प्रवासवर्णनांचे भविष्य काय? (The Future Of Travelogues)

0
249

सूथबी या जगप्रसिद्ध लिलाव कंपनीने थॉमन व विलियम डॅनियल या काका-पुतण्यांच्या जोडीने लिहिलेल्या प्रवासवर्णनपर पुस्तकाची विक्री केली आणि लिलावात त्या पुस्तकाला तीन लाख सदतीस हजार पौंडांहून अधिक (भारतीय चलनात दोन कोटी सत्तर लाख रुपये) एवढी किंमत आली ! त्या जोडीने तो प्रवास 1776-1793 या कालावधीत भारतात केला होता, हे भारतीयांच्या दृष्टीने आकर्षण ! त्या पुस्तकात हाताने रंगकाम केलेली चित्रे व प्रवास यासंबंधी मजकूर आहे. त्या पुस्तकाला दीड लाख ते अडीच लाख पौड किंमत अपेक्षित होती. म्हणजे प्रत्यक्ष लिलावात सूथबी यांच्या अपेक्षेपेक्षा जवळ जवळ तेहेतीस टक्के किंमत अधिक आली ! सूथबी कंपनी ज्या वस्तूंचा लिलाव करते त्यांना नेहमीच अशा भारी किंमती मिळतात. पण सहसा त्या वस्तू जगप्रसिद्ध चित्रकारांची गाजलेली दुर्मीळ चित्रे वगैरे असतात. परंतु पुस्तकाला एवढी मोठी किंमत आली, हे आश्चर्याचेच ! तेसुद्धा प्रवासासंबंधीच्या !

म्हणजे प्रवासवर्णनात खरेच असे काही महत्त्वाचे असते का? तो इतिहास व भूगोल असतो की केवळ परिस्थितीचा आलेख की केवळ प्रवासातील गमतीजमतीचे वर्णन? मी प्रवासवर्णने कुतूहलाने वाचत आलो आहे विशेषत: जुनी नवी प्रवासवर्णने मी इंटरनेटवर शोधून शोधून वाचली. माझे ते सर्फिंग हासुद्धा दीर्घ दीर्घ प्रवास होता व तो अजून चालू आहे आणि निखालस सांगतो, की मला नव्वद-शंभर वर्षांपूवीच्या भारतीय लोकांबद्दल आदर वाटू लागला आहे ! त्यांनी प्रवास खूप अवघड परिस्थितीत, अत्यंत कमी पैशांत, कधी कधी तर उपासमार सहन करूनही केला. त्यात सर्वसामान्य माणसे होती. लेखक-पत्रकार होते, लेखिका-गृहिणी होत्या, विद्वानही होते. त्यांचा प्रवास फार रंगीबेरंगी होता आणि त्यांच्या त्या वर्णनातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश छान पडतो.

carasole

त्या वाचनात मिळालेली काही माहिती फार रंजक आणि काही प्रसंगी विचारांना चालना देणारी होती.

  • विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत, नेपाळमध्ये बँडची सलामी व्यक्तिसूचक असे. निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या रागांच्या सुरावटींमधून सलामी देण्यात येत असे. त्यामुळे आलेल्या व्यक्तीचा बोध सलामीच्या सुरांवरून होत असे.
  • सिंगापूरमध्ये दोन मोठी देवालये दक्षिण हिंदुस्थानातील देवालयांच्या धर्तीवर 1935 साली बांधलेली होती व त्यांपैकी एकास सरकारातून मान्यता मिळालेली होती.
  • कमला फडके व ना.सी. फडके यांना कोल्हापूरहून त्रिवेंद्रमला जाण्यासाठी 1945 साली सहा ठिकाणी गाडी बदलावी लागली व एका स्टेशनवर जेवण बाहेरून, तार करून मागवावे लागले.
  • स्वातंत्र्यपूर्व काळात एका संस्थानातून दुसऱ्या संस्थानात जाण्यासाठी परवाना काढावा लागत असे.
  • हिमालयात यात्रेसाठी जाणाऱ्या वृद्ध स्त्री-पुरुषांनी डोलीतून प्रवास करण्याची पद्धत होती. त्या डोल्या वाहून नेण्यातही चातुर्वर्ण्याचा प्रभाव होता व एका वर्णाचे दंडीवाले दुसऱ्या वर्णाच्या दंडीवाल्यांना कमी लेखत असत.
  • नेपाळात विधवेचे केशवपन होत नसे आणि सर्व ब्राह्मण मांसाहारी असत. ब्राह्मण क्षत्रियांकडे जाऊन वेदोक्त (!) श्राद्ध करत.

अशा तऱ्हेची माहिती बहुधा लेखक दैनंदिनी वा रोजनिशी या स्वरूपात नोंदत आणि नंतर पुस्तक प्रकाशित होई. काही काही लेखक अभ्यासाची शिस्त असल्यासारखे रोजच्या रोज टिपणे वगैरे काढत, पण बहुतांश पुस्तकांतील लेखन सामाजिक परिस्थितीचे अवलोकन, परदेशातील आणि भारतामधील चालीरीतींतील फरक अशा स्वरूपाचे होते. कारण त्या वेळेला त्या बद्दल उत्सुकता होती – बघणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला व वाचणाऱ्यालाही.

मी यांसारख्या नोंदी करत गेलो आणि जणू तेव्हा माझा प्रवासवर्णनपर पुस्तकांचा अभ्यासच चालू झाला. यथावकाश त्याचे हस्तलिखित तयार झाले. त्याच ओघात माझ्या लक्षात आले, की सावंत वाडीचे कवी वसंत सावंत यांनी प्रवासवर्णनांचा अभ्यास करून पीएच डी मिळवली आहे. योगायोग असा, की काश्मीरच्या एका सहलीला गेलो असताना देशमुख कंपनी (पब्लिशर्स) प्रा लि या संस्थेच्या माणिक गोडबोले त्याच सहलीत सहभागी झाल्या होत्या. संभाषणात त्यांनी, त्यावेळेस ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या साप्ताहिक आवृत्तीत माझे जे जुन्या पुस्तकासंबंधीचे सदर येत होते त्याचे एक पुस्तक तयार करता येईल असे सुचवले. त्या पुस्तकाला अर्थातच वेळ लागला, कारण पुस्तकाच्या दृष्टीने लेखनात बऱ्यापैकी बदल करणे आवश्यक होते. तत्पूर्वी मी त्यांना ‘प्रवासवर्णनांचा प्रवास’ हे हस्तलिखित दिले आणि संपादकीय सल्लागार विनय हर्डीकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, पुस्तकाने मूर्तरूप घेतले.

त्या अभ्यासाच्या दरम्यान, जाणवलेले काही मुद्दे येथे सांगणे उचित होईल. ज्या लेखकांनी एकाहून अधिक वेळा प्रवास केला आणि त्यामुळे अनेक प्रवासवर्णनेही लिहिली त्या लेखनात शैलीचे बदल हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. उदाहरणार्थ, पु.ल. देशपांडे, अनंत काणेकर, गोविंद चिमणाजी भाटे, प्रभाकर पाध्ये, गंगाधर गाडगीळ. त्यांपैकी पु.ल. देशपांडे यांची कायम वाचकप्रिय असलेली पुस्तके म्हणजे ‘पूर्वरंग’ आणि ‘अपूर्वाई’. त्या पुस्तकांत, पुलं यांच्या शैलीचा रंजक देखावा आहे. तो देखावा ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकात दिसत नाही. प्रवासलेखन शैलीतील बदल आणि त्याच लेखकाने इतर लेखन केले असल्यास त्या लेखनशैलीतील बदल असा एक अधिक प्रगत अभ्यास करणे हा मराठीच्या प्राध्यापकांना आव्हानात्मक असा पैलू आहे. उदाहरणार्थ, गाडगीळ, पुलं आणि काणेकर यांच्या प्रवासलेखन शैलीतील बदल आणि त्यांच्या त्या काळातील इतर ललित वाङ्मयलेखनाच्या शैलीतील बदल. त्या पुस्तकात अखेरीस मीना प्रभू यांच्या पुस्तकांची थोडक्यात चर्चा केली आहे. प्रवासवर्णन की त्या त्या देशावरील पुस्तक असा प्रश्न त्यांच्या पुस्तकांनी निर्माण होतो असे मत मी मांडले आहे.

माझा प्रवासवर्णने वाचण्याचा नाद सुटलेला नाही. मीना प्रभू यांच्या संकर- प्रयोगाचे मूळ असे वर्णन करता येईल असे एक पुस्तक मला नुकतेच वाचण्यास मिळाले. ते म्हणजे नारायण गोविंद पिंगळे यांचे ‘सीलोन अथवा लंकावरणनम’. ते 1935 साली प्रकाशित झाले. तो प्रवास विविध धर्मांच्या अडतीस लोकांनी एकत्र येऊन केला होता. ते पुस्तक त्या प्रवासात सहभागी झालेल्या देवराम सयाजी वाघ या सिव्हिल कॉण्ट्रॅक्टर गृहस्थाने प्रकाशित केले होते. जुन्या काळातील अशी प्रवासवर्णने, बदलत्या सामाजिक स्थितीच्या अभ्यासाचे साधन म्हणून अभ्यासकांना उपयुक्त वाटतात. आदित्य पानसे नावाचे एक सनदी लेखाकार लंडनजवळ राहतात. त्यांनी महाराष्ट्र स्टडीज ग्रूप या मराठीच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या परिषदेत 22 सप्टेंबर 2021 रोजी एक निबंध प्रस्तुत केला. त्याचे शीर्षक होते – ‘त्यांनी पाहिलेली विलायत –  मराठी प्रवाशांनी 1867-1947 या काळात लिहिलेल्या इंग्लंडच्या प्रवासवर्णनांचा सामाजिक अभ्यास’ त्या अभ्यासलेखनात त्यांनी ‘प्रवासवर्णनांचा प्रवास’ या माझ्या पुस्तकाचा संदर्भ साधन म्हणून उल्लेख केला आहे.

जमाना पालटला आहे. शिक्षणाचा प्रसार झाला आहे, वाहतुकीची साधने खूप वाढली आहेत. जग एक खेडे होऊन गेले आहे. प्रवासाची कारणेही बदलली आहेत. विविध व्यवसाय-उद्योग वाढले – त्यांची कामे वाढली. त्यासाठी खूप नोकरदार व व्यावसायिक प्रवास करतात, पर्यटन हा परवडण्याजोगा छंद झाला – त्यामुळे ट्रॅव्हल कंपन्या निघाल्या. लोक हौसेने देशोदेशी जाऊ लागले. मुले परदेशी स्थायिक झाली म्हणून एकटी पडलेली माता-पितरेही अनेकदा लांबचा प्रवास करून परदेशी जातात. अशा पार्श्वभूमीवर प्रवासवर्णने कोणी लिहिते का? लिहित असेल तर त्यांचा वाचक कोठे आहे? आणि येणाऱ्या दहा वर्षांत संगणक क्रांती अधिक व्यापक प्रमाणावर होईल तेव्हा माहितीचा अधिकार प्रवाशांच्या हातून निसटून तोही नेटवर क्लिक करणाऱ्या माणसाकडे येईल. मग कोणाला प्रवास करावासा वाटला तरी प्रवासासंबंधी लिहिण्यास आणि वाचण्यास आवडेल?

सामान्य वाचकाला उत्सुकता वाटेल आणि तरीही क्लिष्ट वाटणार नाही अशा तऱ्हेने त्या वाङ्मप्रकारातील लेखनाचा विस्तृत आढावा घेण्यास हवा. या माझ्या निरीक्षणातून माझे पुस्तक जन्मले.

थोडक्यात, अजून काही काळ प्रवासवर्णन या प्रकाराला महत्त्व राहील अशी आशा करण्यास हरकत नाही.

रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here