मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरच्या आवारात लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्या गर्दीला कारणही तसे होते. थिएटरचे मालक अबुशेठ यांनी तमाशा रसिकांसाठी एक आगळावेगळा प्रयोग केला होता. थिएटरच्या आवारात एका छान सजवलेल्या राहुटीत पठ्ठे बापुराव आणि पवळाला नटूनथटून बसवले आणि त्यांना बघण्यासाठी तिकिट ठेवले ! मुंबईतील प्रेक्षकांना त्या जोडीबद्दल मोठी उत्सुकता होती. त्यामुळे लोकांनी रांगा लावून तिकिटे काढली. त्यांनी राहुटीत प्रवेश केला, की त्या दोघांना डोळे भरून बघायचे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार म्हणायचे. बापुराव आणि पवळा यांनी हलकेसे स्मित जरी केले तरी बघणाऱ्याला धन्य वाटे. कलाक्षेत्राच्या इतिहासात केवळ कलाकाराला बघण्यासाठी तिकिट लावण्याचा प्रयोग एकदाच झाला, आधुनिक तमाशासृष्टीचे जनक बापुराव आणि तमाशासृष्टीतील पहिली स्त्री कलाकार पवळाबाई यांना ते भाग्य लाभले...