ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.स. खांडेकर यांच्या नावाचे प्रेक्षणीय स्मृती संग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘शिरोडा’ या गावी आहे. ते गाव वेंगुर्ला तालुक्यात समुद्रकाठी वसले आहे. गांधीजींनी केलेल्या 1930 सालच्या मार्च-एप्रिल महिन्यातील मिठाच्या सत्याग्रहानंतर, मे 1930 मध्ये त्याच धर्तीवर परंतु काहीसा वेगळा आणि काकणभर अधिक उग्र स्वरूपाचा मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता ! त्या सत्याग्रहाचे नेते ‘कोकणचे गांधी’ रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते सीताराम पुरुषोत्तम अर्थात अप्पासाहेब पटवर्धन हे होते. त्यात त्या गावच्या अनेकांना बंदिवासाची शिक्षाही भोगावी लागली होती.
शिरोडा गावात ‘बावडेकर’ शाळेची इमारत आहे. ती शाळा गुरुवर्य वि.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानमार्फत चालवली जाते. शाळेला अनंत विष्णू बावडेकर यांचे नाव दिलेले आहे. ते त्या शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. शाळेचे आरंभी नाव ‘ट्यूटोरियल इंग्लिश स्कूल’ होते. तिची स्थापना 1915 मध्ये झाली. पाच वर्षांनंतर शाळेत इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण देण्याचे ठरले. त्याच सुमारास गणेश आत्माराम खांडेकर या नावाचा एक तरुण, पुण्यातील महाविद्यालयीन शिक्षण आर्थिक अडचणीमुळे अर्ध्यात सोडून सावंतवाडी संस्थानाच्या नानेली गावात दाखल झाला. तो सखाराम खांडेकर या त्याच्या सुखवस्तू चुलत चुलत्यांकडे दत्तक गेला. तेच विष्णू सखाराम खांडेकर. सखारामपंत यांची तब्बल बारा अपत्ये अल्पायुषी ठरली होती आणि शेवटची एक मुलगी तेवढी हयात होती.
सखारामपंतांची अपेक्षा दत्तक पुत्राने त्यांची शेतीवाडी आणि गुरेढोरे याकडे लक्ष द्यावे अशी होती. याउलट दत्तक पुत्र – विष्णू सखाराम खांडेकर यांना शेतीवाडी करण्यात रस नव्हता; त्यामुळे ते शिरोडा या गावी शिक्षक हवे आहेत असे समजताच सावंतवाडीपासून चक्क पायी प्रवास करून शिरोड्याला 12 एप्रिल 1920 या दिवशी पोचले. बावडेकरांनी खांडेकरांची शिक्षक म्हणून त्या शाळेत नियुक्ती केली. खांडेकर तेव्हापासून पुढे अठरा वर्षे त्याच शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत शिकवत होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक असा त्यांचा लौकिक होता. शाळा ‘खांडेकरांची शाळा’ म्हणूनच ओळखली जाई.
खांडेकर शिरोडा गावात राहून कथा लिहू लागले आणि प्रसिद्धी पावले. शिरोडयाच्या समुद्रकिनारी त्यांच्या कविता जन्मास आल्या. ‘हृदयाची हाक’, ‘उल्का’, ‘कांचनमृग’ वगैरे कादंबऱ्या प्रकाशित होत गेल्या. त्यांचा बोलबाला साहित्यवर्तुळात झाला. जयवंत दळवी हे त्यांचे विद्यार्थी होते. खांडेकरांनीच त्यांना कादंबरी लेखनासाठी प्रवृत्त केले. खांडेकर मास्तरांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत प्र.के. अत्रे, वि.दा. सावरकर, बा.भ. बोरकर, यशवंत अशा अनेक दिग्गज साहित्यिकांनी शिरोड्यातील त्या शाळेला भेट दिली आहे.
खांडेकरांनी असोगा (तालुका: खानापूर, जिल्हा: बेळगाव) येथील मनू मणेरीकर या मुलीशी त्याच गावात अगदी साधेपणाने विवाह 16 जानेवारी 1929 या दिवशी केला. त्यांनी पत्नीचे नाव ‘उषा’ ठेवले. त्यांनी शिरोड्यातील भाड्याच्या जागेत तिच्यासोबत संसार थाटला. कोल्हापूरच्या ‘हंस पिक्चर्स’ने त्यांच्या एका कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करण्याचा घाट 1935 साली घातला. त्याची पटकथा-संवाद लिहिण्याचे काम खांडेकरांवरच सोपवले. खांडेकरांना त्या कामानिमित्ताने तळकोकणातील शिरोड्याहून घाटापलीकडच्या कोल्हापूरला वारंवार जाणे भाग पडले. त्यांची पटकथा आणि त्यांचे संवादलेखन असलेला ‘छाया’ चित्रपट 1936 साली प्रदर्शित झाला. तो सामाजिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला; गोहर गोल्ड कमिटीने वि.स. खांडेकर यांना त्या वर्षाचे सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद लेखक म्हणून सुवर्ण पदक प्रदान केले.

‘हंस पिक्चर्स’ने त्यांच्या आगामी चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन करण्यासाठी खांडेकरांना लगेच करारबद्ध करून घेतले. खांडेकरांनी विल्यम शेक्सपियरच्या ‘मॅकबेथ’ या नाटकावरून त्यांच्या स्वतःच्या लिहिलेल्या ‘उल्का’ या कादंबरीवरून ‘ज्वाला’ चित्रपटासाठी पटकथा तयार केली. तो चित्रपट 1938 साली प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टी त्यांच्या साहित्याची योग्य दखल घेऊ लागल्याने साहजिकच त्यांची आर्थिक बाजू भक्कम होऊ लागली. खांडेकरांनी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा 1938 साली दिला आणि ते कोल्हापूरला स्थायिक झाले.
खांडेकर हे साहित्याच्या क्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहिले. त्यांनी सोलापूरला 1941 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. ‘ययाति’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार 1960 साली मिळाला तर त्याच कादंबरीसाठी ते ज्ञानपीठ पुरस्काराने 1974 साली सन्मानित झाले. तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन 1968 साली गौरवले होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना ‘डी लिट्’ पदवी बहाल केली. सांगलीत 11 जानेवारी 1898 रोजी जन्मलेल्या खांडेकर यांना मिरज येथे 2 सप्टेंबर 1976 रोजी वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी देवाज्ञा झाली.

तत्पश्चात शिरोड्यातील त्यांच्या शाळेच्या संचालकांनी शिक्षणसंस्थेचे नाव बदलून ते ‘गुरुवर्य वि.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान’ असे ठेवले आणि शाळेच्या नवीन इमारतीत ‘वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालय’ स्थापन केले. शाळेचा शतक महोत्सवी सोहळा 2015 मध्ये नव्या इमारतीत पार पडला. तेव्हाच वि.स. खांडेकर यांचे स्मृती संग्रहालय त्याच इमारतीत दिमाखदार स्वरूपात उभे राहिले. खांडेकरांची दुर्मीळ छायाचित्रे, हस्तलिखित पत्रे, कविता, त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे, त्यांच्या पटकथा-संवाद असलेल्या ‘छाया’, ‘ज्वाला’, ‘देवता’, ‘अमृत’, ‘संगम’, ‘तुझाच’, ‘माझं बाळ’ या चित्रपटांची पोस्टर्स वगैरे अनेक गोष्टींनी संग्रहालय समृद्ध आहे. हे संग्रहालय कोल्हापूरचे सुनीलकुमार लवटे यांच्या अभ्यासातून साकार झाले. वि.स. खांडेकर यांच्या साहित्यकलाकारकिर्दीचे सम्यक् दर्शन तेथे घडते.
– प्रवीण कारखानीस 9860649127 pravinkarkhanis@yahoo.com