शकुंतला परांजपे यांची चढाओढ (Shakuntala Paranjape)

0
110

श्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ही परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले. त्यांनी 1933 ते 1955 या तेवीस वर्षांत सतरा चित्रपटांत भूमिका केल्या. त्यात – ‘कुंकू’, ‘सैरंध्री’, ‘लोकशाहीर रामजोशी’, ‘रामशास्त्री’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतही काम केले. शकुंतलाबार्इंनी Sense And Sensibility, Three Years in Australia ही दोन इंग्रजी आणि ‘भिल्लिणीची बोरे’, ‘काही आंबट काही गोड’, ‘देशविदेशच्या लोककथा’ ही तीन मराठी पुस्तकेदेखील लिहिली. शकुंतलाबार्इंनी दोन लहान लांबीची नाटकेसुद्धा लिहिली आहेत. त्यांची नावे आहेत ‘सोयरीक’ आणि ‘चढाओढ’. पैकी ‘चढाओढ’ आधी लिहिले होते, पण ते ‘सोयरीक’च्या नंतर, 1936 साली प्रकाशित झाले. त्यांच्या ‘चढाओढ’ नाटकाची ही ओळख.

‘चढाओढ’ हे नाटक युजेन लाबिश ह्या प्रसिद्ध फ्रेंच नाटककाराच्या ‘la voyage de monseiur perrichon’ या नाटकाचे भाषांतर आहे. शकुंतलाबाई त्याचा उल्लेख नाटिका असा करतात आणि ते भाषांतर आहे असे म्हणतात. मात्र त्यांनी केले आहे ते रूपांतर. मूळ कथावस्तू आणि मानसशास्त्रीय तत्त्व यांना धक्का न लावता सर्व पात्रे व स्थळे महाराष्ट्रातील आणि त्यांची भाषा पूर्णपणे मराठी असा त्या नाटकाचा बाज आहे.

गणपतराव शहाणे हे एक व्यापारी आहेत. पेशाने; आणि पेशा अंगी मुरल्यामुळे वृत्तीनेदेखील. त्यांना विद्या नावाची उपवर मुलगी आहे. तिला महाबळेश्वर दाखवायचे म्हणून ते औरंगाबाद स्टेशनवर आले आहेत. ते स्वभावाने घायकुते असल्यामुळे अनेक विनोदी प्रसंग निर्माण होतात. विद्या गाण्याच्या ज्या वर्गात जात असते त्याच वर्गात वसंतराव दाणी हे जकात अधिकारी आणि माधवराव साठे हे बँक डायरेक्टर हेही गाणे शिकायला येत असतात. त्या दोघांच्या मनात विद्येशी लग्न करायचे आहे. ती प्रवासाला निघणार ही बातमी लागताच तेही स्टेशनवर येतात. त्यांना कोठे जायचे ते माहीत नाही, पण ते हे जाणून आहेत, की  विद्येला मिळवायची असेल तर तिच्या आईवडिलांवर छाप पाडून त्यांचे मत स्वतःबद्दल अनुकूल निर्माण केले पाहिजे. ते एकमेकांना ओळखतात. नंतर ते दोघे एकाच ध्येयाच्या प्राप्तीसाठी स्पर्धा करत आहेत हेही त्यांना स्पष्ट होते. तेव्हा ते त्यांच्यातील ती स्पर्धा निरोगी ठेवायची असा करार करतात. ते दोघे प्रवासात (स्वतःच्या मनाविरुद्ध) विद्येच्या आईबापांची पूर्ण सेवा करतात आणि दोघे गणपतराव ज्या हॉटेलात उतरणार आहेत तेथेच उतरतात. वसंतराव, घोड्यावरून घसरलेल्या गणपतरावांना दरीत पडण्यापासून वाचवतो. गणपतराव त्यामुळे अगदी भारावून जाऊन त्याला मुलगी देण्याचे ठरवतात. माधवराव माघार घेण्याचा विचार बोलून दाखवतो, परंतु त्यामुळे वसंतरावाला होणारा विजयानंद जाणवताच तो विचार बदलून निराळी चाल योजतो. तो स्वतः साप चावल्याचे नाटक करतो आणि त्याचा ‘जीव वाचवण्याची’ संधी गणपतरावांना देतो. त्याबद्दलची बातमी – ‘गणपतरावांनी शौर्य दाखवून एका सहप्रवाशाचा जीव वाचवलाही’ वृत्तपत्रात, पैसे खर्च करून छापून आणतो. तो त्यांचे पोर्ट्रेट काढून प्रदर्शनांत मांडण्याचा बेत आखतो. त्यामुळे गणपतरावांना स्वकर्तृत्वाची जाणीव होते. त्यांना त्यांनी कोणावर तरी उपकार करून त्याला जन्मभराचे ऋणी करून ठेवले आहे ही भावना सुखावत राहते. माधवराव त्याच भावनेच्या परिपोषासाठी डावपेच आखणे सुरू करतो. गणपतराव त्यांचा निर्णय माधवरावामुळे त्यांना मोठेपण प्राप्त झाले असे वाटून बदलतात. ते वसंतरावाला सांगतात, की ‘तुमचे उपकार पुरे करा! यापुढे मी साता समुद्रात घरंगळत जाऊन पडत असलो तरी मला सावरण्याची तसदी घेऊ नका. माझ्या प्रतिस्पर्ध्याला तुरुंगात अडकावण्याची शिताफी लढवू नका. ढवळाढवळ करणारी माणसे मला आवडत नाहीत.’

_ShakuntalaParanjape_Chadhaaodha_1.jpgया शेवटच्या वाक्याचे मूळ महाबळेश्वरच्या हॉटेलातील एक अन्य उतारू संभाजीराव भोसले हा आहे. तो त्याने ठेवलेल्या बाईचा जाच होऊ लागला म्हणून पळून महाबळेश्वर येथे आलेला व त्याच हॉटेलात उतरलेला असतो. गणपतराव तेथे ठेवलेल्या शेरेबुकात चुकीची नावे लिहून – अफझुलखानाऐवजी शाहिस्तेखान – काही शेरे लिहितो. तो चुकीचा शेरा वाचून संभाजीराव दुसरा शेरा लिहून गणपतरावांना काही खडे बोल सुनावतो. ते वाचून गणपतराव संभाजीरावाची अवहेलना करणारा शेरा लिहितो. त्यामुळे चिडलेला संभाजीराव गणपतरावांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान देतो. मूळ नाटकात थोडा अधिक विनोद निर्माण करणे आणि गणपतरावांच्या मर्यादाची विविध अंगे स्पष्ट करणे यासाठी संभाजीराव हे उपपात्र आणि त्याचे कथानक घातले आहे. माधवराव त्याचा डावपेच यशस्वी झाला ह्या आनंदात वसंतरावाला सत्य घटना सांगतो आणि ती का घडवून आणली ते स्पष्ट करतो.’ तू समोर आलास, की गणपतरावांचे डोके फिरते ते का? तर तुला पाहून त्यांना त्यांच्या मूर्खपणाची जाणीव पटून मनातल्या मनात ओशाळल्यासारखे वाटते आणि त्याची प्रतिक्रिया तुझा द्वेष करण्यात होते.’ माधवरावाची ती कबुली गणपतराव ऐकतात व त्यांना स्वतःच्या चुकीच्या भावनांची जाणीव होते. ते त्यांचा निर्णय बदलून विद्येचा हात वसंतरावाच्या हाती देतात.

या मानसशास्त्रीय तत्त्वाखेरीज लक्षात राहते ती विद्येची आई. तिला नवऱ्याचा उतावळा, हिशेबी स्वभाव अजिबात आवडत नाही आणि ती तसे स्पष्ट बोलून दाखवते. तिला थोडेफार सर्वसामान्यज्ञान आहे आणि बँका बुडतात वगैरे ठाऊक आहे. संभाजीराव व त्याचे ठेवलेल्या बाईशी ‘तुझं माझं जमेना’ असे प्रकरण आणि जकात चुकवून वस्तू आणणे वगैरे गोष्टी मानवी वृत्तीवर प्रकाश टाकतात आणि नाटकाची रंगत वाढवतात.

न. चिं. केळकर यांनी या आणि ‘सोयरीक’ या नाटिकांवर लिहिलेला संयुक्त अभिप्राय पुस्तकात सुरुवातीस दिला आहे. त्यांत त्यांनी शेरेबुक आणि द्वंद्वयुद्ध हे प्रकार भारतीय संस्कृतीत नसल्याने धेडगुजरी प्रकार झाला आहे, एरवी भाषा देवलांसारखी सुबोध झाली आहे असे म्हटले आहे. शेरेपुस्तक साधारणपणे हॉटेलातील वास्तव्य संपताना गिऱ्हाइकासमोर ठेवण्यात येते. नाटकात येथे ते पहिल्याच दिवशी ठेवले गेले आहे, कारण नाटककाराला शेरेबाजीतून द्वंद्वयुद्ध घडवून आणायचे आहे!

नाटकाचा जीव लहान असला, तरी ते रंगते, ‘चढाओढ’नंतर एका वर्षाने पु.ग. सहस्रबुद्धे यांचे ‘वधुसंशोधन’ हे तसेच, मानसशास्त्रीय तत्त्वावर बेतलेले नाटक प्रकाशित झाले. ते अधिक बांधीव आणि वेगवान आहे. ते मूळ तत्त्वाची चर्चा न करता समजणे हे प्रेक्षकांच्या आकलनशक्तीवर सोडून दिले आहे. शकुंतलाबाई प्रस्तावनेत लिहितात, ‘हे नाटक लिहिताना लो. टिळक यांची कन्या सौ. रमाबाई साने यांनी केलेल्या मदतीबद्दल आणि दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.’ ह्या वाक्यामुळे वाचकाची उत्सुकता अधिक जागृत होते. नव्या मराठी रंगभूमीच्या उदयाच्या काळात आलेली ही दोन नाटके समीक्षकांनी काहीशी उपेक्षिली आहेत.

– मुकुंद वझे vazemukund@yahoo.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here