वसंत जोशी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शांतपणे झोपेत मरण पावला (21 सप्टेंबर 2024). तो त्या आधी चार दिवस थोडा अस्वस्थ होता. तसे तर, त्याने त्याचे सार्वजनिक कार्य वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी थांबवले होते. वयोमानाने शरीर थकत होते. त्याच्या पत्नीचे, सुनीताचे देहावसान त्या आधी, तीन वर्षांपूर्वी झाले. त्या काळात, त्याला काही व्याधींनी घेरले, विस्मृती जाणवू लागली होती, पण गंभीर असे काही नव्हते. त्यात सोसायटी पुनर्विकासानंतर मिळालेला फ्लॅट मोठा; अपत्याविना जीवन एकाकी होते. त्याचे पुतणे रविंद्र जोशी व सूनबाई अश्विनी यांनी त्याच्या नाश्ता-जेवणाची व्यवस्था केली होती. पुतणी ज्योती पानसे जाऊन-येऊन लक्ष ठेवायची. तो स्वतः उठून शनिवार, रविवार पुतण्या व पुतणीकडे जाई. वसंतचा स्वभाव ‘सोशल’; सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा, हसतमुख राहण्याचा होता. त्याने जीवनाबद्दल तक्रार कधीही, अगदी शेवटच्या काळातही केली नाही. परंतु घरात तो एकटा असे. सोसायटीतील काही परिवारांचा त्याला आधार होता.
साधारणपणे, वर्षापूर्वी त्याच्या शेवटच्या दिवसांचा प्रवास सुरू झाला. माझा आणि त्याचा सहवास साठ वर्षांचा, मित्रप्रेम व कौटुंबिक संबंध; असे की कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगी आम्ही एकमेकांकरता धावून जाणार ! आमच्या घरी गेल्या वर्षी गणपती बसल्यावर तिसऱ्या दिवशी वसंतचा फोन आला, ‘अशोक, तुझ्या घरी गणपती बसला आहे ना, तुझ्या मुलाला माझ्याकडे गाडी घेऊन पाठव. मला दर्शनाला यायचे आहे.’ माझा मुलगा, महेश त्याच्याकडे गेला. त्याला आमच्या घरी घेऊन आला. वसंतने दर्शन घेतले. आवडीचा नाश्ता केला. तासभर गप्पा झाल्या. त्याने सगळ्यांची आस्थेने चौकशी केली. मुलाने त्याला त्याच्या घरी पोचवले. गणपतीचे दिवस सरले. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी, मी त्याच्यासाठी खाण्यास म्हणून सामोसे व चहा घेऊन गेलो. आम्हा दोघांचे गप्पा मारत खाणेपिणे आनंदाने झाले. दुसऱ्या दिवशी दुपारी तसाच गेलो असता त्याने मी बरोबर नेलेले काही खाल्ले नाही. चहाही दोन घोटच घेतला. त्याच्या डोळ्यांवर झोप होती. तिसऱ्या दिवशी फक्त नानकटाई घेऊन गेलो, तर त्याचा एकच घास त्याच्या तोंडात घोळत राहिला. मी त्याचा पुतण्या व पुतणी यांना मेसेज पाठवला, की ‘वसंतकाकाच्या तब्येतीची मला काळजी वाटते.’
वसंताचा जन्म वाईचा. तीन भाऊ, एक बहीण. त्यात हा सर्वांत लहान. त्याचे वडील त्याच्या लहानपणीच गेले. आईने सांभाळ केला. वसंत हा बुद्धिमान, पोहण्यात तरबेज, कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, त्याची वाईच्या ढोल्या गणपतीची उपासना नित्य चाले.
त्याचा पुतण्या व सून यांनी वसंताला त्याच्या फॅमिली डॉक्टरकडे दुसऱ्या दिवशी, तत्परतेने नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले. काही रिपोर्टस काढून घेऊन, दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. मी बरोबर होतोच. मी वसंतला ‘वसंत विहार’मध्ये सोडले, रिपोर्ट्सची व्यवस्था केली. त्याला खूपच अशक्तपणा जाणवत होता. चालताना आधार द्यावा लागत होता. जीभही जड झाली होती. रिपोर्ट्स काय येतील त्यावर पुढची ट्रीटमेंट ठरणार होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या पुतण्याने रात्री वसंतच्या सोबतीसाठी ‘केअर टेकर’ची व्यवस्था केली. सुनेने दुपारचा जेवणाचा डबा पाठवला होता. रात्री तो जेवला नाही. त्याने ‘केअर टेकर’ने दिलेला चहा घेतला. फ्रेश झाला. नित्यक्रमाप्रमाणे देवापुढे उदबत्ती लावली. अथर्वशीर्ष, रामरक्षा, देवीची 108 नावे म्हटली व झोपी गेला. साधारणतः, त्याचा हा नित्यक्रम अलिकडे झाला होता. तो रात्री दोनच्या सुमारास उठला, वॉशरूमला जाऊन आला, ‘केअर टेकर’चे लक्ष होतेच. नेहमीप्रमाणे, तो त्याच्या बेडवर जाऊन झोपला. सहा वाजता ‘केअर टेकर’ने पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले, की – ‘सगळे संपले आहे !’ त्याने त्याच्या पुतण्याला बोलावून घेतले. पुतण्या व सुनबाई आल्या. खरेच, वसंताला चिरनिद्रा लागली होती. वेदना अगर क्लेश झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर नव्हत्या. शांतपणे, झोपेत त्या पुण्यात्म्याचे देहावसान झाले होते ! मीही सकाळी साडेसहाला तेथे पोचलो, पाहतो तर काय तो शांतपणे, न परतीच्या प्रवासाला निघून गेला होता ! इहलोकीची त्याची यात्रा पूर्ण होऊन तो मार्गस्थ झाला होता.
त्याला अंत्यक्रियेसाठी दहा वाजता ‘वैकुंठ’मध्ये नेले. विधी कोणताही करायचा नाही हे त्याने लिहून ठेवले होते. आम्ही वसंतला ‘पोचवून’ स्मशानातून बाहेर साडेदहा वाजता पडलो.
माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी संध्याकाळी त्याच्या घराकडे चक्कर मारली. घराला कुलुप होते ! स्वाभाविक आहे, त्याच्या ‘घरचे’ कोणी नव्हते, त्याच्या ‘गोड’ स्वभावामुळे काळजी घेणारे बरेच होते, पण ते सारे त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वत:च्या मार्गी लागले होते ! मी थोडा स्तंभित झालो. सकाळी तर त्याचे निधन झाले होते आणि आता घरी कोणी नाही ! बरोबरच आहे, त्याने स्वत:चे जीवन थांबवून टाकले होते. त्याने पुतण्या-पुतणी व आम्हा मित्रांना बजावले होते, की मला काही झाले तरी हॉस्पिटलमध्ये न्यायचे नाही. मला मृत्यू घरी येऊ द्यावा. त्याच्या इच्छेप्रमाणे झाले होते. शेवटपर्यंत कोणाला कसलाही त्रास नाही.
त्याने आयुष्यभर सर्वांना आनंदच दिला. तो निवृत्तीनंतरचे जीवन सार्थकी जगला. त्याने खूप मोठी सार्वजनिक सेवा योग-प्राणायामाचे शिक्षण-प्रशिक्षण लोकांना देऊन केली. त्याच्या स्वत:च्या घरचे वातावरण प्रसन्न असे आणि सतत जाणाऱ्या-येणाऱ्यांचा राबता असे. सकाळची वेळ असायची, घरात लावलेल्या उदबत्तीचा मंद सुवास घराबाहेरपर्यंत दरवळत असायचा. घरात स्वच्छ सतरंज्या अंथरलेल्या. समोर काकांची बैठक. देवपूजा वगैरे आटोपून शिक्षणार्थी येणाऱ्या सर्वांचे हसतमुखाने स्वागत व आस्थेने विचारणा, ‘घर सापडायला त्रास तर नाही ना झाला?’ वसंतने शेकडो, हजारो व्यक्तींना योगा-प्राणायामाचे शिक्षण प्रात्यक्षिकासह देऊन तंदुरुस्त करून सोडले होते. तो प्रत्येक व्यक्तीची गरज पाहून तिला त्यासाठीचे मार्गदर्शन करत असे. प्रत्येक माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे, हा त्याच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू होता. तो त्याचे वीस हजारांपेक्षा जास्त ‘फॉलोअर्स’ आहेत असे सांगत असे. त्याच्याकडे येणाऱ्यांत स्थानिक, परप्रांतीय, परदेशस्थही असत. त्याने आयुर्विमा महामंडळाच्या नोकरीतून 1998 साली निवृत्त झाल्यावर स्वतः प्रशिक्षण घेऊन, तो यज्ञ सुरू केला होता.
त्याला ठाण्याचे श्रीकृष्ण मराठे यांच्याकडून या विषयात ज्ञान मिळाले. तो त्यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या सतत संपर्कात राहिला. तो विशिष्ट व्याधींसाठी, विशिष्ट योगक्रिया-प्राणायामाद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करू लागला. त्याची कीर्ती कर्णोपकर्णी पसरली. तो स्वत:च्या घरी वर्ग घेई, एखाद्या ग्रूपने बोलावल्यास तेथे जाई, आजारी अगर वृद्ध व्यक्तीसाठी तिच्या घरी जाई आणि हे सर्व तो स्वखर्चाने करत असे. त्याने तो यज्ञ वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षापर्यंत निस्पृहतेने चालवला. सुमारे वीस हजार लोकांना मार्गदर्शन केले.
वसंतचा मृत्यू सद्यकालात बहुसंख्य वृद्धांना हवा असेल असाच झाला. रूढार्थाने त्याला मूल-बाळ नसल्याने त्याचे पुढे कोणी नाही असेच म्हटले जाईल. परंतु ते खरे नव्हे. एवढा सद्भाव तो मागे ठेवून गेला… स्मशानात त्याचा अंत्यविधी उरकल्यानंतर कोणी कोणाशी बोलले नाही. त्याचे दिवस-कार्य वगैरे झाल्याचे कळले नाही. मात्र वसंतच्या आम्हा सर्व मित्रांना त्याचे जीवन व मृत्यू यामध्ये आदर्शाच्या अनेक खुणा दिसतात. सगळ्यात मोठी खूण म्हणजे त्याचे स्वच्छ, प्रांजळ, भाबडे वाटावे असे निरोगी मन. त्यामुळे त्याने कोणत्याही मोठ्या गंभीर समस्येचा सामना कधी केला नाही. परंतु तो सर्वसामान्य माणसांच्या हरतऱ्हेच्या प्रश्नांना सरळ सामोरा जाई – त्यात छक्केपंजे नसत. तो उचित गांभीर्य आणि आवश्यक औपचारिकता मात्र सांभाळत असे. तो जीवनातील दैनंदिन घटनांकडे पॉझिटिव्ह दृष्टीनेच पाहायचा. आम्हा मित्रमंडळींमध्ये तऱ्हतऱ्हेचे सांसारिक प्रश्न निर्माण होत. आमच्यापैकी बहुतेक सारे लोक त्या त्या प्रसंगी वसंतचा सल्ला घेत. काही वेळा तर आमच्या मुलामुलींनीदेखील तशा प्रसंगी वसंतला विचारले आहे. त्याची नोकरीतील निवृत्ती आणि जीवनातून निवृत्ती हे टप्पे तसे स्वाभाविक जमून गेलेले दिसतात. त्यामधून मागे राहिलेल्या मंडळींना बराचसा धडा घेता येण्यासारखा आहे. त्यांपैकी मोठा धडा म्हणजे लौकिकाचा आनंद उपभोगणे, परंतु त्यामध्ये जीव न रमवणे ! वसंत सर्वसामान्य माणसांसाठी आदर्शवत जगून गेला. त्याला त्याच्या जीवनाला साजेशी साथ सुनीतावहिनींची लाभली.
– अशोक कुंभोजकर 9822036251 adimata_pune@yahoo.co.in