स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरूद्ध उठाव 1857 च्या क्रांतियुद्धाअगोदरही झालेले होते. दक्षिणेतील वेलोर छावणीतील हिंदी शिपायांना कपाळावर गंध लावण्यास, कानात भिकबाळ्या घालण्यास किंवा दाढी राखण्यास बंदी 1806 साली घातली होती. त्यामुळे हिंदू-मुसलमानांनी त्यांच्या भावना–धर्मभावना दुखावल्या गेल्या म्हणून उठाव केलेला होता. कंपनी सरकारने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांना पदच्युत करून त्यांचे राज्य 1839 साली खालसा केले, तेव्हा साताऱ्याजवळच्या कऱ्हाड गावच्या धारराव पवार यांनी कंपनी सरकारविरूद्ध उठाव केला होता. नरसिंहराव पेटकर यांनी एक हजारावर शिपाई घेऊन बदामीचा किल्ला हस्तगत केला होता. परंतु कंपनी सरकारच्या बेळगाव, धारवाड येथील सैन्याने त्यांचा पराभव केला. त्यानंतर खानदेशातील भिल्लांनी इंग्रजांविरूद्ध 1846 पर्यंत चार-पाच वेळा सशस्त्र उठाव केला होता. कोल्हापूर संस्थानचा कारभारी दाजिबा पंडित याने पाचशे सैनिकांच्या मदतीने सामानगड 1844 मध्ये घेतला आणि तो किल्ला सतरा दिवस लढवून शेवटी शरणागती पत्करली होती. विद्रोहाचे असे छोटे छोटे उद्रेक होत होते. परंतु 1857 च्या विद्रोहाची व्याप्ती मोठी होती. परिणाम दूरगामी करणारी होती.
मॅकार्थी या इतिहासकाराने ‘हिस्टरी ऑफ अवर ओन टाइम्स’ या पुस्तकाच्या तिसऱ्या खंडाच्या सुरुवातीस म्हटले आहे, “फक्त शिपायांनी बंड केले नव्हते. ते निव्वळ लष्करी बंड नव्हते. ते युद्ध म्हणजे फौजेतील नाराजी, संपूर्ण देशाला इंग्रजांबद्दल वाटणारा द्वेष, त्यांचे धर्मवेड, इंग्रजांनी हिंदुस्थान बळकावले त्याचा संताप अशा सगळ्यांचे मिश्रण होते. तेथील राजेमहाराजे आणि शिपाई त्यात सामील होते. भारतातील हिंदू आणि मुसलमान त्यांचे धार्मिक वैर विसरून ख्रिश्चनांच्या विरूद्ध एक झाले होते. त्या मोठ्या बंडखोरीला चालना इंग्रजांबद्दलचा द्वेष आणि भय यामुळेच मिळाली होती. अगोदरपासूनच धुमसत असलेल्या वातावरणात ठिणगी, काडतुसांबद्दलच्या भांडणाने पडली होती. जर ती ठिणगी पडली नसती तरी त्या युद्धाला आणखी कोणते तरी निमित्त पुरले असते… मीरतच्या शिपायांना त्या क्षणी एक निमित्त मिळाले, एक नेता मिळाला आणि त्याचे पर्यवसान झाले ते राज्यक्रांतीच्या युद्धामध्ये. शिपाई सकाळच्या उन्हात हातातील तलवारी परजत यमुना ओलांडून गेले तेव्हा त्यांनी इतिहासातील एक महत्त्वाचा, निर्णायक क्षण पकडला आणि लष्करी बंडाचे रूपांतर धार्मिक, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या युद्धात झाले !”
दिल्लीचा बादशहा बहादूरशहा जफर याच्यावर कंपनी सरकारने पुढे राजद्रोहाचा खटला चालवला होता. त्या वेळेस मेजर हॅरिएटर यांनी सरकारी वकील म्हणून खटल्याचे कामकाज पाहिले होते. त्या मेजर हॅरिएटर यांनी म्हटले आहे, “येथील लोकांनी सत्तेसाठी वेगळा धर्म, रीतिरिवाज, परंपरा, त्वचेचा रंग यांमध्ये वेगळेपणा असणाऱ्यांना हाकलूनच देण्याची धडपड सुरू केली. चरबी लावलेल्या काडतुसांच्या कारणापेक्षा अधिक खोलवर असे दुसरेच काही कारण त्यामागे आहे असे मला म्हणण्यास हवे. ज्या तऱ्हेने, हा जो उठाव ज्या उत्साहाने एकाच वेळी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झाला त्याच्यामागे शहाणपणाने आखलेले मोठे कारस्थान होते हे निश्चित. गोऱ्यांना मारण्यासाठी उद्रेक जेथे काडतुसांचा संबंधही नव्हता तेथेही झालाच होता, हेदेखील लक्षात घेण्यास हवे.”
सेन-मुजुमदार यांनी त्यांच्या ग्रंथांमधून, ‘इंग्रजांबद्दलची शत्रुत्वाची भावना सार्वत्रिक नव्हती. दक्षिण हिंदुस्थानात तर काही घडलेच नाही’ असे प्रतिपादन केले आणि त्यावरून अनुमान काढले, की त्याला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणता येणार नाही, कारण त्याचा उद्रेक उत्तर हिंदुस्थानातील काही ठिकाणी झाला होता. विनायक दामोदर सावरकर यांनीदेखील 1905 साली इंग्लडच्या वास्तव्यात लिहिलेल्या ग्रंथामध्ये 1857 सालच्या अशा घडामोडींची दखल घेतलेली नाही. दक्षिणेतील घडामोडी अंधारातच राहिल्या होत्या. परंतु त्या घडामोडींना प्रकाशात आणले ते डॉ. वा.द. दिवेकर या इतिहास, अर्थशास्त्र या विषयांच्या संशोधक-अभ्यासक प्राध्यापकाने. त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटरी पेपर्स, इंग्रज अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार, याचबरोबर दक्षिण भारतातील राजेरजवाडे, सरदार, जहागिरदार यांच्या दफ्तरी असलेली कागदपत्रे, सरकारी दफ्तरखान्यातील कागदपत्रे यांचा अभ्यास करून ‘साऊथ इंडिया इन 1857 वॉर ऑफ इंडिपेंडन्स’ हे पुस्तक 1990 मध्ये लिहिले. त्या ग्रंथाचे हिंदी भाषांतर 2001 मध्ये प्रसिद्ध झाले असून मराठी भाषांतर ‘1857 चे स्वातंत्र्ययुद्ध : पेटलेला दक्षिण हिंदुस्थान’ असे आहे.
दिवेकर यांनी अंदमानातील कैद्यांच्या नोंदी पाहून असा निष्कर्ष काढला आहे, की “संपूर्ण हिंदुस्थानातून आठशेहून अधिक लोक ‘1857 च्या युद्धा’त भाग घेतला म्हणून अंदमानात शिक्षा भोगत होते. त्यांपैकी दोनशेसाठांहून अधिक नावे ही दक्षिण हिंदुस्थानातील लोकांची आहेत. ब्रिटिश सरकारने निव्वळ सव्वीस लोकांची नोंद केलेली होती.” दिवेकर यांनी दाखवून दिले आहे, की इंग्रजांनी पेठचे राजे भगवंतराव निळकंठराव, नरगुंदचे राजे भास्करराव तथा बाबासाहेब भावे या दोघांना फाशी दिले. कोल्हापूरच्या छत्रपतींचे धाकटे भाऊ चिमासाहेब यांना कराचीला हद्दपार केले, तेथेच त्यांना मृत्यू आला. कोवलमचे राजे दीपसिंग, साताऱ्याच्या छत्रपतींचे पुतणे रामराव जंगबहादूर, जमखिंडीचे राजे रामचंद्रराव या राजेमंडळींबरोबरच, इंग्रजी सैन्यातील कितीतरी हिंदी अधिकारी, शिपाई, मुलकी अधिकारी यांनाही अंदमानमध्ये पाठवण्यात आले होते.
– प्रभाकर भिडे 9892563154 bhideprabhakar@gmail.com