सोहनी हे नाव किती छान आहे ! अनेक चिजांमध्ये ‘सोहनी सूरत’ असा वापर आढळतो. या नावाच्या अर्थाप्रमाणेच सोहनी ही अत्यंत ‘सुहावनी’ रागिणी आहे. रागिणी अशासाठी म्हटले, की तिचा जीव लहान आहे. मैफलीमधील तिचा वावर अल्पकाळासाठी असतो; पण प्रभाव मात्र दीर्घकाळ टिकणारा असतो. पतीच्या किंवा प्रियकराच्या वागण्याने दुखावलेली, त्रासलेली आणि त्यामुळे क्रुद्ध अशी नायिका मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा जेव्हा स्पष्टपणे नायकाला त्याच्या वर्तनाचा जाब विचारते; तेव्हा सोहनीचे सूर सापडतात. अश्विनी भिडे-देशपांडे सोहनीची तुलना द्रौपदीशी करतात...