जुन्नर हा एकमेव पर्यटन तालुका महाराष्ट्र राज्यात मानला जातो; म्हणजे तो अनेकानेक आकर्षणांनी भरलेला आहे. तो पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कडेकपाऱ्यांत वसलेला आहे. जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी. बोरी बुद्रुक हे निसर्गसंपन्न गाव जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे. तेथे अश्मयुगाच्या खुणा सापडल्यामुळे त्या गावाच्या ऐतिहासिकतेच्या खजिन्यात अपूर्व अशी भर पडली आहे. इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे पुरावशेष डेक्कन कॉलेज यांच्या पुरातत्त्वीय संशोधनातून तेथे आढळून आले...