जनआरोग्य योद्धा – डॉ.अनंत फडके

पुण्याचे डॉ.अनंत फडके म्हणजे एके काळच्या मागोवा गटात सहभाग असलेला, शहादा श्रमिक-संघटनेच्या चळवळीचा पाठीराखा. त्यांनी लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य चळवळ यांच्यासाठी आरोग्य व आरोग्य-सेवेसंदर्भात आमूलाग्र सुधारणा करण्याकरता शास्त्रीय भूमिका मांडली. त्यांनी 15 एप्रिल 2025 रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत पदार्पण केले.

सारे जग पैशांच्या मागे धावत असताना डॉ. फडके यांनी स्वत:ला ‘जनआरोग्य चळवळी’त झोकून दिले आहे. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला नाही. ते ज्या निष्ठेने प्रस्थापित वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींच्या  विरुद्ध ठामपणे उभे ठाकले; ते पाहिले, की ते ‘जनआरोग्य योद्धा’ म्हणण्यास खऱ्या अर्थाने पात्र ठरतात. अनंत फडके हे ऑल इंडिया ड्रग ॲक्शन नेटवर्क (AIDAN), लो कॉस्ट, मेडिको-फ्रेंड सर्कल, जनआरोग्य अभियान अशा विविध चळवळींत काम करत आहेत. त्यांनी सरकारच्या औषध धोरणातील चुका, सर्वांसाठी आरोग्य, खाजगी आरोग्यसेवेतील गंभीर दोष, प्रमाणित सेवेसाठी प्रमाणित दर, जनरिक औषधे, तमिळनाडू मॉडेल, अशास्त्रीय औषधे व अशास्त्रीय मिश्रणे, रुग्ण-डॉक्टर संबंधांतील हक्क आणि जबाबदाऱ्या, सर्वांसाठी मोफत आरोग्य सेवा प्रत्यक्षात आणणे शक्य आहे का? अशा अनेक विषयांवर जागृतीचे कार्य गेली एकावन्न वर्षे हाती घेतले आहे. ते व्याख्याने, स्लाईड शो, सेमिनार, प्रदर्शन, स्वाक्षरी मोहीम, जन सुनवाई अशा प्रत्यक्ष कार्यक्रमांप्रमाणेच विविध दैनिकांत मराठी-इंग्रजीतून लेखन करत असतात. त्यांचे चारशेपर्यंत लेख नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची प्रमुख पुस्तके म्हणजे 1995 साली ‘सेज’ या इंग्रजी प्रकाशकांचे ‘ड्रग सप्लाय अँड यूज’, 2000 सालचे ‘लोकवाङ्मय गृहा’चे ‘आरोग्याचे लोकविज्ञान’ आणि ‘मनोविकास’चे 2018 साली प्रसिद्ध ‘सर्वांसाठी आरोग्य? होय, शक्य आहे’ ही होत.

कोविडच्या साथीने सारे जग भयभीत झाले होते तेव्हा अनेक अफवा, गैरसमज पसरले होते. फेसबुक व व्हाट्सॲप अशा विद्यापीठांतून कोविड साथीची वेगवेगळी अशास्त्रीय कारणे आणि त्यावरचे घातक उपचार सांगितले जात होते. लोक ते उपचार करून घेत होते; तर दुसऱ्या  बाजूला कोविडची साथ नाहीच, लसीकरण करू नका असा अपप्रचार केला जात होता. सारा समाज शास्त्रीय माहितीच्या अभावी गोंधळून गेला होता. अनंत फडके तशा बिकट, संकटग्रस्त परिस्थितीत पुढे येऊन ठाम उभे राहिले. त्यांनी कोविडची साथ आणि लसीकरण या विषयी शास्त्रीय माहिती देणारे अनेक लेख लिहिले, मुलाखती दिल्या, वेबिनार घेतले. त्या सोबत त्यांनी त्या साथीविषयी वाटणारी भीती दूर होऊन लोकांना उपचारांबाबत जागृत करण्यासाठी ‘कोविड साथीपासून बचाव कसा करावा?’ ही महत्त्वपूर्ण पुस्तिका प्रश्न-उत्तर स्वरूपात ‘लोकविज्ञान’तर्फे प्रकाशित केली.

डॉ. फडके यांनी जनआरोग्य चळवळीत पूर्णवेळ काम 1978 सालापासून सुरू केले. त्यांनी स्वाभाविकपणेच, 1980 साली महाराष्ट्रव्यापी लोकविज्ञान संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. फडके यांनी लोकविज्ञान संघटनेने विज्ञानाच्या होणाऱ्या  दुरुपयोगाविरोधात जागृती केली पाहिजे ही भूमिका स्वीकारली. त्यांचा भर त्यांनी स्वत: ज्या विषयात शिक्षण घेतले ते वैद्यकीय क्षेत्र हे लोकाभिमुख व शास्त्रीय पायावर उभे असले पाहिजे यांवर असे. त्यामुळे त्यांनी त्या विषयावर पूर्णवेळ काम केले. त्या वेळी जी व्यापक चर्चा झाली त्यातून लोक विज्ञान चळवळीने निव्वळ धार्मिक अंधश्रद्धाविरोधी कार्यक्रम घेऊ नयेत. बुवा लोक लोकांच्या धर्मश्रद्धेचा दुरुपयोग करून त्यांचा गैरफायदा घेतात, समाजाची लूट करतात; त्याच पद्धतीने विज्ञानाच्या क्षेत्रातही बुवा तयार होत आहेत, तेही लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विज्ञानाच्या नावाखाली त्यांची फसवणूक करतात. रुग्ण त्याच्या डॉक्टरवर पूर्ण विश्वास ठेवून औषोधोपचार घेत असतो. त्याचा फायदा अनेक डॉक्टर आणि औषध कंपन्या उचलतात आणि रुग्णांची फसवणूक करतात. फडके यांनी ती बुवाबाजी उघडकीस आणली. त्यांनी अशास्त्रीय व घातक मिश्रणे असलेल्या औषधांची, टॉनिक्सची निर्मिती व वापर; तसेच, सलाईनचा विनाकारण वापर यांमुळे रूग्णांच्या खिशाला बसणारी चाट व त्यांची होणारी दिशाभूल सप्रमाण समाजासमोर आणली.

विज्ञानाच्या नावाखाली समाजाचे जे शोषण होत आहे त्यातील एक भाग म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात लिंगभेदावर आधारित संशोधन करून त्याचा स्त्रीविरोधी हत्यार म्हणून वापर. फडके यांनी ते संशोधन स्त्रीविरोधी कसे आहे हे शास्त्रीय मांडणी करून सांगितले. त्यांनी कुटुंबनियोजनाच्या साधनांचे उदाहरण दिले. आधुनिक वैद्यकीय शास्त्राकडून त्यासाठी उपायपद्धती, साधने ही पुरुषप्रधान नेणिवेतून मुख्यत: स्त्रियांसाठी शोधली जातात आणि स्त्रियांनी वापरण्याची अनेक साधने स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारी ठरतात. फडके यांनी स्त्री आरोग्यासंबंधात काही मुद्दे ठासून मांडले – स्त्री आरोग्यविषयक गैरसमज, स्त्रियांना गर्भपाताचा हक्क मिळाला पाहिजे, वंध्यत्व आणि मासिक पाळी यांबद्दल असणारे गैरसमज, मासिक पाळी अमंगळ समजल्याने स्त्रियांचा होणारा अवमान असे त्यांचे विषय असत. अनंत फडके या व्यक्तिमत्त्वाचा कॅनव्हास फार मोठा आहे – त्यांच्या कार्याची, विचारांची व्याप्ती मोठी आहे. तसेच, त्यांना सखोलता लाभली आहे हे त्यातून दिसून आले. फडके यांनी मांडलेले मुद्दे स्त्रियांना जवळचे व जिव्हाळ्याचे वाटत. फडके यांनी या विषयांवर जागृती करण्यासाठी लोकविज्ञान चळवळीच्या माध्यमातून स्लाईड- शो, पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य असे अभिनव उपक्रम महाराष्ट्रात हाती घेतले होते.

फडके यांनी वैद्यकीय व्यवसाय शास्त्रीय व नैतिक पायावर उभा राहिला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते त्यांच्या लिखाणात ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचा पाठपुरावा करत. डॉक्टर-रुग्ण हे नाते प्रेमाचे, विश्वासाचे, संवादाचे आणि जिव्हाळापूर्ण असले पाहिजे. रुग्ण म्हणजे पैसे देऊन वैद्यकीय सेवा विकत घेणारा केवळ ग्राहक नव्हे; तसे नाते डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये नसावे असा आग्रह अनंत फडके यांचा असे. त्याचबरोबर, रुग्णास जर ‘सेकंड ओपिनियन’ घेण्याची इच्छा असेल तर तो रुग्णाचा हक्क मान्य केला पाहिजे हेही ते आवर्जून सांगतात.

लोकांना विविध आजारांविषयी जे अज्ञान असते, त्यांचे जे गैरसमज असतात ते दूर होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन अनंत फडके यांनी ‘लोकविज्ञान संघटने’ची ‘आरोग्य समिती’ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी त्या समितीमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आजीचा बटवा, बाळाची काळजी, कावीळ, हर्निया, ॲनिमिया, इसब-नायटा-खरूज-कांजिण्या, सुरक्षित गरोदरपण व बाळंतपण, अतिरक्तदाब अशा आजारांच्या विषयांवर प्रत्येकी आठ-दहा पानी तीस-पस्तीस पुस्तिका प्रकाशित केल्या. त्या मागे त्यांची कल्पना होती, की प्रत्येक डॉक्टराने त्याच्या प्रतीक्षा कक्षात ती पुस्तके रुग्णांना वाचण्यासाठी ठेवावीत; जेणे करून रुग्णांना त्या त्या आजारांविषयी शास्त्रीय माहिती मिळेल व गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

हवामान व तापमान बदलामुळे जगबुडीचे जे संकट उभे राहिले आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी निसर्ग आणि मानव यांच्या समतोल विकासाची गरज मांडली आहे. त्यांनी आजची उजवी-डावी विकास नीती हे पर्याय निसर्ग व माणूस वाचवण्यास सुयोग्य नाहीत हे मांडून त्यांतील त्रुटी दाखवत समन्यायी, लोकशाहीवादी पर्यायी विकास नीती कशी असावी हे मांडणारी पुस्तिका मराठीत लिहून प्रसिद्ध केली आहे.

फडके यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्य, मराठी विज्ञान परिषदेचा व महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लेखनकार्यासाठी, मध्यप्रदेश जनस्वास्थ्य अभियानाचा विज्ञान जनस्वास्थ्यासाठी अभियानाच्या विज्ञान स्वास्थ्यासाठी असे व आणखी काही पुरस्कार मिळाले आहेत.

अनंत फडके हा प्रचंड शिस्तीचा माणूस आहे. ते सतत कार्यमग्न असतात. त्यांचा स्वभावविशेष म्हणजे सेकंदही वाया न घालवता कार्यरत राहणे. ते त्यांच्या शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक काम करण्याच्या पद्धतीमुळेच विविध विषयांवर, समस्यांवर काम करू शकले. वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा न डगमगता समाजातील सर्व तऱ्हेच्या शोषणाविरूद्ध अभ्यासपूर्ण व शांतपणे उत्तरे देत असतात. ते व्याख्याने देतात आणि आंदोलनांतही भाग घेतात. त्यांचे लिखाणही खंड पडू न देता सुरू असते.

– राजेंद्र गाडगीळ 8999809416 gadgilrd@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here