Home व्यक्ती वज्रलेखा सुनिता (Sunita a woman of fortitude!)

वज्रलेखा सुनिता (Sunita a woman of fortitude!)

मैत्रबन हे आमचे शेतघर. त्याला आम्ही ‘फार्महाऊस’ म्हणत नाही. ती वास्तू म्हणजे पाठीमागे गर्द झाडीचा डोंगर, शेजारी जंगल, पुढे धरण अशा वेगळ्या धाटणीची आणि व्यक्तिमत्त्वाची आहे. मित्रभाव हाच त्या वास्तूचा स्थायिभाव आहे. ‘मित्रांनी मित्रांसाठी’ असे त्या वास्तूचे बोधवाक्य आहे. आम्ही दोन एकरांच्या माळरान जागेत अनेक वृक्ष लावले आहेत. इग्लूसारखा दिसणारा एक डोम आहे, घर आहे. या आमच्या घरी सुनिता मदतीला आली आणि आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली ! आई नसलेली, लवकर लग्न झालेली, अकाली नवरा गेला अशी अनेक संकटे सोसलेली सुनिता. आदिवासी समाजातून आलेल्या सुनिताला स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तिच्या आदिवासी असण्याचा कोठलाही अडसर आला नाही. तिच्या घराचा ती कणखर सांधा झाली. तीच वज्रलेखा सुनिता ! ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.

अपर्णा महाजन

———————————————————————————————-

वज्रलेखा सुनिता

चौदा वर्षांपूर्वी, एके दिवशी, तिन्हीसांजेच्या वेळी, आमच्या कंपनीतला विजय आमच्याकडे सतीशला घेऊन आला. तरतरीत चेहेर्‍याचा, पंचविशीतला काळासावळा सतीश आणि त्याच्या पाठोपाठ उंच, शिडशिडीत, विशीच्या आतली सुनिता, दोघे पुढे येऊन उभी राहिली.

“विदुरसाहेब, आपल्या मैत्रबनमध्ये राहायला तयार आहे हा सतीश.” विजयने सांगितले. (विदुर, माझे पती)

“साहेब, माझी आत्ता हजर व्हायची तयारी आहे.” सतीश नाही म्हणू नये अशा आर्जवाने बोलला. त्याच्यामागे उभ्या असलेल्या सुनिताने तिचे डोळे वर उचलून आमच्याकडे पाहिले. त्या डोळ्यांतून, तिने सतीशच्या शब्दांपेक्षा अधिक बोलकेपणाने ‘काम द्या’ असे  सांगितले.

ती दोघे पाल्याचे, म्हणजे कामशेतजवळ आदिवासी वस्तीत राहत होती. आत्ता नोकरीसाठी बाहेर पडली होती. दोघांच्या अंगावर जीर्ण कपडे होते. सतीश कामावर जायचा, त्यामुळे जरा बरे कपडे, म्हणजे न फाटलेले. सुनिताची साडी, रंग कळणार नाही इतकी विटलेली आणि जीर्ण झालेली, आतील परकराचे पायाखालून लोंबणारे तुकडे झाकले जात नव्हते. मात्र लक्षात येण्यासारखे होते, ते तिचे चमचमणारे, बोलू शकणारे आणि लोकांचे म्हणणे टिपून घेणारे डोळे.

‘या उद्या.’ विदुर म्हणाला.

“आत्ता आलो तर चालेल?” सतीश हसऱ्या चेहेर्‍याने म्हणाला. त्याच दिवशी, ते मैत्रबनात राहू लागले. ‘मैत्रबन’च्या आवारात, गावापासून इतक्या लांब, डोंगराच्या पायथ्याशी, जंगलाच्या बाजूला राहणार म्हणून येणाऱ्या मदतनीस माणसांना राहण्यासाठी घर होतेच. विदुरने त्यांना रेशनसाठी पैसे दिले आणि सतीश-सुनिता मैत्रबनमध्ये आले.

सतीश मैत्रबनात असलेले वायरलेस फोन वापरण्यास शिकला. त्याला त्यावर ऐटीत ‘ओव्हर’ म्हटल्याशिवाय पलीकडील माणसाला निरोप कळणार नाही असे वाटे. सतीश-सुनिता यांनी केलेल्या स्वच्छतेमुळे महिनाभरात ‘मैत्रबन’चे रूप पालटले आणि परिसर एकदम ‘माणसाळला’.

आम्ही तेथील डोममध्ये राहायचो. सतीश-सुनिता राहत होते, ते घर डोमपासून लांब पडायचे म्हणून आमच्या नव्या घराबरोबर त्यांच्यासाठीपण गेटजवळ टुमदार घर बांधले. त्यात सगळ्या सोयी करून दिल्या. सुनिता मला मदत करता करता, माझ्या चवीचा स्वयंपाक करण्यास शिकली. ती शिकलेली नसली तरी बुद्धीने कुशाग्र आहे. एकदा सांगितले, की ती तिच्या पद्धतीने ते ‘डिकोड’ करून ठेवते आणि जे आणि जसे सांगितले आहे ते आणि तसे करून दाखवते. तिने आमच्या चंदा आणि सुंदर नावाच्या कुत्र्यांना आपलेसे केले. एकदा तिने तिच्यासाठी घरातली भांडी ठेवण्यासाठी फळ्या ठोकून एक मांडणी तयार केली. त्यावर कडेने नेल पॉलिशने फुलांची नक्षी काढली. धावदोऱ्याने साड्यांचे पडदे शिवले. मी तिला नारळाच्या पानांचे तोरण करायला शिकवले.

सतीश गप्पा मारण्यात पटाईत ! तो खूप स्वप्ने पाहायचा, पण त्याला स्वतःला काम करण्यात फार स्वारस्य नसे. कामाची पूर्ण जबाबदारी सुनितावर असे. काही दिवसांतच आमच्या लक्षात आले की सतीशला दारूचे व्यसन आहे. सुनिताने त्याबद्दल कधी तक्रार केली नव्हती. एकदा रात्री अवेळी तिचा फोन आला आणि म्हणाली, ‘सतीश दारू पिऊन कसापण वागतोय.’ तिच्या कमी बोलण्यामुळे आणि तक्रार न करण्याच्या स्वभावामुळे त्या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आम्ही लगेच मैत्रबनात गेलो. मी दारू पिऊन, बेभान झालेला सतीश पहिल्यांदा पाहिला. मला मोठा धक्का होता तो ! त्या मंगरूळ गावात सतीशचे मित्र त्याला घेऊन, हातभट्टीची दारू प्यायला जात. त्या दिवशी सुनिताने पहिल्यांदा ‘असं नेहमी होतं आणि मी गोठ्याच्या पत्र्यावर लपून बसते’ असे सांगितले. यानंतर, विदुरने ताबडतोब त्याला पुण्यातील ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. तो पस्तीस दिवसांनंतर बरा होऊन परत आला, त्याची दारू सुटली होती. त्याच्या बरळण्यातून कळले होते, की त्यांना, त्यांच्या लग्नाला इतकी वर्षे होऊन मूल नसण्याचे दुःख होते. सुनिता निरागसपणे म्हणाली, “मी काय करू?” आमच्या एका डॉक्टर मैत्रिणीने तिला काही गोळ्या दिल्या आणि थोड्याच दिवसांत सुनिताला दिवस गेले. अतिशय उत्साहाने त्यांचे नवीन आयुष्य सुरू झाले. सुनिताच्या दिनक्रमामध्ये गरोदरपणामुळे काहीच फरक पडला नव्हता.

एके दिवशी, आम्ही विदुरच्या सतारीच्या कार्यशाळेची तयारी करत होतो. दुसऱ्या दिवशी काय कामे करायची आहेत असा विचार करत असतानाच, सुनिताच्या पोटात कळा सुरू झाल्या आणि तिने तळेगावच्या जनरल हॉस्पिटलमध्ये अल्पावधीत गुटगुटीत मुलाला जन्म दिला. आई नाही, त्यामुळे माहेर नाही. ती मैत्रबनात आली. सतीशच्या आईने तिची काळजी घेतली आणि आठवड्याभरात ती कामाला लागलीसुद्धा. सगळी कामे, बाळाकडे लक्ष देत पुन्हा तशीच झपाझप करू लागली. काम हा तिचा सगळ्यात आवडता विरंगुळा आहे. तिच्या कामाचे कौतुक केले तर तिला आश्चर्य वाटते.

वर्ष-दोन वर्षे गेली आणि सतीशची सुटलेली दारू पुन्हा सुरू झाली. त्याची पैशांसाठी  भुणभुण सतत असे. त्याला पैशाचे गणित बसवता येत नसे. सगळी कामे सुनिता करायची आणि तो फक्त नळीने पाणी घालायचा. सुनीताला पुन्हा दिवस गेले. सतीश बेजबाबदारपणे म्हणाला, ‘पाडून टाका’; पण सानिकाचा जन्म व्हायचा होता. त्याच सुमारास सतीशला मोठा अपघात झाला. त्याची किडनी अपघात आणि व्यसन यांमुळे काम करेनाशी झाली. सुनिताने सतीशचे आजारपण, स्वतःचे बाळंतपण आणि कामाचे आव्हान सहज स्वीकारले. वर्षभर केलेल्या उपचारांना प्रतिसाद मिळेनाशा झालेल्या सतीशच्या शरीराने हार पत्करली. तो गेला !… सानिका एक वर्षाची होती.

त्यानंतर सुनितासारखी देखणी तरुण मुलगी दोन मुलांसह येथे एकटी राहणार की पाल्याला परत जाणार असा संभ्रम मनात चालू असताना, ती म्हणाली, “मी मैत्रबन सोडणार नाही.”

तिचे नवे आयुष्य सुरू झाले. आता, सासरची देखभाल, सण समारंभ, आजारपण, घरदुरुस्ती यासाठी सुनिताचे पैसे हक्काने गृहीत धरले जाऊ लागले. तिच्या सोबतीला सतीशची आई येऊन राहिली. तीसुद्धा अशीच हिकमती. कष्टाला मागे न बघणारी. त्यांचे सगळे पुरुष मात्र कर्तृत्वहीन, दारूचे व्यसन असणारे आणि तरी मिजासखोर !

सुनिताने दर दिवाळीत सगळ्यांना मनसोक्त खाऊ, खरेदी करून देण्याची प्रथा ठेवली आहे. तिने विदुरच्या मार्गदर्शनाखाली पैसे बँकेत ठेवणे, भिशी, मुलांच्या शाळा, कपडे यांचे पैशाचे नियोजन केले. तिची राहणी सुधारली. पहिली एक लाख रुपयांची ‘एफडी’ केल्यावर ती गहिवरून गेली. सतीशनंतर तिने एकदाही पैसे मागितले नाहीत. ती मुलांनी शिकावे म्हणून मी दिलेल्या फळ्यावर अंकलिपीमध्ये बघून पाढे, बाराखडी लिहिण्यास लागली. पुस्तके मुखपृष्ठावरून ओळखू लागली. माईकसिस्टिम बिनचूक लावू लागली. पान्हे, स्क्रू-ड्रायव्हर वापरून पाईप जोडण्यास शिकली.

सुनिता स्वतः निडर, निर्भय आणि खूप स्वप्नाळू आहे. तिच्यात निसर्गाच्या, प्राण्यांच्या, विचारांच्या आणि माणसांच्या प्रेमात पडण्याची क्षमता आहे. ती साप, नाग, सरडे जवळून गेले तरी त्यांच्याकडे फार लक्ष देत नाही; ते वाटेत आलेच तर सपकन काठीने मारते. पण सापांना मारायचे नाही असे सांगितल्यापासून आता ती मारत नाही. कात दिसली तर मुलांना सांगते, “सापाने कपडे बदललेत !” तिची मुले बोलणारी, मैत्री करणारी, नव्या गोष्टींचे कुतूहल असलेली आहेत. त्यांचे वेगळेपण शहरातील त्यांच्या वयाची मुले पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते.

गांडूळ खत, कंपोस्ट, गायिगुरांची देखरेख, गोठा, कोंबड्यांची अंडी, निमास्त्रसारखे सेंद्रिय कीटकनाशक तयार करून- खांद्यावर डबा घेऊन फवारणी करणे, तांदूळ पेरणे- त्यांची झोडपणी-पाखडणी-पॉलिश करून आणल्यावर तमालपत्र-कडूलिंबाची पाने घालून निगराणी करणे, घरघंटीवर पीठ दळणे ही सगळी कामे आनंद घेऊन करते. आम्ही आता ‘डोम’मध्ये ‘एयर बी अँड बी’ सुरू केले आहे. निसर्ग आवडणारे अनेक लोक तेथे येऊन राहतात. त्या लोकांचे आदरातिथ्य करणे, जेवण तयार करणे, यामुळे त्यांची ती आवडती ताई झाली आहे. माझी मुलगी नेहा आणि जावई ब्रॅडली यांच्यामुळे ती इंग्रजी शब्द शिकली आहे. आता एखादी गोष्ट तिला ‘ईझी’ वाटते. तिच्यासाठी सगळे ‘चिल’ असते.

एका बाजूला जंगल, दोन एकरांचा एकाकी परिसर, मागे डोंगर अशा निर्जन भागात तिने आजूबाजूच्या अनेक घरांशी स्नेहाचे बंध निर्माण केले आहेत. अडीअडचणीला मदत करणारी नाती निर्माण केली आहेत. ती या परिसरात अत्यंत निर्भयपणे एकटी राहण्याचे धारिष्ट्य करते तेव्हा मला सुनिता एक वज्रलेखा वाटते… कणखर, खंबीर, न डगमगता हिरीरीने सगळ्यांना सांभाळायची ताकद असणारी मृदू मनाची वज्रलेखा…

अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

——————————————————————————————

About Post Author

37 COMMENTS

  1. बाबा आमटे परिवाराच्या दीर्घ मैत्रीमुळे आदिवासी समाजाच्या मुलामुलींची मन लावुन कामं करण्याची पद्धत कामास आली.जैविक खते व जैविक कीटनाशकाच्या आमच्या उद्योगात ८० टक्के आदिवासी मुलं मुली आहेत त्यालाच लागुन आमच्या रंगवासा जैविक ग्राम केन्द्रावर पण ३-४ कुटुंब आदिवासी आहेत.ख़ूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडुन

  2. अपर्णाताई,
    एखाद्या निराधार, निरागस रोपट्याला मायेचा आधार मिळाला की ते बाळसं धरतं. आणि, आपल्या नैसर्गिक गूणांसह जोमानं वाढतं. संकटांवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यात जन्मजात असतेच. ती जागविण्याची, चेतविण्याची गरज असते. आपण ते काम नेमकेपणाने केलं. म्हणून वज्रलेखा साकार झाली. अन्यथा ती काळाच्या पडद्याआड कधीच गुडूप झाली असती. सहज आणि ओघवतं मांडलंय आपण. अभिनंदन.!
    प्रा.बी.एन.चौधरी.
    देवरुप परिवार, धरणगाव.
    ९४२३४९२५९३.

    • इतक्या आपलेपणाने लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
      आपणही एखादा छान लेख लिहा या व्यासपीठावर!

  3. सुंदर लेख👌👌
    डोळ्याच्या कडा पाणवणारा
    सुनिता सारखी मदतनीस मिळणे सुध्दा आजकलच्या काळात मुश्कील आहे. तिला तुमचा भक्कम पाठींबा मिळाला हे तिचेही भाग्यच्.
    👍🙏

    • आमचेही भाग्य!❣️
      आपल्या प्रतिक्रियेने छान वाटलं.

  4. How beautifully this article is written! काही क्षणांसाठी मैत्रबन डोळ्या समोर उभा राहिला. This article throws light upon women empowerment, struggle of a Young yet a very matured girl with her kids after the death of her husband is indeed ispiring. They article is so well crafted that it held on to me and compelled me to read it till the end.

    • निनाद
      तुझा अभिप्राय वाचला.
      खूप मनापासून छान वाटलं.
      अशा शब्दांनी लिहिण्याचा हुरूप वाढतो.
      Thank you so much!

  5. तुम्ही एका स्त्रीला सक्षम केलंत, आता ती कशी मागं हटेल? छान लिहिलं आहेस.

    • तुझा प्रतिसाद वाचून खरंच छान वाटलं.
      आम्ही निमित्त झालो.
      ती मागे हटणारी नाही!

  6. सुंदर लिखाण… ओघवती भाषाशैली..
    अप्रतिम व्यक्तीनिरिक्षण….👏👏

  7. You are blessed Aparna to have such a personality in your life who has not only reaped richness in terms of relationship but truly a woman of change. Salute to her enthusiasm and readiness to learn.

    • गीता
      तिच्यात होणारा बदल बघणे हे माझ्यासाठी किती आनंदाचे होते, हे तू समजू शकतेस!
      Thank you for your kind words ❣️

  8. लेख वाचला..या लेखातली आधीची सुनीता ताई आणि आत्ता आत्ता कुठे 3-4 वेळा मी पाहिलेली सुनीता ताई यात केव्हढंssss अंतर पार करून ती आली आहे असं वाटतं.

    ताईचा तिथला आत्मविश्वासपूर्ण वावर, कामाचा उरक, हसतमुख असणं, presence of mind, चपळता, कमीतकमी बोलणं, कल्पकता, सुग्रास जेवण आणि अजून काहीकाही बरंच असेलही.

    या लेखामुळे कादंबरीतलं एक पात्र वाटली सुनीता ताई.

  9. लेख वाचला..या लेखातली आधीची सुनीता ताई आणि आत्ता आत्ता कुठे 3-4 वेळा मी पाहिलेली सुनीता ताई यात केव्हढंssss अंतर पार करून ती आली आहे असं वाटतं.

    ताईचा तिथला आत्मविश्वासपूर्ण वावर, कामाचा उरक, हसतमुख असणं, presence of mind, चपळता, कमीतकमी बोलणं, कल्पकता, सुग्रास जेवण आणि अजून काहीकाही बरंच असेलही.

    या लेखामुळे कादंबरीतलं एक पात्र वाटली सुनीता ताई.

  10. अपर्णा खूपच आवडली तुमची ही सुनीता अणि तिला घडविणारे तुम्ही. घडणारा अणि घडवणाऱ्यांची सांगड (नाळ ) जमली कीं काहीतरी सुन्दर निर्माण होते त्याची ही प्रचिती! मैत्रबन बघण्याची इच्छा अणि उत्सुकताही वाढली आहे. फार छान सरळ सहज सुटसुटीत तिचे चित्र रेखाटले आहेस. 🙏

    • मलापण आवडेल तू मैत्रबनात आलीस तर!
      सुनिता आवडली ना!😊

  11. अपर्णा खूपच आवडली तुमची ही सुनीता अणि तिला घडविणारे तुम्ही! घडवणारा अणि घडणारा ह्यांची पूरक अशी सांगड, अणि चालून आलेल्या संधीचा योग्य वापर झाला कीं काहीतरी सुन्दर निर्माण होते ह्याची ही प्रचिती! मैत्रबन बघण्याची इच्छा अणि उत्सुकताही वाढली आहे. फार छान सरळ, सहज सुटसुटीत तिचे चित्र रेखाटले आहेस. 👌👌

  12. वाह किती सुंदर मांडणी केली आहें लेखाची.. अगदी तशीच्या तशी सुनीता ताई उभी राहिली डोळ्यासमोर.. सालस, प्रेमळ, कष्टाळू.. तुम्हा दोघांच्या संस्कारात व पाठिंब्यामुळे अगदी भक्कमपणे स्वतःचा ठसा उमटवणारी… लेख वाचताना तुम्ही नेहमी म्हणता ते वाक्य आठवत होतं “सुनीता आहें म्हणून मैत्रबन आहें “

  13. अप्रतिम लेख ताई❤️
    आणि नावही तितकेच समर्पक !

  14. खूपच प्रेरणा देणारा आहे सुनिता प्रवास . तिचे भाग्य (हो,भाग्यच ) खूप चांगले,ती तुम्हा दोघांच्या छत्र छायेखाली आली आuणि तिचे जीवन सुरक्षित झाले.आज अशा कितीतरी सुनिता केवळ योग्य आधार न मिळाल्याने परिस्थितीच्या दुष्टचक्रात अडकल्या आहेत.लेखाची मांडणी खूप छान. भाषाशैली ही नैसर्गिक आणि प्रवाही आहे. एकूण, मनाला स्पर्श करणारा लेख!

  15. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्व विषयी लेख अनेक जण लिहितात पण सुनिता सारख्या असामान्य, कर्तुत्ववान व्यक्तिरेखेला तुम्ही यानिमित्ताने जगासमोर आणून एक प्रकारचा मानवतेचा आदर्श घातला आहे. जवळपास बारा वर्षे सुनिता चा हा प्रवास मैत्र बनात येत असताना बघितला आहे.अनेक कठीण प्रसंगांना धिरोदात्तपणे सामोरे जाऊन देखील प्रत्येक वेळेला सुनिता कशी आहे? असे म्हटल्यावर ‘मी मस्त’ असे झोकात उत्तर मिळते आणि म्हणूनच वज्रलेखा सुनिता ही उपमा अगदी यथार्थ आहे असे मला वाटते.

    • कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या आजूबाजूला ही असतात.फक्त इतिहासाच्या पुस्तकात शोधण्याच्या नाहीत, असं मी विद्यार्थांना सांगत असे.
      किती छान प्रतिक्रिया लिहिली आहेस!

  16. अतिशय समर्पक शब्दात तिच्या जीवनाचा पट तुम्ही मांडला आहे तसेच तुमच्या विचारांनी तिच्या मनाने जी मशागत केली आहे ती यात प्रतिबिंबित होते मला खूपच भावला हा लेख

  17. आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर काम . सुनीता बाईचा उध्वस्त होणारा संसार आपण सावरला . अपुरा का होईना पण त्यांच्या संसार वेलीवर दोन फुल लागली . हे आपल्या मदतीमुळे शक्य झाले .

    मैत्रबंनमधील त्यांच्या हातचे जेवण अगदी चवदार आणि आजही आठवणीत राहणार झाले होते. . .

    • तुमच्या आपलेपणाच्या शब्दांनी खूप आनंद झाला.
      परत या!

  18. “प्रेमात पडण्याची क्षमता…” या लेखातला मला हा सगळ्यात आवडलेला वाक्प्रचार आहे छोटी मावशी… आजूबाजूला जे काही असेल, जसं काही असेल.. तसं त्याच्या प्रेमात पडण्याची क्षमता…
    या लेखातून ती जशी सूनिताची जाणवते.. तशीच तुझीही जाणवते..
    बोजड आणि अवघड विशेषण न वापरता केलेलं तोंड भरून कौतुक.. जाणत्या आईने केलेलं कर्तृत्ववान मुलीचं कौतुक… 😊
    Day has become even brighter after reading this 😊

  19. 👆 सुनीता विषयावर लेख खुपच छान लिहिला आहे,तिचा संपूर्ण इतिहास वाचतांना डोळ्यासमोर सर्व चित्रं उभं राहिल खुप छान.

  20. चांगल्या मुलीला चांगला जोडीदार मिळू नये ?
    किती मुलींची किती वर्षे अशी प्रचंड ताणा खाली जात असतील..

    तू खूप चांगलं केलंस तिचं. करते आहेस.

    • खरंच रे!

      तुझी प्रतिक्रिया आनंद देणारी!

  21. छान आहे लेख. साध्या सरळ भाषेत लिहिलेला. अनुभव कथन? व्यक्तिचित्रण?
    वेळोवेळी प्रसंगोचित सहजसुलभ भावना साध्या शब्दांत मांडलेल्या आहेत. आवडला मला.

  22. विविध संस्कृतींपलीकडे जाऊन, एकमेकांची प्रेमाची भाषा समजणाऱ्या मैत्रबन कुटुंबाला सलाम!

  23. मलाही आवडेल तुमच्या मैत्र बनास भेट द्यायला.. खूप छान लेख..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version