भोपाळच्या गादीवर महिला 1818 पासून शंभर वर्षे राज्य करत होत्या. त्यांनी कल्याणकारी राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्यात सिकंदर बेगम व सुलतान जहाँ बेगम यांनी लष्कर सेवा, प्रशासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात केलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरल्या…
बेगम आणि नवाब हे दोन शब्द मराठी भाषक आदरपूर्वक उच्चारतात असे नाही; नव्हे, बऱ्याचदा त्यात टिंगलीचा सूर असतो (संगीतप्रेमी लोकांचा अपवाद – बेगम अख्तर हे त्यांचे दैवत असते). परंतु आदराने नाव नोंदवावे अशी आणखी एक बेगम भोपाळच्या इतिहासात होऊन गेली. तिचे नाव नवाब सिकंदर बेगम. बेगम आणि नवाब ह्या दोन विरूद्ध लिंगदर्शक उपाधी. पूर्ण राज्याधिकार मिळालेल्या व्यक्तीला नवाब हा हुद्दा ब्रिटिश देत असत. ती व्यक्ती स्त्री असली तर तिला नवाब बेगम अशी संज्ञा असे.
नवाब सिकंदर बेगम या भोपाळच्या गादीवरून राज्य करत होत्या. त्यादेखील 1858 च्या पूर्वीपासून. तो मुलूख पठाण वंशाच्या लोकांनी मिळवला. सिकंदर बेगम हिचे वडील नजर मोहंमद खान भोपाळच्या गादीवर राज्य करत होते. त्यांचा मृत्यू एका अपघातात झाला तेव्हा त्यांचा पुतण्या त्यांच्या जागी, गादीवर यावा असे ब्रिटिशांनी ठरवले. त्याने बरीच भांडणे केली, तेव्हा ब्रिटिशांनी त्याच्या जागी, गादीवर त्याचा भाऊ जहांगीर मोहमद खान याला बसवले. त्याने सिकंदर बेगमशी लग्न 1835 मध्ये केले, पण त्यानेही बायकोशी भांडणे केली. त्याचे निधन झाले आणि राज्य सिकंदरच्या मुलीकडे शहाजहान बेगम हिच्याकडे गेले. त्यावेळी (1844) सिकंदर सत्तावीस वर्षांची आणि तिची मुलगी (शहाजहान बेगम) नऊ वर्षांची होती. सिकंदर बेगमने मुलीच्या नावाने कारभार सुरू केला. तिने तिचा हक्क भोपाळच्या गादीवर 1859 साली सांगितला आणि तो पुढील वर्षी मान्य झाला. मात्र गादीवरील हक्क मान्य न होणे हे मुलीच्या कर्तृत्वाच्या आड आले नाही. गादीवर वारस ब्रिटिश नेमत असत. त्यामुळे सिकंदर बेगम हिला गादीवर हक्क मागावा लागला. तिने केलेल्या सुधारणा सर्वसमावेशक होत्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तिने त्यांची आवश्यकता ओळखून त्या सुधारणांचे प्राधान्य निश्चित केले.
सुधारणांचे पहिले केंद्र होते लष्करी सेवांच्या बाबतीत. त्यावेळी संस्थानचे स्वतःचे असे सैन्य नव्हते. सुभेदार स्वतःच्या पदरी लढाईत कुशल अशी माणसे बाळगत. संस्थानावर काही संकट आले आणि लढाईची वेळ आली तर सुभेदार स्वतःच्या पदरच्या लोकांना संस्थानाच्या वतीने लढाईवर पाठवत असत. शांततेच्या काळात हे ‘तात्पुरते’ सैनिक दंगामस्ती करत असत. जरूरीच्या वेळी संस्थानाला सैनिक पुरवठा करणारे सुभेदार राज्यकारभारात दबाव आणू पाहत. सिकंदर बेगम हिने पहिले काम केले ते म्हणजे संस्थानाचे स्वतंत्र असे लष्कर उभे केले. तिच्या त्या प्रयत्नाला काही वेळा तीव्र असा विरोधही झाला, पण तो तिने मोडून काढला. सैन्य स्थापना यशस्वी झाल्यावर, तिने तिचा मोर्चा प्रशासनाच्या प्रगतीकडे वळवला. तिने भोपाळ संस्थानाचा संपूर्ण दौरा केला. अनेक ठिकाणी मुक्काम केला आणि स्थानिक शेतकऱ्यांचे जीवन व समस्या समजावून घेतल्या. भोपाळ संस्थानाचे विभाजन तीन जिल्ह्यांत केले आणि त्यांच्या सीमा निश्चित केल्या. तिने नवी सारा वसुली पद्धत कृषी महसूल वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सुरू केली. गव्हर्नर जनरलचा प्रतिनिधी रॉबर्ट हॅमिल्टन तिच्या कामामुळे प्रभावित झाला. त्याने बेगमला 7 नोव्हेंबर 1854 रोजी लिहिलेल्या पत्रात असे शब्द वापरले – “तुम्ही असे उदाहरण घालून देत आहात, की राज्याचा कारभार तुमच्याच हाती ठेवणे इष्ट होईल.”
त्याच्या पुढील पायरी म्हणजे न्यायव्यवस्थेत सुधारणा. सिकंदर बेगमने न्यायालये ठिकठिकाणी कार्यरत केली. सिव्हिल आणि क्रिमिनल, दोन्ही कायद्यांची सविस्तर रचना करून ती लेखी स्वरूपात जाहीर केली. तशा नियम – कानून पुस्तिकांच्या हस्तलिखित प्रती वेळोवेळी काढल्या जाऊ लागल्या. भोपाळ संस्थानात पहिले मुद्रणालय – सिकंदर प्रेस – 1860 साली सुरू झाले. सिकंदर बेगम हिने शेतकऱ्यांची मने जिंकून घेतली ती त्यांच्याशी मातृत्वाने वागून; ती स्वतःचा राजवाडा आणि बगीचा संस्थानच्या राजधानीत येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्याबरोबर हिंडून दाखवत असे. अशा प्रसंगी ती शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना खेळणी आणि खाऊ देऊन खुश करत असे.
अनेक संस्थानिकांप्रमाणे, सिकंदर बेगम ही ब्रिटिशांची कट्टर समर्थक होती. ती 1857 च्या ‘बंडा’त ब्रिटिशांच्या बाजूने उभी राहिली. इंदूरला मोठा उठाव झाला. ब्रिटिशांनी तेथे अनेक अधिकाऱ्यांना पाठवण्याचे ठरवले. ते अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसह सिहोर येथे आले. परंतु तेथील सैनिकांत पूर्व भारतातील सैनिक अनेक होते आणि त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी तयार केले गेले होते. त्यामुळे सिहोरला आलेली मंडळी भोपाळला रवाना झाली. सिकंदर बेगमने त्यांचे चांगले स्वागत केले, त्यांना संरक्षण दिले आणि बारा हत्ती, शिधासामुग्री व शस्त्रे देऊन त्यांना होशंगाबाद येथे सुरक्षित रीत्या पाठवले. ब्रिटिशांनी तिच्या त्या निष्ठेचे स्मरण ठेवले. दरबार जबलपूर येथे 1 नोव्हेंबर 1861 रोजी भरला होता, त्यात बैरासिया जिल्ह्याची सूत्रे बेगमच्या हाती समारंभपूर्वक दिली गेली. तिला सात तोफांची सलामी जाहीर झाली. त्या दरबारात ग्वाल्हेर, रामपूर आणि पतियाळा येथील राजांनाही पदव्या दिल्या गेल्या.
सिकंदर बेगम हिने बनारस, फैजाबाद, लखनौ आणि दिल्ली या शहरांना त्या दरबारानंतर भेटी दिल्या. ती शाहजहानची मस्जिद पाहण्यास त्या प्रवासात गेली, तेव्हा ती बंद होती. त्याचे कारण तेथील मुस्लिम 1857 च्या ‘बंडा’त ब्रिटिशांच्या विरूद्ध गेले होते. सिकंदर बेगमच्या विनंतीवरून मस्जिद पुन्हा खुली केली गेली.
तिने तिची सारी कर्तव्ये समाधानकारक रीत्या पार पडली या आनंदात मक्का-मदिना यांची यात्रा आखली (हज यात्रा). तिने त्या यात्रेचे विलक्षण वर्णन पुस्तकरूपाने लिहिले आहे. त्या मूळ उर्दूतील पुस्तकाचा अनुवाद Pilgramage to Mecca by Nawab Sikandar Begum of Bhopal या नावाने 1870 मध्ये प्रकाशित झाला. अनुवाद केला होता Mrs Willoughby -Osborne या ब्रिटिश महिलेने. ती पोलिटिकल एजंटची पत्नी होती. त्या अद्भुत प्रवासाची अद्भुत कहाणी हा वेगळ्या लेखाचा विषय आहे.
सिकंदर बेगमच्या आयुष्याची आणखी काही ओळख तिची नात नवाब सुलतान जहाँ बेगम हिने लिहिलेल्या आत्मकथनातून होते. त्या आत्मकथनाचे शीर्षक आहे – An Account of My Life. ज्या वर्षी सुलतान जहाँ हिने कुराण संपूर्ण वाचल्याच्या निमित्ताने खर्चिक व भव्य असा सोहळा झाला, त्याच वर्षी सुलतान जहाँ हिच्या आईने पुनर्विवाह केला. त्या घटनेपासून आईचे व मुलीचे संबंध दुरावले. आईच्या नव्या पतीकडून आई-मुली यांच्या नात्यातील माया उणावेल यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले गेले. त्यांच्यातील संबंध इतके दुरावले, की सुलतान जहाँ हिने तिच्या मुलांसाठी मुली (बायको म्हणून) बघण्यासाठी म्हणून आईचा सल्ला मागणारे पत्र लिहिले आणि त्याला आईने तोंडी तुटक उत्तर पाठवले, की “त्या मुली, मुलांच्या वडिलांच्या बाजूच्या असाव्यात, मुलांच्या आईच्या वडिलांच्या बाजूकडील नसाव्यात.”
सुलतान जहाँ हिची आई हुशार – नव्हे विद्वान होती. पौर्वात्य वाङ्मयाचा तिचा अभ्यास दांडगा होता. तिने भोपाळचा इतिहास लिहिला. तिची अन्य चार पुस्तकेही आहेत. तिने अरेबिक व पर्शियन भाषांचे शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या. काही शिष्यवृत्त्यादेखील दिल्या. परंतु त्यांचा दुरुपयोग झाला. तिने पोस्टाचे नवे स्टॅम्प जारी केले. न्यायदान आणि लष्कर यांच्या प्रशासनात सुधारणा केल्या; तसेच, लष्कराचे सामर्थ्य व क्षमता वाढवण्यासाठी उपाय केले.
सुलतान जहाँ तिच्या आत्मचरित्रात लिहिते, की तिच्या वयाच्या पाचव्या वर्षी तिच्या शिक्षणाला सुरुवात झाली. त्याचा तपशील तिने सांगितला आहे – मी पाच वर्षांची झाले आणि माझ्या नियमित शिक्षणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी परंपरागत असा समारंभ झाला, ईश्वराची प्रार्थना करून त्याचे आशीर्वाद मागितले गेले. मी मला आखून दिलेल्या दिनक्रमानुसार सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करत असे. सकाळी आठ ते दहा या वेळात कुराणाचा अभ्यास करत असे, दुपारी बारा ते एक – हस्ताक्षर सुधारणे, दुपारी एक ते तीन – इंग्रजीचा अभ्यास. त्यानंतर पर्शियन, अंकगणित, पुश्तू आणि भालाफेक (आळीपाळीने). संध्याकाळी साडेपाच ते सहा – घोडेस्वारीचे शिक्षण. तिच्या या सर्व कार्यक्रमामागे सिकंदर बेगम हिचा पुढाकार होता. अंकगणित वगळता सर्व विषय शिकवणारे शिक्षक मुस्लिम होते, अंकगणित शिकवणाऱ्या शिक्षकाचे नाव होते – गुरुजी पंडित गणपत राय. सिकंदर बेगम हिच्या दोन प्रमुख मंत्र्यांपैकी एक मुस्लिम सेनापती आणि दुसरा हिंदू होता. सिकंदर बेगम हिनेच नातीचा सर्व अभ्यासक्रम ठरवला होता. तिचा विशेष भर इंग्रजी शिकण्यावर होता.
सिकंदर बेगम मक्केच्या प्रवासाला गेली आणि तिने प्रवासाच्या दरम्यान नियमितपणे तिच्या नातीला पत्रे लिहिली. त्यांतील काही पत्रे नातीने तिच्या आत्मचरित्रात उद्धृत केलेली आहेत. त्यांतून सिकंदर बेगम हिचा श्रद्धाळू स्वभाव पुरेसा प्रतीत होतो. “आमची बोट- ‘इंदूर’ -एडनला पोचली. मी त्यासाठी ईश्वराची ऋणी आहे. आम्ही सर्व खुशाल आहोत. जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल, तेव्हा प्रार्थनेपूर्वीचे शरीरशुद्धीचे विधी कर आणि तुझ्यासाठी झाफरान याने जी चटई विणली आहे त्यावर बसून प्रार्थना कर.” बेगमने नातीला दुसऱ्या एका पत्रात लिहिले, की “तुझ्यासाठी बोटीवर मी काही खरेदी केली. त्यात एक पेटी आहे आणि त्यात शाईची दौत ठेवण्याची सोय आहे.”
नातीने आजीला पत्रांची उत्तरे पाठवली (म्हणजे दुसऱ्या माणसाकडून लिहवून घेतली). परंतु त्या मजकुराखाली सही नव्हती, म्हणून आजीने नातीला सौम्य शब्दांत झापले. नातीला आजीची आणि आजीला नातीची आठवण सतत येत होती, त्यामुळे आजी मक्का यात्रा संपवून परत आली तेव्हा दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला! आजी जेव्हा परत आली, तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी भलामोठा लवाजमा गेला होता. त्यावेळी भोपाळपासून तीन मैलांवर असलेल्या सिकंदराबाद नावाच्या छोट्या शहरवजा गावात राजघराण्यातील मंडळी हत्तीवरून गेली.
सिकंदर बेगम हिने यात्रेहून परतल्यावर नातीच्या शिक्षणाचा आढावा घेतला. शिक्षकांना ती नातीची परीक्षा घेण्यास लावत असे आणि तिला किती कौशल्य प्राप्त झाले आहे याचे प्रमाणपत्र घेत असे. मात्र सिकंदर बेगमची मुलगी गादीवर आली आणि तिच्या नातीच्या शिक्षणातील इंग्रजी शिकण्याचे महत्त्व कमी झाले. त्याऐवजी तिला कारभारात लक्ष घालण्याची सवय व्हावी म्हणून दरबारी कामकाजाची कागदपत्रे वाचण्यास आणि त्यावर काय निर्णय घ्यावा हे सुचवण्यास सांगितले गेले. नात सुलतान जहाँ बेगम हिचे संपूर्ण कुराण एकदा वाचून झाले होते. ती त्यावेळी अकरा वर्षांची होती. तिने कुराण दुसऱ्या वेळेस वाचण्यास सुरुवात केली. पहिल्या वाचनाची यशस्वी सांगता म्हणून एक मोठा समारंभ केला गेला. इंग्रजी अधिकाऱ्यांना बोलावणे गेले. शेजारच्या प्रांतांचे सुभेदार समारंभासाठी आले. मनोरंजन आणि दानधर्म मोठ्या प्रमाणावर झाले. या सर्वांसाठी खर्च (फक्त) दोन लाख शहाण्णव हजार चारशेएकोणीस रुपये, नऊ आणे आणि सहा पै आला!
नातीने लिहिलेल्या आत्मचरित्रातील या उल्लेखाचे आश्चर्य वाटते ते तिनेच लिहिलेल्या स्वतःच्या लग्नाच्या हकीगतीचा वृत्तांत वाचून. आपली नात मोठी झाली, तिच्या लग्नाचा विचार करण्यास हवा म्हणून सिकंदर बेगम नातजावयाच्या शोधाला लागली. नातजावयाच्या पदरी दोन गुण असण्यास हवेत – (हा तत्कालीन संस्थानिकांचा आणि सुविचारी सत्ताधीशांचा आग्रह असे, असे सुलतान जहाँ बेगम सांगते) तो उच्च कुळातील असावा आणि तो उधळ्या असू नये, नव्हे मितव्ययी असावा. “या मुद्यावर इस्लाम धर्माचा भर आहे. उधळेपणा हा अपराध गणला जातो आणि एखाद्या स्त्रीने नवऱ्यापासून अलग होण्यासाठी ते कारण पुरेसे मानले जाते.” ही विचारधारा गरीब कुटुंबाच्या जीवनसरणीशी सुसंगत अशी वाटते आणि ती दीडशे वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळाच्या मुस्लिम समाजातील होती याचे नवल वाटल्यावाचून राहत नाही. अशीच आश्चर्यकारक आणखी माहिती तिने तिच्या व मुलांच्या लग्नाबाबत दिली आहे. सिकंदर बेगम हिने नातजावई पसंत केला. त्याला पद्धतशीर असे राज्यकारभाराचे, चालचलणुकीचे, धर्मनिष्ठेचे असे प्रशिक्षण देणे सुरू झाले. पण सिकंदर बेगम हिचा मृत्यू ते प्रशिक्षण पुरे होण्याआधी झाला; तरी प्रशिक्षण चालू राहिले. प्रशिक्षण पुरे झाल्यावर, बेगम सुलतान जहाँ हिच्यासाठी शोधलेला नवरा गव्हर्नर जनरल याने मान्य करणे आवश्यक होते. त्यासाठी खलिता लिहिला गेला. तो उर्दूत होता. त्याचे इंग्रजीत भाषांतर करण्यात वेळ गेला. सरकारची पसंती आली नाही म्हणून सर्वांचा जीव कासावीस झाला. अखेर सरकारी दिरंगाई संपली – म्हणजे गव्हर्नर जनरलने त्याचा प्रतिनिधी खातरजमा करून घेण्यासाठी पाठवला. खातरजमा कोणत्या गोष्टींची? मुलगा उच्च कुळातील आहे ना, मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नाला संमती दबावाखाली येऊन दिलेली नाही ना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो मुलगा ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहील ना! एजंटने त्याचा अहवाल पाठवला, त्यानंतरच गव्हर्नर जनरलची विवाहाला परवानगी आली आणि लग्न लागले. विरोधाभास असा, की नवरामुलगा उधळ्या नसावा हा निकष लावणाऱ्या कुटुंबाने लग्नासाठी खर्च केला होता – फक्त सहा लाख सत्तावन्न हजार सहाशेबारा रुपये, चौदा आणे आणि तीन पै. त्यांपैकी नवऱ्या मुलाच्या पोशाखावर खर्च दीड लाखाहून अधिक, तर वधूच्या पोशाखावर साडेचार लाखांस थोडा कमी!
सुलतान जहाँ हिची मुले मोठी झाली तेव्हा तिनेही त्यांच्यासाठी मुली पसंत करण्यापूर्वी आईची संमती घेतली. त्या मुलांच्या साखरपुड्याला तिची आई हजर राहिली नाही, कारण आईने तोपर्यंत दुसरे लग्न केले होते व माय-लेकींचे संबंध त्यानंतर तुटले होते. सुलतान जहाँ हिने मुलांच्या साखरपुड्याबरोबरच सर्वात धाकट्या मुलाचा सुंता विधी केला, मात्र तो अत्यंत साधेपणाने.
सुलतान जहाँ बेगम हिने तिच्या आजीप्रमाणेच अनेक सुधारणा केल्या. ती राज्यावर बसली तेव्हा राज्याची आर्थिक स्थिती खूप खराब झाली होती. तिने सर्व प्रशासनाला शिस्त लावण्यास सुरुवात केली. तिच्या नवऱ्याने तिला त्या कामी मदत केली, अगदी मनापासून. परंतु त्याचे अकाली निधन झाले. सुलतान जहाँ हिने सर्व राज्याचा दौरा केला. नोकरशाहीत बदल केले. तहसीलदारांचे पगार वाढवले, पेन्शनर वर्गातून सहाय्यक तहसीलदार नेमले. कानपूरच्या शेती कॉलेजातून मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी निधी उभारला. रोमन कॅथॉलिक प्रीस्टला सरकारी मदत सुरू केली. शेतकऱ्यांना बियाणे खरीदता यावे म्हणून कर्ज अल्प व्याजात मिळण्याची सोय केली. सुलतान जहाँ बेगमने पोलिस चौक्या पुन्हा प्रस्थापित केल्या.
तिने तिच्या सत्ताग्रहणाला एक वर्ष झाल्यावर मोठा समारंभ केला. तिने त्या एका वर्षात काय प्रयत्न केले अन् कोणत्या सुधारणा केल्या याचा विस्तृत अहवाल सादर केला. तिचे ते कृत्य निश्चितच क्रांतिकारक ठरले असेल! तिने नवीन कायदेकानू बनवण्यासाठी एक समिती नेमली (संस्थानचे लॉ कमिशन). तिने मुलींसाठी शाळा सुरू केली. त्यात विषय शिकवले जात होते – अंकगणित, उर्दू, भूगोल आणि प्राथमिक अर्थशास्त्र ( elementary domestic economy). चाळीस मुली पहिल्या वर्षी दाखल झाल्या. तिने युनानी औषधशास्त्राचे शिक्षण देण्यासाठी कॉलेज काढले. तिने आजीच्या पावलावर पाऊल ठेवून हजची यात्रा केली आणि यात्रेचे वर्णन करणारे पुस्तकही लिहिले. भोपाळच्या गादीवर महिला 1818 पासून शंभर वर्षे राज्य करत होत्या आणि त्यांनी कल्याणकारी राज्य स्थापण्याचा यत्न केला!
– रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com
———————————————————————————————————————–