चिपळूणचे राजन इंदुलकर ‘प्रयोगभूमी’ नावाचा आदिवासी शिक्षणाचा प्रयोग करण्यात गुंतले आहेत; त्यालाही वीस वर्षे झाली. ते चिपळूण तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात कोळकेवाडी येथे पोचले व तेथे ‘श्रमिक सहयोग’चे काम सुरू केले. संस्थेमार्फत शिक्षणापासून वंचित अशा धनगर, कातकरी आणि आदिवासी मुलांना नावीन्यपूर्ण पद्धतीचे शिक्षण देण्यावर त्यांचा भर आहे. ती मुले शिक्षणापासून वंचित होती; त्यांना प्रयोगभूमीमुळे शिक्षण सुविधा प्राप्त झाली. प्रयोगभूमी डोंगरउतारावर वसलेली आहे. संस्थेच्या सोळा एकर क्षेत्रापैकी सत्तर टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. तेथे दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने पाण्यावरील वीज वापरली जाते. उर्जा स्वावलंबनाचा विचार पसरावा म्हणून दरवर्षी ऑगस्टमध्ये तेथे ‘चला वीज बनवुया’ कार्यक्रम साजरा केला जातो...