विनोबांची ‘गीताई’ घराघरांत पोचली. मात्र त्याआधीही गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या मराठी भाषेत मांडले होते ते अनंततनय यांनी. त्यांचे नाव दत्तात्रेय अनंत आपटे. त्यांनी ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाची रचना 1917 मध्ये केली.
माझे मातुल आजोबा बाळकृष्ण केशव करंबेळकर यांच्या संग्रहात ते पुस्तक मिळाले. ते आध्यात्मिक वृत्तीचे होते. ते पेशाने शिक्षक आणि त्यांचा विद्यार्थिप्रिय गुरुजी असा लौकिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होता. त्यांना संगीत, विशेषतः हार्मोनियम वादन, मूर्तिकला यांतही गती होती. त्यांचे निधन वयाच्या ऐंशीव्या वर्षी 2006 मध्ये झाले. त्यांच्या मठ (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील घरात जुन्या कागदपत्रांमध्ये ‘झोपाळ्यावरची गीता’ ही छोटी पुस्तिका 2010 साली आम्हाला सापडली. त्यांनी गीताजयंतीनिमित्त शाळेतील मुलांचे अठरा गट पाडून त्यांच्याकडून गीतेचे अठरा अध्याय पाठ करून घेण्याचा उपक्रम बऱ्याच वर्षांपूर्वी राबवला होता. त्याचा गौरव म्हणून लांज्याचे आमदार शशिशेखर आठल्ये गुरुजी यांनी त्यांना ‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक भेट म्हणून दिले होते.
माझे मामा आनंद करंबेळकर यांनी मला ती आठवण सांगितली. ‘झोंपाळ्यावरच्या गीते’त भगवद्गीतेचा आशय असलेले श्लोक सुलभ मराठी भाषेत लिहिलेले आहेत. त्या काळी मुलींचे विवाह वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी होत. मुली चैत्रगौरीच्या निमित्ताने माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झुले (झोपाळे) बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्या मुलींनी गीता म्हटली तर लहान वयात त्यांना चांगले ज्ञान मिळू शकेल असा विचार पुढे आला असावा; पण संस्कृतमधील गीता म्हणणे तसे अवघड होते. त्यामुळे ‘झोंपाळ्यावरच्या गीते’ची रचना केली गेली असावी असे स्पष्टीकरण मामाने तेव्हा दिले होते. ‘झोंपाळ्यावरची गीता’कार अनंततनय यांच्या प्रस्तावनेतही तशा आशयाचा उल्लेख आहे.

सापडलेल्या त्या गीतेच्या पुस्तिकेत सुरुवातीची; तसेच, शेवटची अशी मिळून चार पाने नव्हती. त्यामुळे त्या गीतेची रचना कोणी केली आहे हे कळण्यास मार्ग नव्हता. म्हणून आम्ही मूळ पुस्तिका आणखी कोणाकडे आहे का याविषयी शोध सुरू केला. त्यात फारसे यश आले नाही. त्यातूनच ‘झोपाळ्यावरच्या गीते’चे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची कल्पना सुचली. संकेतस्थळ मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा (शके 1932, 17 डिसेंबर 2010) गीता जयंतीचा मुहूर्त साधून सुरू झाले. ती पुस्तिका आणखी कोणाकडे असेल तर माहिती द्यावी असे आवाहन त्यावर केले होते. तेव्हा मी ‘महाराष्ट्र टाइम्स’(मटा)च्या पुणे आवृत्तीत उपसंपादक म्हणून कार्यरत होतो. ‘मटा’च्या पुणे आवृत्तीत मराठी राजभाषादिनानिमित्ताने विशेष पुरवणी 27 फेब्रुवारी 2011 रोजी प्रसिद्ध झाली होती. मी त्या पुरवणीत ‘झोंपाळ्यावरच्या गीते’विषयीचा लेख लिहिला. त्यात संकेतस्थळाचीही माहिती दिली. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर, पुण्यातील प्रसिद्ध बालसाहित्यकार सरिता पदकी यांनी संपर्क साधून त्यांच्याकडे ती पुस्तिका असल्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याने उर्वरित चार पानांमधील ओव्याही उपलब्ध झाल्या. मुख्य म्हणजे अनंततनय (दत्तात्रेय अनंत आपटे –1879 ते 1929) यांनी ‘झोंपाळ्यावरच्या गीते’ची रचना केली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 4 एप्रिल 2011 रोजी गुढीपाडव्याचे औचित्य साधून पूर्ण ‘झोंपाळ्यावरची गीता’ पुस्तिकेच्या मूळ प्रस्तावनेसह संकेतस्थळावर उपलब्ध केली.
अनंततनय यांनी ‘झोंपाळ्यावरच्या गीते’ची रचना समश्लोकी केलेली नाही. मूळ भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या सातशे आहे, तर ‘झोपाळ्यावरच्या गीते’ मध्ये पाचशेसेहेचाळीस श्लोक आहेत. श्लोकांची संख्या कमी असली तरी मूळ गीतेतील पूर्ण आशय त्यामध्ये सोप्या शब्दांत आला आहे. एकूण अठरा अध्यायांपैकी नऊ, बारा, पंधरा आणि सोळा या अध्यायांमध्ये मात्र मूळ श्लोकांपेक्षा ‘झोंपाळ्यावरच्या गीते’तील श्लोकांची संख्या थोडी अधिक आहे. त्यांनी मूळ श्लोकांचे निरूपण विस्ताराने करण्यासाठी असे केले असावे. ‘झोंपाळ्यावरच्या गीते’च्या तीन आवृत्ती शके १८३९(1917), शके १८४१ (1919) आणि शके १८५० (1928) निघाल्या होत्या. त्या पुण्यातील शंकर नरहर जोशी यांच्या चित्रशाळा प्रेसने प्रकाशित केल्या होत्या. त्या वेळी पुस्तकाची किंमत चार आणे एवढी होती.
अनिकेत कोनकर या तरूणाने ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाच्या हरवलेल्या पानांचा शोध घेऊन ते दुर्मीळ पुस्तक पुनर्प्रकाशित केले.
‘झोंपाळ्यावरच्या गीते’चे पुनर्प्रकाशन करावे असा विचार त्याच वेळी मनात आला होता; पण तो लगेच प्रत्यक्षात येऊ शकला नाही. प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी विशिष्ट वेळ यावी लागते, त्यानुसार लोकमान्य टिळक यांच्या ‘गीतारहस्य’च्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त टिळकांच्या जन्मभूमीत विशेष चर्चासत्र होणार असल्याचे समजले. ‘झोंपाळ्यावरच्या गीते’च्या पुनर्प्रकाशनासाठी तोच मुहूर्त योग्य म्हणून तो साधला गेला. आमच्या ‘सत्त्वश्री प्रकाशना’तर्फे (कोकण मीडिया) ‘झोपाळ्यावरची गीता’ पुस्तकरूपाने 01 ऑगस्ट 2015 रोजी प्रकाशित करण्यात आली ! सदानंद मोरे यांच्या हस्ते रत्नागिरीतील ‘गीता भवन’मध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. तो बहुमोल ठेवा शंभर वर्षांनी पुन्हा एकदा उपलब्ध करता आला याचा आनंद मोठा होता; मात्र त्या दुर्मीळ पुस्तकातील गहाळ झालेली पाने ज्यांच्यामुळे उपलब्ध होऊ शकली त्या सरिता पदकी या हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी (जानेवारी 2015 मध्ये) निवर्तल्या. पुनर्प्रकाशित पुस्तक त्यांना दाखवता आले नाही त्याची रुखरुख लागून राहिली.
पत्रकार हा बहुगुणी, सखोल, अभ्यासू आणि सूक्ष्म दृष्टीचा असू शकतो हे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांची कारकीर्द पाहिली की जाणवते. त्यांचा अभ्यास हा जगभरच्या राजकारणापासून राज्याच्या व स्थानिक घडामोडींपर्यंत असतो. तसाच त्यांचा वावर सुरक्षित वाहतूक या विषयावरील रस्त्यारस्त्यांवरील भाषणांपासून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील पदव्युत्तर वर्गामधील अध्यापनापर्यंत असतो.
आमच्या साप्ताहिक ‘कोकण मीडिया’च्या वेबसाइटचे उद्घाटन 29 फेब्रुवारी 2020 रोजी झाले. त्या वेळी माझ्या बाबांनी (प्रमोद कोनकर) त्यांचे जवळचे मित्र राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना ते पुस्तक भेट दिले. दुसऱ्याच दिवशी, त्यांचा मला मेसेज आला, की ‘झोंपाळ्यावरची गीता’ वाचल्यानंतर त्यांना ती इतकी आवडली, की तिचा इंग्रजीत अनुवाद करण्याची तीव्र इच्छा झाली. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी लगेच पहिल्या काही ओव्या अनुवादित करून पाठवल्यासुद्धा. ती कल्पना खूपच उत्तम होती. कारण संस्कृतमधून सुलभ मराठीत आलेला तो ठेवा इंग्रजी या जागतिक भाषेत जाणार होता.

आम्ही पुन्हा गीता जयंतीचे औचित्य साधून kokanmedia.in या वेबसाइटवर ‘झोंपाळ्यावरची गीता’चा इंग्रजी अनुवाद 25 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. दररोज काही ओव्या प्रसिद्ध केल्या जात. मसुरकर नियमितपणे अनुवाद करून ओव्या पाठवायचे. त्यामुळे एकही दिवस खंड न पडता तो उपक्रम 11 मे 2021 या तारखेपर्यंत चालला. गीता जयंतीच्याच दिवशी 3 डिसेंबर 2022 रोजी इंग्रजी अनुवादासह The Geeta in Leisure या नावाने हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्यात आले. ज्येष्ठ प्रवचनकार-व्याख्याते धनंजय चितळे यांच्या हस्ते हे पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन झाले. हे पुस्तक द्वैभाषिक असून, त्यात मूळ मराठी ‘झोंपाळ्यावरची गीता’ आणि तिचा इंग्रजी अनुवाद समाविष्ट आहे. मसुरकर म्हणजे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि मोठा व्यासंग असलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी चरित्रकार धनंजय कीर यांचे चरित्र लिहिले आहे. तसेच, मसुरकर यांनी धनंजय कीर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवादही केला आहे.
पुस्तकाच्या ई-बुकची लिंक
‘झोंपाळ्यावरची गीता’ हा ठेवा मौल्यवान आहेच; पण मसुरकरांच्या लेखणीतून त्या ठेव्याची भाषिक आणि आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये इंग्रजीमध्येही पुरेपूर उतरली आहेत. त्यांनी केलेला अनुवाद वाचत असताना माझ्या शब्दभांडारात किती तरी इंग्रजी शब्दांची भर पडली ! हा अनुवाद समश्लोकी असल्याने अनुवाद करणे हे खूप आव्हानात्मक होते. ते आव्हान मसुरकर यांनी पेलले आहे असे मला वाटते. अनुवाद वाचताना क्लिष्ट वाटत नाही हे त्याचे वैशिष्ट्य.
– अनिकेत बाळकृष्ण कोनकर 9850880119 aniketbkonkar@gmail.com