दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले...