Home व्यक्ती संमेलनाध्यक्षांची ओळख एकविसावे साहित्य संमेलन (Twenty First Marathi Literary Meet- 1935)

एकविसावे साहित्य संमेलन (Twenty First Marathi Literary Meet- 1935)

इंदूरयेथे भरलेल्या एकविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष औंध संस्थानचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी होते. ते विद्याव्यासंगी होतेच, पण कलांचेही भोक्ते होते. त्यांनीच महात्मा गांधी यांच्या सल्ल्याने त्यांच्या संस्थानात पहिली रयतसभा स्थापन केली. त्यांनीच किर्लोस्कर आणि ओगले यांना औद्योगिक क्षेत्रात विशेष रस घेऊन पुढे आणले.

औंध हे राजेसाहेबांच्या कारकिर्दीत चित्रकलेचे माहेरघर झाले होते. ते स्वत: चित्रकार होते. औंध सरकारचे म्युझियम हे उत्कृष्ट म्युझियम म्हणून संबोधले जाते. ते पाहण्यासाठी कलारसिक मुद्दाम औंधला जातात. त्यांनी उभ्या केलेल्या कलावस्तुसंग्रहालयात चित्रादी विविध कलावस्तूंचा वेचक संग्रह आहे. तेथे विशेषतः प्राचीन काळापासूनच्या चित्रकारांची उत्तमोत्तम दुर्मीळ चित्रे आहेत; तसेच, चित्रकलेवरील जागतिक कीर्तीच्या विविध ग्रंथांचा संग्रह आहे. त्यांनी स्वतःही ऐतिहासिकपौराणिक विषयांवरील अनेक दर्जेदार चित्रकृती निर्माण केल्या आहेत. त्यांतून त्यांच्या स्वतंत्र चित्रशैलीचा प्रत्यय येतो. बाळासाहेब 1927 साली महाराष्ट्रातील विविध नामवंत चित्रकारांना घेऊन अजिंठ्यास गेले व त्यांनी तेथील चित्रांच्या नकला करवल्या. ते काम सहा महिने चालू होते. स्वतः महाराज तेथे थांबून चित्रे काढत असत. गुहांमध्ये प्रकाशासाठी बाहेर मोठे आरसे लावून त्यांचा प्रकाश गुहेत पाडला जाई. पुढे त्या सर्व चित्रांचा अजिंठा नावाचा ग्रंथ औंध प्रेसमध्ये तयार केला. त्यांनी भांडारकर संशोधन केंद्रालाही चित्रे काढून दिली होती.

असा हा प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा राजा अध्यक्ष झाला. त्यांनी विविध माहितीपर पुस्तके लिहिली, त्यामध्ये अजंठा, चित्ररामायण’, ‘सूर्यनमस्कार’, ‘नेत्रबलसंवर्धन यांसारखी पुस्तके आहेत. पण त्यांना साहित्य म्हणून गणता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली तेव्हा स्वत: साहित्यिक नसूनही अध्यक्ष झाले म्हणून आक्षेप उपस्थित झाला. योगायोग असा की त्यांनी पुण्याच्या साहित्य परिषदेसाठी जागा दिली होती. मात्र श्रींमंत व्यक्तीस अध्यक्ष निवडण्याची ती परंपरा एकविसाव्या साहित्य संमेलनानंतर खंडित झाली.

            श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म ऑक्टोबर 1868 मध्ये औंध येथे झाला. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते. पुढे त्यांनी मुंबईस कायदा, चित्रकला व फोटोग्राफी अशा विविध विद्या व कला पारंगत केल्या. त्यांनी वडील श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी ह्यांचे मुख्य सचिव म्हणून 1897-1901 या काळात काम पाहिले. त्यांनी संस्थानावर असलेल्या कर्जाची फेड केली. त्यामुळे शिल्लक पैशांचा योग्य विनियोग केला जावा यासाठी श्री यमाई श्रीनिवास हायस्कूलची कल्पना राबवून त्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना फी तर नाहीच पण गरिबांस माधुकरीची व्यवस्थाही केली. औंध हायस्कूलमध्ये 1910 सालापासून चित्रकला हा विषय आवश्यक करून ड्रॉइंग मास्तर म्हणून स्वतंत्र शिक्षक नेमले. त्या काळात लोकशिक्षण विविध तऱ्हेचे व झपाट्याने झाल्याचे दिसून येते. संस्थानात बहात्तर खेड्यांत पंच्याऐशी शाळा होत्या. त्यांनी मोफत वसतिगृहे, व्यावसायिक आणि कलेचे शिक्षण देण्यासाठी त्रिंबक-कला-भुवन स्थापन केले. महाराजांनी औंधला विजयादशमीच्या मुहूर्तावर औंध स्टेट प्रेस सुरू केला. त्यांना कीर्तनाचासुद्धा छंद होता. त्यांनी होतकरू कीर्तनकारांसाठी विविध योजना आखल्या होत्या. त्यांनी मल्लविद्येला उत्तेजन दिले. ते साष्टांग नमस्काराचे पुरस्कर्ते होते.

ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की काही उद्योगी विद्वान त्यांच्या हिंमतीवर लोकाश्रय मिळवून मराठीत उत्तमोत्तम ग्रंथ तयार करत आहेत. तथापी अन्य उपयोगी विद्या व कला अजून मराठीत अज्ञातच आहेत. नव्या पिढीवर आमचा फार विश्वास आहे. राष्ट्राच्या खऱ्या उद्धाराचे ते खरे स्तंभ आहेत.

ते वयाच्या चाळिसाव्या वर्षी औंध संस्थानचे अधिपती झाले आणि त्यांनी संस्थाने विलीन होईपर्यंत एकोणचाळीस वर्षें उत्तम राज्यकारभार केला.त्यांनी प्रजेला स्वराज्याचे अधिकार देऊन संस्थानात लोकशाही आणली होती. त्यांचा मृत्यू 14 एप्रिल 1951रोजी मुंबईमध्ये झाला.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

————————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version