Home संस्था साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a...

साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)

0
 

साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. चर्चेस किरण येले, संजीवनी खेर, संध्या जोशी अशी साहित्य क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित होती. संमेलनाविषयीच्या चर्चेत सहभाग विशेष अहमहमिकेने झाला. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांच्या वतीने महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका प्रासंगिक विषयावर असे चर्चामंडळ योजले जाते. तांबे व चोरमारे या दोघांनीही उस्मानाबादचे संमेलन यशस्वी रीत्या पार पडले असाच अभिप्राय दिला. व्यासपीठावर राजकारणी आहेत वा नाहीत हा मुद्दा बिनमहत्त्वाचा आहे असे चोरमारे यांनी सांगितले. ते म्हणाले, “साहित्यबाह्य कोणाही व्यक्तीला मुद्दाम मानपान देणे हे अनुचित होय. पण राजकारणी वा अन्य कोणी व्यावसायिक साहित्यप्रेमी असेल तर त्याला संमेलनात स्थान असलेच पाहिजे. एक पथ्य जरूर पाळले गेले पाहिजे, की स्थानिक संयोजन समितीत राजकीय पुढाऱ्याचा अथवा धनाढ्याचा वरचष्मा असता कामा नये.”

 
उषा तांबे यांनी संमेलन कसे योजले जाते, त्यात विविध तणाव कसे निर्माण होतात याबाबत मार्मिक विवेचन केले. ते करत असताना, त्यांनी छोटीमोठी उदाहरणे दिली. त्यामुळे चर्चेला योग्य पार्श्वभूमी तयार झाली. चोरमारे यांनी संमेलनाच्या अध्यक्षांची निवड पदाधिकाऱ्यांच्या कोंडाळ्याने करणे योग्य नव्हे; ती निवड अधिकाधिक साहित्यप्रेमींनी करायला हवी. त्यासाठी महामंडळाने वेगवेगळ्या संस्थांना मतांची संख्या वाढवून द्यावी. ती एकूण किमान काही हजार तरी असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मिलिंद बोकील यांनी महाराष्ट्रातील नोंदणीकृत वाचनालयांच्या सक्रिय वाचक सभासदांना संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मतदान करण्याची मुभा द्यावी, किंबहुना तो अध्यक्षीय निवडीचा मतदार संघ असावा असे एका लेखात सुचवले आहे. तो मुद्दा चर्चेस आला. परंतु तो फारशा गांभीर्याने घेतला गेला नाही. तशा निवडणुकीचे संयोजन फार गुंतागुंतीचे होईल असे चर्चेस जमलेल्या सगळ्यांचे मत दिसले.
चोरमारे गेल्या तीस वर्षांत एकवीस संमेलनांना हजर राहिले आहेत, तर सुदेश हिंगलासपूरकर गेली चाळीस वर्षें संमेलनास पूर्ण वेळ सतत हजर राहिलेले आहेत. उषा तांबे या तर दस्तुरखुद्द पदाधिकारी. त्यांचा संयोजनातच महत्त्वाचा वाटा. त्या म्हणाल्या, की “संमेलन स्थानिक समिती त्यांच्या क्षमतेनुसार घडवत असते. ‘साहित्य महामंडळ’ संमेलनाची जागा ठरवते आणि संमेलनाची कार्यक्रम पत्रिका स्थानिकांच्या सहकार्याने आखून देते. बाकी आर्थिक व्यवहारात संमेलन समितीवर महामंडळाचे कोणतेही दडपण नसते.”
सुदेश हिंगलासपूरकर यांनी काही मार्मिक निरीक्षणे मांडली. ते म्हणाले, की नेटके झालेले शेवटचे संमेलन बार्शीचे, गं.बा. सरदार यांच्या अध्यक्षतेखालील म्हणून सांगता येईल. त्याला चार दशके झाली. त्यानंतर निर्वेध झालेले संमेलन आठवत नाही. संमेलनात साहित्य आणि पुस्तकविषयक बाबी खूपच कमी येतात. त्यांनी यंदाचेच उदाहरण दिले. ते म्हणाले, की “या वर्षी संमेलनात चोरटी छापली गेलेली पुस्तके (पायरेटेड) मोठ्या प्रमाणावर पकडली गेली. संबंधित माणसास पोलिसांच्या ताब्यातदेखील देण्यात आले. परंतु हा मुद्दा कोणाही साहित्य संस्थेने आणि साहित्यिकाने महत्त्वाचा मानला नाही. संमेलनात दोन-अडीच कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाली, हे खरेच असणार; परंतु ती पुस्तके कार्योपयोगी आणि धार्मिक-आध्यात्मिक अधिक संख्येने असतात हे कोणी नमूद करत नाही. संमेलन त्यांच्यासाठी भरवले जाते का?”
 
किरण येले यांनी महाराष्ट्रभर गावोगावी छोट्यामोठ्या साहित्य संस्था आहेत. त्यांचे प्रतिनिधीत्व संमेलनात नसते हे लक्षात आणून दिले. त्यांनी त्यावर अभिनव सूचना केली, की स्पोर्ट्स-फिल्म्ससारख्या अन्य क्षेत्रांत अशा संस्थांना केंद्रिय संस्थेत नोंदणी करण्याची सुविधा असते. त्यामुळे त्यांना मान्यता मिळते आणि त्या सर्वांचे मिळून जे फेडरेशन बनते ती त्या त्या क्षेत्राची प्रातिनिधीक संस्था ठरते. तशी व्यवस्था साहित्यक्षेत्रात नाही.
 
संमेलनात विघ्न निर्माण होते, त्यास बऱ्याच वेळा मीडिया कारणीभूत असते असे अचूक निरीक्षण विजय चोरमारे यांनी मांडले. ते म्हणाले, की “संमेलनाच्या बातम्या देण्यासाठी जे मीडिया प्रतिनिधी येतात, त्यांना ना साहित्यिक, ना साहित्यिकांची कामगिरी माहीत असते. त्यामुळे ते उठवळपणे कोणत्यातरी क्षुल्लक बातम्या मीडियास पाठवत असतात आणि आम लोकांसमोर विसंगत चित्र तयार होते.” उस्मानाबाद संमेलनात अरुणा ढेरे यांच्या तोंडचा ‘हिटलरशाही’ हा शब्द ‘प्रेस’ने प्रश्न विचारताना उच्चारला होता. ढेरे म्हणाल्या, की ‘मला तसा अनुभव येत नाही.’ तर त्यांच्याच तोंडी ‘हिटलरशाही’ शब्द घातले गेल्यामुळे बातमीला भडकपणा प्राप्त झाला असे उदाहरण उषा तांबे यांनी दिले.
 [youtube=https://www.youtube.com/watch?v=zx4vGafuCyI&w=320&h=266]


संमेलनास जत्रेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे ते योजणे, प्रत्यक्ष भरवणे हे गुंतागुंतीचे आणि अशक्यप्राय होत चालले आहे. दुसऱ्या बाजूला ‘जयपूर लिटररी फेस्टिवल’सारखा नमुना आहे. तेथेही गर्दी अफाट होते. परंतु त्या गर्दीला चोखंदळपणा असतो. मराठी संमेलनात हौशे-नवशे-गवशे सारेच एकत्र जमतात. त्यांना त्यांच्या कानांवरून काही चांगले गेल्याचे समाधान लाभते हे नक्की. दुसऱ्या बाजूस परिसंवादास वक्ते सहसा बरीच तयारी करून येतात. परंतु त्यांच्यासमोर योग्य श्रोतृसमुदाय नसतो. कवीकट्टा-पुस्तकप्रकाशन कट्टा ही गेल्या काही वर्षांत संमेलनांची मोठी आकर्षणे निर्माण झाली आहेत आणि मुख्य मंडपातील कार्यक्रम मात्र निष्प्रभ होतात. उदाहरणार्थ, निमंत्रितांचे कविसंमेलन. त्यासाठी कवी प्रादेशिक तत्त्वावर बोलावले जातात. सूत्रसंचालकांना त्यांच्या बाबतची माहिती नसते आणि मग एकूण कार्यक्रमाला जुजबीपणा येतो, श्रोते कंटाळून जातात… अशा अनेक त्रुटी, विसंगती चर्चेत लोकांनी मांडल्या. त्यावर पुन्हा विचारविमर्ष झाला आणि मग चर्चेस जमलेल्या सर्वांचे मत असे झाले, की संमेलन संयोजनाचे विविध नमुने ध्यानी घेऊन त्यांचा सुवर्णमध्य असलेले साहित्य संमेलन मराठी साहित्यप्रेमी समुदायासाठी अनुरूप ठरेल.
– थिंक महाराष्ट्र Think Maharashtra

About Post Author

Previous articleमहागाव – रांगोळी कलेचे गाव
Next article‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ – महाराष्ट्राचे समग्र चित्र
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. ते क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांच्या साथीने 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे संपादन केले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version