आद्य तमाशा कलावती – पवळा हिवरगावकर (The first lady Tamasha artist -The beautiful Pawalabai)

4
502

मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरच्या आवारात लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्या गर्दीला कारणही तसे होते. थिएटरचे मालक अबुशेठ यांनी तमाशा रसिकांसाठी एक आगळावेगळा प्रयोग केला होता. थिएटरच्या आवारात एका छान सजवलेल्या राहुटीत पठ्ठे बापुराव आणि पवळाला नटूनथटून बसवले आणि त्यांना बघण्यासाठी तिकिट ठेवले ! मुंबईतील प्रेक्षकांना त्या जोडीबद्दल मोठी उत्सुकता होती. त्यामुळे लोकांनी रांगा लावून तिकिटे काढली. त्यांनी राहुटीत प्रवेश केला, की त्या दोघांना डोळे भरून बघायचे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार म्हणायचे. बापुराव आणि पवळा यांनी हलकेसे स्मित जरी केले तरी बघणाऱ्याला धन्य वाटे. कलाक्षेत्राच्या इतिहासात केवळ कलाकाराला बघण्यासाठी तिकिट लावण्याचा प्रयोग एकदाच झाला, आधुनिक तमाशासृष्टीचे जनक बापुराव आणि तमाशासृष्टीतील पहिली स्त्री कलाकार पवळाबाई यांना ते भाग्य लाभले. पवळाबाई या अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रहिवासी.

हिवरगाव पावसा हे गाव संगमनेरपासून चार मैलांवर आहे. पवळा ही तेथील तबाजी (तानाजी) आणि रेऊबाई भालेराव यांची मुलगी. पवळाचा जन्म 12 ऑगस्ट 1870 रोजी झाला. खंडोबाला केलेल्या नवसामुळे मुलगी झाली, म्हणून पालकांनी तिला मुरळी म्हणून देवाला अर्पण केले ! पवळा दिसण्यास सुंदर होती. तिचा आवाजही गोड होता. तबाजीने पवळाला, ती बारातेरा वर्षांची झाली तेव्हा तिने गाणे शिकून हरिबाबा घोलप यांच्याकडे गाणे शिकण्यासाठी पाठवले. खंडोबाची गाणी म्हणावी हा त्यांचा हेतू. हरिबाबा हे उत्तम कवी, शाहीर होते. त्यांचा छोटासा तमाशाही होता. तमाशात तरुण मुलगे स्त्रियांचा वेष करून नाचगाणी म्हणत. पवळाच्या रूपाने सुंदर दिसणारी, सुंदर नाचणारी तरुण मुलगी तमाशात आली ! हरिबाबा घोलप यांच्या तमाशाची कीर्ती सगळीकडे पसरली.

पण हरिबाबा घोलप यांना या सगळ्याचा एका टप्प्यावर कंटाळा आला. त्यांनी विरक्ती पत्करली आणि ते कीर्तन करू लागले ! तेव्हा पवळाने कोल्हापूरचा कडू सुभान्या लोखंडे यांच्या आणि इतर एकदोन तमाशांत काम केले. नंतर ती नामा धुलवडकर यांच्या तमाशात काम करत असताना तो तमाशा मुंबईत आला. मुंबईत पठ्ठे बापुराव, भाऊ फक्कड, दगडुबा साळी, शिवा संभा कवलापूरकर, शंकरराव अवसरीकर आदी तमाशे गाजत होते. त्या सगळ्या तमाशांत तरुण मुले स्त्रीवेशात नाचत. जेव्हा मुंबईत बातमी पसरली, की नामा धुलवडकर यांच्या तमाशात खरीखुरी स्त्री नाचते, तेव्हा त्या तमाशाला मोठी गर्दी होऊ लागली. गर्दी इतकी वाढली, की नामा धुलवडकरांसारख्या तमासगीरालाही गुंड प्रवृत्तीच्या प्रेक्षकांपासून पवळाला सांभाळणे कठीण जाऊ लागले. धुलवडकरांनी तमाशा बंद केला आणि पवळा पठ्ठे बापुरावांच्या तमाशात गेली.

बापुरावांचा जन्म सध्याच्या सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष गावचा. त्यांना लहानपणापासून तमाशाची आवड. त्यांनी चोरून तमाशे बघण्यास सुरुवात केली. बापुराव त्यांच्या आईवडिलांच्या निधनानंतर गावातील हरिजन वस्तीतील तमाशा कलाकारांना कवने रचून देऊ लागले. बापुरावांनी हळूहळू तमासगीर मंडळींत राहण्यास सुरुवात केली. बापुरावांकडून परंपरेने चालत आलेले गावचे कुलकर्णीपद सांभाळताना चूक झाली. वरिष्ठांकडून विचारणा झाल्यावर बापुरावांनी सरकारी काम सोडले आणि ब्राह्मण्यही सोडले. ते स्वत:च कलाकार गोळा करून तमाशे करू लागले. तोवर ओबडधोबड असलेल्या तमाशात लोकांना चांगली कवने ऐकण्यास मिळू लागली आणि बापुरावांचा तमाशा गाजू लागला. त्या तमाशात पवळाचा प्रवेश झाला आणि तमाशा लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचला ! असे म्हणतात, की बापुराव एके दिवशी गायलेले कवन दुसऱ्या दिवशी म्हणत नसत. पवळामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला बहर आला. अमाप पैसा मिळत गेला. बापुरावांचा त्या काळातील रोजचा खर्च वीस-पंचवीस रुपये होऊ लागला. सरकारी नोकराला महिन्याला तेवढा पगारही मिळत नव्हता. बापुराव आणि पवळा ही जोडी तमाशा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली होती.

पवळाचा थाट असा असायचा, की ती मुंबईहून पावसाळ्यात संगमनेरला आली, की तिच्यासाठी खास तयार केलेल्या आणि सजवलेल्या छकड्यातून हिवरगावला जायची ! तिच्या अंगावर नेहमी उत्तम शालू असायचा. पवळा नखशिखांत सोन्याने मढलेली असायची. स्वाभाविकच, तिच्या गाडीला चहूबाजूने पडदे लावलेले असत आणि गाडी तशी हिवरगावला त्यांच्या मळ्यात जाई. पण बापुरावांच्या खर्चिक स्वभावामुळे तिचे त्यांच्याशी वाद होऊ लागले. अखेरीस तिने बापुरावांची साथ सोडली.

मसुरच्या मारुतराव पाटील यांनी पवळाला नवा फड उभारून दिला. पण इकडे बापुराव सैरभैर झाले. काही काळ पवळाचा तमाशा फड जोरात चालला, पण मारुती पाटील आणि पवळा यांचेही वाद सुरू झाले, ते वाद शेवटी कोर्टात गेले आणि फड बंद पडला. पवळा पुन्हा हिवरगावला आली. बापुरावांना ती बातमी कळली. ते संगमनेरला आले आणि पवळाला जाऊन भेटले. गावातील थोरामोठ्यांच्या मध्यस्थीने पवळा आणि बापुराव यांच्यातील वाद मिटवला गेला. पवळा आणि बापुराव यांच्या नावाने पुन्हा तमाशा उभा राहिला. त्या तमाशाचा पहिला खेळ वाघापूर गावात मोफत करण्याचे ठरले. संगमनेर आणि पंचक्रोशीतील लोकांनी तमाशाला मोठी गर्दी केली. दोघांनी पुन्हा महाराष्ट्र गाजवण्यास सुरुवात केली. बापुराव तमाशात रमले, पण त्यांच्या गावात ते धर्मांतर करणार असल्याची अफवा पसरली. लोक त्यांना समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. बापुरावांना समजुतीच्या चार गोष्टी सांगताना पवळाला दोष देऊ लागले. त्यामुळे पुन्हा पवळा आणि बापुराव यांच्यात खटके उडू लागले. गावकऱ्यांनी बापुरावांना रेठऱ्याला नेले, तीनशे रुपये वर्गणी काढून ती रक्कम बापुरावांना दिली आणि ‘काशीला जाऊन शुद्धिकरण करून या’ असे सांगितले. बापुराव तीनशे रुपये घेऊन मुंबईला आले, त्यांनी सर्व पैसे पवळाला दिले. पण पवळा मनातून दुःखी झालेली होती, लोकांचे टोमणे तिला सहन होत नव्हते. तिने तमाशा सोडला आणि ती गावी परत गेली. तिचे वय वाढले, आजारपण वाढू लागले. शेवटी उपचार करणे गरजेचे होते, म्हणून कफल्लक झालेली पवळा मुंबईतील नागपाडा भागात राहत असलेल्या तिच्या लक्ष्मण तबाजी भालेराव या भावाकडे गेली. पण आजारपणाने तिची पाठ सोडली नाही. कधी काळी ऐश्वर्य भोगलेली पवळाबाई 6 डिसेंबर 1939 रोजी हे जग सोडून गेली. जिला बघण्यासाठी मुंबईकर तिकिट काढून यायचे, त्या पवळाबाईला अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वरळीच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले.

पठ्ठे बापुराव आणि पवळा यांच्या जीवनावर आधारित दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झालेले आहेत. ‘पठ्ठे बापुराव’ या नावाने 1950 साली तर ‘लावण्यवती’ या नावाने दुसरा सिनेमा 1993 साली आला होता. योगायोग असा, की 1993 साली आलेल्या ‘लावण्यवती’ सिनेमात पवळाची भूमिका संगमनेरची कन्या वर्षा संगमनेरकर यांनी केली. वर्षा या गुलाबबाई संगमनेरकर यांच्या धाकट्या कन्या आहेत. ज्या संगमनेरकरांवर सिनेमे आले अशा अनंत फंदीडॉ. आनंदीबाई जोशी (संगमनेरच्या स्नुषा) यांच्यानंतर तिसऱ्या संगमनेरकर म्हणजे पवळा हिवरगावकर.

– संतोष खेडलेकर 9822097809 skhedlekar15@yahoo.co.in

About Post Author

4 COMMENTS

  1. पठ्ठे बापूराव आणि पवळा ह्यांच्या बद्दल खुप छान माहिती मिळाली आयुष्यात सर्वांना सुखदु:खाशी सामना करावा लागतो हेच त्यांच्या जीवन कहाणी तून सिद्ध होतं

  2. विशाखा पोफळी….. अमरावती. खुप छान. माहिती. पुढील वाटचालीसाठी खुप. शुभेच्छा

  3. संतोष भाऊ खूप सुंदर आणि माहितीपूर्ण लेख धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here