वडखळचा थांबा ! ज्यांनी म्हणून मुंबईतून कोकणात किंवा अलिबागला प्रवास केला आहे, त्यांचा त्या गावाशी नक्की परिचय असेल. पेण या महत्त्वाच्या एसटी स्टँडपासून सात-आठ किलोमीटरवर असलेले ते गाव एरवी दुर्लक्षित राहिले असते, पण मुंबई-गोवा महामार्गाने त्या गावाला ओळख दिली. कोकणात जाणारी गाडी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडून पनवेल ओलांडते, पळस्प्याला लागते आणि मग जरा एका लयीत येते. वाहतूक कोंडीत गचके खाणारे प्रवासी गार हवा आल्याने सुस्तावतात, ते पेणचा स्टँड येईपर्यंत...