Home मोगरा फुलला स्त्री मुक्ती संघटना (Stree Mukti Sanghatana)

स्त्री मुक्ती संघटना (Stree Mukti Sanghatana)

2

स्त्री मुक्ती संघटना गेली 48 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून संघटनेने विविध स्तरातल्या स्त्रियांच्या आयुष्यात गुणात्मक फरक केला आहे. त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या पंचवीस वर्षे उपाध्यक्ष आणि संघटनेच्या 2018 पासून सेक्रेटरी असलेल्या अमोल केरकर या लेखात स्त्री मुक्ती संघटनेच्या उद्दिष्टांविषयी आणि वाटचालीविषयी विस्ताराने सांगत आहेत. संस्थेच्या 48 वर्षांच्या कामाविषयी लेख असल्यामुळे काहीसा दीर्घ आहे. मात्र संस्थेच्या वाढीसाठी केलेले विविध उपक्रम या लेखामुळे इतर संस्थांनाही मार्गदर्शक ठरतील असे आहेत.

अमोल केरकर यांना बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीत काम करण्याचाही दीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या मृदू स्वभावाच्या आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्तीचे अनुभव आणि विचार महत्त्वाचे आहेत.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सुनंदा भोसेकर

स्त्री मुक्ती संघटना

‘स्त्री मुक्ती संघटना’ हे नाव महाराष्ट्राला तसे सुपरिचित आहे. स्त्रियांच्या प्रश्नावर गेली अठ्ठेचाळीस वर्षे सातत्याने जनजागृती करणारी, त्यांना संघटित करणारी ही एक स्वयंसेवी संघटना आहे. साधारण वय वर्षे 18 ते 80 + हा कार्यकर्त्यांचा वयोगट आहे. कोणत्याही जाती-धर्माचे, आर्थिक स्तराचे बंधन न ठेवता संघटनेने आतापर्यंत शेकडो कार्यकर्ते सामावून घेतले आहेत. इतर स्त्री संघटना व मित्र संघटनांबरोबर सहकार्याचे संबंध तयार केले आहेत. परंतु ती कोणत्याही राजकीय पक्षाला जोडलेली नाही.

स्त्री मुक्ती संघटनेने 1975 सालापासून सातत्याने स्त्री मुक्तीचा, स्त्री पुरुष समानतेचा विचार निरनिराळ्या माध्यमातून समाजाच्या सर्व विभागांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रश्नांवर चर्चा केल्या. स्त्रियांच्या प्रश्नांवर जनजागृती मोहिमा घेतल्या. अनेक आंदोलने केली. विविध उपक्रम राबवले. स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर संघटनांबरोबर एकजुटीच्या महाराष्ट्रव्यापी किंवा देशव्यापी मोहिमांमध्ये भागीदारी केली. स्त्रियांचे प्रश्न इतर कष्टकरी विभागांच्या आंदोलनांबरोबर जोडून घेतले. स्त्रियांच्या प्रश्नांवर जाणीवपूर्वक पुरुषांना सहभागी करून घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर  विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना स्वतः पुढाकार घेऊन असे उपक्रम मुंबईत राबवले. हे सगळे काम करत असताना अनेक लेख लिहिले. काही विषयांवर पुस्तिका लिहिल्या. पुस्तके प्रकाशित केली. अडतीस वर्षे स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेले ‘प्रेरक ललकारी’ हे संघटनेचे मुखपत्र चालवले. हे सर्व काम, त्यामागचा विचार व भूमिका या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न आहे.

पार्श्वभूमी

दुसरे महायुद्ध संपता संपता अनेक देशांमध्ये स्वातंत्र्यलढे सुरू होते. त्यानंतर दोन वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळाले. चीनमध्ये क्रांती 1949 मध्ये  झाली. साठच्या दशकात आफ्रिकी देशांत स्वातंत्र्यलढे सुरू होते. एकवीस वर्षाच्या घमासान युद्धानंतर व्हिएतनामसारख्या छोट्याशा कृषीप्रधान देशाने महाबालाढ्य अमेरिकेचा निर्णायक पराभव केला. या सर्व स्वातंत्र्ययुद्धांमध्ये – मग ती भारतातल्याप्रमाणे अहिंसक पद्धतीने लढली गेली असोत की सशस्त्र- त्या सर्वांमध्ये स्त्रियांचा पुरुषांच्या बरोबरीने सहभाग होता. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाने 1975 साल स्त्री वर्ष म्हणून घोषित केले.

त्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पुण्यामध्ये स्त्रियांची एक ‘स्त्री मुक्ती संघर्ष परिषद’ झाली. त्या परिषदेला जाऊन आल्यानंतर मुंबईतील काही जणींनी स्त्री संघटना स्थापन करण्याचे ठरवले. नाव अर्थातच ‘स्त्री मुक्ती संघटना’ असे ठरले.

त्या काळात स्त्रीमुक्ती हा टिंगल-टवाळीचा विषय होता. जमले तर या कल्पनेला विरोध करायचा, नाही तर त्यावर विनोद करायचा, तेही नाही जमले तर विपर्यास करायचा. हे पाश्चिमात्य फॅड आहे म्हणून त्याची बोळवण करायची. अशा वातावरणात आम्ही प्रथम अभ्यास करून आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते निश्चित करण्याचे ठरवले. त्यासाठी काही पुस्तकांचे वाचन व चर्चा केल्या. सुरुवातीला वीस- पंचवीस जणींचा एक छोटा गट होता. दोन-तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर 1978 साली संघटनेचा जाहीरनामा तयार केला गेला.

स्त्री मुक्ती संघटनेचा जाहीरनामा

भारतीय घटनेने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दिलेले समान हक्क व समान दर्जा प्रत्यक्षात उतरलेले नाहीत. त्यामुळे स्त्रियांची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व मानसिक दडपणुकीपासून मुक्तता करण्यासाठी स्त्री मुक्ती संघटनेची गरज निर्माण झाली आहे. लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी नष्ट होणे ही समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होण्यासाठी पूर्वअट आहे. संपूर्ण समाजाच्या मुक्तीच्या क्रमातच स्त्रीमुक्ती साकार होणार आहे.

स्त्री मुक्ती व्यक्तिगत पातळीवर होणे शक्य नाही. त्यामुळे स्वतःशी वैचारिक संघर्ष, स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातील संघर्ष व सामुदायिक संघर्ष या तीनही पातळीवर संघर्ष करण्यासाठी संघटित व सामुदायिक चळवळी सुरू करणे आवश्यक आहे. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी जेथे जेथे प्रयत्न चालू असतील तिथे आपण सहकार्य करायला हवे.

स्त्रियांच्या प्रश्नांचा सैद्धांतिक अभ्यास, त्यांना स्वतःच्या हक्काबद्दल जागृत करणे व संघटित करणे ही संघटनेपुढची महत्त्वाची कामे आहेत. स्त्रियांच्या सर्वसामान्य प्रश्नासंबंधीचा स्त्रीमुक्ती संघटनेचा दृष्टिकोन व्यापक व सर्वंकष आहे. सर्व गटातील व थरातील स्त्रियांची एकजुटीची चळवळ निर्माण करणे व ती पक्षनिरपेक्ष पद्धतीने व्यापक समुदायांच्या चळवळीशी जोडण्याचे प्रयत्न संघटना करेल. एकूण सामाजिक रचना व तद्जन्य पुरुषी अरेरावी वृत्ती व मानसिक गुलामगिरी हे स्त्रीमुक्तीच्या मार्गातील खरे अडथळे आहेत. स्त्री मुक्ती हा फक्त भारतीय स्त्रियांचा प्रश्न नसून आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्यामुळे संघटना या चळवळींपासून प्रेरणा घेणे, विचारांची देवाण-घेवाण करणे, त्या चळवळींना पाठिंबा देणे इत्यादी गोष्टी करेल. वरील विचारधारा मानणारी कोणतीही व्यक्ती संघटनेची सभासद होऊ शकेल.

एकजुटीची आंदोलने

निरनिराळ्या स्त्री संघटनांनी एकत्र येऊन पुण्यामध्ये ‘स्त्री मुक्ती संपर्क समिती’ची स्थापना 1978 साली केली. स्त्री संघटनांच्या या व्यासपीठाने एकजुटीच्या सर्व प्रयत्नांना, मोहिमांना, आंदोलनांना बळ दिले. ‘बायजा’ हे स्त्री चळवळीचे पहिले मराठी मासिक पुण्यातून सुरू झाले.

यानंतरच्या काळात स्त्रियांच्या चळवळीने एकत्र येऊन जी आंदोलने केली त्यातून आवश्यक ते कायदेबदल करण्यास सरकारला भाग पाडले. मथुरा नावाच्या आदिवासी मुलीवर पोलीस कस्टडीत बलात्कार झाला. आरोपी कोर्टात सुटल्यामुळे स्त्री संघटनांनी बलात्कार-विरोधी मोहीम सुरू केली. या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. सरकारवर दबाव आणला. यामुळे कायद्यात बदल होऊन बलात्कार केला नाही हे शाबित करण्याची जबाबदारी बलात्कार करणाऱ्यावर जाऊन पडली. शिवाय हे खटले बंद खोलीत (इन कॅमेरा) चालवणे आवश्यक झाले.

पुण्यात मंजुश्री सारडाचा संशयास्पद मृत्यू 1984 मध्ये झाला. तिचा संशयित नवरा या खटल्यात  निर्दोष सुटला. यानंतर स्त्री संघटनांनी घराच्या आत, कुटुंबात होणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचारांवर समाजाचे लक्ष वेधले. हुंडा विरोधी मोहीम संघटित केली. सभा, मोर्चे, लेख, पुस्तके, नाटके, गाणी अशा सर्व माध्यमातून जनजागृती केली. ‘हुंडा देणार नाही, घेणार नाही’ अशा शपथांचे कार्यक्रम कॉलेजेसमध्ये घेऊन तरुण मुला-मुलींना या आंदोलनात सामील करून घेतले. हुंडा घेणे हा यानंतर कायद्याने गुन्हा झाला.

राजस्थानात भंवरी देवी या सरकारी स्वयंसेविका असणाऱ्या साथिनवर तिने बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर गावातील धनदांडग्यांनी दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार केला. हे सर्वजण कोर्टात निर्दोष सुटल्यानंतर ‘विशाखा’ या संघटनेने सुप्रीम कोर्टात केस दाखल केली. सुजाता मनोहर या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपल्या अतिमहत्त्वाच्या निकालात “कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे” जाहीर केली. त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्त्री संघटनांनी अथक प्रयत्न केले. या मार्गदर्शक सूत्रांवर आधारित कायदा 2013 साली अंमलात आला.

‘न्याय मिळण्यास विलंब झाला तर तो न्याय नव्हे’ याचा अनुभव भारतीय जनतेस आहे. स्त्रियांना तर त्यांच्या सामाजिक स्थानामुळे न्यायापासून नेहमीच वंचित ठेवले जाते. त्यामुळे स्त्री संघटनांनी कौटुंबिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वतंत्र कोर्टाची मागणी केली. काही वर्षांच्या मोहिमांनंतर ती मान्य होऊन कौटुंबिक न्यायालयांची स्थापना झाली.

या सर्व आंदोलनांमध्ये स्त्री मुक्ती संघटना एक महत्त्वाचा व अविभाज्य घटक होती.

कलापथक

समाजातील सर्व थरातील व वयोगटातील सुशिक्षित किंवा अशिक्षित स्त्रियांपर्यंत पोचण्याचे कलापथक हे एक प्रभावी माध्यम आहे. निरनिराळ्या जनचळवळींनी त्याचा उपयोग अतिशय प्रभावीपणे केला आहे. महाराष्ट्राला अशी एक थोर शाहिरी परंपरा आहे. तिचा वारसा पुढे चालवत आम्ही स्त्री मुक्तीचा विचार समाजातील तळागाळातील वंचित घटकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. या गाण्यांमधून स्त्रियांच्या समस्या, त्या विरुद्ध पुकारलेला संघर्ष, त्यासाठी उगारलेले एकजुटीचे हत्यार आणि भविष्यासाठीची स्वप्ने आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवली. आमचे कार्यक्रम शहरातील महिला मंडळे, कामगार मेळावे, खेडेगावातील शेतमजूर परिषदा, देवदासी परिषद, महाविद्यालये, आस्थापने इत्यादी ठिकाणी होत असत. नेमके शब्द, सोप्या चाली, नेटका विचार आणि मनाला उभारी देणारा संदेश यामुळे ही गाणी महाराष्ट्रातील जनचळवळींची वाहक बनली. आम्ही या गाण्यांच्या अतिशय स्वस्त पुस्तिका कार्यक्रम झाल्यानंतर विकत असू. अशा हजारो पुस्तिका गावागावातील स्त्रियांनी विकत घेऊन व त्यावर आधारित कलापथकांचे कार्यक्रम करून चळवळीशी बांधिलकी व्यक्त केली आहे. गेली 48 वर्षे अव्याहतपणे कलापथकाचे कार्यक्रम सुरू आहेत. हा एक विक्रमच म्हणावा लागेल.

पोस्टर्स प्रदर्शन

एखादा विषय किंवा विचार सूत्ररूपाने लोकांसमोर मांडण्यासाठी पोस्टर्सच्या माध्यमाचा आम्ही उपयोग केला. स्त्रीला निसर्गाने पुरुषापेक्षा हिणकस बनवले नसून इतिहासाच्या क्रमात तिला पुरुषाच्या तुलनेत दुय्यमत्व प्राप्त झाले. या विषयावर चित्रे, फोटो व त्यावर थोडक्यात भाष्य करत हा गहन विषय लोकांपर्यंत नेला. नंतरच्या काळात ज्या अनेक मोहिमा आम्ही हाती घेतल्या त्या  सर्व विषयांवर पोस्टर्स तयार केली. उदाहरणार्थ, हुंडा: एक विघातक रूढी, छेडछाड इत्यादी.आमच्या कला पथकाच्या कार्यक्रमाच्या आधी पोस्टर्स प्रदर्शन लावून कलापथकाच्या मांडणीला जोड दिली.

दृकश्राव्य माध्यमे

आम्ही दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग सुरू केला. आम्ही स्त्रियांना ‘आस्था’ या संस्थेने तयार केलेल्या ‘कहाणी नहाणाची’ आणि ‘कहाणी नऊ महिन्याची’ या स्लाईड शोच्या मदतीने त्यांच्या शरीराविषयी शास्त्रीय माहिती दिली. स्त्रीच्या शरीराभोवती व मासिक पाळीभोवती असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी मुख्यतः कॉलेजच्या मुली, तरुण मुली हा आमचा प्रेक्षक वर्ग होता. त्यानंतर आम्ही स्वतःच संघटनेच्या गाण्यांच्या व नाटकांच्या ध्वनिफिती (ऑडिओ कॅसेट) व चित्रफिती (व्हिडिओ कॅसेट) तयार केल्या. प्रत्यक्षात जिथे पोचता येत नाही तिथे आमचा विचार या प्रचार साहित्याच्या मदतीने पोचला.

पथनाट्ये

कलापथकात ‘मुलगी झाली हो’ या आमच्या मुक्तनाट्याची भर 1983 मध्ये पडली. ज्योती म्हापसेकर लिखित आणि विनोद हडप दिग्दर्शित या मुक्तनाट्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले. जुन्या लोकगीतांच्या चाली घेऊन त्यांना नवा आशय देऊन सादर करण्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची ताकद कित्येक पटींनी वाढली. संघटनेकडे कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला. यात मुख्यतः तरुण मुलींचा आणि विद्यार्थिनींचा भरणा असला तरी प्रौढ वयातल्या गृहिणी, निवृत्त शिक्षिका, कर्मचारीही होत्या. तसेच पुरुष कार्यकर्तेही होते. ‘मुलगी झाली हो’ चे एकापेक्षा अधिक संच करून आम्ही एकाच वेळी जास्त प्रयोग करू लागलो. या काळात संघटनेने सळसळत्या चैतन्याचा अनुभव घेतला. लोक एखादा विचार उचलून धरतात म्हणजे काय होते ते त्याचे प्रात्यक्षिकच होते. या नाटकाचे संघटनेने आतापर्यंत पाच हजार प्रयोग केले आहेत. शिवाय इतर संघटनांनी किंवा संचांनीही त्याचे शेकडो प्रयोग केले आहेत. या पथनाट्याच्या  ‘बेटी आई है’ या हिंदी रूपांतराचे संघटनेने शेकडो प्रयोग केले आहेत. त्याचे इंग्रजी सकट आठ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ऑस्ट्रेलिया व चीन या दोन देशात या मुक्त नाट्याचे प्रयोग झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाने चळवळीतील अपपर ही भावना संपवली. ‘मुलगी’ फक्त स्त्रीमुक्ती संघटनेची न राहता सर्वांची झाली. वर्ग जातीभेदाच्या पलीकडे जाऊन तिचा सर्वत्र संचार सुरू झाला. आजही ‘मुलगी’चे प्रयोग लोक तितक्याच तन्मयतेने पाहतात आणि तितकाच जोरदार प्रतिसाद आजही या प्रयोगाला मिळतो.

आम्ही ज्योती म्हापसेकर लिखित व विनोद हडप दिग्दर्शित ‘हुंडा नको ग बाई’ या नाटकाचे प्रयोग 1986 साली सुरू केले. अर्थपूर्ण गाणी, खटकेदार संवाद आणि उपरोधाचा सूर यामुळे हे नाटक लवकरच लोकप्रिय झाले. हुंडा विरोधी चळवळीत या नाटकाने जनजागृतीची महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यानंतर ज्योती म्हापसेकर लिखित, विनोद हडप दिग्दर्शित ‘बाप रे बाप’ हे प्रहसन साहित्य संघ मंदिराच्या कलाकारांनी 1994 साली केले. या नाटकात नवऱ्याला गर्भवती होण्याचा शाप देऊन ‘स्वानुभावावर आधारित शहाणपणा’ पुरुषांना यावा व त्यांनी स्त्रियांवर नको असलेली बाळंतपणे लादू नये अशी विनोदी अंगाने केलेली मांडणी होती.

‘कशासाठी पोटासाठी’ हे बालमजुरांच्या प्रश्नावर आधारित नाटक ज्योतीने 1998 साली लिहिले. तसेच ‘कथा ही रेशनच्या गोंधळाची’ या ज्योतीने लिहिलेल्या पथनाट्याचे कोरो या संघटनेने 40 प्रयोग केले.

एकोणिसाव्या व वीसाव्या शतकात स्त्रियांची सामाजिक, राजकीय परिस्थिती सुधारावी म्हणून जगभर ज्या ज्या स्त्रियांनी प्रयत्न केले त्याचा गोषवारा घेणारे ज्योती म्हापसेकर लिखित व सुषमा देशपांडे दिग्दर्शित ‘समतेकडे वाटचाल’ या नाटकाचे प्रयोग सुरू झाले.

स्त्री पुरुष समानता यात्रा
आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमध्ये ग्रंथालीच्या ग्रंथ यात्रेच्या धर्तीवर स्त्री मुक्ती यात्रा काढण्याचे जानेवारी 1985 मध्ये ठरवले. पश्चिम महाराष्ट्रात तेव्हा निरनिराळ्या क्षेत्रातील कामगार संघटना, शेतमजूर संघटना, कर्मचारी संघटना, डाव्या विचारसरणीच्या निरनिराळ्या समाज विभागात काम करणाऱ्या संघटना यांचे प्राबल्य होते. त्यांच्या सहकार्याने स्त्रीमुक्तीचा विचार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जाऊन मांडण्याचा हा कार्यक्रम होता. या दौऱ्यामुळे विचाराच्या प्रचाराबरोबरच स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष अनुभवातून मोठे शिक्षण होईल असाही एक हेतू होता. तसेच ज्या ठिकाणी समविचारी लोक असंघटित असतील त्यांनाही या वातावरण ढवळून काढणाऱ्या प्रयत्नातून संघटित होण्याची ताकद मिळेल असाही होरा होता. या पहिल्या यात्रेत संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच अनेक समविचारी कार्यकर्तेही सामील झाले होते.

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व जिल्ह्यातील आणखी एका मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी कार्यक्रम आखलेले होते. मुंबईहून जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यासाठी दोन गट करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी कॉलेजमध्ये सकाळी विद्यार्थी विद्यार्थिनी मेळावे, दुपारी महिला मेळावे, संध्याकाळी सर्व नागरिकांसाठी स्त्री विषयक प्रश्नांवर परिसंवाद व रात्री कलापथकाचा कार्यक्रम होत असे. याशिवाय दिवसभर पोस्टर्स प्रदर्शने, स्लाईड शोज, पुस्तक प्रदर्शने अशा सर्व साधनांनिशी जोरदार प्रचार होत असे. यात मोठ्या प्रमाणात विचारांची देवाण-घेवाण होत होती. वर्तमानपत्रांमध्ये यानिमित्ताने होणाऱ्या चर्चांमुळेही वातावरण निर्मितीत भर पडत होती.

पश्चिम महाराष्ट्राच्या यात्रेत कलापथकामध्ये ‘मुलगी झाली हो’ बरोबरीने संजीवनी खेर लिखित ‘ज्वालाशिखा पंडिता रमाबाई’ हे पंडिता रमाबाईंच्या जीवनावरील स्त्री मुक्ती संघटनेचे नाटक समाविष्ट होते. तसेच ‘स्त्री एके स्त्री’ हे प्रशांत दळवी लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक औरंगाबादमधील जिगीषा ग्रूपच्या तरुण कलाकारांसह सामील झाले होते.

याच धर्तीवर 1986 साली विदर्भ, 1987 मध्ये कोकण व 1988 मध्ये मराठवाडा विभागात स्त्री-पुरुष समानता यात्रा संघटित केल्या. या यात्रांमध्ये संघटनेचे ‘हुंडा नको ग बाई’ हे नाटक कलापथकाचा भाग झाले. उत्तर महाराष्ट्राची यात्रा मात्र बऱ्याच उशीरा, 2000 साली काढली. या यात्रांमध्ये प्रत्येक विभागाचे म्हणून जरी वैविध्य असले तरीही पहिल्याच यात्रेचा धागा धरून पुढचे दौरे झाले. याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, मसूरी इत्यादी ठिकाणीही असेच दौरे त्या काळात काढले.

या दौऱ्यांमुळे संघटनेच्या कामाची भौगोलिक व्याप्ती तर वाढलीच पण महाराष्ट्रातील इतर स्त्री संघटनांबरोबर तसेच इतर कष्टकऱ्यांच्या संघटनांबरोबर मैत्रीचे संबंध तयार झाले. या सर्व दौऱ्यांचा अनुभव उत्साहवर्धक होता. प्रत्येक ठिकाणी लोक, विशेषतः तरुण विद्यार्थिनी व स्त्रिया उत्सुकतेने सर्व समजावून घेऊन त्यानुसार पुढे बदलायचे अशा तयारीनेच येत असे वाटत होते. परंतु एक- दोन ठिकाणी काही कॉलेजच्या प्राध्यापकांनीच विद्यार्थ्यांना चुकीची माहिती दिल्याचा अनुभव आला. स्त्रिया संघटित होऊन वेगळा विचार करत आहेत ही बाब त्यांना धास्तावणारीच होती. आम्हीही शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.

प्रेरक ललकारी
संघटनेने स्वतःचे मुखपत्र काढण्याचा निर्णय 1986 साली घेतला. निमित्त होते विदर्भ दौऱ्याचे. दौरा संघटित करण्यासाठी व नंतर सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी त्याचा उपयोग झाला. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना सप्टेंबर 1986 पासून आजतगायत एकही अंक न चुकवता ‘प्रेरक ललकारी’ प्रकाशित होत आहे. या अंकाचे अडीच हजार वर्गणीदार आहेत. निरनिराळ्या दौऱ्यांच्या निमित्ताने हा अंक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावोगावी पोचला आहे. अनेक शैक्षणिक संस्था, वाचनालये ललकारीचे वर्गणीदार आहेत.

संघटनेतील उपक्रमांची माहिती ललकारीमध्ये नियमितपणे दिली जाते. त्यामुळे निरनिराळ्या उपक्रमांमध्ये काम करणारे कार्यकर्ते या उपक्रमांशी व इतर कार्यकर्त्यांशी जोडले जातात. तसेच स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व जागतिक घडामोडींबद्दल लिखाण वाचायला मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची वैचारिक तयारी होण्यास मदत होते. कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक अभिसरण होत राहते.

प्रेरक ललकारीचे संपादकीय हे संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे दस्तावेज आहेत.त्यात स्त्रियांच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निगडित असणाऱ्या बहुतेक सर्व प्रश्नांवर तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केलेले असते. वेळोवेळी संघटनेची भूमिका नि:संधिग्धपणे विशद केलेली असते.यातील काही निवडक लेखांचे ‘ललकार’ हे पुस्तक संघटनेने प्रसिद्ध केले आहे.

निरनिराळ्या विषयांवर एक किंवा काही वर्षे चालणारी सदरे हे ललकारीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. इतिहासाचे पान, शिल्पकार, जावे शोधांच्या गावा, देशोदेशी, जगातून फेरफटका, व्यसनमुक्ती, विज्ञान व शोध, लोकशाही, प्रौढ साक्षरता, रेशनचा प्रश्न, कचरा वेचकांचे प्रश्न, समस्या निवारण केंद्रातील समस्यांचा उहापोह, स्त्रियांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे, सरपंच स्त्रियांचे अनुभव अशा अनेक विषयांवर सदरे लिहिली गेली.

महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्यात ललकारीचा वार्षिक विशेषांक प्रकाशित होतो. हा मार्च-एप्रिल महिन्यांचा जोड-अंक शंभर पानांचा असतो. आतापर्यंत विज्ञान, साहित्य, सामाजिक भान, वृद्धांचे प्रश्न, पर्यावरण,भारताचे संविधान, इतर भाषेतील उत्तम साहित्याचा अनुवाद, आरोग्य, भूराजकीय बदल, नास्तिकतावाद अशा अनेकानेक विषयांवर संग्रही ठेवण्यासारखे विशेषांक प्रकाशित झाले आहेत.

पुस्तक प्रकाशन

‘स्त्रीविमुक्ती, आपले शरीर-आपले मन’, ‘स्त्री मुक्ती: विचार, भूमिका, मागण्या’, ‘कुटुंब संस्था’, ‘स्त्रीमुक्ती आणि विज्ञान’, ‘दलित प्रश्न’, ‘हुंडा: एक विघातक रूढी’,’हुंडा नको ग बाई’, ‘समस्या सोडविताना’, ‘जिज्ञासा’, ‘कचरा नव्हे संपत्ती’, ‘विनी मांडेलांचे आत्मचरित्र’, ‘आरसा एक मनाचा’, ‘प्रबोधकथा’ अशी अनेक पुस्तके व पुस्तिका वेळोवेळी संघटनेने प्रकाशित केल्या. कलापथकाच्या गाण्यांच्या पुस्तिकांच्या आत्तापर्यंत लाखभर प्रति छापल्या आहेत.

समस्या निवारण केंद्र

कलापथकाच्या कार्यक्रमांमुळे आमचा जनसंपर्क बराच वाढला. कार्यक्रमानंतर कौटुंबिक समस्येवर मदत मिळण्याच्या अपेक्षेने काहीजणी आम्हाला भेटायला येत. ही गरज लक्षात घेऊन आम्ही 1985 मध्ये दादरच्या ‘श्रमिक’ ऑफिसवर दर शनिवारी 4 ते 6 या वेळात समस्या निवारण केंद्र सुरू केले. हळूहळू आठवड्यातून तीन वेळा हे केंद्र चालवण्याची गरज पडू लागली.

हे केंद्र आम्ही स्वयंसेवी पद्धतीने चालवत होतो. परंतु समाजाची गरज लक्षात घेता सरकारने यासाठी जागा व निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही सरकारकडे केली. इतर स्त्री संघटनाही यात सहभागी होत्या. 1989 मध्ये ही मागणी मान्य झाली व संघटनेला दोन केंद्रे चालवण्याची परवानगी मिळाली. या केंद्रांमध्ये एम एस डब्ल्यू झालेले प्रशिक्षित समुपदेशक असले पाहिजेत ही अट सरकारकडून घालण्यात आली होती.

याशिवाय संघटनेने फॅमिली ट्रस्ट, कंपन्या,फाउंडेशन या माध्यमातून निधी उभा करून अनेक ठिकाणी पूर्ण वेळ समस्या निवारण केंद्रे उभी केली. सध्या चेंबूर, विक्रोळी, परळ,भायखळा, वडाळा, वाशी, कोपरखैरणे, पुणे,बुलढाणा, धाराशिव, कोल्हापूर या ठिकाणी संघटनेची कौटुंबिक सल्ला केंद्रे चालू आहेत. केंद्रांमध्ये वैयक्तिक व कौटुंबिक समुपदेशन केले जाते.पण काही वेळा गरज पडल्यास वस्तीमध्ये जाऊन सामाजिक हस्तक्षेपाचे दबाव तंत्र वापरले जाते. पीडित स्त्रीला गरज असल्यास तिच्या तात्पुरत्या निवासाची सोय केली जाते.तिच्या मुलांची तात्पुरती सोय,शाळेतील प्रवेश इत्यादी बाबतीत तिला मदत केली जाते. शक्य असल्यास तिला आर्थिक स्वावलंबनासाठी कौशल्य प्रशिक्षण किंवा सक्षमीकरण प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तिला रोजगाराची संधी मिळू शकते. स्त्रीधन परत मिळवण्यास मदत केली जाते. कायदेशीर मदतही दिली जाते. मुख्यतः समुपदेशनातून तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा असे प्रयत्न केले जातात.

या केंद्रांमध्ये संघटनेचे स्वयंसेवक ही मदत करतात. शिवाय आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये संपर्क करून काही स्त्रियांना वस्ती पातळीवरील समुपदेशक म्हणून प्रशिक्षण दिले जाते. या स्त्रिया त्याच वस्तीत राहत असल्यामुळे अनेक समस्याग्रस्त स्त्रियांना केंद्रामध्ये घेऊन येतात.

25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर हा पंधरवडा जगभरात हिंसाचार विरोधी पंधरवडा मानला जातो. बऱ्याच स्त्री संघटना या पंधरवड्यात एकत्र येऊन कार्यक्रम करतात व हिंसाविरोधी वातावरण निर्मिती करतात. वर्षभर निरनिराळ्या जाणीव जागृती कार्यशाळांचे आयोजन केले जाते. स्त्रियांवरील हिंसेविरोधात होणाऱ्या परिषदा, चर्चासत्रे यामध्ये कार्यकर्त्या सहभागी होतात. स्त्रीमुक्ती संघटनेच्या पुढाकाराने इतर संघटनांबरोबर एक वर्षाआड महाराष्ट्रव्यापी हिंसामुक्ती परिषद डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाते. राष्ट्रव्यापी पातळीवर स्त्री संघटनांच्या नेटवर्कमध्येही स्त्री मुक्ती संघटना सहभागी होते.

स्त्री मुक्ती संघटनेची ‘सेवा पुरवठादार संस्था’ म्हणून सरकारकडे नोंदणी झाली आहे. निरनिराळ्या कायद्याखाली गरज असेल त्याप्रमाणे संघटनेचे कार्यकर्ते ही कामे पार पाडतात. ‘कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, 2013’ या कायद्याखाली निरनिराळ्या आस्थापनांमध्ये असलेल्या कमिटीमध्ये स्वयंसेवी संस्थांचा सदस्य असण्याची तरतूद आहे. अशा अनेक आस्थापनातील कमिट्यांवर स्त्री समस्या निवारण केंद्रातील कार्यकर्त्या सदस्य म्हणून काम करतात.

गेल्या 40 वर्षात 40000 पेक्षा जास्त स्त्रियांनी या समस्या निवारण केंद्रांची मदत घेतली आहे. बहुतेक सर्व स्त्रिया निम्न किंवा गरीब थरातल्या आहेत. क्वचित एखाद्या पुरुषाचीही केस आम्ही नोंदवून घेतली आहे.

इतक्या संघटना स्त्रियांसाठी काम करत असूनही इतक्या तक्रारी अजून नोंदवल्या जातात हा आपल्या समाजापुढचा आरसा आहे. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, हिंसा होऊच नये म्हणून अगदी सुरुवातीला हाती घेतलेले प्रचाराचे काम अजूनही करावे लागते.

पाळणाघरे

स्वातंत्र्यानंतर तीस चाळीस वर्षाच्या काळात समाजाची ज्या प्रकारे प्रगती झाली होती त्यात स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी एकत्र कुटुंब पद्धती विघटित होऊन शहरात मोठ्या प्रमाणात विभक्त कुटुंबपद्धती उदयाला येत होती. पूर्वापार स्त्रियांची समजली जाणारी कामे म्हणजे स्वयंपाक व बाल संगोपन ही नोकरी करून पार पाडताना त्यांची फारच दमछाक होत होती. अशावेळी स्त्रियांना निर्वेधपणे कामाच्या ठिकाणी सहभागी होता यावे यासाठी या वैयक्तिक जबाबदाऱ्यांचे सामाजिकीकरण झाले पाहिजे, दिवसभर मुलांच्या संगोपनासाठी पाळणाघरे निघाली पाहिजेत, तसेच कामाच्या ठिकाणी व राहत्या घराजवळ स्वच्छ व स्वस्त जेवणघरे निघाली पाहिजेत अशा मागण्या आम्ही करत होतो. त्यासाठी एक सह्यांची मोहीम करून आम्ही ही पाळणाघरांची कल्पना लोकांपर्यंत पोचवली. भरपूर उजेड, वारा असलेल्या जागेत प्रशिक्षित सेविकांकडून चालवलेली, मुलांवर समानतेचा संस्कार करणारी पाळणाघरे महिला मंडळे, सामाजिक संस्था यांनी चालवावीत, सरकारने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची मागणी होती.

संघटनेच्या सुरुवातीच्या काळापासून विचाराचा प्रचार, मागण्या, मोर्चे, आंदोलने, सभा-संमेलने, दौरे इत्यादी कार्यक्रमात व्यग्र असलेल्या संघटनेत आपणही पाळणाघरे चालवावीत असा विचार सुरू झाला. बऱ्याच चर्चांनंतर आम्ही या संस्था उभारणीस सुरुवात केली.

आम्ही बोरिवली व मुलुंड येथे हाउसिंग सोसायटीमध्ये दोन पाळणाघरांची सुरुवात 1989 साली केली. तीन महिने ते पंधरा वर्षांपर्यंतची मुले आमच्या पाळणाघरात असतात. प्रशिक्षित सेविका, एक सुपरवायझर, सकाळी आठ ते रात्री आठ या दोन शिफ्टमध्ये चालणारे पाळणाघर, पालकांशी संवाद हे या पाळणाघरांचे वैशिष्ट्य आहे. एक जेवण, दोन वेळा नाश्ता, एक कप दूध व फळे असे पौष्टिक, ताजे खाणे दररोज मुलांना दिले जाते. पाळणाघरात भरपूर पुस्तके व खेळणी असतात. आता संघटनेची दहा पाळणाघरे चालतात. त्यातील सहा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या व बँकांमध्ये चालतात. या पाळणाघरात आम्ही प्रत्यक्ष प्रशिक्षण देतोच. शिवाय एसएनडीटी विद्यापीठाच्या सहाय्याने आम्ही पाळणाघरावर एक प्रशिक्षणाचा कोर्सही सुरू केला आहे.

जिज्ञासा

कुमारवयीन मुलांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होत असतात. काही वेळा अशा ताणतणावांवर काबू न ठेवता आल्यामुळे मुले वाईट मार्गाला लागून त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. हे थांबवण्यासाठी स्त्री मुक्ती संघटना, इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ व मुंबई पोलीस (हेमंत करकरे यांच्या अधिकाराखालील अंमली पदार्थ विरोधी पथक) यांच्या संयुक्त विद्यमाने जिज्ञासा उपक्रम 1996 साली सुरू करण्यात आला. सुरुवातीला मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळांतील नववी व दहावीच्या मुलांसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला. कुमारवय, ताणतणाव, व्यसनमुक्ती, लैंगिक शिक्षण, मूल्यशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन या सहा विषयांवर तिन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, चर्चा करून पायाभूत मांडणीचा आराखडा तयार केला. त्यावर ‘जिज्ञासा’ हे मार्गदर्शक होईल असे पुस्तक काढले. त्यानंतर प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधणाऱ्या संवादकांना प्रशिक्षण देण्यात आले. मांडणीचे मूळ सूत्र तेच ठेवून, निरनिराळी उदाहरणे देऊन संवादकाने तो विषय मुलांपुढे सोप्या पद्धतीने मांडावा व मुलांना त्या विषयावर बोलते करून त्यांच्याशी संवाद साधावा अशी मूळ कल्पना आहे. सुरुवातीला महानगरपालिकेच्या शाळांपासून सुरुवात करून नंतर इतरही शाळांमध्ये जिज्ञासा उपक्रम राबवण्यात आला. प्रथम मुंबई नंतर पुणे, पनवेल इत्यादी ठिकाणच्या शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला. काही शाळांमध्ये जिज्ञासा कार्यक्रम संपल्यानंतर संवादक शाळांना भेटी देऊन मुलांच्या समस्या सोडवतात. त्यांना मार्गदर्शन व मदत करतात. या उपक्रमाद्वारे तेरा जिल्ह्यांमध्ये सहाशे संवादकांच्या सहाय्याने आम्ही पाच लाख मुलांपर्यंत पोचलो आहोत. आता जिज्ञासा पुस्तकाची ब्रेल आवृत्तीही निघाली आहे.

परिसर विकास

संघटनेने चेंबूरच्या आसपासच्या वस्त्यांमध्ये प्रौढ साक्षरता मोहीम राबवण्यास सुरुवात 1989 साली केली. तसेच 1990 मध्ये रेशनिंगच्या विविध प्रश्नांवर लोकांना संघटित करण्यास सुरुवात केली. 1993 च्या मुंबईतील दंगलींनंतर सामाजिक सहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर वस्त्यांमध्ये काम केले. 1998 मध्ये याच वस्त्यांमधील सर्वात वंचित अशा कचरा वेचणाऱ्या स्त्रियांचे सर्वेक्षण केले.

जातीच्या उतरंडीवर सर्वात खालच्या पायरीवर असणाऱ्या या स्त्रिया मराठवाड्यातील 72-73च्या दुष्काळात मुंबईत आल्या. शिक्षण किंवा कोणतेही कौशल्य अवगत नसल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या परिघावरच राहिल्या. बहुतेक ठिकाणी त्याच कुटुंबप्रमुख! घाणीतील काम, अपुरे व अनिश्चित उत्पन्न, काटेवाले (सुका कचरा, रद्दी व भंगार वजनावर घेणारे) व पोलीस यांच्याकडून नाडलेल्या, अनारोग्य, दारिद्र्य याने पिचलेल्या अशा या स्त्रियांना संघटनेने संघटित करण्यास सुरुवात केली. त्यांचे बचत गट बांधले. स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयांवर त्यांचे प्रशिक्षण केले. त्यांच्यातले नेतृत्वगुण हेरून वाढवले. ओल्या कचऱ्यापासून खत करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले. सुका कचरा एकत्र करून काटेवाल्याला विकल्यामुळे त्यांना योग्य किंमत मिळू लागली. त्यातून एकजुटीतून येणाऱ्या ताकदीचा त्यांना अनुभव मिळू लागला. बचत गटातून कर्ज मिळण्याची सोय झाल्यामुळे वस्तीतील काटेवाला, सावकार यांच्या पाशातून सुटका होऊ लागली. बचत गटांची फेडरेशन बांधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल, कर्जवाटप व परतफेड हे व्यवहार त्या करू लागल्या. कचऱ्यापासून खत निर्मिती व बागकाम यांचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे निरनिराळ्या वसाहतींमध्ये त्यांच्या सहकारी संस्थांना कामाची कंत्राटे मिळू लागली. आत्मनिर्भरतेच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.

या वस्तीतील मुली आईच्या मागे कचरा वेचण्यासाठी जात किंवा धाकट्या भावंडांना सांभाळण्यासाठी घरी रहात. त्यांची लहान वयात लग्न केली जात. पुढे त्याही आईप्रमाणे दारिद्र्याचे जिणे जगत.स्त्रीमुक्ती संघटनेने यात निर्णायक हस्तक्षेप करून हे दारिद्र्याचे दुष्टचक्र भेदण्याचा प्रयत्न केला. या मुलींच्या शिक्षणासाठी दत्तक-पालक योजना सुरू करून जवळजवळ पंधरा वर्षे राबवली. रिझर्व बँक एम्पलॉईज असोसिएशनच्या सहकार्याने रिझर्व बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ‘एका व्यक्तीकडून एका मुलीचा खर्च’ या तत्त्वावर देणग्या घेऊन मुलींना दप्तर, युनिफॉर्म, वह्या, पुस्तके अशा वस्तूरुपात मदत दिली. स्त्रियांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे वस्तीतील वातावरण बदलले.वस्तीतील मुलींची पहिली पिढी शिकून तयार झाली.

परिसर विकास उद्योग व घनकचरा व्यवस्थापन

या कामाची दुसरी बाजू आहे ‘घनकचरा व्यवस्थापन’. शहर जेवढे श्रीमंत तेवढा त्याचा कचरा जास्त. या कचऱ्याचे सुका व ओला असे वर्गीकरण करून निर्मितीच्या ठिकाणीच ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले व सुक्या कचऱ्याचा पुनर्वापराची व्यवस्था केली तर शहरात ‘शून्य कचरा’ अशी अवस्था येऊ शकते. यामुळे कचऱ्याच्या वाहतुकीवर होणारा खर्च वाचतो. कचऱ्याच्या वाहतुकीतून होणारे प्रदूषण टळते. डम्पिंगग्राउंडसाठी होणारा जमिनीचा अपव्यय टळतो. त्याला लागणाऱ्या आगीमुळे होणारे प्रदूषण टाळता येते. संपूर्ण शहराचे आरोग्य सुधारू शकते.

या विषयावर मोठ्या प्रमाणात प्रचार मोहिमा संघटित करता करता ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताची विक्री सुरू केली. वसाहतींमध्ये पिट्स बांधून तिथे तयार होणारे खत तिथल्याच बागेसाठी वापरण्यात येऊ लागले. अतिरिक्त खत विक्रीसाठी उपलब्ध झाले. हॉस्पिटले, कॅन्टीन अशा ठिकाणी टनाने तयार होणाऱ्या कचऱ्यासाठी ‘निसर्गऋण’ प्लांट तयार केले. त्यातून तयार होणाऱ्या मिथेन वायूवर वीज तयार करून ती त्याच हॉस्पिटलसाठी  किंवा कॅन्टीन साठी वापरता येऊ लागली. निसर्गात तयार होणारी संपत्ती कचऱ्यावर प्रक्रिया करून खताच्या रूपाने निसर्गाला परत मिळाली किंवा विजेच्या रूपाने इंधन म्हणून उपयोगात आली.

राष्ट्रीय कचरावेचक आघाडीचे सचिव पद तीन वर्षासाठी स्त्री मुक्ती संघटनेकडे आले. 2024 सालात सुशीला साबळे यांची इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्टपिकर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.

जवळजवळ चाळीस वर्षाच्या अविश्रांत कामानंतर आज संघटनेचे सर्व उपक्रम एके ठिकाणी चालू शकतील अशी एक वास्तू नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथे उभी आहे. ते स्त्री चळवळीचे सांस्कृतिक केंद्र बनावे अशी आमची मनीषा आहे.

संघटनेला पन्नास वर्षे 2025 साली पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने इतर सर्व स्त्री संघटनांना बरोबर घेऊन वर्षभर कार्यक्रम करण्याचे योजत आहोत.

संघटनेचे उद्दिष्ट समाजबदलाचे आणि म्हणूनच लांब पल्ल्याचे आहे. हा लेख पूर्ण करताना हे आमचे उद्दिष्ट अधोरेखित करणाऱ्या आमच्या गाण्यातील दोन ओळी उद्धृत करते.

    पददलितांची पिळवणुकीतून मुक्ती व्हावी हा एकच ध्यास! मनी घेऊनी जाऊ आपण निर्मू आपुला नवा समाज!!

अमोल केरकर 9820988862 Amol.kerkar1957@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. इतका सगळा  मोठा इतिहास प्रथमच कळला . खूप आभार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version