ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.स. खांडेकर यांच्या नावाचे प्रेक्षणीय स्मृती संग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘शिरोडा’ या गावी आहे. ते गाव वेंगुर्ला तालुक्यात समुद्रकाठी वसले आहे. गांधीजींनी केलेल्या 1930 सालच्या मार्च-एप्रिल महिन्यातील मिठाच्या सत्याग्रहानंतर, मे 1930 मध्ये त्याच धर्तीवर परंतु काहीसा वेगळा आणि काकणभर अधिक उग्र स्वरूपाचा मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता ! त्या सत्याग्रहाचे नेते ‘कोकणचे गांधी’ रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते सीताराम पुरुषोत्तम अर्थात आप्पासाहेब पटवर्धन हे होते. त्यात त्या गावच्या अनेकांना बंदिवासाची शिक्षाही भोगावी लागली होती...