सतीश आळेकर हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. आळेकर यांच्या रंगभूमीवरील कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2017 या वर्षीचा 'तन्वीर सन्मान' देण्यात आला. त्यांचा परिचय नाटककार, दिग्दर्शक आणि ‘थिएटर अॅकेडमी’चे संस्थापक सदस्य असा आहे. त्या सर्वांना कवेत घेईल आणि तरी वैशिष्ट्याने वर चार अंगुळे उरेल असे त्यांचे कार्य म्हणजे पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’चे प्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी. त्याचा यथोचित उल्लेख अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने ‘तन्वीर पुरस्कार’ समारंभात केला. आळेकर यांनी अभिनयही केला; किंबहुना, त्यांचा यशस्वी चरित्र अभिनेते म्हणून निर्देश ‘व्हेंटिलेटर’नंतर होऊ लागला आहे...