जगाचे नेतृत्व करणारी दहा शहरे (The Cities that Led the World: From Ancient Metropolis to Modern Megacity)

0
422

‘द सिटीज् दॅट लेड द वर्ल्ड: फ्रॉम एन्शन्ट मेट्रोपोलिस टू मॉडर्न मेगासिटी’ हे पॉल स्ट्रॅदन लिखित पुस्तक जगातील दहा अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या महानगरांच्या माध्यमातून जवळपास सहा हजार वर्षांच्या मानवी इतिहासाचा आढावा घेते. महानगरे ही संस्कृती-संकराची वाहक असतात. त्यांच्यामुळे मानवी संस्कृतीला आजचे रूप येत गेले आणि पुढेही येत राहील. या संस्कृतिकारणाचा शोध इसवी सन पूर्व चार हजार वर्षे बॅबिलॉन या शहरापासून सुरू होतो तो आजच्या बिजिंग आणि मुंबई या शहरांपर्यंत येऊन थांबतो. इतिहासाचा हा दीर्घ पल्ला आहे.

या चित्तवेधक पुस्तकाचा परिचय करून देत आहेत नामवंत वास्तूविशारद आणि शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन. इतिहासाच्या वाटेवरून भविष्याच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचणारा हा काहीसा दीर्घ लेख कारण हा भविष्यवेधी प्रवासही लांबचा आहे.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

जगाचे नेतृत्व करणारी दहा शहरे

Before we can build a stable civilization worthy of humanity as a whole, it is necessary that each historical civilization should become conscious of its limitations and its unworthiness to become an ideal civilization of the world…

Sarvapalli Radhakrishnan, Kalki, 1929

प्राचीन काळापासून भरभराटीला आलेली अनेक महानगरे मूलभूतपणे विविध प्रदेशातील संस्कृतींची वाहक झाली आहेत. कालप्रवाहात जगाच्या विविध खंडात, प्रदेशात स्थिर वसाहती निर्माण होत होत मानवी संस्कृतीचा उदय झाला. त्यातील काही वस्त्यांची शहरे, महानगरे झाली. अनेक शतके विकसित होऊन, भरभराटीला येऊन काही नष्ट झाली; काही महानगरे हजारो वर्ष त्यांच्या संस्कृतींचे मोठेपण-खुजेपण, वैशिष्ट्ये, त्याच्यावरचे आघात आणि प्रतिघात, भाषा, साहित्य, कला आणि संगीत, विचार आणि अविचार, क्रौर्य आणि माणुसकी तसेच इतर सांस्कृतिक घटकांना सामावून घेत आजही टिकून आहेत. बहुतेक प्राचीन महानगरांच्या भोवतीचे देश -प्रदेश, त्यांच्या भौगोलिक सीमा, राज्यकर्ते, धर्म आणि राज्यव्यवस्था बदलत गेल्या आहेत. महानगरांना, राष्ट्रांना भौगोलिक सीमा असतात परंतु संस्कृती मात्र अशा बंधनांपासून मुक्त असतात. एका संस्कृतीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना, तंत्रे, ज्ञान जगभर फैलावू शकतात. या सांस्कृतिक घुसळणीतून वादळे निर्माण होतात; कधी लढाया तर कधी शांतता पर्व. शांतता पर्वात संस्कृतींचा संकर सुरु होतो. ती प्रक्रिया संथ असते. त्यातूनच नवीन संकरित सांस्कृतिकतेचा जन्म होतो.

संस्कृती मानवजातीचे संगोपन करतात. विकृती मानव जातीचा विनाश करतात. प्राचीन काळापासून मानवाने विकसित केलेली महानगरे मानवी संस्कृतीची आणि विकृतीचीही गुणसूत्रे पुढे नेण्याचे काम करत आली आहेत. आज संपर्क आणि संवाद माध्यमे, प्रवासी तंत्रज्ञानामधून जगातील सर्व प्रदेश, देश, समाज त्यांच्या संस्कृती-विकृतीसह जवळ येत आहेत. त्या प्रक्रियेत आजची महानगरे कळीची भूमिका बजावत आहेत. तरीही मानवी समाजात आज स्थैर्याचा अभाव दिसतो. अशा वेळी उद्याची महानगरे मानवी समाजाला स्थैर्य आणि शांततेचा अनुभव देतील का? संस्कृतींची धडपड त्याच अपेक्षेने झालेली आहे ना?

असंख्य महानगरांचे विसावे शतक – विसाव्या शतकात जागतिक महानगरांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली. दुसरे महायुद्ध संपले आणि पाश्चिमात्य देशांच्या जोखडातून शेकडो देश स्वतंत्र झाले, त्या नवस्वतंत्र देशांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढली. त्याच बरोबर शहरांची आणि दहा लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या महानगरांची संख्याही झपाट्याने वाढली. एकविसाव्या शतकाच्या पहाटेला जगाच्या सात अब्ज लोकसंख्येपैकी अर्धी नागरी भागात होती. त्यातील किमान 1/3 लोकसंख्या पाच लाख लोकवस्तीच्या शहरांमध्ये आहे. ह्या शतकाच्या अखेरीस पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असेल. ह्या घडामोडींमुळे नागरी जगाचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे दोन विषय त्याच बरोबर भूतकाळातील शहरे, महानगरे आणि नागरीकरणाचाही अभ्यास जगातील सर्वांसाठी महत्त्वाचे झाले आहेत.

प्राचीन महानगरे पुरातत्त्व शास्त्र आणि इतिहास ह्या दोन क्षेत्रांतील संशोधकांनी जगाच्या विविध प्रदेशातील प्राचीन आणि ऐतिहासिक शहरांचे संशोधन सुरु केले. त्यातून जागतिक नागरीकरणाचा आणि मानवी संस्कृतीचा एक दीर्घ, सलग, गुंतागुंतीचा, एकमेकांवर प्रभाव टाकणारा जागतिक प्रवाह उलगडायला लागला. विशेषतः जगाच्या विविध प्रदेशांतील महानगरांचे एकमेकांशी असलेले सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक-व्यापारी, राजकीय आणि ऐतिहासिक नातेसंबंध लक्षात येऊ लागले. त्यातूनच नागरीकरणाकडे मानवी उत्क्रांतीच्या परिप्रेक्ष्यातून बघण्याची दृष्टी विकसित होत आहे. प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य जगातील प्राचीन आणि वर्तमानातील साम्राज्यांचा धावता इतिहास तेथील महानगरांच्या माध्यमातून घेतला आहे. त्यात मध्य पूर्वेतील प्राचीन महानगर बॅबिलॉन, ऐतिहासिक काळातील अथेन्स, रोम, कॉन्स्टॅन्टिनोपॉल/ इस्तंबुल या शहरांची दखल घेतली आहे. त्यापाठोपाठ आधुनिक काळात महत्त्व प्राप्त झालेल्या पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क आणि मॉस्को ह्या चार महानगरांचा इतिहास थोडक्यात मांडला आहे. भविष्यात चीन आणि भारत यांच्यामध्ये जागतिक साम्राज्य बनण्यासाठी स्पर्धा असेल असे लेखकाला वाटते.

ह्या सर्व महानगरांनी जागतिक संस्कृतीचे नेतृत्व केले. त्यांच्या सहभागातून मानवी समाजाची एक सलग सांस्कृतिक उत्क्रांती प्रक्रिया पुढे नेली. ह्या प्रत्येक शहरात माणसाच्या बुद्धीमत्तेचे, सौंदर्यासक्तीचे, आनंद निर्मितीचे जसे दर्शन होते तसेच त्याच्यातील क्रौर्याचे, कपट-कारस्थाने आणि दुष्ट प्रवृत्तीचेही पोषण होत होते. ह्या दोन्ही प्रकारच्या प्रवाहांची असंख्य रूपे, त्यातील विरोधाभास आपल्याला आजच्या प्रत्येक महानगरात बघायला मिळतात! अशा असंख्य विरोधाभासांच्या निर्मितीला जन्म देणाऱ्या महानगरांचे हे पुस्तक मला महत्त्वाचे वाटले.

युरोप खंडातील सात साम्राज्यातील सात महानगरांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध उलगडत असतानाच आजच्या घडीला नेतृत्व स्थानी असलेल्या अमेरिकेच्या साम्राज्याचा, न्यूयॉर्क शहराचा आता उतरणीला लागलेला प्रभावही लेखकाने विशद केला आहे. भविष्यकाळात आशियामधील मुंबई आणि (किंवा) बीजिंग ही भारत आणि चीनमधील महानगरे जगाचे नेतृत्व करतील असे भाकीत लेखकाने केले आहे. सध्याची मुंबईची स्थिती पाहता ह्या पुस्तकात मुंबईचा समावेश का आणि कशामुळे केला असावा ह्याचे आश्चर्य तर वाटलेच, पण त्याहूनही जास्त कुतूहल वाटले. त्याबद्दल लिहिण्याआधी लेखकाने उदाहरण म्हणून निवडलेल्या आठ पाश्चिमात्य महानगरांबद्दल थोडे विवेचन केले आहे.

युरोपमधील प्रभावशाली सात महानगरे – लेखकाने निवडलेली युरोपमधील सात महानगरे गेल्या काही हजार वर्षात निर्माण होऊन नष्ट झालेल्या साम्राज्यांमधील आहेत. ती आजही जगात महत्त्व राखून आहेत. अनेक शतकांच्या दीर्घ प्रवासात सांस्कृतिक शिखरावर पोचलेली मेसापोटेमिया, ग्रीक आणि रोम ही प्राचीन साम्राज्ये इसवी सन पूर्व काळातच लयाला गेलेली आहेत. तेथील बॅबिलॉन, अथेन्स आणि रोम ह्या महानगरांनी मानवी संस्कृतीमध्ये घातलेली भर अतुलनीय आहे. तेथे विकसित झालेल्या अनेक मूलभूत संकल्पनांचे प्रतिबिंब आजही अनेक महानगरांमध्ये दिसते.

बॅबिलॉन – मेसापोटेमिया ही जगातील सर्वात पुरातन संस्कृती. ह्या साम्राज्याची सुरुवात भूमध्य समुद्राच्या काठावर इसवी सन पूर्व 4000 ते 1850 ह्या काळात झाली.  तेव्हा मानव टोळी व्यवस्थेतून बाहेर पडून शेती व्यवस्थेमध्ये स्थिरावत होता. धातू, चाक, बैलगाडी, वजन वाहून नेणारी गाढवे, शिडाचे जहाज; अशा अनेक गोष्टींमुळे पुढच्या विकासाची पूर्वतयारी होत होती. त्या काळानंतरच बॅबिलॉन ह्या लहान गावाचे एका भव्य व्यापारी, श्रीमंत महानगरात रूपांतर होत गेले. बॅबिलॉन, तैग्रिस आणि युफ्रातीस नद्यांच्या परिसरात (आजचा इराक) भरभराटीला आले. तेथील झिगुरत म्हणजेच टप्पे असलेले आणि माथ्यावर सपाटी असलेले उंच पिरॅमिड प्रसिद्ध आहेत. ग्रहांची स्थितीगती मोजणारे, ग्रहणाचे अचूक अंदाज बांधणारे गणित, आकाशस्थ ग्रहांची निरीक्षणे यातून आधुनिक ज्योतिर्विद्येचा पाया तेथे घातला गेला. कालवे बांधून नद्यांमधील पाणी वळवणे ही त्याच संस्कृतीची तांत्रिक देणगी. हमुरब्बी (इसवी सन पूर्व 1792-1750) ह्या राजाच्या काळात बॅबिलॉन महानगर व्यापारामुळे भरभराटीला आले. त्याने निर्माण केलेले नागरी व्यापाराला उपयुक्त असे दोनशे ब्याऐंशी नियम हमुरब्बी कोड नावाने ओळखले जातात. प्राचीन काळात सर्वात प्रथम निर्माण झालेले हे कायदे एका दगडी खांबावर कोरलेले आहेत. त्या खांबाचा शोध 1901 साली लागला.

अशा ह्या सर्वात पुरातन संस्कृतीचे वैभव मिरवणाऱ्या बॅबिलॉन शहरावर हल्ले करणाऱ्या, कब्जा करून लुटून नेलेल्या संपत्तीच्या जोरावर आजूबाजूच्या प्रदेशात अनेक लहान-मोठी शहरे आणि नंतरची साम्राज्ये घडली. (उदाहरणार्थ इजिप्त, पर्शिया, ग्रीस इत्यादी) इसवी सन पूर्व 539 मध्ये, दीड हजार वर्ष भरभराटीला आलेले हे महानगर पर्शियन सैन्याच्या हल्ल्यामध्ये नष्ट झाले. साम्राज्याचा अस्त झाला. मागे भग्नावशेष उरले. असंख्य शतकांत जमलेल्या धूळ आणि वाळूने त्या शहरातील मातीच्या हजारो पाट्यांवर लिहिलेली, भाजून पक्की केलेली टोकदार अक्षरे, आकडे, चित्रलिपी (क्यूनिफॉर्म) गाडून टाकली. जर्मन पुरातत्व संशोधकांनी (1899 ते 1917) तेथील असंख्य कलाकृती, चित्रे पळवून नेली. बर्लिनमध्ये एक म्युझियम तयार केले. अलीकडे मातीच्या काही पाट्यांवरील राजांची नावे, व्यापारी मालाची यादी, आकडे, असा मजकूर वाचणे शक्य झाले आहे. त्या पाट्या व्यापारासाठी आवश्यक असलेला जमा-खर्च, मालाच्या नोंदी करण्यासाठी तयार केल्या होत्या. आधुनिक विकसित वित्त व्यवहाराला ह्या संस्कृतीने जन्म दिला असल्याचे लक्षात आले. इतिहासातले सोयीचे दाखले देऊन बॅबिलॉन शहराचे वैभव पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न इराकमधील हुकूमशहा सद्दाम हुसेन याने केला. तो स्वतःला बॅबिलॉन मधील शेवटच्या राजाचा दैवी अवतार मानत असे. जुन्या नदीच्या वालुकामय पात्रामध्ये त्याने झिगुरत आणि एक डोंगर तयार करून त्यावर स्वतःसाठी मोठा महाल बांधला होता. अमेरिकेच्या हल्ल्यात सैनिकांनी तेथे छावणी करून त्याचे नुकसान केले. आता तेथे नव्याने पर्यटक आकर्षित होते आहेत!

अथेन्स – ग्रीक संस्कृती इसवी सन पूर्व 1700 ते 900 वर्ष विकसित होत होती. अथेन्स हे ग्रीक साम्राज्यातले सुप्रसिद्ध प्राचीन महानगर, बॅबिलॉनच्या पाडावानंतर भरभराटीला आले. ते ग्रीक संस्कृतीचे माहेर घर. अथेन्सने जगाला दिलेली सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेची संकल्पना आणि प्रयोग. अथेन्समध्ये राजा किंवा सम्राट नसे तर सामान्य नागरिकांमधून दर दोन वर्षांनी शासनकर्ते निवडले जात. तेव्हा ग्रीसमध्ये अथेन्स सारखी अनेक नगरराज्ये होती. त्यांच्यात स्पर्धा असली तरी त्यांच्यातील सांस्कृतिक प्रवाह एकच होता. त्या प्रवाहाचा प्रभाव भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या सर्व भौगोलिक प्रदेशात पसरलेला होता. अथेन्स हे शहर चारी बाजूंनी चुना आणि संगमरवरी दगडांच्या डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे त्यांचा सढळहस्ते वापर तेथील प्राचीन वास्तु आणि शिल्पकलेमध्ये होत होता ह्यात नवल नाही.

अथेन्समधील वास्तुकलेने गाठलेले शिखर अक्रोपोलिसवरील पार्थेनॉन ह्या प्रसिद्ध इमारतीच्या रूपाने आजही बघायला मिळते. तेथील संगमरवरी, कोरीव खांबांची योजना, त्यांची गणिती प्रमाणबद्धता आणि त्यावरील त्रिकोणी आकाराचे छत हे रचना वैशिष्ट्य. त्याची असंख्य अनुकरणे जगभर बघायला मिळतात. मुंबईमधील एशियाटिक लायब्ररीची इमारत हे भारतामधील उदाहरण. आधुनिक स्टेडियम आणि मॅरथॉन शर्यत ही अथेन्सची जगाला मिळालेली खास देणगी. प्लेटो, ऍरिस्टोटल, सॉक्रेटिस हे प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ अथेन्सचे. पायथागोरस हा गणिती त्याच्या भूमिती सिद्धांतामुळे आपल्याला शाळेतच भेटतो. ग्रीसची लॅटिन भाषा ही युरोपमधील सर्व भाषांची जननी. शोकात्मिका आणि कॉमेडी नाटक हा आज जागतिक झालेला करमणुकीचा प्रकार येथेच जन्मला. ह्या साम्राज्याचा विस्तार करणारा सम्राट अलेक्झांडर, पूर्वेकडे आजच्या पाकिस्तानच्या वेशीवर येऊन पराभूत होऊन परत गेला. त्याच्या मृत्यूनंतर ग्रीक साम्राज्य लयाला गेले. पर्शियन फौजांनी अथेन्स जिंकून घेतले. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात ट्रॉय शहरातून पराभूत झालेल्या ग्रीक राजाने जहाज घेऊन वस्ती करण्यासाठी नवीन प्रदेश शोधला. इटलीमध्ये रोम येथे नव्या साम्राज्याची पायाभरणी केली.

रोम– ग्रीक संस्कृतीच्या उरल्या-सुरल्या अवशेषांतून, साहित्य, संस्कृती, तत्वज्ञानाच्या, वास्तुकलेच्या आणि गणितासारख्या शास्त्रांच्या प्रभावातून पुढे रोमन साम्राज्य उदयाला आले तरी ते ग्रीक संस्कृतीपेक्षा मूलभूतपणे वेगळे होते. ग्रीक संस्कृतीमधील लोक शांतीप्रिय, विनम्र आणि सहनशील वृत्तीचे होते. तेथे लोकशाही व्यवस्थेमध्ये नगर राज्याचे लोक एकत्र जमून विविध विषयांवर चर्चा करून प्रश्न सोडवायचे. रोमन लोक मात्र आक्रमक आणि लढवय्ये होते. ग्रीक प्रभावाखाली सुरुवातीला काही काळ रोमन लोकांचे संघराज्य अस्तित्वात आले. परंतु इसवी सन पूर्व काळात ज्युलियस सीझरच्या उदयानंतर तेथे राजेशाही रूढ झाली. सुरुवातीच्या राजांवर ज्यू धर्माचा प्रभाव होता. त्यांनी पूर्वेकडील जेरुसलेम येथून आलेल्या ख्रिश्चन धर्मियांचा छळ केला. नंतर कॉन्स्टन्टाईन या राजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि पुढे एक हजार वर्षे रोमन संस्कृतीचा पूर्व आणि पश्चिम युरोपात विस्तार झाला. ख्रिश्चन धर्मगुरूंना राजाश्रय मिळाला. रोमन चर्चचा धार्मिक प्रभाव पूर्ण युरोपभर विस्तारला. त्या काळात युरोपमध्ये सांस्कृतिक दृष्टीने फारसे काही घडले नाही. त्यामुळेच त्या काळाला ‘मध्ययुगीन अंधाराचा काळ’ म्हटले जाते.

ख्रिश्चन धर्माची सुरुवात जेरुसलेम ह्या ज्यू धर्मीय जन्मस्थानापासून सुरु झाली तरी त्याच्या प्रभावाचे मुख्य केंद्र रोम शहर झाले. रोममधील सेंट पिटर चर्च असलेला व्हॅटिकन विभाग हे आज एक स्वतंत्र शहर मानले जाते, ते आजतागायत. चर्चच्या इमारतींच्या बांधकामांसाठी विकसित होत गेलेल्या वास्तुकलेबरोबरच, धार्मिक शिक्षणाद्वारे ख्रिश्चन धर्म प्रसाराला मदत झाली. गोलाकार दगडी कमानी, बाकदार व्हॉल्ट आणि घुमट बांधण्याचे तंत्र म्हणजे रोमन वास्तुकलेने जागतिक वास्तुशास्त्राला दिलेली अतुलनीय देणगी आहे. ह्या कमानीच्या रचना तंत्राचा वापर करून पाण्याचे कालवे, पूल, जमिनीखालील बोगदे बांधणे सुकर झाले. रोम मधील लंबगोलाकार, कमानी रचून बांधलेली चार मजली कलोझियम, म्हणजेच स्टेडियम हे जागतिक वास्तुकलेचा उत्कर्ष बिंदू मानला जातो. रोमन तंत्राचा प्रसार आणि विकास होत होत आजही आधुनिक वास्तुकलेवर त्याचा मोठा प्रभाव पडतो आहे. नवी दिल्लीमधील इंडिया गेटची इमारत, राजभवनाचा घुमट आणि अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील प्रसिद्ध कॅपिटॉल हिलची, पार्लमेंटची इमारत, सेंट लुई यथील अत्यंत भव्य अशी काँक्रीटची कमान. कमानीच्या मूळ संकल्पनेची अशी अनंत रूपे जगभर बघायला मिळतात.

कॉन्स्टॅन्टिनोपॉल- इस्तंबुल -रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर रोमन सरदारांनी पश्चिम आणि पूर्व युरोपमध्ये स्वतंत्र राज्ये स्थापन केली. कॉन्स्टन्टाईनने पूर्व युरोपमध्ये पूर्वेकडील मध्य आशियाच्या सीमेवर कॉन्स्टॅन्टिनोपोल शहर वसवले. आशिया आणि युरोपमधील बॉस्परस नदीच्या काठावर मोक्याच्या स्थानावर असलेल्या ह्या शहराची सुमारे सातशे वर्षे आशिया-युरोपमधील व्यापारातून भरभराट झाली. ह्या काळात तेथे जागतिक ठेवा असलेले हेगिया सोफिया सारखे भव्य चर्च, राजवाडे बांधले गेले. शहराच्या भोवती तीन थर असलेली भक्कम तटबंदी बांधली होती. मध्य पूर्वेतील अरब टोळ्यांकडून सतत हल्ले होत असले तरी त्यांना ही तटबंदी पार करता येत नसे. परंतु ह्याच काळात चीनमधून आलेल्या दारूगोळ्यांचा प्रसार झाला. सुरुवातीला करमणुकीसाठी होणारे दारूकाम पुढे लष्कराच्या मदतीला आले. त्यातच सातव्या शतकापासून भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर, आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात व्यापाराच्या बरोबरच इस्लाम धर्माचा वेगाने प्रसार सुरु झाला. ख्रिश्चन धर्माला हटवून इस्लाम धर्माने प्रदेश काबीज केले. पश्चिम युरोपमध्ये स्पेन-पोर्तुगाल पर्यंत अरब लोकांनी प्रदेश ताब्यात घेतले. अरब लोकांनी व्यापार, हस्तकला आणि लष्करी बळ वापरून धर्म प्रसार केला. अनेक देशांच्या राजांनी इस्लाम धर्म स्वीकारला.

ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम ह्या तीनही धर्मांचे जन्मस्थान असलेल्या जेरुसलेम शहरावर ताबा मिळवण्यासाठी रोमन ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांमध्ये असंख्य युद्धे-क्रुसेड्स झाली. त्यामध्ये युरोपमधील देशांचे नुकसान झाले. पूर्वेकडील रोमन ख्रिश्चन धर्माची राजधानी बनलेल्या कॉन्स्टॅन्टिनोपोलसाठी (म्हणजेच आजचे इस्तंबुल) अनेक दशके लढाया झाल्या. पूर्व आणि पश्चिमेच्या व्यापारावर ताबा ठेवण्याच्या दृष्टीने हे शहर कळीचे होते. शेवटी चौदाव्या शतकामध्ये तुर्की टोळ्यांच्या तरुण म्होरक्याने अनेक आठवडे ह्या शहराला वेढा घातला, तोफांच्या साहाय्याने तीन थर असलेली तटबंदी उध्वस्त केली आणि शेवटी ते महानगर तुर्की टोळीच्या ताब्यात गेले. त्या महानगराचे इस्तंबुल असे नामकरण होऊन तेथे ऑटोमन साम्राज्याची राजधानी प्रस्थापित झाली. पाच दशके ऑटोमन साम्राज्याचा विस्तार युरोपमध्ये आणि रशियापर्यंत अनेक प्रदेशात झाला.

रोमन आणि अरब साम्राज्यांच्या काळात घडलेल्या आणि व्यापारामुळे भरभराटीला आलेल्या इस्तंबुल महानगराच्या वास्तुकलेत पश्चिमेकडील रोमच्या ख्रिश्चन आणि पूर्वेकडील इस्लाम संस्कृतीचा झालेला संकर आज बघायला मिळतो. हेगिया सोफिया हे बायझेंटाईन वास्तू शैलीचा प्रभाव असलेले, मोठा रोमन घुमट असलेले ख्रिश्चन धर्म प्रचाराच्या काळात बांधलेले पूर्वेकडील सर्वात मोठे, भव्य आणि कलाकृतींनी सजवलेले चर्च. ते नव्या अरब सम्राटाने पाडले नाही, तर त्याच्या भोवती उंच मिनार बांधून त्याचे मशिदीमध्ये रूपांतर केले. ते इस्लाम धर्माचे प्रार्थनास्थळ झाले. शिवाय तेथे अनेक धार्मिक स्थळे, भव्य राजवाडे, हजारो दुकाने असलेले व्यापारी केंद्र बांधले.

आधुनिक युगाची पहाट आणि महानगरे – प्राचीन काळापासून युरोपमध्ये भरभराटीला आलेल्या, ग्रीक, रोमन संस्कृतींचा आणि इस्लाम धर्माचा प्रभाव असलेल्या साम्राज्यांमध्ये मोठे बदल सुरु झाले ते पंधराव्या शतकापासून. हजार वर्षे मध्ययुगाच्या अंधारात राहिलेल्या युरोपमध्ये पुनरुत्थान चळवळ आणि आधुनिक वैज्ञानिक युगाची सुरुवात झाली. पृथ्वी गोल आहे की सपाट ह्यावर चर्च आणि शास्त्रज्ञ यांच्यात वाद झाले. पृथ्वी गोल आहे ह्या कल्पनेने दर्यावर्दी भारत शोधायला निघाले. धार्मिक युद्धांमुळे युरोप आणि आशियामधील व्यापारावर विपरीत परिणाम झाला होता. अशावेळी अरब देशांना टाळून, भारत आणि पुढे चीनपर्यंत व्यापार करण्यासाठी समुद्राचा मार्ग शोधण्यासाठी मोहिमा सुरु झाल्या. पश्चिमेकडे जाऊन भारत शोधण्याच्या प्रयत्नात कोलंबसला अमेरिका खंडाचा शोध लागला. पोर्तुगीज वास्को द गामाला भारतात येण्याचा मार्ग सापडला. जगामध्ये युरोपमधील लोकांनी व्यापारी वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. वसाहतवादाचे पर्व सुरु झाले. व्यापाराबरोबरच युरोपमधील आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार जगात सुरु झाला.

सहाशे वर्षे भरभराटीला आलेल्या ऑटोमन साम्राज्याचा विसाव्या शतकात पहिल्या महायुद्धानंतर अस्त झाला. युद्धानंतरच्या तहानुसार इस्तंबूल आजच्या टर्कीमध्ये राहिले. हेगिया सोफिया ह्या दोन धर्मीय प्रार्थनास्थळाला वस्तुसंग्रहालय म्हणून जागतिक ओळख मिळाली. 1935 मध्ये अतातुर्क केमाल पाशा ह्याच्या निधर्मी राज्य संकल्पनेच्या स्वीकारामुळे आता ती वास्तू जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामधील एक झाली आहे. मात्र 2020 मध्ये इस्लाम धर्माच्या पुनरुज्जीवनानंतर पुन्हा तिचे मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आले.

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य समाजांच्या, संस्कृतींच्या संकर प्रक्रियेला वसाहतवादामुळे जागतिक आयाम लाभले होते. ह्या काळाने नवीन प्रकारच्या आधुनिक साम्राज्यशाही व्यवस्थापनाचा उदय झाला. फ्रान्समधील पॅरिस आणि इंग्लंडमधील लंडन ह्या दोन देशांच्या महानगरांनी आधुनिक बदलांना वैचारिक स्फूर्ती देऊन जागतिक सांस्कृतिक घुसळण सुरु केली.

पॅरिस आणि लंडन – रोमन साम्राज्य लयाला जात असताना 2400 ते 2200 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये सीन नदीच्या काठावर पॅरिस आणि इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या काठावर लंडन येथे रोमन सरदार आणि नागरिक स्थायिक झाले. तेथील स्थानिक टोळ्यांना हुसकावून लावत वस्तीच्या भोवती संरक्षणासाठी तटबंदी बांधून वसाहतींची पायाभरणी केली. ती दोन्ही शहरे रोमन चर्चच्या आणि राजेशाहीच्या प्रभावाखाली पंधराशे वर्षे वाढत होती. सोळाव्या शतकात पुनरुत्थान चळवळीने पुन्हा एकदा अथेन्समधील क्लासिकल संस्कृतीच्या काळातील ऐहिक जीवनाचा विचार ऐरणीवर आणायला सुरुवात केली. त्यातून भौतिक आणि रसायन शास्त्र, गणित, खगोलशास्त्र, तत्वज्ञान ह्यांचा अभ्यास सुरु झाला. युरोपमधील पुनरुत्थान चळवळीचे केंद्र असलेले पॅरिस अडीच लाख वस्ती असलेले युरोपमधील महानगर झाले. तेथे राजा आणि चर्च ह्या दोन्हीची पकड हळूहळू सैल होत गेली. फ्रान्स आणि युरोपमध्ये राजकीय लढाया होत असल्या तरी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, साहित्य आणि कला ह्या क्षेत्रामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत होती. चर्चमधील धर्मगुरूंच्या भाकड समजुतींना आधुनिक विचारवतांनी धक्के दिले. समाजाचे लक्ष मानवी जीवन सुधारण्याकडे वळवले. गुटेनबर्गच्या छपाईयंत्रामुळे नवे विचार प्रसारित करणे साध्य झाले. नव्या तंत्रामुळे समाजात आर्थिक बदल, वित्त व्यवहारात नाविन्यपूर्ण सुधारणा होत गेल्या. बँका, कागदी चलन याद्वारे व्यवहार सुरु झाले. भांडवल जमा करून व्यापार आणि उद्योग विस्तारू लागले. त्याच वेळी वित्त घोटाळ्यांचीही सुरुवात झाली. फ्रान्सचा राजा एशोआराम आणि लढाया यामुळे कर्जबाजारी झाला होता. नव्या वित्त बाजारात त्याचे कर्ज फिटले पण अनेक सरदार त्यांची पारंपरिक संपत्ती गमावून देशोधडीला लागले.

युरोपमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन युरोपमधील लोकसंख्येचा दबाव कमी होत गेला. युरोपमध्ये एकमेकांशी लढाया करणाऱ्या देशांमधील लोक अमेरिकेत जाऊन एकमेकांशी जमवून घेऊ लागले. तेथे नवीन सांस्कृतिक समाज उदयाला आला. आफ्रिकेतील लोकांना पकडून गुलाम म्हणून अमेरिकेत नेऊन ऊस, तंबाखू, कापूस उत्पादन आणि उपभोग वाढला. व्यापारी जहाजात तांत्रिक बदल होत गेले. युरोप, अमेरिका, भारत, चीन आणि पूर्वेकडील देशांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार वाढत गेला. युरोपमधील अनेक देशांचे विचारवंत एकेमकांच्या संपर्कात येऊन विचारमंथन करत होते. त्यांचे लिखाण, संकल्पना, चर्च आणि राजेशाहीच्या विरोधातील लिखाण लोकांपर्यंत पोचत होते, नाट्यकला जोपासली जात होती. राजेशाही, सामंतशाही आणि चर्चव्यवस्थेच्या वर्चस्वाला धक्के बसायला लागले. पॅरिसमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या विचाराने अठराव्या शतकात क्रांती झाली. लंडनमध्ये त्या आधीच राजाच्या अधिकारावर पार्लमेंटने मर्यादा आणली होती. समाजाची लोकशाही आणि व्यापारी वृत्ती घडत होती. फ्रान्समध्ये सुरु झालेली चळवळ इंग्लंड आणि नंतर युरोप आणि जगातील इतर देशांमध्येही पोचली.

इंग्लंड हा औद्योगिक क्रांतीला आणि भांडवलशाहीला जन्म देणारा देश वसाहतींच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आला. तेथे यांत्रिक शेती, व्यापार, कारखानदारी उत्पादन, वाफेचे इंजिन आणि रेल्वे यामुळे औद्योगिक क्रांती अवतरली. इंग्लंडमध्ये औद्योगिक आणि व्यापारी शहरे वाढली. राजधानी असलेले लंडन अठराव्या शतकाअखेर दहा लाख लोकवस्तीचे गरिबी आणि बकाल महानगर झाले. त्या समस्यांवर प्रयत्नपूर्वक संशोधन होऊन पाणी, सांडपाणी, आरोग्य, स्वच्छता अशा नागरी सेवांचे तंत्रज्ञान विकसित झाले. एकोणिसाव्या शतकात भांडवलशाही आणि समाजवाद-साम्यवाद यांच्या विचारांचा उगम लंडनमध्ये झाला. वसाहतीच्या राज्यशासना बरोबरच लोकशाही, भांडवलशाही, समाजवाद -साम्यवाद असे सर्व वाद आणि संकल्पना जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्या. विविध प्रदेशांमध्ये त्या संकल्पनांच्या प्रभावाखाली स्वातंत्र्याच्या लोकचळवळी सुरु झाल्या. रशियामध्ये क्रांती होऊन सोव्हिएत युनियनचे साम्राज्य 1917 मध्ये उदयाला आले. पूर्व युरोपमधील अनेक देशांमध्ये साम्यवादी राजवटी आल्या. विसाव्या शतकाच्या मध्यावर युरोपमधील दुसऱ्या महायुध्दानंतर फ्रान्स आणि इंग्लंडसह युरोपमधील सर्वच वसाहतींची साम्राज्ये लयाला गेली. अमेरिका आणि सोव्हियत युनियन या अनुक्रमे भांडवलशाही आणि साम्यवादी साम्राज्यांची जागतिक स्पर्धा सुरु झाली. साम्यवादाची राजकीय राजधानी मॉस्को आणि मुक्त भांडवलशाहीची वित्त राजधानी असलेले महानगर न्यूयॉर्क. ह्या दोन जागतिक महानगरांचे नेतृत्व पर्व सुरु झाले. संपूर्णपणे विरोधी राजकीय तत्वांच्या प्रभावाखाली जगातील सर्व प्रदेशात दोन तट निर्माण झाले.

मॉस्को आणि न्यूयॉर्क – रशियाध्ये क्रांती होऊन मॉस्को साम्यवादी देशांचे नेतृत्व करू लागली. दुसऱ्या महायुध्दानंतर युरोपमधील इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स ह्या देशांचे जागतिक वर्चस्व संपुष्टात आले. युरोपच्या पूर्वेकडील अनेक देश मॉस्कोच्या राजकीय प्रभावाखाली आले. तेथेही साम्यवादी, हुकूमशाही राजवटी आल्या. तेथे देशातील शेती, व्यापार, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सर्व आर्थिक धोरणे आणि व्यवहार केंद्र शासनाच्या नियोजनाखाली आणि आदेशाने होऊ लागले. समाजातील तीव्र विरोधाभास नष्ट करून सर्वंकष समानता निर्माण करण्याचा हा एक सर्वस्वी नवा आणि भव्य साम्यवादी प्रयोग होता. काही प्रमाणात, उदाहरणार्थ, सार्वजनिक शिक्षण, आरोग्य सेवा, घरबांधणी, सामान्य नागरिकांना उपलब्ध झालेली आरामघरे, या बाबतीत साम्यवादी राजवटींना यश आले. मात्र लष्करी बळ, राजकीय सत्तेला लोकशाही आधार नसल्याने काही काळातच लोकांमध्ये असंतोष वाढला. केंद्रीय नियोजन आणि समानतेच्या अट्टाहासी वरवंट्याखाली अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. सामान्य लोकांचे जीवन खडतर आणि असुरक्षित झाले. विसाव्या शतकाच्या अखेरीस रशियामध्ये प्रतिक्रांती होऊन सोव्हिएत युनियनचे साम्राज्य लयाला गेले. मॉस्को महानगर त्या भूकंपाचे केंद्र होते. साम्यवादी प्रयोग संपुष्टात आला. तरी त्याचे बरे-वाईट धडे आणि धक्के सर्व जगाला मिळाले. त्यानंतर न्यूयॉर्क महानगर आणि अमेरिका ही जगाचे नेतृत्व करणारी एकच महासत्ता उरली. न्यूयॉर्कमधील वित्त भांडवल आणि वॉल स्ट्रीट वरील वित्त बाजार हे नव्या मुक्त भांडवलशाही जगाचे केंद्र बनले.

ह्या सर्व साम्राज्यांच्या घडामोडींमध्ये जी महानगरे जगाच्या नेतृत्वस्थानी आली, त्यांच्यामध्ये काही विशेष गुणधर्म होते. ह्या सर्व महानगरांना आधारभूत ठरणारे अनेक गरीब आणि सत्ताहीन वर्ग होते, विविध वंशाचे गुलाम होते, दलित होते. ह्या सर्व शहरांनी जगाला काही ना काही विशेष देणग्या दिल्या आहेत ज्यांच्यामुळे जगामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्या बदलांमुळे मानवी समाजाचा अनेक अंगांनी विकास झाला. त्यांचा लय होत असतानाही त्यांनी जगाला अनेक महत्त्वाचे नवीन विचार, सांस्कृतिक वारसा दिला. त्याच्यामुळे जगामध्ये नवीन ज्ञान, विज्ञान आणि कलांचा विस्तार होत होत जगाला जवळ आणले आहे. ह्या प्रत्येक शहराकडे स्वतःचे असे खास नावीन्य निर्माण करण्याची क्षमता होती. याच मुख्य गुणांमुळे साम्राज्याचे आणि जगाचे नेतृत्व करणारी महानगरे म्हणून लेखकाने त्यांची निवड केली आहे.

भविष्यातील जागतिक साम्राज्य आणि नेतृत्व कोणाकडे? भविष्यात जगाचे नेतृत्व कोणत्या देशाच्या कोणत्या शहराकडे असेल हा प्रश्न लेखकाला पडला आहे. त्यामध्ये भारतामधील मुंबई आणि चीनमधील बीजिंग यांच्यामध्ये लेखकाने भविष्यकालीन नेतृत्वाचे काही गुण-अवगुण नोंदले आहेत. आजच्या घडीला अमेरिकेच्या नेतृत्वाला शह देऊ शकणारे दोन देश म्हणजे भारत आणि चीन. ह्या दोन देशांत सध्या स्पर्धा आहे आणि त्यातून पाश्चिमात्य साम्राज्यांच्या, संस्कृतीच्या जागतिक स्थानाचे वर्चस्व संपेल असे लेखकाला वाटते. लेखकाने मुंबई आणि बीजिंग ह्या दोन महानगरांची तुलना त्यांच्या सद्यकालीन स्थिती-गतीच्या आधारे केली आहे केली आहे. खरे तर ती तुलना भारत आणि चीन अशीच आहे. त्यामधील महत्त्वाचे मुद्दे:

मुंबई: वर्तमानकाळातील मुंबई म्हणजे पराकोटीची विषमता. एकीकडे संपत्ती आणि श्रीमंतीचे अत्यंत किळसवाणे प्रदर्शन; तर दुसरीकडे सर्वत्र पसरलेली घाण आणि गरिबी. मुंबईमधील जगाच्या श्रीमंताच्या यादीमध्ये अग्रणी असलेले मुकेश अंबानींचे चोवीस मजल्यांचे आकाशात उभारलेले अत्यंत बेढब आकाराचे घर; तर दुसरीकडे केवळ सात-आठ किलोमीटर अंतरावर अक्राळविक्राळ पसरलेली जगातील सर्वात मोठी, धारावीची कुप्रसिद्ध झोपडवस्ती. अशा मुंबईला नापास शहर म्हटले जात असले तरी येथे राजकीय दृष्टीने रडत-खडत का होईना कार्यरत असलेली लोकशाही पद्धत आहे. ह्या व्यवस्थेला भ्रष्टाचार, गरिबी आणि श्रीमंतीचा तणाव आणि राजकीय गोंधळाने ग्रासलेले असले तरी विकसित देशांप्रमाणे या गोंधळाला मुक्त राजकीय वातावरण आणि उदारमतवादाची झिलई आहे. जर मुंबईमध्ये आणि भारतामध्ये लोकतंत्र पराभूत झाले, त्याच्या जागी काही वेगळी राज्यव्यवस्था आली तर मात्र जगातील सर्वच गरीब आणि विकसनशील देशांसाठी ते एक मोठे संकट ठरेल असे लेखकाला वाटते. लोकशाही भारतामधील मुंबईची खरी स्पर्धा चीनमधील बीजिंगशी आहे. बीजिंगमध्ये असलेली हुकूमशाही, एकाधिकारशाही मुंबईपेक्षा वरचढ ठरणार आहे का असा प्रश्न लेखकाने उपस्थित केला आहे. त्यामध्ये अशी हुकूमशाही नसावी अशी सुप्त इच्छा व्यक्त केली आहे.

बीजिंग: बीजिंग हे महानगर केवळ राजकीय हुकूमशाहीच्याच दृष्टीने नाही तर इतर सर्वच दृष्टीने मुंबईपेक्षा वेगळे आहे. अनेक शतके त्या शहराला चीनची राजधानी ह्या भूमिकेचे वलय आहे. बीजिंगमध्ये ऑलिम्पिकचे खेळ भरवले गेले असताना जगातील असंख्य लोकांना त्या भव्य, ऐतिहासिक आणि आधुनिक शहराचे जे दर्शन झाले ते आश्चर्यकारक होते. पक्षाच्या घरट्याच्या आकाराचे, चीनमधील वईवई ह्या कलाकाराच्या संकल्पनेतून साकारलेले भव्य स्टेडियम हे बीजिंगच्या आधुनिक विकासाचे एक महत्त्वाचे प्रतीक झाले होते. त्यानंतर आजतागायत त्या शहरामध्ये असंख्य मोठ्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या, अभिनव आकाराच्या आणि प्रकाराच्या इमारतींची संकुले उभी राहिली आहेत. किंबहुना बीजिंग शहराच्या अवकाशात पाश्चिमात्य रचनाकारांच्या संकल्पना शक्तीला आलेले उधाण तेथील वास्तुकलेमध्ये पडलेले दिसते. त्याच वेळी वईवई ह्या कलाकारावर अनेक बंधने घातली जात आहेत. बीजिंगमध्ये मुंबईमधील धारावीसारखी झोपडवस्ती दिसत नसली तरी शहराच्या परिघावर असलेल्या अनेक खेड्यांमध्ये राहणारे लोक लहान लहान घरांच्या खुराड्यात राहत आहेत. मध्यवस्तीच्या बीजिंग मधील काचेच्या उतुंग इमारती आणि परिघावरच्या गरिबांच्या वसाहती हा विरोधाभास हुकूमशाहीला नष्ट करता आलेला नाही. संध्याकाळ झाली की अशा परिघावर असलेल्या वस्त्यांमध्ये कामावरून परतणाऱ्या लोकांची गर्दी रस्त्यावर बघायला मिळते.  तेथील आसमंतामध्ये घराघरातील चुलींमधून निघणारा धूर आकाश झाकोळून टाकतो. जोडीला दुर्गंधीचेही साम्राज्य असते. अशा लाकडी घरांच्या वस्त्या अचानकच उगवतात. शासनाचे लक्ष गेल्यावर त्यावर वरवंटा फिरवला जातो, तरी त्या दुसरीकडे उभ्या राहतात. मात्र कोट्यावधी लोकांना गरिबीच्या खाईमधून चीनने बाहेर काढले आहे ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे मुक्त भांडवलशाहीचा स्वीकार चीनने केला आहे तर दुसरीकडे कठोर राजकीय साम्यवादी तत्वावर चालणारी हुकूमशाही व्यवस्था असल्याने लोकांचे आवाज दबलेले आहेत. चीनचा पाश्चिमात्य उदारमतवादी, लोकशाही राज्य व्यवस्थेवर विश्वास नाही मात्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर आहे. त्यामुळेच मुक्त पाश्चिमात्य देश आणि चीन ह्यांच्यामध्ये आर्थिक वर्चस्वासाठी स्पर्धा आहे. भारत आणि मुंबई ह्या स्पर्धेपासून दूरच आहे. येणाऱ्या काळात जग व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेपासून दूर जाऊन शक्तिमान केंद्राच्या आधीन होईल किंवा कसे ह्याचे भाकीत करणे अवघड आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही अशा कल्पना बाबिलोन, अथेन्स, अशा शहरांनी जगात प्रसूत केल्या. रोमन साम्राज्याने जगाला अनेक देणग्या दिल्या तर इस्तंबूल शहराने ख्रिश्चन आणि मुस्लिम संस्कृतींना सामावून घेण्याचा प्रयोग करून बहुसांस्कृतिक शहर म्हणून जगात ओळख मिळवली. पॅरिसने लोकशाही क्रांती तर आणि लंडन औद्योगिक क्रांती, लोकशाही राज्यव्यवस्थेची आणि उदारमतवादाचा जगात प्रसार केला. न्यूयॉर्कने मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रसार जगभर केला. जगाची वित्त राजधानी म्हणून मान मिळवला. मॉस्कोने साम्यवादी क्रांतीचा प्रयोग करून तिचा जगभर प्रसार केला. ह्या प्रत्येक साम्राज्यातील शहरांनी जगाच्या इतिहासावर मोठी छाप टाकली आहे.

ह्या सर्व साम्राज्यांच्या स्पर्धेमध्ये सध्या तरी मुंबई आणि भारत ह्यांची पिछाडी आहे. किंबहुना चीन आणि भारताला ऐतिहासिक काळापासून साम्राज्य विस्ताराची वैचारिक परंपरा नाही. चीनने मात्र आता जागतिक साम्राज्य बनवण्याच्या हेतूने आर्थिक, राजकीय आणि सामरिक बळ वाढवले आहे. त्या तुलनेत भारत चीनच्या जवळपासही फिरकू शकत नाही. एकविसाव्या शतकाच्या पहाटे भारत वेगाने आर्थिक सुधारणा करेल ही अपेक्षा जगात निर्माण झाली होती. मात्र भारताकडून जगाच्या कितीही अपेक्षा असल्या तरी प्रभाव टाकण्याची भारताची क्षमता क्षीण झाली आहे. भारताला चीनसारखे ना आर्थिक बळ आहे, ना सामरिक बळ, ना हुकूमशाहीला आवश्यक असलेले संख्या बळ. भरकटलेला राज्य कारभार किती काळ चालेल हे सांगणेही कठीण आहे. असो. त्यामुळे पाश्चिमात्य लेखकाला दिसत असलेले भारताचे जागतिक साम्राज्य फक्त मृगजळच आहे.

The Cities that Led the World: From Ancient Metropolis to Modern Megacity

Paul Strathern

Hodder and stoughton, 2022

-सुलक्षणा महाजन 9819357358 Sulakshna.mahajan@gmail.com

(छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

About Post Author

Previous articleउषा बाळ यांची सोबती समवेत आव्हानांवर मात
Next articleलोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन (Folk Arts – A Cultural Heritage)
सुलक्षणा महाजन या आर्किटेक्ट आहेत. त्या शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांचे संशोधन करतात. त्यांनी जे जे कॉलेज, येथून 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची' पदवी 1972 साली मिळवली. त्यांनी आय.आय.टी. पवई येथून इन्डरस्ट्रियल डिझाईनची पदवी मिळवली. त्यांनी अॅन ऑर्बर, मिशिगन, यूएसए येथे नगर नियोजन शास्त्राचे अध्ययन 2000 साली केले. त्या मुंबईच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’च्या मुंबई ट्रान्‍सफॉर्मेशन सपोर्ट युनियनमध्ये सल्लागार आहेत. तसेच घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स् कन्सल्टंट, ठाणे या खासगी क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये‍ आर्किटेक्ट म्हणून नोकरी करतात. त्यांनी 'हॉबिटाट' या जागतिक संस्थेाच्या सस्टे‍नेबल सिटीज प्रकल्पातर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास केला आहे. त्यांची 'जग बदललं', 'अर्थसृष्टी : भाव आणि स्वभाव', 'लंडननामा' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या 'महानगर', 'लोकसत्ता','सकाळ','आजचा सुधारक', 'साधना', 'दिव्य् मराठी' या दैनिकांत लेखन करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here