तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ. महाबळेश्वर हे पहिले. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्याच्या शहाद्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतात आहे. ते धडगाव तालुक्यात येते. ते नंदुरबारपासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तेथे म्हसावद – शहादा या मार्गावरून जावे–यावे लागते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगा एकामागे एक अशा आहेत. तोरणमाळ हे सातपुडा पर्वतातील पठार आहे. त्याच्या पलीकडे उत्तरेला नर्मदा नदीचा प्रवाह येतो. तोरणमाळ पठाराचे क्षेत्रफळ 3.2 चौरस मैल एवढे आहे. शिवाय, सातपुड्याच्या कुशीत असंख्य शिखरे, कडा, दरी, स्तर इत्यादी विसावली आहेत. तोरणमाळ हे अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ते सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत असून समुद्र- सपाटीपासून एक हजार एकशेत्रेचाळीस मीटर उंचीवर आहे.
सातपुडा पर्वताची पूर्व–पश्चिम लांबी सातशेपंचवीस किलोमीटर तर उत्तर–दक्षिण रुंदी साधारणत: बारा किलोमीटर आहे. त्या पर्वतमालेची सुरुवात पश्चिमेस गुजरातमधील भडोच जिल्ह्याच्या राजपीपला ह्या गावाजवळील टेकड्यांपासून होते. पर्वतरांगा लहानमोठ्या आकारांनी एकमेकांना समांतर खेटून उभ्या आहेत. सातपुड्याची गुलीअंबा, अस्तंबा व तोरणमाळ अशी तीन शिखरे आहेत. पैकी गुलीअंबा हे शिखर सर्वाधिक उंचीचे आहे व ते गुजरात राज्याच्या हद्दीत येते. उर्वरित दोन शिखरे महाराष्ट्रात मोडतात. सातपुड्याचे रूप हे मुळात रौद्र आहे. तो शुरांच्या विषयांचा, क्रांतीकारकांचा भूभाग म्हणून इतिहासाला परिचित आहे. स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजाना सळो की पळो करून, जेरीस आणणारे वीर तंट्या भिल्ल यांचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. ते नेमाडातील सातपुड्याच्या मातीतील एक तेजस्वी रत्न होत.

तोरणमाळ वाटेवर जेथे शहाद्याला तालुक्याची हद्द संपते तेथे धडगाव तालुक्याच्या हद्दीचा प्रारंभ होतो. तेथेच प्रथम भेटतो सातपायरी घाट! एकेका पायरीने घाटातील वळणे घेत मार्गक्रमण करताना जो आनंद होतो तो काय वर्णावा? पुढे चालणाऱ्याला मागचे दिसत नाही, पण तोरणमाळला जाताना सातपायरी घाट पहिल्या वळणापासून तर शेवटच्या सातव्या वळणापर्यंत प्रवाशाची साथसंगत सोडत नाही. म्हसावद (शहादा) येथून तोरणमाळला जाण्यासाठी पक्की डांबरी सडक आहे. राणीपूर येथपासून घाटरस्ता सुरू होतो. तोरणमाळला जाताना पर्वतरांगा, पर्वत पठार आणि पर्वतातून वाहणारे झरे, ओहोळ असे निसर्गवैभव दिसते. विशेषत: ते पावसाच्या ऋतूमध्ये खुलते.
घाटावर पहिले दर्शन होते ते नागार्जुनाचे. ती मूर्ती लहानशा गुहेत आहे. मूर्तीची भव्यता आणि शिल्पाची प्राचीनता पाहवी अशी आहे. ती देवता हिंदू–जैन आणि बौद्ध अशा तिन्ही धर्मविचारांत दिसते. त्या स्थळी थांबून सातपायरीच्या विहंगम वळणाचे दृश्य अनुभवता येते. जालंधरनाथांचे भग्नावस्थेतील मंदिर, मच्छिंद्रनाथ गुंफा आणि भग्न अवस्थेतीलच किल्ला ही तीन घाटावरील प्रमुख आकर्षणे आहेत. त्या किल्ल्याचा न्याय–नीतिसंपन्न, प्रजाहितैशी अभिरराजा युवनाश्व याची कथाही मनोरंजक आहे. तो महाभारतकालीन समजला जातो. तोरणमाळवरील खडकी पॉइंट आणि सनराईज पॉइंट हे प्रसिद्ध आहे. सनराईज पॉइंटवरून सूर्योदयाचे दृश्य अप्रतिम दिसते. तोरणाई शिखर हेच घाटावरील खरे आकर्षण आहे. त्या शिखराने तोरणमाळला त्याच्या ऐतिहासिक, पौराणिक अस्तित्वाची व नैसर्गिक नावाची ओळख करून दिली आहे. शिखरावर देवी तोरणाईचे मंदिर आहे.
तोरणमाळला नवनाथांपैकी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांचे वास्तव्य होते असे मानले जाते. गोरक्षनाथ मंदिराचा परिसर प्रसन्न व मोक्षदायी वाटतो. सर्व पर्वतराजींमध्ये असते तसेच शंकराचे अस्तित्व येथेही आहे. त्याला म्हणतात चंद्रमौळी श्रीमहादेव. तोरणमाळला महाशिवरात्रीला महायात्रोत्सव भरतो. यात्रेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि इतर दूरदूर ठिकाणांहून भाविक येतात. त्यावेळी आदिवासी समाजातील स्त्री–पुरुषांची वेशभूषा, त्यांचे विविध आकारांचे वजनदार दागदागिने, त्यांची बोलीभाषा, निसर्गप्रेमातून साकारलेल्या कल्पना यांचे जवळून दर्शन घडते.
यशवंत तलाव हेही तोरणमाळचे वेगळेच आकर्षण होय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्या स्थळाला भेट दिल्याची स्मृती म्हणून तलावाला दिलेले ते नाव आहे. तो तलाव विस्तीर्ण, स्वच्छ, तरल आणि अखंड जलाने समृद्ध आहे. तो कधीही आटलेला नाही. त्याची खोली 9.20 मीटर असून जल साठवण क्षमता तीन हजार पाचशे टीएमसी आहे. परीघ चार किलोमीटर असून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. तलावात नौकानयन व जलविहार करता येतात.

तोरणमाळच्या ईशान्य कोपऱ्यातील खोल दरी म्हणजे सिताखाई होय. सिताखाई तोरणमाळ गावठाणपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. सिताखाई पॉइंटवरून दिसणाऱ्या खोल दऱ्या पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. स्थानिक समजुतीनुसार रामराज्याच्या काळात श्रीराम व सीता ही दोघे रथातून जात असताना, त्यांच्या रथाचे चाक त्या ठिकाणी अडकल्याने भला मोठा खड्डा पडला होता. त्याच खड्ड्याला सीताखाई म्हणून ओळखले जाते. तिची खोली सुमारे दीडशे फूट असावी. ती खोल दरी तिन्ही बाजूंनी प्रचंड पाषाणाच्या व उंच उंच ताशीव कडांनी निसर्गतः निर्माण झाली आहे. तेथे उभे राहून आवाज दिल्यास तीन वेळा आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येतो. सिताखाईच्या अलिकडे कृष्णकमळे आढळणारे तळे आहे. त्याला कृष्णकमळ तलाव म्हटले जाते. सीताखाईच्या तळाला जलकूंड आहे. त्याला सिताकूंड असे नाव आहे. सिताखाईत पावसाळ्यात मोठा फेनिल (फेसाळणारा) धबधबा उसळतो. तोरणमाळ येथे एक चर्च आहे. त्याचे भव्य रूप बघून बुद्धी थक्क होते. ते एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर बांधल्याचे म्हटले जाते.
तोरणमाळचा निसर्ग कोरडे जंगल प्रकारात मोडतो. तेथील वृक्षराजी उन्हाळ्यात पर्णहीन होते. तोरणमाळच्या जंगलात सलई, साग, महू, चारोळी, टेंभुर्णी, तिवसा, कुडा, खैर, अर्जुन, आवळा, जांभूळ, आंबा, सिताफळ, पेरू, बोर, पळस, बांबू इत्यादी वृक्ष आढळतात. चैत्र पालवीने लालबुंद झालेला पळस तेथे पाहता येतो. तेथील वनात कारवी, धायटी, तोरण, करवंद इत्यादी रानमेवा तर माका, रिठा इत्यादी मोहक फुले आढळतात. त्या औषधी वनस्पतींचा ‘लेगापाणी’ गावातील वनोद्यानात संग्रह करण्यात आला आहे. संशोधक त्या वनस्पती उद्यानाला भेट देत असतात. त्या ठिकाणी हिरडा, बेहडा, रंगतरोडा, बायन्या, कुकडकांदा, जिरण्या, तिरकांदा, जंगलीकेळी, कुदळा, नजऱ्या यांसारख्या औषधी वनस्पती आढळतात. पळसाच्या पानांपासून द्रोण, पत्रावळी बनवणे. उन्हाळ्यात तेंदु पत्ता गोळा करणे, हिवाळ्यात महूफुले गोळा करणे हा स्थनिक लोकांचा रोजगार आहे. महूफुलांपासून घरगुती पद्धतीने मद्य बनवले जाते. महूफुलांपासून भाकरीही बनवून खाल्ली जाते.

तोरणमाळचे जंगल पक्षीसंपदेने समृद्ध आहे. तेथील वनविभागाकडे दोनशेतेहतीस प्रजातींचे पक्षी आढळल्याची नोंद आहे. पक्षीजगतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला वनपिंगळाही तेथे आढळला आहे. तो घुबडासारखा दिसतो, मात्र घुबड जसा निशाचर आहे तसा वनपिंगळा नाही. वनपिंगळाच्या तेहतीसपैकी नऊ प्रजाती तोरणमाळच्या जंगलात आढळून आल्या आहेत. तशी नोंद ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडिया’च्या पक्षितज्ज्ञांनी केली आहे. तोरणमाळ येथे थंडीच्या काळात (नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यांत) बहुसंख्य हिमालयातील पक्षी नियमितपणे येत असतात. त्यात हिमालयातील ब्लॅक रेड स्टार, वारवब्लर आणि विदेशी पक्ष्यांत युरोपीयन रोलर हेन, हॅरीयर पेल-हॅरीयर ग्रे वॅगटेल, ग्रीन सॅडे पायपर येतात. ते एप्रिल मे महिन्यांत परतीच्या वाटेवर निघतात. तोरणमाळ जंगलात पदभ्रमंती करताना सातपुड्याच्या कुशीतील असंख्य शिखरे, कडा, दरी, स्तर, वृक्षवल्ली, लता, औषधी वनस्पती, कंदमुळे, फुले-फळे व पक्षी; तेथील बोलीभाषा, उत्सव आणि इतिहास पर्यटकाला साद घालतात.
– पुरुषोत्तम पटेल 9421530412, 8208841364 patelpm31@gmail.com
————————————————————————————————–
About Post Author
पुरुषोत्तम पटेल हे म्हसावदच्या कुबेर हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात (ता. शहादा, जिल्हा नंदुरबार) उपप्राचार्य आहेत. त्यांची ‘आईचे अमृतघन’ (कथासंग्रह), ‘अमृतवेल’ (कवितासंग्रह) आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चरित्र ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविताही प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखन नियतकालिकांत आणि मासिकांत प्रसिद्ध होत असते.9421530412, 8208841364
खानदेशच्दया पर्ययटन स्थळांची सुंदर सैर…छानच
धन्यवाद 🙏
खानदेशच्या पर्यटनस्थळांची सुंदर सैर घडवलीत…छानच
धन्यवाद! 🙏
धन्यवाद 🙏
फारच छान माहिती व वर्णन! आभारी आहे🙏
खूप छान ,मागच्या वर्षी मी तोरणमाळ जाऊन आलो,नितांत सुंदर स्थळ,माझ्या पुस्तकात यावर एक लेख मी लिहिला आहे,तो ललित लेख आहे,या लेखाने अधिक विस्तृत माहिती मिळाली धन्यवाद !
तोरणमाळला भेट द्यायची आहे.शहादा परीसरात गेलो आहे.तोरणमाळ राहीले आहे.उपयुक्त लेख.