शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी (ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण प्रक्रिया) नावाच्या उपक्रमाची सुरुवात गुंजकर सरांनी लॉकडाऊनच्या आधीपासून केली होती. तो उपक्रम राबवला जातो रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी. गुंजकर सर सांगतात, माझ्या पूयना शाळेत एकूण चौसष्ट विद्यार्थी असून वर्ग 1 ते 4 आहेत. या उपक्रमासाठी प्रथम प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन, त्याचा व्हॉट्सअॅप नंबर घेऊन प्रत्येक वर्गाचा ग्रूप तयार केला. ज्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता त्या मुलांना त्यांच्या शेजारील मुलांच्या मोबाईलच्या माध्यमातून जोडले. मी चार हजारांचा एक मोबाईल घेऊन तो गावातील मुलांच्या एका ग्रूपला काही महिने दिला. अशा प्रकारे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रूपमध्ये सामावून घेतले. बऱ्याच मुलांना लिंक ओपन करणे, पीडीएफ फाईल डाउनलोड करणे, व्हिडिओ बघणे, ऑडिओ ऐकणे इत्यादी गोष्टी साधत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांत मोबाइल साक्षरता मोहीम घेतली. काही पालकांनाही त्याची माहिती नव्हती. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या बाबी कशा कराव्या याची माहिती प्रत्यक्ष मोबाईलच्या साह्याने दिली. नंतर गुगल, युट्यूबवर सर्च करून काम कसे करावे, झूम मीटिंगमध्ये कसे जॉईन व्हावे, ऑनलाईन चाचणी कशी सोडवावी, केलेला अभ्यास ग्रूपवर कसा पोस्ट करावा याबद्दलही मार्गदर्शन केले. परिणामी, विद्यार्थी व पालक, दोघेही मोबाईल साक्षर झाले. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी ही (ऑनलाईन व ऑफलाईन) शिक्षण प्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थ्यांचे गल्ली/ग्रूप तयार करण्यात आले. त्यांवर गटप्रमुख नेमण्यात आले. तो गट सकाळी आठ वाजता अभ्यासाला बसत असे. जो विद्यार्थी बसला नाही त्याला गटप्रमुख अभ्यासाला बसवत असे. तसेच, मोबाईलवरील अभ्यासाची किंवा इतर काही अडचण असल्यास ती गटप्रमुख सोडवत असे.
मुलांचे इयत्तेनुसार गट केले होते. प्रत्येक ग्रूपवर अभ्यासक्रमानुसार अभ्यास दिला जात असे. तो अभ्यास पीडीएफ फाईलच्या स्वरूपात वा अन्य फॉर्मेटमध्ये असे. दिलेला अभ्यास दुसऱ्या दिवशी गावात जाऊन, प्रत्येक मुलाच्या दारी होऊन कोविड19 च्या नियमांचे पालन करून तपासला जात असे. तसेच, काही प्रश्न, समस्या, शंका असल्यास त्या दुरुस्त केल्या जात असत.
मी सकाळी आठ ते अकरा गावात जाऊन मुलांचा अभ्यास तपासत असे. Zoom मीटिंग घेऊन अभ्यास घेत असे. त्यामध्ये पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी पाठ्यपुस्तकावरील घटकांचा जास्त समावेश असे. विशेषतः इयत्ता तिसरी व चौथी करता झूम मीटिंगचा वापर जास्त केला.
दर शनिवारी गोष्टीचा उपक्रम प्रभावीपणे राबवला. गोष्टीचे एक इयत्ता पहिली व दुसरी, तिसरी व चौथी, पाचवी व सहावी असे दोन वर्गांकरता पुस्तक येत असे. ते पुस्तक पीडीएफ, लिंक स्वरूपात असे. त्यातील गोष्टी मुलांकडून वाचन करून घेत असे. वाचन वैयक्तिक व सामूहिक स्वरूपाचे असे. त्यावर आधारित पूरक उपक्रमही असत. आम्ही ‘मिसकॉल दो कहानी सुनो’ हा उपक्रम प्रभावीपणे वापरला. तो ‘प्रथम’ या संस्थेद्वारे प्रसारित केला जात असे. त्यामध्ये एका ठरावीक नंबरवर मिस कॉल दिला, की गोष्ट ऐकवली जाते. त्या उपक्रमात माझे सर्व विद्यार्थी सहभागी होत. मुले ज्या ज्या गोष्टी ऐकत त्यांची नोंद वहीत करत. युडायस स्वाध्याय हा एक उपक्रम शासनातर्फे देण्यात येत असे. दर शनिवारी नवीन स्वाध्याय इयत्ता व विषय निहाय दिला जात असे. मी माझ्याकडील दोन मोबाईलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी या उपक्रमात जोडून Conve Genius नावाचे दोन ग्रूप तयार केले. दर शनिवारी ऑनलाईन स्वरूपात त्यांचा स्वाध्याय येत असे. तो आलेला स्वाध्याय मुले वैयक्तिक स्वरूपात सोडवत. काही अडचण आल्यास ती गटप्रमुख सोडवत असे. अडचण त्याच्या द्वारे सोडवली न गेल्यास मुले माझ्याकडे येत असत. पण असे फार कमी वेळा होत असे. त्या स्वाध्यायाचे ऑफलाईन लेखनही बऱ्याच मुलांनी केले आहे. कथा सरिता हा व्हिडिओ स्वरूपातील उपक्रम राबवला. त्यामध्ये दररोज एक नवीन कथा मुले बघतात. माझे सर्व विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहिले. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा पाठ्यक्रम वेळेत पूर्ण केला आहे. जोडी, ग्रूप, विषय मित्राच्या माध्यमातून पॅडॉगोजी इंटरवेशन प्रक्रिया राबवत आहे. अशा विविध उपक्रमांतून मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसित करण्यात आले. संभाषण कौशल्य, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी स्किल इत्यादी. त्यामुळे मुले चतुर झाली – मोबाईलमध्ये काय बघावे व काय टाळावे हे मुलांना कळले. गोष्टीचा शनिवार या उपक्रमाद्वारे मुलांमध्ये वाचन संस्कृती विकसित झाली. ऑनलाइन, ऑफलाईन चाचणी, स्वाध्याय उपक्रम यांतून मुलांची मूल्यमापन प्रक्रिया होत आहे.
मला या कार्यक्रमासाठी खूप सारे पुरस्कार मिळाले आहेत-
कोविड 19 योद्धा पुरस्कार ‘दैनिक दिव्य मराठी’तर्फे.
हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या तर्फे खासदार राजीव सातव यांच्या हस्ते एका सोहळ्यात दर्पण पुरस्कार.
जिल्हा परिषदेचा (हिंगोली) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.
पंचायत समिती (कळमनुरी) यांचा गुरू गौरव पुरस्कार 2016.
आस संघटनेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.
शिक्षण समिती (हिंगोली) तर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.
गायत्री शांती धाम (हिंगोली) तर्फे गुरू गौरव पुरस्कार, 2018.
भीमथडी शिक्षण संस्था, (दौड, पुणे) तर्फे शिक्षक रत्न पुरस्कार.
संजीवनी ट्रस्ट (पुणे) तर्फे सत्कार व एक लाख मदत.
आदर्श शिक्षक पुरस्कार (2019) महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे औरंगाबाद येथे.
सावित्रीबाई फुले समाज शिक्षक पुरस्कार 2020 (हिंगोली)
राखी बांधून दाखविला ऑनलाईन अभ्यास या हेडलाईनवर दैनिक लोकमत पेपरमध्ये बातमी.
(संकलित. गुंजकर गुरुजींशी गप्पांमधून)