विनोबांची ‘गीताई’ घराघरांत पोचली. मात्र त्याआधीही गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या मराठी भाषेत मांडले होते ते अनंततनय यांनी. त्यांचे नाव दत्तात्रेय अनंत आपटे. त्यांनी 1917 मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाची रचना केली. त्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करावे असा विचार मनात आला. त्यानुसार लोकमान्य टिळक यांच्या ‘गीतारहस्य’च्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त टिळकांच्या जन्मभूमीत विशेष चर्चासत्र होणार असल्याचे समजले. ‘झोपाळ्यावरच्या गीते’च्या पुनर्प्रकाशनासाठी तोच मुहूर्त योग्य म्हणून तो साधला गेला. सदानंद मोरे यांच्या हस्ते रत्नागिरीतील ‘गीता भवन’मध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. तो बहुमोल ठेवा शंभर वर्षांनी पुन्हा एकदा उपलब्ध करता आला याचा आनंद मोठा होता. त्यानंतर त्याचा इंग्रजी अनुवाद मसुरकर यांनी केला आणि आनंद द्विगुणित झाला...