मल्लखांब दिन 15 जून रोजी साजरा होतो. योगायोगाची बाब म्हणजे तो दिवस वैद्य म.द. करमरकर यांचा स्मृतिदिन असतो. करमरकर हे मिरजेचे. त्यांनी एक वैद्य या नात्याने महिलांना मल्लखांब शिकवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुर्वेद संशोधनाचा तो विषय बनवला. त्यांनी स्वत:च्या सहा व चार वर्षांच्या कन्यांना आणि पत्नीला त्या प्रयोगाचा भाग बनवले ! त्यांचा तो निर्णय 1944 साली धाडसाचा होता. मिरजेसारख्या निमग्रामीण भागात पत्नीला नऊवारी पातळावर व दोन मोठ्या मुलींना शर्ट-हाफपॅण्टवर धावण्याच्या सरावास सोडणे, त्यांच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवत - त्यांचा चहा बंद करून त्यांचे दूध पिण्याचे प्रमाण वाढवणे...