उदयन वाजपेयींची संवादयात्रा- शम्सुर्रहमान फारूकी (Udayan Vajpayee Interviews: Shamsur Rahman Faruqi)

1
108

उदयन वाजपेयी हे हिंदीमधील आघाडीचे लेखक. त्यांनी त्यांच्या दीर्घ लेखन कारकिर्दीत कथा, कविता, कादंबरी, प्रवासवृत्तांत-समीक्षात्मक निबंध, अनुवाद असे अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले आहे.

त्यांनी स्वत:च्या लेखनाबरोबरच समकालीन प्रतिभावंतांचे विचारविश्व जाणून घेण्याच्या उद्देशाने काही दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्यांत सिनेकर्मी मणी कौल, इतिहासकार धरमपाल, मणिपुरी रंगकर्मी रतन थिय्यम, वेगवेगळ्या संस्कृतींचे अभ्यासक सुरेश शर्मा, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सामदोंग रिनपोछे, उर्दू साहित्यसंस्कृतीचे, मुघलकाळ-संस्कृतीचे अभ्यासक-भाष्यकार, कथा-कादंबरीकार, सरस्वती सन्मान विजेते कादंबरीकार-समीक्षक शम्सुर्रहमान फारूकी, शिक्षणातील मूलभूत बाबींचे अभ्यासक के.बी. जिनान, आधुनिक दार्शनिक नवज्योती सिंह, कमलेश-अशोक वाजपेयी, वागीश शुक्ल-आशीष नंदी-बी.एन. गोस्वामी इत्यादींचा समावेश आहे.

त्या मुलाखतींपैकी शम्सुर्रहमान फारूकी यांच्या मुलाखतीविषयी परिचयात्मक लेख निरंतर वाचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नीतिन वैद्य यांनी लिहिला आहे. बाकीच्या मुलाखतींचाही परिचय करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

-सुनंदा भोसेकर

उदयन वाजपेयींची संवादयात्रा- शम्सुर्रहमान फारूकी

उदयन वाजपेयी हे हिंदीमधील आघाडीचे लेखक. त्यांनी त्यांच्या दीर्घ लेखन कारकिर्दीत कथा, कविता, कादंबरी, प्रवासवृत्तांत, वैचारिक-समीक्षात्मक निबंध, अनुवाद असे बहुसंचारी लेखन केले आहे. ते हिंदीतही पठडीतील लेखनापेक्षा वेगळे आहे. वानगीदाखल, अलिकडेच प्रफुल्ल शिलेदार यांनी त्यांचा ‘केवळ काही वाक्य’ (केवल कुछ वाक्य) हा कवितासंग्रह मराठीत आणला आहे, तो पाहवा. त्यांनी कविता या साहित्यप्रकाराला असलेल्या अंगभूत मर्यादा ओलांडून त्यातील नव्या शक्यता यशस्वीपणे तपासल्या आहेत.

गंभीर प्रवृत्तीच्या या लेखकाने साहित्य, संस्कृती, समाज, इतिहास, कला अशा विविध क्षेत्रांत मूलगामी काम करणाऱ्या प्रतिभावंतांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मुलाखती म्हणण्यापेक्षा त्यांना दीर्घ संवाद म्हणणे अधिक योग्य होईल. स्वत:च प्रतिभावंत असलेल्या लेखकाला समकालीन प्रज्ञावंतांशी संथा घ्यावी- तसा संवाद साधावा, त्यांनी जमवलेले संचित समजून घ्यावे, शब्दांकनाचे कष्ट घेऊन ते तुमच्याआमच्यापुढे सादर करावे असे वाटते; याचे मला ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ अशा अनुभवाच्या काळात फार अप्रूप वाटते. चारसहा तासांपासून चारसहा महिन्यांपर्यंत चालणाऱ्या दीर्घ संवादाच्या या मैफिलींमधून आपले अंतर्याम उजळत आहे असा अनुभव येतो. अगदी अलिकडे वागीश शुक्ल यांच्याशी त्यांनी कोरोनाकाळात इमेलद्वारे असा दीर्घ संवाद केला, जो जानकीपूल (jankipul.com) या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. त्याआधी सिनेकर्मी मणी कौल (अभेद आकाश), इतिहासकार धरमपाल (मती, स्मृती और प्रज्ञा), मणिपुरी रंगकर्मी रतन थिय्यम (भव्यता का रंगकर्म), जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचे, त्यांच्या उदयास्तांचे, बलस्थाने आणि मर्यादा यांचेही अभ्यासक सुरेश शर्मा (आधुनिकता और पैगन सभ्यताएं), बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सामदोंग रिनपोछे (अनुठा साहचर्य), उर्दू साहित्यसंस्कृतीचे व मुघलसंस्कृतीचे अभ्यासक-भाष्यकार, कथा-कादंबरीकार, सरस्वती सन्मान विजेते समीक्षक शम्सुर्रहमान फारूकी (उपन्यासकार का सफरनामा), शिक्षणातील मूलभूत बाबींचे अभ्यासक के.बी.जिनान (बच्चों की समझ), आधुनिक दार्शनिक नवज्योती सिंह (विचक्षण), कमलेश-अशोक वाजपेयी, अद्याप पुस्तकरूपाने न आलेले वागीश शुक्ल-आशीष नंदी-बी.एन. गोस्वामी यांच्याबरोबर  कविता-कादंबरी-साहित्य-संस्कृती-नाटकसिनेमादी कला-वैचारिक विश्व, धर्म-दर्शनविचार आदींसंदर्भात केलेले दीर्घ संवाद; असे उभारलेले हे अफाट जग आहे.

उदयन वाजपेयींनी शम्सुर्रहमान फारूकींशी साधलेल्या संवादाविषयी – (उपन्यासकार का सफरनामा, द्वितीयावृत्ती 2022) 

वाजपेयी म्हणतात, उर्दू साहित्यसंस्कृतीचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आणि कथा-कादंबरीकार असलेल्या शम्सुर्रहमान फारूकींना मी एकांतातही त्यांच्या नावाने थेट उद्धृत केलेले नाही. हिंदी साहित्याचे गेल्या चारपाच दशकांत ज्या मूल्यांच्या आधारावर मापन झाले ती मूल्ये दुर्देवाने साहित्यपरंपरेपेक्षा समाजशास्त्रातून आलेली होती. येथे महत्त्वपूर्ण ठरवलेल्या कृतींचे साहित्यिक वा कलात्मक आधार स्पष्ट झालेले नाहीत.‌ अशा काळात एका अशा लेखकाची गाठभेट होते ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्य साहित्यात कलात्मक मूल्ये प्रस्थापित करण्यात घालवले, तेव्हा आशेचा किरण दिसू लागतो. अशा नांदीने सुरू झालेली सरस्वती सन्मान विजेते ज्येष्ठ उर्दू कादंबरीकार, समीक्षक आणि मुख्य म्हणजे मुघलकाळापासून गेल्या चारपाच शतकांतील बदलत गेलेल्या मुस्लिम संस्कृतीचे साक्षेपी अभ्यासक शम्स्सुर्रहमान फारूकी यांच्या मुलाखतीची ही दीर्घकालीन मैफल, ‘उपन्यासकार का सफरनामा’ संध्या रागासारखी उत्तरोत्तर रंगत जात एक समृद्ध वाचनानुभव देते.

फारूकींच्या महत्त्वाच्या दोन कादंबऱ्यांपैकी ‘कई चांद थे सरे आस्माँ’ या बहुचर्चित कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील दिल्लीतील सांस्कृतिक ऱ्हासपर्वाचे चित्रण येते, तर ‘कब्जे जमाँ’ ही पाच शतकांतील मुघलकाळाची सरमिसळ करणारी विस्मयकारी सफर आहे. संस्कृतीचा आणि लोकजीवनातील कालजयी ऐवजाचा शोध या दोन्हींत आणि त्यांच्या कथांमध्येही केंद्रस्थानी आहे. कथनात फारूकी जुन्या शेरशायरीचा फार सुंदर, सृजनशील वापर करतात. म्हणतात, फारसी, उर्दू शायरीमधील एखाद्या ओळीतही ब्रह्मांड सामावलेले असू शकते, उदा. ‘कई चांद…’मधील शम्सुद्दीनची मानसिक स्थिती नेमकी प्रकट करणारी ही ओळ पाहा, ‘हम खुले में फँस गए और बारिशने हमें पकड़ लिया’. कादंबऱ्यांमधील ऐवजाबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘गोरखपूर, बनारस, लखनौमधून बालपण गेले तेव्हा तेथे हिंदू, मुस्लिम दोन्हीकडची जुनी घरे पाहिली. स्त्रियांचे समाजात, घरात काय स्थान असे, पुरूष कसे वागत, पेहराव कसे असत, शायरांचे विश्व – त्यातील उस्ताद परंपरेपासून, टोकाची स्पर्धा, लौन्डेबाजीपर्यंत सगळे – असे बरेच काही. हे सगळे संचित तेव्हाही लयाला चालले होते. इंग्रजी शिक्षणाचे फायदे झाले तसे नुकसानही फार झाले. मॅक्समुल्लर, विल्यम जोन्स संवेदनशील होते, पण त्यांची संवेदना वेगळ्या जातकुळीची होती. ती युरोपीय समज हा शेकडो वर्षांतून विकसित झालेला लोकव्यवहार समजू शकली नाही. त्यात पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्यांनी भारताचा पुरातन वारसा जाणून न घेताच भविष्याचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न केला. (त्या काळात शासकीय नोकरीसाठी) परीक्षेत ‘यश’ मिळवायचे तर तेवढे पुरेसे होते, त्यामुळे तेवढेच लोकांनी वाचले. पूर्वी ‘दाग’ त्यांच्या शिष्यांना शिकवताना समस्यापूर्ती असते तशी एक ओळ देत, दुसरी लिहून आणायला सांगत. वीस वीस वेळा ती दुरूस्त करायला लावत. त्यातून शागिर्दांची शायरीची आणि एकुणात आयुष्याचीही समज विकसित होई.’

घरी वडील ‘देवबंद’मधील सनातनी, पण आई प्रागतिक घरातील, तरी त्यांच्यात विसंवाद नव्हता. आसपासही वातावरण खुले, मोकळे होते. फारूकी म्हणतात, त्या वेळच्या मुसलमान तरुण लेखकासमोर दोनच रस्ते होते, एकतर डावे व्हा किंवा थेट मौदुदींच्या जमाते इस्लामीत सामील व्हा. दोन्हींत तसे फार अंतर नव्हते. डावे ‘तरक्कीपसंद’ (प्रागतिक) तर जमातवाले ‘तालिमपसंद’ (आज्ञाधारी) म्हणवले जात. मी दोन्हींच्या मध्ये 50-51 दरम्यान तारुण्याच्या उंबरठ्यावर झुलत होतो. माझ्या पहिल्या कादंबरीत सामाजिक, क्रांतिकारी, सुधारणावादी, मजूरवर्ग असे काहीच नव्हते. तरुण मुलाची खेड्यातील अधुरी प्रेमकहाणी त्यात होती. त्याच्यात हिंमत नाही, पण या कथेत पाप, पुण्य, प्रलोभन वगैरे होते म्हणून जमातवाल्यांशी जवळीक असलेल्या एका पत्रिकेत ते प्रकाशित झाले. दुसरीकडे ‘यांनी चार मारले तर त्यांनीही चार मारायला हवेत’ असा थेट हिशेब असे. माणसांवरील अत्याचारांपेक्षा ‘संतुलन’ महत्त्वाचे असे. माझे दोघांशीही जमत नव्हते. या गटातील मंटो, इस्मत चुगताई, कृष्णचंदर, बेदी असे सगळे वाचून सोडून दिले. वाटू लागले, मी असे का लिहावे? सगळ्या गोष्टी थेट काळ्या नाही तर पांढऱ्या. प्रेमचंदांचे कथांचे तेव्हाचे लोकप्रिय डावे मॉडेलही फारूकी नाकारतात. 

वाजपेयी विचारतात, हा काळ माणसाला दरम्यानच्या काळात त्याच्या सांस्कृतिक वारशाचे जे विस्मरण झाले त्याच्या जाणिवेचा आहे, त्यामुळे कदाचित ज्या कादंबऱ्यांमधून गतेतिहासाचे पुनर्कथन होते अशा कादंबऱ्यांची चलती दिसते. ‘कब्जे जमाँ’च्या वेळी तुम्हाला असे काही जाणवले होते का? फारूकी म्हणतात, ‘पाश्चात्य साहित्यात तोडफोडीची जुनी परंपरा आहे तरी ते आपल्यात काही ना काही निरंतरताही पाहतात. आपल्याकडे मात्र विशेषतः उर्दू साहित्य-संस्कृतीबाबत काही धारणा बनवल्या गेल्या होत्या. तीत फक्त शेरोशायरी, लौण्डेबाजी, पतंगबाजी, भोग-विलास आहे वगैरे. त्या मला तोडायच्या होत्या. त्यासाठी या काळातील, काळासंबंधी सर्वाधिक वाचन कदाचित मी केले असेन, ज्यातून मी सांस्कृतिक निरंतरतेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.’

या मुलाखतीचे पुस्तक आले 2018 मध्ये. माझ्या हातात पडली ती 2022 मधली दुसरी आवृत्ती. त्या आधी फारुकी डिसेंबर 2020 मध्ये गेले तेव्हा प्रथम त्यांच्याविषयी वाचले. उत्सुकता वाटली तशी थोडी शोधाशोध केली. त्यांची शेवटची ‘कब्जेजमाँ’ ही कादंबरी तेव्हा प्रकाशकाधीन होती. ती 21च्या जानेवारीत मध्ये आल्यावर उत्सुकतेपोटी लगेच वाचून तीवर एक टिपण लिहिले होते. त्यात म्हटले होते, ‘इब्राहीम लोधीपासून पाच शतकांतील मुघलांच्या तीन काळा-शाह्यांमधून फिरते तरी कालचमत्कृती वा काळाची सरमिसळ हा या कथेचा हेतू वा तिचे केंद्रस्थान नाही. या दीर्घ काळात बदलत गेलेल्या लोकव्यवहाराचे, निमित्तापुरती कथा घेऊन तपशिलात, नजाकतीने केलेले दस्तावेजीकरण त्यात आहे. इतिहासाने राजे-त्यांचा परिवार, युद्धे, लढाया यांशिवाय परिघाबाहेर ठेवलेल्या लोकजीवनाबद्दल बाळगलेले मौन इथे बोलके होते. तसेच काळाची निरंतरताही प्रत्ययास येते.’

येथे फारूकी म्हणतात, ‘लोकव्यवहारांची बरीचशी माहिती वाचनातून मनात साचून राहिली होती. पुरातन, मृत झालेली पुस्तके… ती, त्यांना कुणी वाचावे म्हणून वर्तमानात परत आणणे हा मुख्य उद्देश. कादंबरी- तीही व्यक्ती, काळ जिवंत करणारी, वर्णनांमधूनच उभी राहते नं? सगळं दृश्य ऐंद्रिय तपशीलांमधून उभं केलं नाही तर तुम्ही त्याला (स्वतःच्या अंतःचक्षूंसमोर) पाहू कसं शकाल?’ फारूकींनी त्यांच्या समीक्षेतूनही उर्दू साहित्यात तोवर नाकारले गेलेले मूल्यसिद्धांत प्रतिष्ठित केले. त्यासाठी स्वत:च्या खर्चाने ‘शब़खून’ नावाचे नियतकालिक चार दशके एकहाती चालवले. साहित्य अकादमी आणि सरस्वती हे दोन्ही प्रतिष्ठित सन्मान त्यांना समीक्षेसाठी मिळाले आहेत.

ही बातचीत सलग तीन दिवस रोज चार ते सहा तास चालली तेव्हा फारुकी 82 वर्षांचे होते. त्या वयातही विलक्षण धारदार स्मरण आणि तशीच सर्जनाची असोशी जाणवत राहते. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘मुझे डर रहता है कि मुझपर बुढापे की मुहर न लगा दी जाय. मेरा दिमाग बंद नहीं है पर नयापन लिये आदमी मुझे नहीं मिल रहे, तो मैं क्या करू?’

‘फिक्शन की सच्चाईयाँ’ नावाचे फारूकींचे एक व्याख्यान या पुस्तकात परिशिष्टासारखे समाविष्ट केलेले आहे. कथात्म साहित्य म्हणजे काय, साहित्याच्या इतर प्रकारांपेक्षा त्याचे वेगळेपण कशात आहे अशा मूलभूत मुद्यांची चर्चा त्यात त्यांनी केली आहे. फारुकी म्हणतात, ‘फिक्शन अथवा कथात्म साहित्य म्हणजे वास्तवाचे तपशीलवार वर्णन, वा घटना-प्रसंगांची रचलेली उतरंड नव्हे. त्याच्यासह किंवा त्याच्याविनाही केलेली वास्तवाची- प्रसंगी अवास्तव वाटेलशी, अतिवास्तवाकडे नेईल अशीही रचना कथात्म म्हणता येईल.’ गाढ्या व्यासंगातून, सर्जनाच्या अनुभवांमधून आलेले हे मौलिक उर्दू कथन मूळातून पूर्ण अनुवादावे असे आहे. (क्रमश:)

नीतिन प्रभाकर वैद्य 9405269718n Nitinvaidya2708@gmail.com

About Post Author

Previous articleनरसिंग महाराजांच्या नाना लीला
Next article शिक्षण पत्रिका नव्वदी पार !
नितीन वैद्य हे पेशाने स्थापत्य अभियंता आहेत. त्यांची वाचन आणि समजून घेणे ही जीविका. त्यांना वि.रा. जोग स्मृती समिती, दिवा संघटना आदींचे वाचन पुरस्कार लाभले आहेत. त्यांनी ‘आशय’ या वाङ्मयीन वार्षिकाचे संपादन केले आहे. त्यांनी दैनिके, मासिके दिवाळी अंक, वेबपोर्टल्स, समाज माध्यमे इत्यादी ठिकाणी पुस्तकां संदर्भात सातत्याने विपुल लेखन केले आहे. त्यांनी कादंबरीकार, समीक्षक, चिंतक त्र्यं.वि. सरदेशमुख यांच्या साहित्यावर विशेष काम केले आहे. त्यांची ‘त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्य, संदर्भसाहित्य सूची आणि चरित्रपट’ आणि ‘जवळिकीची सरोवरे’, त्र्यं.वि. सरदेशमुख यांचे ‘प्रज्ञावंत सखे सांगाती’ ही दोन पुस्तके प्रकाशित. त्यांच्या ‘सरोवरे’ला पुणे मराठी ग्रंथालयाचा ना. के. बेहेरे स्मृती पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे पुस्तकांविषयीचे 'वाचन प्रसंग' या नावाचे पुस्तकही प्रकाशित आहे.

1 COMMENT

  1. Incredibly wonderful.
    We need to have insight into Urdu, Hindi
    Literature. South indian literature too.
    Nitinbhai, superb…
    MUKESH THALI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here