ग्रामजीवनाची ऊबदार गोधडी (Village Life In Lockdown Period)

1
79

 

तांदळाची लुसलुशीत भाकरी. सोबत घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी. त्याने डब्यातून असा घास घेत न्याहरी संपवली. मोठ्ठी ढेकर ऐकू आली. तृप्ततेची… त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला… आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात. तो पिऊन त्याला आणखी तरतरी आली आणि तो उत्साहाने खालच्या मळीत काम करायला बाहेर पडला… हे दृश्य माझ्या गावातलं.
दुसरं दृश्य शहरातलं. आज शहरात इतके रूग्ण नव्याने सापडले… इतक्या जणांचा मृत्यू… कुणीतरी एक मुलगा कोरोनाग्रस्त अंध वडिलांना रूग्णालयात दाखल करतो आणि त्यांचे तिथे झालेले हाल माध्यमावर पोस्ट करतो तर कुणी विलगीकरण कक्षात आलेले चांगले अनुभव इतरांपर्यंत पोचवत असते.
कोकणातल्या एका खेड्यात बसून मी या दोन दृश्यांची एकाच वेळी साक्षीदार आहे. पहिलं दृश्य माझ्याच घरात घडतं आणि दुसरं मी फेसबुक, व्हॉटस्अप, इ वृत्तपत्रे यांवर वाचत, पाहत असते. रत्नागिरी जिल्हा, तालुका राजापूरमधील ताम्हाने हे आमचं छोटं गाव. वाड्या बारा. लोकसंख्या अडीच हजाराच्या आसपास. पूर्वी बरीच होती असं ग्रामस्थ सांगतात. पण नोकरीसाठी बरेचसे तरुण मुंबईला गेलेले असल्याने ही संख्या कमी झाली. शिमगा आणि गणपती या उत्सवासाठी हमखास चाकरमानी त्यांच्या कोकणातल्या घरी येतातच. या वर्षीही शिमग्यासाठी चाकरमानी आले, पण लॉकडाऊनमुळे येथेच अडकले. तिकडे मुंबईतल्या त्यांच्या लहानशा घरात लॉकडाऊनमुळे राहणेही कठीण झाल्याने लॉकडाऊनच्या दुसर्‍या-तिसर्‍या टप्प्यात मिळेल त्या वाहनाने, पडेल तितकी जास्तीची रक्कम देऊन मंडळी कोकणातल्या त्यांच्या घरी आली. त्यामुळे सध्या गावात हजारभर तरी माणसांची भर नक्की पडलेली आहे.
लॉकडाऊन आणि कोरोना या परिस्थितीत कोकणातल्या या छोट्या खेड्यात माझ्याच घरात मी कुटुंबासह राहिले आणि मला जे दिसलं, जे आम्ही अनुभवलं ते इथे नोंदवत आहे. आम्ही इथे सेंद्रीय शेती करतो. त्यामुळे आमच्याकडे मदतीसाठी स्थानिक सदस्य येतात. त्यांच्याशी झालेला संवाद, गावात फिरताना अनुभवलेली परिस्थिती, माझ्याकडे अभ्यासाला येणारी दोन वाड्यांमधील मुले यांच्यामुळे मला विविध कंगोरे टिपण्याची संधी मिळाली.
पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी मंडईत उसळलेली गर्दी असो किंवा मुंबईत मरीन डाईव्हवर फिरणारे हौशी असोत… संसर्ग वाढतच राहिला. पण आमच्या गावात मुंबईहून घरी परतलेले चाकरमानी आणि त्यांची कुटुंबं चौदा दिवस माळावरच्या गोठ्यात किंवा बंद असलेल्या आणि आता स्वच्छ करून कुटुंबानेच जागा उपलब्ध करून दिलेल्या घरात बंद होते. माझी मदतनीस ताई मला सांगू लागली, “काय करणार ताई, माझीच जाव हाय. पण बशीतून उतरल्यावर मी तिला घरात पन घेतली नाय. तांब्या भांडा लांबच ठेवलीला नं मी… आपलीच मानसं हायती, पन गावात आजार पसरंल मनून कालजी घेतलेली बरी नं!” मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. हे वास्तव सर्वदूर अनुभवाला येतं की ग्रामीण भागातील लोक हे अडाणी, गावठी, खेडूत म्हणून गणले जातात. शिक्षण कमी, संधी कमी, सुविधा कमी म्हणून शहराच्या तुलनेत मागे राहिलेला मोठा समाजगट गावांमधे पाहायला मिळतो. त्यांना काही स्वप्नं नाहीत, त्यांच्यात काही क्षमता नाहीत, त्यांना उज्वल भविष्य नाही म्हणून हिणवला जाणारा तो समाजगट शहरातल्या उच्चशिक्षितांनाही लाजवताना कोरोनाच्या काळात आम्ही अनुभवला. त्यांच्याकडे दोन पायांची गाडी, थोडी सुबत्ता असली तर घरातल्या युवकाकडे एखादी बाईक आणि चारचाकी तशी विरळाच! दिवसभर शेतात, घरात, रानात राबणारा हा समाज कोरोनाच्या काळात सजग होता. आत्मनिर्भर होता हे माझं निरीक्षण आहे. कारण मुंबईहून आलेल्या आपल्याच जिवलगांना त्यांनी स्वयंप्रेरणेने कॉरण्टाईन केलं. त्यांच्यासाठी पाणी, शिधा, चुलीसाठी फाटी, ताटं, भांडी… अगदी टूथपेस्टसुद्धा अशा सगळ्या सोयी घराबाहेर उपलब्ध करून दिल्या. लॉकडाऊन जाहीर व्हायच्या आधी कडूवाडीतला प्रसिद्ध महिलांच्या लेझीमचा पालखीभोवतीचा नृत्याविष्कार सगळ्या गावाने अनुभवला. जसे कोरोनासंबंधीचे शासकीय आदेश येऊ लागले तसे लोकांनी पालखी आटोपती घेतली. शेवटच्या दिवशी होत असलेले पूजेचे उपचार थोडक्यात आटोपले आणि दुपारीच देवी मंदिरात नेऊन पुनःस्थापित केलीसुद्धा. दरवर्षी होणारी रोमटाची जत्राही झाली नाहीच, अर्थात!
लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुंबईकर, पुणेकर गावातच अडकले. घराघरात दाटी झाली. पहिल्या एकवीस दिवसांच्या काळात एक अनामिक भीती मनात दाटली होती. अनिश्चितता.. आणि पुरवठा कसा होणार याची काळजी… गावातलं किराणा मालाचं एकमेव दुकान आणि दुसरं रेशन दुकान, खाजगी केशकर्तनालय सर्व बंद होतं. लोकांनी दुसर्‍याच्या शेतात जाऊन करायची कामंही थांबवली होती. मुलं वाड्यावाड्यात एकत्र खेळत होती पण तरी तणाव दिसत होता. कोरोनाचे नियम पाळा सांगणारी ग्रामपंचायतीची रिक्षा वाड्यावाड्यात फिरली. सरपंच आणि समिती सदस्य घरोघरी जात होते. रूग्णसेविका ताई माझी मैत्रीणच आहेत. दिवसभर त्या स्वतः आणि अंगणवाडी ताई घराघरात जात होत्या. एक शिक्का मारलेला माणूस गावभर फिरत आहे ही तक्रार पंचायतीत त्याच्या कुटुंबीयांनीच दिली! वैद्यकीय यंत्रणा काम करत होती. शाळेतल्या शिक्षकांना पोलिसांचे सहाय्यक म्हणून ड्यूटीही लागली. पण हे फार काळ नाही जाणवलं. आठवडाभराने लोक त्यांच्या त्यांच्या शेतातील कवळं तोडणे, भातलावणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करणे, भाजावळ करणे अशी कामं करताना दिसू लागली. किराणा मालाच्या दुकानापुढे चौकोन आखले गेले . एका भावाचा दूरभाष क्रमांक नोंदवला गेला. इथे यादी पाठवा आणि दुसर्‍या दिवशी आपली पिशवी घेऊन जा असे सुचवण्यात आले. दर आठवड्याला भाजीचा टेम्पो येऊ लागला. लोक मास्क बांधून, अंतर ठेवून भाजी विकत घ्यायला जायचे. फळंही मिळायची अधूनमधून. आठवडी बाजार कटाक्षाने बंद होता. गवळी कुटुंबातून दूध पुरवठा होत होता. घरात खूप माणसे असल्याने जिथे वस्तू कमी पडतील तिथे त्या एकमेकांना दिल्या जात होत्या.
एक महिला म्हणून नजरेने टिपलेलं असं, की मुंबई-पुण्याहून आलेल्या नातलग महिला आरंभी अंगणात खुर्च्या टाकून गप्पा मारत असत आणि कोकणातल्या घरी असलेली जाऊ, सासू, बहीण, नणंद मात्र विस्तारित कुटुंबासाठी राबत होत्या. त्या कुरबुरीही कानावर आल्या. पण लॉकडाऊन वाढल्यावर मात्र शहरांतून आलेल्या महिलाही भाजी घ्यायला आलेल्या दिसू लागल्या, घरकामात मदतही करू लागल्या. धान्य, भाजी नाही, मांसाहारी पदार्थ नाहीत, पण लोकांनी अंडी खूपच वापरली आहारात. अंड्यांचा टेम्पो आला की लोक पाचसहा डझन अंडी सहज नेत होते. परिस्थितीशी सामंजस्य दिसत होतं. घरात साठवलेला वर्षभराचा तांदूळ, भाकरीसाठी नाचणी आणि पिठल्यासाठी कुळीथ आहेत वैनी. कशाला जाचं तडमडायला शहरात… काय नाय तर भात आणि पिठी (कुळीथाचं पिठलं) चुलीवर करून दोन वेळा खायाचं आणि गप बसायचं… शेजारच्या घाग वहिनींनी माझ्या डोळ्यांत नकळत अंजन घातलं. कारण मी आज फ्लॉवर नाही, टॉमेटोच खराब अशा कुरकुरी करत होते. मग चार महिने मीही आमच्या शेतातल्या चवळीच्या शेंगा, वांगी, दुधी याच भाज्या परतपरत वेगवेगळ्या पद्धतींनी करून पाहिल्या, उसळी केल्या आणि काहीच नसलं तर कांदे आणि बटाटे मिळत होतेच – सकाळी कांदाबटाटा, संध्याकाळी बटाटाकांदा…. पण काही अडलं नाही. पोट तृप्तीने भरत होतंच.
शेतातील भात लावणीचे दृश्य
रोजी बंद म्हणून रोजंदारीवर काम करणारा वर्ग अस्वस्थ नक्कीच झाला. पण यावेळी मुंबईतील नातेवाईक मदतीला मिळाल्याने अनेकांनी मिळेल त्या सामानात घरांची डागडुजी केली, परिसर नीटनेटका केला; एवढंच काय रात्री वहाळातून जाऊन छोट्यामोठ्या शिकारीही केल्या. गावात ते सहज घडतं. पावसाळ्यात तर मासे, चिंबोर्‍या पकडायला जाळी घेऊन अनेक जण रात्री बाहेर पडतात, दुसऱ्या दिवसाच्या कालवणाची सोय. चाकरमानी मात्र मुंबईतील परिस्थिती पाहून-ऐकून बेचैन होत. पण त्यांनीही हळुहळू त्यांचं कसब बाहेर काढलं. त्यांनी शांतपणे गावात छोटीमोठी कामे मिळवून ती करायला सुरुवात केली. म्हणाले वेळ जातो आणि पैसेही मिळतात. घरोघरची भातलावणी तर यावेळी लग्नघरासारखी पार पडली. शेतात पंचवीस-तीस कुटुंबीय एकत्र दिसत. स्थानिक ग्रामस्थ सांगत “यावेळी मुंबईचा भाव आला ना, कोरोनामुळे. त्यामुळे लावणी कवाच उरकली… जास्त काय वाटला नाय काम. पोरांनी तर मजाच केली लय…”
भाजीचा टेम्पो आला…’ ‘सौंदळच्या पंपावर उद्या पेट्रोल येणार आहे…’ ‘पाचल हे आठवडी गाव आजउद्या सुरू असणार आहे अशा मदतीच्या बातम्या पसरत. मग गावात लगबग सुरू होई. गावाची परंपरागत खोती ज्या कुटुंबाकडे आहे ते कुटुंबही अतिशय स्वस्थतेने नेहमीसारखं जगत आहे. त्यांचंच किराणामालाचं एकमेव दुकान गावात आहे. म्हणून त्यांच्याकडे व्यस्तता अधिक असते. पण नियम पालन करून धान्य मिळतं. त्यांच्या घरातल्या महिला वेळच्या वेळी तुळशीपुढे दिवा लावताना, वाती वळताना, स्वयंपाक करताना अगदी नेहमीसारख्याच रमलेल्या दिसतात.
गाव पाहुण्यांनी भरलं, त्यामुळे नेटवर्कवर ताण आला आहे. मात्र अधूनमधून नेटवर्क मिळतं. आम्हाला इकडे खरंच जाणवलं नाही की पुण्यात, मुंबईत काय घडतंय? नातलग, स्नेही, सर्वांची चिंता वाटत होती, पण शहरातल्या असुरक्षिततेची पुसटशीही कल्पना येत नाही. गावातल्या घराशी, जीवनशैलीशी अपरिचित असलेले लोक ई पास काढून शहरात परतले. पण बहुतांश मंडळी गणपतीपर्यंत गावातच राहणार आहेत. काही शिक्षित मुले शहरांत कंपन्यांमधे कामाला आहेत, त्यांना कामे सुरू झाल्याने परतावे शिधा, वाणसामान पोत्यात भरून भरून गाडीत कोंबला अक्षरशः! हे सर्व वर्णन नोंदवताना मला जाणवतंय की आयुष्याकडून फार कमी अपेक्षा ही या ग्रामीण जीवनाची गुरुकिल्ली आहे! पालकांनी माझ्याकडे मुलं अभ्यासाला पाठवली. त्यातून हेही स्पष्ट झालं, की पालक आणि मुलं त्यांच्या भविष्याबाबत जागरूक आहेत. मुलांनाही त्यांनी मोठं व्हावं असं वाटतं. पण त्यांचं जगणं खरंच आत्मनिर्भर शब्दाला साजेसं आहे. ही माणसं आहे त्या परिस्थितीत निसर्गाशी जुळवून घेत जगत आहेत. आरोग्याच्या समस्या त्यांनाही आहेत. कौटुंबिक विवंचनाही आहेत. तरीही गावात सगळ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. पाच जणांची छोटी दिंडी पुरेसे अंतर राखून विठ्ठल मंदिरात आली. आषाढ अमावास्याही गावात साजरी झाली आणि पंचमीला मातीचा नागोबाही घरोघरी पूजला गेला. पावसाळ्याच्या सुरुवातीला एकमेकांच्या अंगण-परसातल्या वेली-झाडं छाटून आणली गेली आणि प्रत्येकाच्या अंगणात रूजवली गेली. मलाही गावातल्या एका आजींनी स्वतःहून चार-पाच रोपं दिली अंगणात लावायला!
तर हे सगळं मी अनुभवलं. त्यामुळे मला समजली ग्रामीण आयुष्यातली आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि समाधान हा सहसा मानवी आयुष्याच्या कोशात न सापडणारा शब्द. मी गावातल्या स्थानिकांच्या कुटुंबांत नैराश्य पाहिलं नाही. आयुष्य संपलं की काय असा आविर्भावही कुणाचा दिसला नाही. संपूर्ण जग हादरलेले असताना बारा वाड्यांचं एक छोटं गाव नांदतं आहे. त्यासारखी अनेक गावं भारतभर आहेत. लॉकडाऊनच्या काळात मोठमोठी शहरं उदासीनतेच्या छायेत आणि माणसं निराशेच्या गर्तेत जात असताना गावातली ही रंगीबेरंगी तुकड्यांनी विणलेली गोधडी कोरोनाच्या अनिश्चिततेच्या सावटातही मला ऊब देऊन गेली!
आर्या जोशी9422059795
jaaryaa@gmail.co
————————————————————————————

About Post Author

Previous articleरूद्र आणि शिव (ShivShankar’s Two Faces – Rudra & Shiv)
Next articleख (Kha)
आर्याआशुतोष जोशी यांनी ‘श्राद्धविधीची दान संकल्पना‘ या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा ‘कन्यारत्न पुरस्कार‘ आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा ‘स्री शक्ती पुरस्कार‘ प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दोन वर्षांपासून संपादक म्हणून कार्यरत आहेत.9422059795

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here