मराठीतील अर्थशास्त्राविषयीचे पहिले चार ग्रंथ हे पुढीलप्रमाणे आहेत-
- हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे त्याचा काय परिणाम होणार, याविषयी विचार: रामकृष्ण विश्वनाथ
- लक्ष्मीज्ञान: लोकहितवादी
- देशव्यवहार व्यवस्था: हरि केशवजी पाठारे
- अर्थशास्त्र परिभाषा: कृष्णशास्त्री चिपळूणकर
ही पुस्तके 1843 ते 1855 या दरम्यान, म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापूर्वी आणि कंपनी सरकारचा अंमल जाऊन ब्रिटिश पार्लमेंटचा भारतावर अंमल येण्याआधी लिहिली गेली आहेत. मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले. त्यापूर्वी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निसर्गविज्ञानाची व मानवविज्ञानाची पुस्तके लिहिणारे लेखक त्यांच्या काळातील ज्ञान मराठीतून लोकांना देत होते ! या चार ग्रंथांमध्ये अर्थशास्त्राविषयी मांडलेले विचार, त्या काळात मराठी वाचकांना फार नवे होते. त्या विचारांचा उगम युरोपात, विशेषत: इंग्लंडात झाला. जॉन स्टुअर्ट मिल यांचा ‘प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल एकॉनामी’ हा ग्रंथ 1848 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्या ग्रंथाचा आधार घेऊन लिहिलेली दोन पुस्तके प्रस्तुत संग्रहात आहेत. म्हणजे इंग्लंडमधील त्या वेळच्या नव्या अर्थशास्त्रीय विचारांचा परिचय मराठीतून करून देण्याचे कार्य हे मराठी लेखक लगोलग करत होते. त्या लेखकांनी त्या विचारांचा भारत देशातील परिस्थितीशी संबंध दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे.
इस्ट इंडिया कंपनीने येथे राजकीय व लष्करी सत्ता स्थापन केली, तिचे स्वरूप काय आहे याचे आकलन रामकृष्ण यांना झालेले होते. इंग्रजांच्या पूर्वीचे परकीय मुसलमान राज्यकर्ते येथील हिंदू प्रजेला बाटवण्याच्या किंवा धर्मप्रसाराच्या दृष्टीने जुलूम करत होते, तरी त्यांचा मुख्य उद्देश केवळ येथील संचित धन लुटण्याचा होता असे ते सांगतात. त्यांनी या राज्यकर्त्यांपेक्षा इग्रजांच्या जुलमाचे स्वरूप व्यापारी पद्धतीचे व वेगळे आहे आणि जास्त पद्धतशीर व मोठ्या लुटीचे आहे ही गोष्ट ठळकपणे नजरेस आणली आहे. त्यांनी एडमंड बर्क यांचे वाक्य ‘हिंदुस्थानात राज्य नव्हे, लष्करी अंमल व दिवाणी जुलूम आहे’ हे उद्धृत केले आहे आणि ‘दिवाणी’ जुलमामुळे येथील संपत्तीची लूट कोणकोणत्या नव्या मार्गांनी होत आहे याची माहिती दिली आहे.
माणसाने ‘स्वाभाविक’ (रॅशनल) स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा हा ईश्वरी संकेत आहे असे रामकृष्णांनी, लोकहितवादींनी व नंतर न्या. रानडे व टिळक प्रभृतींनी मोठ्या दृढ श्रद्धेने मानले. लोकहितवादी म्हणतात, की “मनुष्याने या जन्मामध्ये वर्तणूक कशी करावी याचा नेम ईश्वराने त्यांच्या स्वभावातच दिला आहे.” मनुष्यमात्राची ईश्वरदत्त, स्वाभाविक प्रवृत्ती श्रमाकडे, सुखाकडे, ज्ञानाकडे व स्वातंत्र्याकडे आहे, पण खोट्या, भ्रष्ट रुढी व अज्ञान यांच्यामुळे हिंदुस्थानातील लोक आळशी व राष्ट्राभिमानाला पारखे झाले आहेत.
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांचा ‘लक्ष्मीज्ञान’ हा ग्रंथ रामकृष्णांच्या ग्रंथाप्रमाणे अगदी स्वतंत्रपणे लिहिलेला नाही. त्यांनी तो देशबांधवांना नव्या विचारांसाठी व कृतींसाठी केवळ आवाहन देण्यासाठीही लिहिलेला नाही. लोकहितवादींनी तो ग्रंथ क्लिफ्ट यांच्या ग्रंथाच्या आधारे रचला असे म्हटले आहे. त्यांनी क्लिफ्ट यांच्या ग्रंथाचे नाव मात्र दिले नाही. ग्रंथातील एकंदर विवेचन पाहता तो लेखकाने स्वतंत्रपणे लिहिला, फक्त क्लिफ्टच्या ग्रंथाप्रमाणे प्रकरणांचा व प्रतिपादनाचा क्रम राखला असे अनुमान करावेसे वाटते. शेवटचे प्रकरण हिंदुस्थानबद्दलचे आहे व ते लेखकाचे स्वत:चे आहे.
लोकहितवादींना त्यांनी दिलेले ग्रंथाचे नाव पाहता ‘पोलिटकल इकॉनामी’ या इंग्रजी संज्ञेला सार्थ प्रतिशब्द सुचलेला दिसत नाही. त्यांनी 1848-49 मध्ये लिहिलेले आर्थिक विषयावरील निबंध वाचून पाहिले तर त्यांतही ‘अर्थशास्त्र’ हा पारिभाषिक शब्द आढळत नाही. ‘आर्थिक’, ‘अर्थशास्त्रीय’ इत्यादी शब्द नंतरच्या काळात सहज वापरले जातात, पण ते शब्द रामकृष्ण, लोकहितवादी व तिसरे लेखक हरि केशवजी यांच्याही लिखाणात आढळत नाहीत. ‘अर्थशास्त्र’ हा शब्द प्रथमत: चौथे लेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी उपयोगात आणला व मग तो मराठीत रूढ झाला.
लोकहितवादींनी ‘लक्ष्मीज्ञान’ हे नाव ग्रंथाला देताना ‘लक्ष्मी’ म्हणजे ‘वेल्थ’ किंवा संपत्ती हा अर्थ मनात घेतलेला होता. त्यांनी ग्रंथाच्या प्रारंभीच संपत्ती म्हणजे काय याचे विवरण केलेले आहे. ते संपत्ती म्हणजे पैसा, द्रव्य, सोने किंवा जडजवाहीर नव्हे, तर श्रमाने पैदा केलेल्या आणि मनुष्यांच्या गरजा भागवणाऱ्या वस्तू आणि या वस्तू निर्माण करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्चा माल व उपकरणे असा खुलासा करतात. देव व दानव यांनी मिळून समुद्रमंथनाचे विराट श्रम केले तेव्हा लक्ष्मी प्राप्त झाली असा पुराणकथेचा अर्थ, त्यांनी त्यांच्या प्रमेयाला पोषक म्हणून नव्या संदर्भात लावला आहे. त्यांनी पुढील प्रकरणांतून, संपत्ती उत्पन्न करणारे वर्ग आणि संपत्तीचा व्यय नुसता करणारे अनुत्पादक वर्ग यांतील फरक विशद केला आहे. अर्थशास्त्रज्ञांनी मध्ययुगीन वर्गरचनेवर आणि अनुत्पादक वर्गांवर ‘क्लासिकल धार’ धरली आणि भांडवलधारी अर्थव्यवस्थेला व नव्या वर्गरचनेला ‘स्वाभाविक’ व श्रेयस्कर उत्पादक व्यवस्था मानले.
ब्रिटनमध्ये आणि इतर युरोपीय देशांतही त्या काळामध्ये वर्गसंघर्ष प्रत्यक्ष चालू होता. ‘क्लासिकल’ अर्थशास्त्रीय मताचा आधार घेऊन, विशेषत: श्रमाचा मूल्य-सिद्धांत स्वीकारून, समाजवादी अर्थशास्त्राला चालना मिळत होती. श्रम करणाऱ्या बहुजनसमाजाचे शोषण होत आहे असा आक्षेप सेंट सायमनप्रभृती फ्रेंच समाजवादी, रॉबर्ट ओवेनप्रभृती ब्रिटिश समाजवादी व इतर विचारवंत यांच्याकडून रूढ भांडवलदारी अर्थव्यवस्थेवर घेतला जात होता. रामकृष्ण व लोकहितवादी यांनीही श्रमाचा मूल्यसिद्धांत आणि शोषणाची कल्पना स्वीकारली. पण ते शोषण देशातील श्रमिकांचेही होत आहे ही गोष्ट नजरेस येण्याइतकी स्वदेशी भांडवलदारी व्यवस्था येथे विकसित नव्हती. त्याऐवजी सर्व भारतीय जनतेचे इंग्रज राज्यकर्त्यांकडून साम्राज्यवादी पद्धतीने शोषण होत आहे एवढीच गोष्ट त्यांच्या नजरेस ठळकपणे आली व त्यांनी ती स्पष्टपणे मांडली.
लोकहितवादी यांच्या ‘लक्ष्मीज्ञान’ या ग्रंथात ‘उद्योगाचे विभाग’(आजच्या परिभाषेत ‘श्रमविभाग’), ‘क्रयविक्रय’, ‘भांडवल’, ‘निर्भयपणा’ (आजच्या परिभाषेत ‘भांडवल गुंतवणुकीचे धाडस’ Venture Or Angle Capital), ‘किंमत’, ‘धारा, नफा व मजुरी’ अशी प्रकरणे असून शेवटचे प्रकरण ‘हिंदुस्थानविषयी विचार’ असे आहे.
हरि केशवजी यांनी त्यांचा ‘देशव्यवहार व्यवस्था’ हा ग्रंथ लिहिताना मिसेस मार्सेट या इंग्रज लेखिकेच्या ग्रंथाचा ‘कोठे भाषांतर, कोठे भावार्थ’ असा उपयोग केला आहे; तसेच, जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ‘पद्धतीस बहुतेक प्रकरणी अनुसरून’ त्यांचा ग्रंथ लिहिला आहे. मिल यांचा ‘प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल एकॉनामी’ हा ग्रंथ 1848 मध्ये प्रसिद्ध झाला.
मिसेस मार्सेट (1769-1858) या मूळच्या स्वित्झर्लंडमधील. त्या इंग्लंडमध्ये आल्या व त्यांनी मार्सेट या इंग्रज डॉक्टरशी लग्न केले. त्यांनी निसर्गविज्ञान व समाजविज्ञान या क्षेत्रांतील विषयांवर ज्ञानप्रसाराच्या दृष्टीने सोपी पुस्तके लिहिली. ती पुस्तके फार लोकप्रिय झाली. त्यांनी ‘कॉन्व्हर्सेशन्स ऑन पोलिटिकल एकॉनामी’ हे पुस्तक 1816 साली लिहिले. मेकॉले यांनी त्याची प्रशंसा केली. हरि केशवजी यांच्या ग्रंथाची एकंदर पृष्ठे दोनशेऐंशी असून, त्यात मिलच्या ग्रंथाच्या सर्व प्रकरणांतील विषय आलेले आहेत. त्यांनी मूळ ग्रंथाचा सुमारे निम्मा संक्षेप केलेला दिसतो. मिल यांच्या ग्रंथाची शब्दसंख्या सुमारे एक लाख सहासष्ट हजार आहे, तर हरि केशवजी यांच्या ग्रंथाची सुमारे ऐंशी हजार सहाशे आहे. त्यांनी ॲडम स्मिथ यांच्या ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या प्रख्यात ग्रंथाच्या नावापासून स्फूर्ती घेतली; तसेच, त्यांनी ‘पोलिटिकल एकॉनामी’ या संज्ञेतील ‘पोलिटिकल’ या शब्दावर विचार केला. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत प्रारंभीच, ‘हिंदुस्थान देश पूर्वी श्रीमंत होता व नंतर दरिद्री झाला आहे. एखादा देश सधन का होतो व दरिद्री कसा होतो? असा प्रश्न गोपाळ विचारतो व त्याला गुरू उत्तर देतात’ असा प्रसंग घेतला आहे. त्यांनी हिंदुस्थानच्या आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे जे विषय आढळतील त्यांचा ऊहापोह आवर्जून केला आहे. उदाहरणार्थ, त्यांनी उपजीविकेच्या साधनांच्या मानाने व भांडवलाच्या मानाने लोकसंख्या वाढण्याचे भय लक्षात घेतले आहे. त्यांनी या विषयाचे विवेचन मिलच्या आधाराने चांगले केलेले आढळते.
‘अर्थशास्त्र परिभाषा’ हा प्रस्तुत संग्रहातील शेवटचा, चौथा ग्रंथ. तो कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिला. रामकृष्णांनी 1843 मध्ये लिहिलेल्या ग्रंथानंतर बारा वर्षांनी, म्हणजे 1855 साली. आर्थिक प्रश्नांकडे व प्रमेयांकडे पाहण्याच्या दृष्टीत तेवढ्या अवधीत, मूलत: फरक झालेला नव्हता. हिंदुस्थान राजकीय दृष्ट्या परतंत्र आहे, म्हणून त्याच्या आर्थिक विकासाचा मार्ग बंद झालेला असून देशाच्या संपत्तीचे तीव्र शोषण इंग्रजांकडून होत आहे. रामकृष्णांची मूलभूत धारणा भारतीयांनी आर्थिक विकासाचे शास्त्र व तंत्र शिकले पाहिजे आणि देशाचे दारिद्रय व पारतंत्र्य यांचा नाश केला पाहिजे ही होती; तशीच, ती कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचीही होती. या सर्व लेखकांनी त्या दृष्टीनेच ज्ञानप्रसाराचे व्रत अंगिकारले होते. ज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतून करणे अवघड आहे किंवा अशक्य आहे अशी पुसट शंकाही त्यांच्यापैकी कोणाच्या मनात आलेली दिसत नाही.
अॅडम स्मिथ, रिकार्डो, मार्क्स व कीन्स यांच्या उदाहरणांवरून असे म्हणता येईल, की अर्थशास्त्राच्या प्रगतीला अर्थशास्त्रीय घडामोडींची नव्हे, तर एकंदर समाजाच्या राजकीय स्थित्यंतरांशी असे प्रत्यक्ष व कार्यप्रवण संबंध असणाऱ्या विचारवंतांची कामगिरी मोलाची ठरते. दादाभाई नवरोजी व न्यायमूर्ती रानडे यांची उदाहरणेही या बाबतीत अशीच लक्षात येणारी आहेत. तेव्हा केवळ सैद्धांतिक शास्त्रीय विचारांकडे होणारी वाटचाल ही प्रगतीला नेहमी उपकारक ठरते असे म्हणता येत नाही. येथे अर्थशास्त्रीय विचारांचा नव्याने परिचय 1843 ते 1855 या काळात होत होता आणि तो परिचय मराठी भाषेतून करून देण्याचे मोलाचे कार्य रामकृष्णांपासून कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्यापर्यंत सर्वांनी केले. रामकृष्णांनी ‘पोलिटिकल एकॉनामी’ म्हणजेच ‘राज्यव्यवस्थेचे शास्त्र’ असे मानले. पुढे हरि केशवजी यांच्या वेळेपर्यंत राजकीय व आर्थिक क्षेत्रांतील भिन्नपणा लक्षात आलेला दिसतो. हरि केशवजी त्यांच्या ग्रंथात म्हणतात, की “एकटे द्रव्यापासून लोकांस सुख होत नाही” व म्हणून “चांगला धर्म, मार्ग, चांगले आचरण, शहाणे राज्यकर्ते, चहूकडे ज्ञान झालेले असे जेव्हा होते तेव्हा लोक सुखी होतात. हे लाभ जर झाले नाहीत तर एकट्या संपत्तीपासून सुख होणार नाही.”
कृष्णशास्त्रींनी ‘अर्थशास्त्र’ ही नवी संज्ञा ‘पोलिटिकल एकॉनामी’ या अर्थाने वापरली; त्यांच्या आधी ‘राज्यव्यवस्था’, ‘लक्ष्मीज्ञान’ आणि ‘देशव्यवहार व्यवस्था’, ‘संपत्तिविवेचन’ या संज्ञा वापरात होत्या. ही नवी संज्ञा त्यांनी का वापरली असावी? ‘अर्थशास्त्र’, ‘आर्थिक स्थिति’, ‘आर्थिक व्यवहार’ असे शब्द य.न. केळकर यांनी तयार केलेल्या ‘ऐतिहासिक शब्दकोशा’त दिलेले नाहीत. संस्कृतमध्ये ‘धन’, ‘संपत्ती’, ‘द्रव्य’ असे शब्द येतात. ‘अर्थ’ या शब्दाचाही संपत्ती या अर्थाने कोठे कोठे वापर झालेला आढळतो. पण ‘अर्थशास्त्र’ या संस्कृत संज्ञेचा अर्थ मात्र अगदी वेगळा आहे. ‘अर्थशास्त्र’ शब्दाचा परंपरागत अर्थ ‘राजनीती’ किंवा ‘दंडनीती’ असा आहे. तो कौटिल्याच्याही पूर्वीपासून रुढ झालेला आहे. तो ‘राजनीती’ याच अर्थाने ‘दशकुमारचरित’सारख्या वाङ्मयीन ग्रंथातही आलेला आहे.
‘धर्म, ‘अर्थ’, ‘काम’ आणि ‘मोक्ष’ असे चार ‘पुरुषार्थ’ म्हणजे मनुष्याला उचित अशी उद्दिष्टे मानलेली आहेत. ‘मोक्ष’ हा परमार्थ आहे, तो ऐहिकाच्या पलीकडचा व विलग असा ‘अर्थ’ आहे. तो ‘धर्म’, ‘स्वर्ग’, ‘पापपुण्य’ अशा कल्पनांशी निगडित आहे. तसेच, ‘धर्मशास्त्रा’कडे ‘विवाह’, ‘दायभाग’ इत्यादी बाबतींत नियम सांगण्याचा अधिकारही आहे. ‘कामशास्त्रा’कडे सुरतविषयक उद्दिष्टांचे व नियमांचे क्षेत्र आहे. तेव्हा ‘धर्मशास्त्र’ व ‘कामशास्त्र’ या दोन्हींच्या क्षेत्रांतून वगळलेले सर्व ऐहिक जीवन ‘अर्थशास्त्रा’त समाविष्ट आहे. म्हणून केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक व राज्यविषयक व्यवहारांचे विवेचन कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’त येते. ते राजाच्या मार्गदर्शनासाठी प्रामुख्याने विवेचले गेले असल्यामुळे त्याला ‘राजनीती’ ही संज्ञाही रास्त ठरते. हा सारा विचार चिपळूणकर यांच्या मनात आल्यामुळे ‘अर्थशास्त्र’ संज्ञेची परंपरागत सढळ व्याप्ती त्यांनी गृहीत धरली असावी.
राजा हा ‘अर्थशास्त्रा’चे केंद्र आहे असे पूर्वी मानले होते, आता आधुनिक काळात ‘देश-राष्ट्र-नेशन’ किंवा लोकशाहीत ‘प्रजा’ हे केंद्र मानतात. पण व्याप्ती तीच राहू शकेल. ‘राजनीती’ हा ‘अर्थशास्त्रा’चा जुना पर्यायशब्द होता. तो मात्र तसा उरणार नाही. पण ‘अर्थशास्त्रा’चे देशव्यवहारात्मक पारंपरिक क्षेत्रच ‘पोलिटिकल एकॉनामी’चे क्षेत्र आहे असे मिल या आधुनिक अर्थशास्त्रज्ञाला अनुसरून मानता येईल. सारांश ‘धर्मशास्त्र’, ‘कामशास्त्र’ व ‘मोक्षशास्त्र’ यांच्या कक्षा वगळून (त्यात पैसा असला तरी, अर्थ नाही) उरलेले मानवी व्यवहारांचे सारे क्षेत्र हा आधुनिक ‘अर्थशास्त्रा’चा विषय राहील ही चिपळूणकर यांची कल्पना असावी. परंपरेतील एक अर्थवाही व समर्थ शास्त्रीय संज्ञा अशा रीतीने नव्या काळातही वापरणे शास्त्रीय दृष्टीने उचित ठरेल, ही गोष्ट ‘अर्थशास्त्र’ या संज्ञेच्या बाबतीत शक्य झालेली दिसते. या संज्ञेचा तसा उपयोग करण्याचे श्रेय कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना देण्यास हवे.
‘पोलिटिकल एकॉनामी’ या संज्ञेतील ‘पोलिटिकल’ हा शब्द पाश्चात्य देशात गळून पडला आणि ‘एकॉनॉमिक्स’ ही नवी संज्ञा रुढ झाली. त्या शास्त्रात आर्थिक व्यवहार विलगपणे, स्वायत्त रीत्या अभ्यासण्यात येतात. ‘अर्थशास्त्र’ ही मराठी संज्ञा 1555 पासून पुढे तशीच चालू राहिली आहे. मात्र तिचा व्यापक पारंपरिक अर्थ आणि त्याला अनुलक्षून चिपळूणकर यांनी दिलेला नवा अर्थ हे दोन्ही झिजत गेले. त्या संज्ञेला ‘केवळ आर्थिक व्यवहारांचे’ शास्त्र असा विशिष्ट अर्थ आलेला आहे. त्यामुळे कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’ला ‘राजनीती’ का म्हणत होते आणि ‘धर्म, ‘अर्थ, ‘काम’ व ‘मोक्ष’ यांना ‘पुरुषार्थ’ का म्हटले आहे अशासारखे प्रश्न मराठी वाचकाला दुर्बोध वाटतात.
त्यानंतरच्या दीडशे वर्षांत मात्र अर्थशास्त्रावरील विशेष असे ग्रंथ निर्माण झालेले नाहीत. अभ्यासकांनी इंग्रजी ग्रंथ वाचले, ते रुपांतरीतही झाले नाहीत. त्यामुळे मराठीत अर्थनिरक्षरता आली. लोकांना प्रत्यक्षात भेडसावणाऱ्या आर्थिक विचारांपेक्षा आणि प्रश्नांपेक्षा राजकारण, सिनेमा, क्रिकेट अशा गोष्टींची पलायनवादी ओढ निर्माण झाली. त्यामुळे राजकारण त्यांनी एकांडे (आयसोलेटेड) पाहिले. राजकारण-अर्थकारण यांची सांगड, जशी त्या चार जुन्या ग्रंथांत घातलेली दिसते, तशी त्यानंतर घातली गेली नाही आणि जात नाही. अर्थसाक्षरतेशिवाय समाजाचा योग्य विकास जलद होणार नाही.
– जयराज साळगावकर 9820032232 jayraj3june@gmail.com
छान लेख…