वामन मल्हार जोशी नावाचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व तत्त्वनिष्ठेने भारलेले होते. ‘विश्ववृत्त’ मासिकातील एका लेखाविरूद्ध जेव्हा खटला भरला गेला तेव्हा तो लेख वामन मल्हार यांनी लिहिलेला नसतानाही मोठ्या धैर्याने त्यांनी तुरुंगाचा रस्ता धरला. तेथून सुटून आल्यावर त्यांनी केसरी-मराठी वृत्तसंस्था आणि नंतर ‘Message’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले. त्याच काळात ‘मनोरंजन’ मासिकातून त्यांची ‘रागिणी’ ही कादंबरी क्रमश: प्रसिद्ध होऊ लागली. ती विलक्षण गाजली. ती गोष्ट 1915 सालची. त्यांची लेखणी ही साहित्यिकाची होती, पत्रकाराची नव्हती. त्यामुळे त्यांनी वृत्तपत्रातील नोकरी सोडली. शिवाय मनातील राष्ट्रीय विचार आणि ज्वलंत ध्येयवाद त्यांना सतत सामाजिक क्षेत्रात वावरण्यास लावत होता. ते महर्षी कर्वे यांच्या अनाथ बालिकाश्रमात जाऊन मिळाले (1918). ते तेथे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि इंग्रजी-मराठी साहित्य शिकवत. पुढे, ते महिला कॉलेजचे प्राचार्य झाले. तत्त्वज्ञ आणि वाङ्मयाचे गाढे अभ्यासू म्हणून वामन मल्हार यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. ‘नीतिशास्त्रप्रवेश’ हा त्यांचा ग्रंथ सर्वोत्कृष्ट मानला जातो.
वामन मल्हार जोशी यांचा जन्म 21 जानेवारी 1882 रोजी रायगड जिल्ह्यातील ‘तळे’ या गावी झाला. त्यांनी ‘रागिणी’, ‘नलिनी’, ‘सुशीलेचा देव’, ‘आश्रम हरिणी’, ‘इंदु काळे सरला भोळे’ या पाच कादंबऱ्या. ‘नवपुष्पकरंडक’ हा कथासंग्रह आणि ‘विचार सौंदर्य’, ‘विचारविलास’, ‘विचारविहार’, ‘विचारलहरी’, ‘स्मृतिलहरी’, ‘नीतिशास्त्रप्रवेश’ असे तत्त्वचिंतनपर ललित ग्रंथ, ‘सॉक्रेटिसचे संवाद’ हे भाषांतर आणि वाङ्मयमाला (दोन खंडांत); तसेच, ‘Gift of Gita Rahasya’ हा ग्रंथ असे साहित्य लिहिले आहे. त्यांचे ‘स्मृतिलहरी’मधील आठवणींचे लेखनही तत्त्वशोधक वृत्तीने केलेल्या जीवनानुभवाच्या चिंतनातून जन्माला आलेले आहे. त्यांच्या ठिकाणी प्रसन्न विनोदबुद्धीही होती. तिचा प्रत्यय त्यांच्या सर्व लेखनातून व प्रबंधात्मक ग्रंथांतून येतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी मराठीतील तात्त्विक कादंबरीच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला आहे.
ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की ‘आपण शब्द वापरावेत. पण त्या शब्दांपाठीमागे आचारविचारांचे तेज आणि पावित्र्य पाहिजे. असत्य, दुर्जनता व हरतऱ्हेची कुरुपता यांचा विनाश करणे व सत्य, सौजन्य आणि सौंदर्य यांचे संस्थापन करणे हे आपले अवतारकृत्य आहे.’
त्यांचे निधन 20 जुलै 1943 रोजी मुंबईत झाले.
– वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
—————————————————————————————————————————————–
✍️१६ व्या अ.भा.म.सा.संमेलनाच्या अध्यक्षांच्या कार्यकर्तृत्वाची सुंदर माहिती सदर लेखातून मिळाली.आभारी! 🙏© प्रा.पुरुषोत्तम पटेल,