इतिहास-पुराणकथांत वर्णन केलेली माणसे असतात तशी माणसे सभोवताली दिसली, की प्रत्येक वेळी अचंबित व्हायला होते. कुडाळच्या संदीप परबची गोष्ट तशीच आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याचा गुणसमुच्चय वाढवतच गेलेली आहे. तो शालेय वयात असताना त्याने शेजारच्या बालविधवेची पीडा जाणली. ती माहेरी आलेली होती. तेथेही तिला काबाडकष्ट करावे लागत. आठवी-नववीत असलेल्या संदीपने गुरे रानातून चारून त्यांना घरी घेऊन येत असताना पाहिले, की शेजारीण रस्त्याकडेला पडली आहे. सोबत जळणाच्या लाकडांची मोळी आहे. त्या मुलीला आजारी अवस्थेत सर्व कामे करावी लागत होती. संदीपने तिला उचलली, सावरली आणि तिला घरी घेऊन आला. संदीपच्या मनाला अशी अनेक दृश्ये जाचत, दुर्बल वृद्धांची व मुलांची अवस्था फार बिकट असते असे त्याला जाणवे.
त्याची वृत्ती विनम्र आहे -वाणी मृदू आहे; पण त्या पलीकडे त्याच्या स्वभावाला एक ओढ आहे. तो माणसांना खेचून घेऊ शकतो ते त्याच्या आर्जवाने आणि सेवाभावाने. त्याला रस्त्याकडेला घाणीत, गटारात पडलेली वृद्ध माणसे आणि निराधार, बेसहारा मुले समाजात असतात या गोष्टीचा फार त्रास होतो. तो त्यांच्यासाठी काम करतो. तो म्हणतो, त्यांतील काही माणसे मनोरुग्ण असतात. अत्यंत घाण अवस्थेत राहतात. केसांच्या जटा झालेल्या -त्यात किडे! त्यांना शोधणे-स्वच्छ करणे-त्यांचा आजार बरा करणे आणि त्यांना त्यांच्या घरी पोचवणे हे पहिले काम. त्या कामाचे वर्णन त्याच्याकडून आपल्याला ऐकवत नाही. तो सांगतो, केसांच्या जटा झालेल्या, केसांत-अंगावरच्या जखमांत किडे असतात. एकेका व्यक्तीच्या अंगावर दीडशे-दोनशे किडे मिळतात! त्याची वर्णने ऐकताना अंगावर काटा येतो. मुले सहसा रेल्वेस्टेशनांवर मिळतात. काही कारणाने घरून निघालेली असतात-हरवलेली असतात. साऱ्या भारतातून आलेली असतात. त्यांची घरे शोधून त्यांना घरी पोचवणे हे मोठे व काही महिन्यांचे काम असते. संदीप ते काम गेली बारा वर्षे निष्ठेने अथकपणे करत आहे.
त्याने त्याच्या कार्यासाठी ‘जीवन आनंद संस्था’ निर्माण केली आहे. संस्थेचे खार, सांताक्रूझ, विरार असे मुंबई परिसरात तीन आणि कुडाळजवळ एक असे चार आश्रम आहेत. मुंबईत तीन ठिकाणी मिळून पन्नास वृद्ध-मुले आहेत. तर कुडाळजवळच्या मुख्य आश्रमात एकशेवीस निवासी वृद्ध व बालके आहेत. संदीपच्या कामाचा असा मोठा पसारा झाला आहे. तो त्यात हरवलेला असतो, कारण त्याच्या संस्थेचे पंचावन्न कार्यकर्ते पूर्णवेळ आहेत, तर दीडशे स्वयंसेवक हौसेने येऊन कामे करणारे आहेत. त्या सर्वांना कामात गुंतवणे व व्यग्र ठेवणे हा मोठा व्याप असतो.
संदीपचे वय आहे पंचेचाळीस, पण त्याला जगाचा अनुभव प्रचंड आहे. त्याची माणसे जोडण्याची हातोटी विलक्षण आहे. त्याचा मोठेपणा त्याच्या तोंडून कधीच व्यक्त होत नाही. तो बोलतो आर्जवाने. तो त्याच्या गप्पागोष्टी तोंडातून आपोआप प्रकट होत आहेत असे वाटावे इतक्या हळुवारपणे बोलतो. त्यामुळे त्याचे बोलणे कान देऊन ऐकावे लागते. संदीप सतत मुंबई-कुडाळ आणि अन्य प्रदेशात फिरत असतो. त्याचे घर वसईला आहे. त्याच्या घरी पत्नी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे.
कार्व्हर डे-नाईट निवारा केंद्र |
तो त्याच्याकडील वृद्धांच्या, बालकांच्या, मनोरुग्णांच्या कहाण्या उत्कटपणे सांगतो -परत परत सांगू शकतो. मी त्याला एकदा म्हटले, की निराधार भटक्या अवस्थेत फिरणाऱ्या माणसांना आसरा देण्याचे प्रकल्प ठिकठिकाणी आहेत. दादरची समतोल संस्था प्रसिद्ध आहे. कर्जतचे डॉ. भारत वाटवानी यांना तर गेल्या वर्षी त्या कामासाठी मॅगसेसे अॅवॉर्ड मिळाले. पुणे-कोल्हापूर-नगर येथेही अशाच कामासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकल्प आहेत. त्यांच्यात काही प्रमाणात नेटवर्क असतेही, पण दैनंदिन बाबी इतक्या गुंतागुंतीच्या असतात की ती माणसे, त्या संस्था एकांडेपणाने काम करत राहतात. त्यामधून मुख्य प्रश्न सुटण्याच्या दिशेने काही हालचाल सोडाच, विचारदेखील होत नाही. पंचवीस-तीस टक्के सुखवस्तू समाज आणि निराधार व्यक्तींसारखे सामाजिक प्रश्न यांच्यामध्ये सततचे नाते निर्माण करण्याच्या दृष्टीने काही व्यवस्था करणे शक्य आहे का?
वीणा गव्हाणकर आणि संदीप परब |
संदीपला माझा प्रश्न कळला-भिडला, तरी तो मूकपणे हसला. माझे बोलणे ऐकत राहिला. मी गेल्या नोव्हेंबरात कुडाळला गेलो होतो तेव्हाची ही गोष्ट. त्यानंतर आमची भेट दोन-तीन वेळा तरी झाली. मी त्याला प्रत्येक वेळी छेडले. तो प्रत्येक वेळी तसाच हसला. त्याच्या प्रकल्पांवर विकास आमटे, वीणा गव्हाणकर, अनिल नेरूरकर यांच्यासारखी कर्तबगार, मोठी माणसे येऊन गेली आहेत. नवनवीन येत असतात. संदीप त्यांना खास निमंत्रणे देऊन आणतो. संदीपने त्यांच्या मदतीने अशा मोठ्या कार्याची धुरा उचलावी -अन्यथा संदीप साठ-सत्तर-ऐंशी वर्षांचा होईल तरी निराधार वृद्धांच्या आणि मनोरुग्ण मुलांच्या कहाण्या सांगत राहील!
(दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
———————————————————————————————-
—————————————————————————————————
संदीपसारखी ध्येयाने काम करणारी माणसे पाहिली की ह्या माणसांचा अभिमान वाटतो .असे आदर्श पुढच्या पिढीला समजण्यात ह्या लिखाणाचा खूप फायदा होईल . सौ .अंजली आपटे दादर.
अशा लोकांची माहिती समाजापुढे आणण्याच्या या उपक्रमाबद्दल थिंक महाराष्ट्रचे कौतुक!
बापरे. काय माणूस आहे. काय काम आहे. साष्टांग नमस्कार.अश्या माणसाबद्दलची माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली त्या बद्दल think महाराष्ट्र धन्यवाद.
ओहो,काय ग्रेट माणूस आहे.फारसा गाजावाजा न करता केवळ सेवावृत्तीने काम करणा-या अशा महत्म्यांमुळेच समाजाचा गाडा चालूआहे. माहिती दिल्याबद्दल थींक महाराष्ट्राला धन्यवाद. सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.