मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देऊन आणि विविध धर्मांच्या आणि जातींच्या एकशेपाच हुतात्म्यांचे बलिदान देऊन जिंकलेल्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेने ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे महाराष्ट्राचे पारंपरिक मूलतत्त्व स्वीकारून राज्याची लोककल्याणाची नीती आणि सामाजिक प्रगती साधण्याचे ठरवले. मृणाल गोरे आणि तशाच इतर काही स्वाभिमानी नेत्यांनी पेरलेल्या मराठी भाषाभिमानाच्या बीजांमधून मुंबईत मराठी भाषेच्या संवर्धनाची मोहीम जोमाने फोफावली. त्यातूनच मराठी माणसाच्या मनात ‘माझे राज्य, माझी भाषा, माझी संस्कृती’ ह्या भावनेची पाळेमुळे घट्ट पसरू लागली. तत्कालीन राजकीय नेत्यांनीदेखील त्या भावनेला प्रोत्साहन दिले...