परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक

1
233

‘शिंदी बुद्रुक’ हे पूर्ण गाव ‘शिंदी’ या बहुपयोगी झाडांनी बहरलेले होते. तो जुना काळ होता. त्या भागात शिंदीच्या घनदाट जंगलामध्ये जंगली श्वापदे व वाघ यांचा वावर अगदी 1953-60 च्या काळापर्यंत होता. तेथील लोकवस्तीत वाघांचा उपद्रव होत असे. गावातील प्रसिद्ध शिकारी अण्णा राऊत यांनी दोन नरभक्षक वाघांची शिकार केली होती. आज शिंदीपासून पाच किलोमीटर परिसरात टवलार, कविठा, वलनी, रानी अशी छोटी खेडी आहेत. शिंदीची झाडे त्या सर्व ठिकाणी फार कमी आढळतात.

शिंदीच्या झाडाचा उपयोग कल्पवृक्षाप्रमाणे बुंध्यापासून शेंड्यापर्यंत असतो. ते खाण्यास उपयोगी आहे तसे त्याचा उपयोग कौलारू घरांचे वासे- नाटा- बांधण्यासाठीही होतो. शिंदीचे झाड पाच-सहा फूटांचे झाल्यावर त्याचा शेंडा उडवल्यास नारळाच्या खोबऱ्यासारखा भाग निघतो. तो खाण्यास गोड असतो. त्याला ‘गोब’ असे म्हणतात. तो गोब खाऊन 1968 व 1972 साली पडलेल्या दुष्काळात गावातील लोक जगल्याच्या कहाण्या सांगतात ! गोब गाई-म्हशींना खाऊ घातल्यास त्या मुबलक दूध देतात. गोब मिळणाऱ्या भागात खाच पाडून, त्यातून गळणारा विशिष्ट द्रव गोळा केला जातो. तीच ‘शिंदी’ होय. ती पिण्यास मस्त लागते.

शिंदीचे झाड साधारण पंचवीस फूटांपर्यंत वाढते. झाडाच्या शेंड्यावर खारकेच्या आकाराच्या फळांचे झुपके लागतात. शिंदीच्या झाडाची पाने काटेरी असतात. त्यामुळे सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांना त्यांचे भक्ष्य शोधण्यास त्या झाडावर चढता येत नाही आणि त्यामुळेच ‘सोनचिडी’सारखे दुर्मीळ पक्षी त्यांची घरटी त्या झाडांच्या शेंड्यावर निर्धास्तपणे बांधतात. शिंदीच्या लाकडाचा उपयोग सागवान लाकडाप्रमाणे घराच्या आतील बांधकामासाठी केला जातो. ते लाकूड पाण्याचा स्पर्श न झाल्यास जवळपास शंभर वर्षेही टिकते. शिंदी झाडाच्या बुंध्याजवळ ‘भुईनीम’ नावाची, चवीला अत्यंत कडू वनस्पती सापडते. त्या वनस्पतीचा रस ज्वर-ताप असताना औषध म्हणून केला जातो.

श्रीराम त्यांच्या वनवासादरम्यान शिंदी वनातून वाहणाऱ्या नदीकाठावरून जात असताना, ‘भुलले’ म्हणजे वाट हरवले होते, म्हणून त्या नदीला ‘भुलेश्वरी’ असे म्हटले जाते. त्या नदीकाठच्या गाळातून घरांसाठी लागणारी मातीची कौले बनवली जात. त्यात ‘पायली’चे (पाईपच्या आकाराचे कौल) आणि ‘भोंगरी’वरचे (साधे कौल) अशी दोन प्रकारची कौले तयार केली जात.

नदीकाठी अलिकडे असलेली छोटी वस्ती म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’ आणि नदीकाठी पलीकडे असलेली मोठी वस्ती म्हणजे ‘शिंदी-खुर्द’. ‘शिंदी’ गावात ‘रामलीला’ 1947 च्या आधीपासून सादर केली जाई. त्या कलावंतांना ‘रामजिल्हा’ असे संबोधले जाई. गावातील स्थानिक कलावंत गाजलेली संगीत नाटके गावात 1953 ते 1978 सालापर्यंत सादर करत. त्या नाटकांमधील पुरुष कलावंत स्त्रीपात्रे साकारत. मारुती पाटील, देवकरण बूब, घोटे गुरुजी, गुलाबराव लहाने टेलर या मंडळींनी पुरुषपात्रे तर तुळशीराम गाडगे, नामदेव घुटे या कलावंतांनी स्त्रीपात्रे साकारली आहेत. त्यांनीच या नाटकांची सुरुवात गावात केली. त्यामुळे ‘नाटकाची शिंदी’ अशी या गावाची नवी ओळख बनली. दादानाथ महाराज गाडगे यांच्याकडून नाटकासाठी लागणाऱ्या तंबूची व्यवस्था मोफत केली जाई. एकदा, बालगंधर्व गावात नाटक पाहण्यासाठी आले असताना, त्या नाटकात स्त्रीपात्र साकारणाऱ्या पुरुष कलावंतांना बालगंधर्वही ते पुरुष आहेत असे ओळखू शकले नाहीत !

नाट्यप्रयोगांच्या उत्पन्नातून गावात मंदिरे उभारली गेली. दत्त मंदिराच्या खिडक्यांचे बांधकाम नाटकाची तिकिटे देता-घेता येतील, अशा प्रकारे उभारले असल्याचे दिसते. मारुतीराव पाटील-लहाने यांनी मंदिरे बांधण्यात पुढाकार घेतला होता. गावात दोन मजली देवांची मंदिरे 1955-60 दरम्यान बांधण्यात आली. तशा दोन मजली दत्त व हनुमान या मंदिरांमध्ये पूर्वी पहिल्या मजल्यावर शाळा भरत असे. मारुतीरावांचे भाऊ गुणवंतराव लहाने गुरुजी हे स्वेच्छेने ‘कार्लेकर सर्कस’ (दुसर्‍या महायुद्धाच्या काळात बंद पडली) मधील कलाकारांच्या मुलांना क्रमिक शिक्षण देत असत. पुढे, मुलांना ‘बजरंग मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटी’अंतर्गत स्थापन केलेल्या ‘जनता हायस्कूल’मध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येते. गावात सादर होणाऱ्या नाटकांतून जमा झालेल्या उत्पन्नातून शाळेचे कामकाज व नवनवीन उपक्रम सुरू ठेवण्यास मदत केली गेली. गावातील कृष्णराव पाटील लहाने हे त्या सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. दामोदर लहाने हे सध्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत या शिक्षणसंस्थांची भरभराट व कायापालट झाला आहे.

‘काटे शुक्रम बाबा’ हे गाव शिंदी गावापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर आहे. ते चक्रधर स्वामींच्या लीलांसाठी प्रसिद्ध स्थान आहे. चक्रधर स्वामींचे वास्तव्य भुलेश्वर नदीकाठी असलेल्या ‘वडनेर-भुजंग’ या गावात होते. तेथे त्यांचे मोठे मंदिर आहे. चक्रधर स्वामींचे त्या स्थानी असलेले वास्तव्य व त्यांच्या लीला यांचा उल्लेख ‘लीळा चरित्रा’त आहे. महादेवाचे मंदिर हेमाडपंथी शैलीचे बांधकाम असलेले गावात आहे. नाथे गुरुजी महादेवभक्त असल्याने त्यांनी त्या मंदिर बांधणीसाठी पुढाकार घेतला. भागवताचार्य महाराज गाडगे-पाटील यांनी 1965-70 सालापासून सलग पन्नास वर्षे त्या मंदिरात ‘भागवत सप्ताह’ घडवून आणला आहे. सप्ताह दर महाशिवरात्रीच्या आधी मंदिरात साजरा होतो. जवळपास शंभर वर्षांचे पंचांग, काडेपेटीच्या डबीच्या आकाराएवढी भगवद्गीता ते दीड फूट लांब व सव्वा फूट रुंद अशी ग्रंथाची पाने असलेले ‘मूळ श्रीमद् भागवत’; अशा जवळपास अडीचशे ग्रंथांचा संग्रह त्यांच्या घरात जतन केलेला आहे. त्यात ‘पयोष्णी पुराण’ या ग्रंथाचाही समावेश आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मीळ हस्तलिखित मानले जाते. ‘मातेच्या सद्गरम दुधासारखा आणि अमृतासमान गोड पाणी असणारी चंद्रभागा नदी’ या दोन्ही अर्थांचा संगम म्हणजेच ‘पयोष्णी’.

परतवाडा-अमरावती मार्गावर शिंदी-बुद्रुकपासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर लीळा चरित्रात उल्लेख असलेले ‘अष्टमहासिद्धी’ हे देवस्थान आहे. तेथे असलेल्या विहिरीच्या पाण्याने तान्ह्या बाळाला अंघोळ घातल्यावर त्याचे आजार दूर होतात अशी ग्रामस्थांची धारणा आहे. त्या विहिरीतील पाण्याच्या नमुन्याचा तपास शास्त्रज्ञांनी केल्यावर त्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे आढळून आले. म्हणून लोकधारणेने ती प्रथा तेथे चालू राहिली आहे.

शिंदी गावची ग्रामदेवता श्री मरिआई. त्या देवीची मिरवणूक श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी निघते. मिरवणूक देवीच्या मंदिरापासून दुपारी निघून, सायंकाळी पुन्हा मंदिरात परतते. मिरवणूक मंदिरात परतल्यावर गावाच्या वेशीजवळील अष्टभैरवांची आरती होते व नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी सर्व गावकऱ्यांच्या घरी गव्हाच्या भरड पिठापासून उंडे बनवून, ते गोवऱ्यांवर भाजून बनवलेले ‘रोडगे’ व भेरीच्या कोवळ्याच्या भाजीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. मात्र स्त्रिया व मुली यांना देवीची मिरवणूक पाहण्यास बंदी आहे. ती मिरवणूक रस्त्यावरून जात असताना, स्त्रीने घराबाहेर पडू नयेच, पण गावातील घरांच्या दारे-खिडक्याही बंद करून घ्याव्यात असा नियम काटेकोरपणे गावात पाळला जातो. त्यातील गंमत अशी, की मरिआई देवीचे मंदिर, पुरामुळे उद्ध्वस्त झाले असताना, तमाशा फडाची मालकीण व देवीची कट्टर भक्त अशा कमलाबाई यांनी 1959 साली स्वखर्चाने पुन्हा बांधले होते !

बैल शिंदीच्या कोवळ्या पानांचा साज घालून, महादेवाच्या मंदिरापर्यंत वाजत-गाजत येतात, मिरवणूक मानकऱ्यांच्या घरातून निघते. ‘द्वारकेच्या बैला’ची मिरवणूक बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी निघते. ‘द्वारकेच्या बैला’ची पूजा मिरवणुकीदरम्यान घरोघरी होते. ‘द्वारकेच्या बैला’चे दर्शन प्रथम गावातील मारुतीच्या मंदिरात घेतले जाते. पुढे, महादेवाच्या मंदिरातील नंदीवर शिंदीच्या कोवळ्या पाल्याची सजवलेली झूल चढवून त्याचे विसर्जन केले जाते. ‘द्वारकेचा बैल’ काढण्याची प्रथा भागवताचार्य दादा महाराज गाडगे-पाटील यांचे आजोबा सखाराम गाडगे-पाटील यांनी सुरू केली. ती परंपरा त्यांच्या पश्चात गणेशराव पाटील-गाडगे व अमृतराव गाडगे यांनी साठ ते सत्तर वर्षे सुरू ठेवली. दिलीप गाडगे, विलास गाडगे यांनी ती परंपरा आजतागायत सुरू ठेवली आहे.

जनार्दन स्वामींची शंभर पायऱ्यांची ‘पाय विहीर’ हे शिंदी बुद्रुकचे वैशिष्ट्य आहे. गावकरी कार्तिक महिन्यात महिनाभर पहाटे काकड आरती करत, वाजत-गाजत मिरवणूक काढतात. जनार्दन स्वामींच्या विहिरीवर येऊन, आरती करून विसर्जन होते. विहीर वर्षभर आटलेली असते. मात्र पाऊस चांगला झाल्यास भरते.

शिंदीपासून नऊ किलोमीटर अंतरावरील अंजनगाव सुर्जी या गावात नागवेलीचे (विड्याच्या पानांची वेल) मळे आहेत; तसेच, लेंडी पिंपळी या आयुर्वेदातील औषधी वनस्पतींचे, उत्पादन तेथे मुबलक होते. गावातील ‘बारी’ समाजाचे लोक नागवेलीला  त्यांची ‘माय-लेक’ मानतात. ते नागवेलीची लागवड इतर कोणत्याही समाजातील लोकांना करू देत नाहीत. बाळानाथ महाराजांचा मठ त्याच गावातून वाहणाऱ्या शहानूर नदीकाठी तीनशे-चारशे वर्षांपासून आहे. सिद्धपुरुष विदेही संत गुलाब बाबा अंजनगावाहून सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकरखेडा या गावात होऊन गेले. त्यांचे देहावसान पंधरा-वीस वर्षांपूर्वी झाले. त्यांचे मंदिर गावात आहे. ते राजस्थानहून आणलेल्या लाल दगडावर राजस्थानी शैलीतील कोरीव काम करून बांधलेले आहे.

अष्टभैरवांपैकी एक सात्त्विक भैरव मानल्या जाणाऱ्या ‘अंबराजी बाबांच्या मंदिरा’ची यात्रा श्रावणातील पौर्णिमेला म्हणजेच ‘माळी पौर्णिमे’ला शिंदी बुद्रुकपासून दहा किलोमीटर अंतरावर असते. शिंदी बुद्रुकमध्ये ‘माळी पौर्णिमे’साठी घरोघरी ‘भुलजा’ (बाहुल्या, पारंपरिक नाव ‘भुलाई’) यांची देवी पार्वतीचे रूप मानून, ज्वारीची पाच कणसे विशिष्ट आकारात कापून, त्यात त्या भुलजांची प्रतिष्ठापना केली जाते. घरोघरी जाऊन वर्‍हाडी भाषेतील लोकगीते म्हणतात, त्यावर ताल धरून घरोघरी माहेरवाशीणीच्या रूपात आलेल्या पार्वतीचा माळीचा सोहळा रंगतो. ‘माळी पौर्णिमे’च्या दिवशी पार्वतीच्या अवतारातील देवीची पूजा मांडून सोळा पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याच दिवशी नदीवर या भुलजांचे विसर्जन करताना, सासरच्या प्रवासाला निघालेल्या माहेरवाशिणींना (भुलाई, पार्वती) शिदोरीही दिली जाते.

शिंदी गावात उद्योगधंदे, व्यवसाय नाहीत. ‘शेती’ हे शिंदी गावाचे उत्पन्नाचे साधन आहे. ज्वारी, कापूस, उडीद, मूग ही पारंपरिक पिके गावात वर्षानुवर्षे घेतली जात होती. परंतु भौगोलिक वातावरण बदल व जमिनीच्या पोतातील बिघाड यामुळे 1977 नंतर मात्र उडीद, मूग यांचे उत्पादन घटले व पूर्णतः बंद झाले. सध्या गावात सोयाबीन, कापूस, तूर हीच पिके घेतली जातात. चणे हे रब्बी पीक घेतले जाते. पाऊस चांगला होऊन, पाणीसाठा उपलब्ध असल्यास ओलिताचा गहू, कांदा व केळीही घेतली जातात.

कवी विठ्ठल वाघ यांनी अकोला, बुलढाणा, यवतमाळसह संपूर्ण अमरावती भागात दौरे करून जवळपास साठ हजार वऱ्हाडी भाषेतील शब्द, म्हणी व बोली भाषेतील लोप पावणारे शब्द गोळा करून ते पुस्तक रूपात जतन केले आहेत. स्थानिक लेखिका शैलजा गावंडे यांचे कथासंग्रह, कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. गावातील तरुण इंजिनीयर मंडळींच्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या सहकार्याने जेसीबीच्या सहाय्याने नदीचा गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. शेतीसाठी पोषक असलेला नदीतील उपसलेला गाळ गावातील शेतकऱ्यांना केवळ ट्रकभाडे आकारून दिला जातो. तो गाळ उपसल्याने नदीचे पात्र स्वच्छ होते, शेतीसाठी शेतकऱ्यांचा फायदा तर होतोच, शिवाय गाळ वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांनाही रोजगार मिळतो.

प्रसिद्ध गणितज्ज्ञ गुणाकर मुळे शिंदी गावात होऊन गेले. भदंत कौसल्यायन बौद्ध गुरू व अभ्यासक यांनी गुणाकर मुळे यांच्यातील गुण हेरून त्यांना वर्ध्याला स्वतःकडे ठेवून शिकवले व पाली भाषेतून अभ्यासात पारंगत केले. मुळे यांनी ‘राहुल सांकृत्यायन’ या बौद्ध धर्माच्या अभ्यासकांवर ग्रंथ अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेऊन लिहिला. त्या ग्रंथलेखनासाठी त्यांना पाली भाषेतील एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. ते पाली भाषा अभ्यासक, ज्योतिष जाणकार व खगोलशास्त्रज्ञही होते. त्यांनी जवळपास तीनशे लेख इंग्रजी-विज्ञान विषयांवर लिहिले आहेत. ते दिल्लीतून प्रसिद्ध झाले. गुणाकर मुळे हे मराठी भाषिक, पण लेखन हिंदीतून करत. त्यांची पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

शिंदीमध्ये साहित्यिक कार्यक्रमांची सुरुवात 1979 पासून झाली. कवी संमेलन 1980 साली घेतले गेले. तेव्हापासून कवी संमेलने सुरू आहेत. त्या कविसंमेलनांमध्ये नारायण सुर्वे, विठ्ठल वाघ, मधुकर वाकोडे, किशोर सानप, प्रभू जवंजाळ, लक्ष्मी जवंजाळ, शंकर बढे, मीरा ठाकरे, मीना गावंडे, शैलजा गावंडे, प्रतिमा इंगोले, अशोक टेकाडे अशा मान्यवरांचे परिसंवाद, कविता सादरीकरण, जनजागृती, लोकशिक्षण या माध्यमांतून कार्यक्रम केले गेले. महिला व बाल मेळावेही घेतले गेले.

शिंदी बुद्रुक हे गाव मध्यप्रदेश प्रांत मतदारसंघात होते. सात्त्विक, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले नाथे गुरुजी हे त्या मतदार संघाचे पहिले आमदार होते. नाथ गुरुजींची धडपड समाजोपयोगी कामे करून गावाचा विकास साधण्याची होती. त्यांनी त्यांच्या काळात गावातील प्रत्येक घरातील सातवी शिकलेल्या मुलाला शिक्षक केले होते. त्यातूनच ‘शिक्षकांचे गाव’ अशी शिंदी बुद्रुकची वेगळी ओळख निर्माण झाली. ‘मध्य प्रदेश प्रांत मतदारसंघ जाऊन ‘रामटेक मतदार संघ’ उदयास आला. त्यानंतर गावात ‘अमरावती मतदारसंघ’ असे नाव त्यास दिले गेले. गावाचे सारे कामकाज ‘मेळघाट मतदार संघ’ या राखीव आदिवासी मतदारसंघाअंतर्गत चालते.

गावात सरकारी दवाखाना व खासगी डॉक्टर्सही आहेत. गावात एस टी डेपो नाही व गावात एस टी येतही नाही ! शिंदीतील गावकऱ्यांसाठी परतवाडा एस टी डेपो आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी तीस किलोमीटर एस टी पकडण्याकरता जावे लागते.

गावात ‘जनता हायस्कूल’शिवाय उर्दू शाळा, जिल्हा परिषदेची शाळा, सहा अंगणवाड्या अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. गावातील मुले महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेण्यासाठी परतवाडा गावापासून वीस किलोमीटर अंतरावरील, अंजनगाव व अमरावती या शहरांत जातात. गावात वऱ्हाडी बोलीभाषा बोलली जाते. मूर्तिजापूर ते शिंदी मार्गावर नॅरो गेज रेल्वे सुरू आहे. ती मीटर गेज करण्यासाठी गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

शब्दांकन – प्रियांका चव्हाण 9769108629 priyankasschavan1986@gmail.com
दिलीप गाडगे 9922383033, 8411015296 adityagadge03@gmail.com

————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. खुप छान माहिती मिळाली शिंदी बुद्रुकची .शिंदीची झाड इतक उपयोगी आहे हे आताच कळलं,आम्ही लहानपणी मामाकडे अंजनगाव ला जायचो तेंव्हा शिंदीची झाडं खुप दिसायची मजा वाटायची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here