शिक्षा भोगत असलेला, विरहव्याकूळ यक्ष, कसेही करून त्याची खुशाली त्याच्या प्रिय पत्नीपर्यंत पोचवण्यासाठी दूत म्हणून मेघाची योजना करतो. हा मेघ ‘पुष्करावर्तकां’च्या प्रख्यात कुळात जन्मला असल्याचा उल्लेख ‘मेघदूता’च्या सहाव्या श्लोकात आला आहे. मेघांविषयी अधिक आणि महत्त्वाची; तसेच, रंजक माहिती ‘बोरवणकर- किंजवडेकर’ यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहे. मल्लिनाथाने ‘पुष्कर’ आणि ‘आवर्तक’ अशी मेघांची दोन निरनिराळी कुळे मानली आहेत...