुवारपणे बोलतात. त्यांच्यापैकी उमेश बिपीन खरे हे जबलपूरचे. ते डॉक्टरांपेक्षा सतरा वर्षांनी लहान आहेत. खरे करकरे यांची शास्त्रीय गाण्याची तयारी करून घेतात. दुसरे गुरू किरण कामत. ते अंध आहेत. ते डॉक्टरांना बजावतात, की तू भले गाणी म्हणत असशील, पण मी तुला गाणी नाही तर गायला शिकवत आहे. दोन्ही गुरु शिस्तबद्ध, नियमबद्ध सराव करून घेतात. दोन्ही गुरुघराण्यांत अनेक कार्यक्रम असतात. तेथेही डॉक्टरांना गाण्याची विशेष संधी मिळते.
करकरे म्हणाले, “मी सिनेमा गाण्यांचा वेडा. मला इंग्रजी गाणी फार आवडतात, पण गुरुजींच्या क्लासमध्ये सातत्याने जाऊन मला भक्तिगीतांचे वेड जरा जास्त लागले आहे. त्यांतील शब्द-अर्थ-रस मला फार उत्कट वाटतात. त्याचा वाढल्या वयाशी काही संबंध असावा असे वाटत नाही, कारण मी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला 1982 साली. माझी पत्नी नीला ही कराडची. तिला गोंदवल्याची ओढ होती. मला शंकर महाराज, साटम महाराज हे पंथही परिचित होते, पण मला गोंदवल्याचे पीठ साधे सरळ वाटले.” डॉक्टरांची गोंदवल्याप्रती भक्ती इतकी अनन्य, की ते गोंदवल्याकडे जाणारी एसटी रस्त्यात दिसली तर गाडी थांबवतात, ड्रायव्हरजवळ शंभराची नोट देतात व आश्रमाच्या दानपेटीत टाकण्यास सांगतात. एसटी सकाळी नऊच्या बेतास चेंबूरच्या रस्त्यावर आठवड्यातून दोनदा तरी भेटतेच भेटते असे ते म्हणाले.
डॉक्टरांच्या पत्नी नीला या कराडच्या. आमच्या वासंती मुझुमदारच्या मैत्रीण. दीपा गोवारीकर या लेखिका ही त्यांची सखी. त्यामुळे त्यांचे साहित्यप्रेम वेगवेगळ्या कारणांनी व्यक्त होते. त्या काही काळ शिक्षिकाही होत्या.
डॉ. नकुल करकरे आणि त्याचा परिवार
धाकटा मुलगा निखिल करकरे आणि त्याचा परिवार
करकरे यांचा मोठा मुलगा नकुल हाही ‘हिप आणि नी सर्जन’ म्हणून अमेरिकेत न्यूयॉर्क येथे प्रॅक्टिस करतो. त्याच्या पत्नी शेफाली या पेडिअॅट्रिक न्युरॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ मानल्या जातात. दोघांचा लौकिक बराच मोठा आहे. तशी त्यांची कामगिरीही असाधारण आहे. करकरे यांचा दुसरा मुलगा निखिल व त्याची पत्नी पुण्यात ‘वॉलनट‘नावाची वैशिष्ट्यपूर्ण शाळा चालवतात. मुलांना आवडणारे, बालकेंद्री शिक्षण हे त्या शाळेचे वैशिष्ट्य आहे. ती आता तीन शाळांची चेन बनली आहे.ते सारे पंचाहत्तरीच्या समारंभात उपस्थित होते. नव्हे, त्यांच्या सूनबाईने त्या समारंभात सूत्रे छान सांभाळली.
असा हा छांदिष्ट माणूस, पण डॉक्टरांची शिस्त अनुसरावी अशी आहे. कामाच्या जागी काम – हौसेच्या जागी हौस! करकरे उठतात पहाटे साडेचार वाजता आणि झोपी जातात रात्री साडेअकरा वाजता. त्यांचा दिवस सुरु होतो योग-ध्यानधारणा-जलतरण व चालणे अशा व्यायामांनी. ते हॉस्पिटलला पोचतात पावणेआठ वाजता. तो राऊंड झाल्यावर पुन्हा सकाळी 10 ते दुपारी 2 ही रुग्ण तपासण्याची वेळ. दुपारी 2 ते सायंकाळी 5 शस्त्रक्रिया. त्यानंतर दोन तास विश्रांती घेऊन पुन्हा सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत रुग्ण तपासणी. वेळ काढणाऱ्याला वेळ असतो ही म्हण सार्थ ठरवणारा डॉक्टर करकरे यांचा हा दिनक्रम. त्यामध्ये ते सर्व तऱ्हेच्या भेटीगाठी-गाणीगप्पा व इतर हौसमौज करत असतात. त्यांचा चेंबूरच्या समाजात उत्तम वावर असतो. सहसा आयुष्याची सत्तरी-पंच्याहत्तरी आली, की संबंधित व्यक्तीच्या जीवनाची कृतार्थता सांगितली जाते. करकरे यांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमास जीवनोत्सव असे नाव दिले गेले होते. किती समर्पक!
डॉ. विनोद करकरे 9820075293 dr.vinod.karkare@gmail.com
– दिनकर गांगल9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.
दुर्मिळ मीत्र माझ्या आयुष्यात मित्रांना खुपच महत्वाचे स्थान आहे आज जो मी काही आहे ते त्यांचंयामुळेच एका विनोद मुळे (म्हात्रे) दुसरे विनोद (डॉ करकरे) मिळाले केवढे मोठे भाग्य डॉक्टरांचे माझ्यावर खूप.खूप उपकार आहेत ते मी शब्दात व्यक्त कृरू शकत नाही माझ्या आईचे आपरेशन या मित्राने मी डोंबिवलीत राहातं असल्यामुळे तिथे येऊन केलं आजवर तुम्ही कुठे असं ऐकलं नसेल असे आहेत डॉ करकरे अनवधानाने माझ्या कडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व कायम तुमच्या ऋणी आहे तुमच्या असेच निरोगी व आनंदी जीवनासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आपला नरेंद्र कैकाडी नाशिक रोड
रक्ताचे नाते नसताना, रकतापेक्षा घट्ट नातं आहे माझे आणि विनोद काका आणि नीला काकीचे.. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही. सतत कार्यरत राहणे, सगळ्यांची मदत करणे आणि नावाप्रमाणेच'विनोद' करून इतरांना हस्ते हा त्यांचा हातखंडा. अशा देवमाणसाला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा,🙏
चेबुर मधील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी खास उल्लेख करावा तसेच काहींना बघितल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच छाप समोरच्या माणसावर पडते अश्यापैकी एक म्हणजे डॉक्टर विनोद करकरे. चेंबुर्वसियांचे भूषण.चेबुरच्या d r खडके प्रतिष्ठान तर्फे दर महिन्याच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला ते अवरजून हजार असतात.काही महिन्यांपूर्वी चेंबूरच्या फाइन आर्ट हॉल मध्ये चेंबूर मधील सर्व डॉक्टरांचा हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात त्यांचे गाणे लक्षणीय होते. जानेवारीत दादरला सूर्यवंशी हॉल मधे प्रमुख अतिथी म्हणून भाषण करताना सुध्दा त्यांनी शेवटी एक गाणे म्हटलेएवढी गाण्याची आवड .त्यांचे पंचाहत्तरी निमित्त अभिनंदन व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा.विनय हर्डीकर.
किती छान माणूस
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Bahu Aayami vyaktimatv.
दुर्मिळ मीत्र माझ्या आयुष्यात मित्रांना खुपच महत्वाचे स्थान आहे आज जो मी काही आहे ते त्यांचंयामुळेच एका विनोद मुळे (म्हात्रे) दुसरे विनोद (डॉ करकरे) मिळाले केवढे मोठे भाग्य डॉक्टरांचे माझ्यावर खूप.खूप उपकार आहेत ते मी शब्दात व्यक्त कृरू शकत नाही माझ्या आईचे आपरेशन या मित्राने मी डोंबिवलीत राहातं असल्यामुळे तिथे येऊन केलं आजवर तुम्ही कुठे असं ऐकलं नसेल असे आहेत डॉ करकरे अनवधानाने माझ्या कडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व कायम तुमच्या ऋणी आहे तुमच्या असेच निरोगी व आनंदी जीवनासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आपला नरेंद्र कैकाडी नाशिक रोड
धन्यवाद
रक्ताचे नाते नसताना, रकतापेक्षा घट्ट नातं आहे माझे आणि विनोद काका आणि नीला काकीचे.. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही. सतत कार्यरत राहणे, सगळ्यांची मदत करणे आणि नावाप्रमाणेच'विनोद' करून इतरांना हस्ते हा त्यांचा हातखंडा. अशा देवमाणसाला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा,🙏
Smruti Rajadhyaksha
चेबुर मधील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी खास उल्लेख करावा तसेच काहींना बघितल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच छाप समोरच्या माणसावर पडते अश्यापैकी एक म्हणजे डॉक्टर विनोद करकरे. चेंबुर्वसियांचे भूषण.चेबुरच्या d r खडके प्रतिष्ठान तर्फे दर महिन्याच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला ते अवरजून हजार असतात.काही महिन्यांपूर्वी चेंबूरच्या फाइन आर्ट हॉल मध्ये चेंबूर मधील सर्व डॉक्टरांचा हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात त्यांचे गाणे लक्षणीय होते. जानेवारीत दादरला सूर्यवंशी हॉल मधे प्रमुख अतिथी म्हणून भाषण करताना सुध्दा त्यांनी शेवटी एक गाणे म्हटलेएवढी गाण्याची आवड .त्यांचे पंचाहत्तरी निमित्त अभिनंदन व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा.विनय हर्डीकर.