गवळी-धनगर समाज कोकणात सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहत असून तो खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पाच तालुक्यांत विखुरला गेला आहे. त्यांची वाडी अतिलहान म्हणजे पाच ते दहा घरांची असते. एका वाडीवर सत्तर ते ऐंशी लोकसंख्या असते. त्या समाजाच्या एकूण सत्तर वाड्या चिपळूण तालुक्यात 1990 साली होत्या व साडेपाच हजार इतकी लोकसंख्या होती. त्यांचा मुख्य व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाची वाहतूक करणे हा होता. त्यासाठी ते बैल सांभाळत. कालांतराने, सह्याद्री पर्वतात रस्ते झाले, वाहतुकीची आधुनिक साधने आली; त्यामुळे त्या समाजाचा तो व्यवसाय नाहीसा झाला. त्यांनी दुधाचा व्यवसाय स्वीकारला...