कुकडी प्रकल्पात बोरी गावाच्या वरील बाजूस येडगाव व त्या पाठीमागे माणिकडोह अशी दोन धरणे बांधली गेली. त्यामुळे कुकडी नदीचे पात्र कायम वाहते होते, ते कोरडे पडले. परंतु त्या उघड्या पात्राचा फायदा असा झाला, की त्यातून आदिमानवाची सत्यकथा प्रकट झाली ! ही गोष्ट 1987 सालातील. पुण्याजवळच्या परिसरात भौगोलिक सर्वेक्षण सुरू होते. विश्वास काळे यांना बोरी गावाजवळ कुकडी नदीकाठी राखेचे आगळेवेगळे थर आढळले. तसे थर नदीकाठाने तब्बल दहा किलोमीटरच्या परिसरात पसरलेले होते. पण ती राख नव्हती, तर तप्त ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर हवेत उडालेले खनिज, सिलिका अशा द्रव्यांच्या सूक्ष्मकणांचा तो थर होता. राखेसारख्या त्या कणांना भू-शास्त्रीय भाषेत ‘टेफ्रा’ म्हणतात...