संजय वाघ यांना ‘साहित्य अकादमी’चा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीसाठी तो पुरस्कार दिला गेला आहे. ते नाशिकचे पत्रकार आणि साहित्यिक आहेत. दरवर्षी जाहीर होणाऱ्या ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांतून नाशिकच्या वाट्याला आलेला साहित्य अकादमीचा बाल साहित्यातील हा पहिला पुरस्कार आहे. वाघ यांना मोबाईलमध्ये गढलेली, एकलकोंडी झालेली बालके; त्यांना खेळण्यास सोबत कोणी नाही, बोलण्यास कोणी नाही; त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे असे वाटते. बालकांच्या हाती त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे बालसाहित्य दिले पाहिजे. त्यांच्या डोळ्यांत स्वप्ने पेरली पाहिजेत असे त्यांचे म्हणणे आहे. ‘जोकर बनला किंगमेकर’ या त्यांच्या किशोर कादंबरीचा जन्म तशाच विचारातून झाला आहे असे ते सांगतात. सर्कशीतील जोकरकडे करमणुकीच्या दृष्टीने पाहिले जाते. त्याची स्वतःचीही काही दुःखे असतील असा विचार कोणाच्या मनाला शिवत नाही. वाघ यांनी अशा केवळ सव्वा दोन फूट शारीरिक उंची असलेल्या जोकरला कादंबरीचा नायक म्हणून मुलांसमोर उभे केले आहे. शारीरिक उणीवा असतानाही तीव्र इच्छाशक्तीद्वारे छोटासा जोकर त्याच्या गावासाठी डोंगराएवढे काम उभे करतो. गावाला विकासाच्या वाटेवर आणतो असे विषयसूत्र त्यांच्या कादंबरीचे आहे.
वाघ यांची भूमिका साहित्य निर्मितीतून मिळणारा आनंद स्वतःसोबत इतरांनाही वाटता यावा अशी आहे. संजय वाघ यांनी त्यांची लेखणी समाजाला दिशा देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वर्तमानपत्रांतून मुख्यत: झिजवली आहे. ते पत्रकार म्हणून परखड, रोखठोक आहेत. मात्र ते साहित्यलेखन करताना मेणाहून मऊ होतात. वाघ विशेषत: बालकांच्या भावविश्वाशी एकरूप होतात. त्यातूनच त्यांच्या ‘गाव मामाचं हरवलं’ आणि ‘बेडकाची फजिती’ या बालकविता संग्रहांचा जन्म झाला. बदललेली कुटुंबरचना, विभक्त कुटुंबपद्धती, हम दो हमारे दो असे चौकोनी कुटुंब यामुळे मायेचा ओलावा, जिव्हाळा लोप पावत चालला आहे. आजी-आजोबांचे संस्कार आणि त्यांची माया यांच्यापासून पारख्या होत चाललेल्या कोवळ्या पिढीबद्दल वाघ हळवेपणाने बोलतात. तेच त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे विषय आहेत.
विज्ञान युगातील बालकांची कल्पनाशक्ती अफाट आहे. त्यांच्या स्वप्नांची झेप अतुलनीय आहे. त्याच्याशी सुसंगत बाल साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे. बाल साहित्याकडे दुय्यम दर्ज्याचा वाङमय प्रकार म्हणून पाहिले जाते. पण लेखकाचा खरा कस बालसाहित्य लिहिताना लागतो. प्रौढ वयातील लेखकाने बाल मनाशी एकरूप होणे. त्यांचे भावविश्व जाणून घेणे ही परकायाप्रवेशासारखी कठीण गोष्ट आहे. एकदा का ती साधली तर सकस बालसाहित्य निर्मिती दूर नाही असे वाघ यांचे मत आहे. ते म्हणतात, की बालकांना केवळ उपदेशांचे डोस पाजण्याऐवजी, त्यांचे मानसिक भरण-पोषण करणारे साहित्य त्यांना दिले गेले पाहिजे.
वाघ यांना पुस्तकरूपी पहिले अपत्य जन्माला येण्यासाठी वयाची एकोणचाळीस वर्षे वाट बघावी लागली. त्यांचे पहिले पुस्तक मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अठरा शहिदांची शौर्यगाथा मांडणारे ‘26/11 चे अमर हुतात्मे’ हे नोव्हेंबर 2009 मध्ये प्रसिद्ध झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या प्रस्तावनांचे संपादन असलेले ‘डॉ. श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम’ हे वाघ यांनी संपादित केलेले दुसरे पुस्तक. ‘गंध माणसांचा’, ‘ऊन सावल्या’ ही दोन व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके ही त्यानंतरची. अशी चार पुस्तके ही त्यांची इतर ग्रंथसंपदा आहे.
‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीची पहिली आवृत्ती चपराक प्रकाशनाने प्रकाशित केली. दुसरी आवृत्ती वैशाली वाघ यांच्या प्राजक्ता प्रकाशनाने देखण्या रूपात वाचकांसमोर आणली. त्या कादंबरीला महाराष्ट्रातील मानाचे आणि महत्त्वाचे काही पुरस्कार लाभले आहेत. त्यात सार्वजनिक वाचनालय (नाशिक), सूर्योदय साहित्य पुरस्कार (जळगाव), दीनमित्रकार मुकुंदराव पाटील बालकादंबरी, कादवा शिवार प्रतिष्ठान, स्वर्गीय माणिकराव जाधव उत्कृष्ट साहित्य निर्मिती यांचा समावेश आहे. तसेच, त्यांना सावाना बालभवनच्या ‘वाचू आनंदे’ प्रकल्पा अंतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कारही मिळाला आहे. ‘जोकर बनला किंगमेकर : निर्मिती आणि विश्लेषण’ हा या कादंबरीवरील समीक्षा ग्रंथ समीक्षक दिवंगत राहुल पाटील यांनी संपादित केला आहे. कादंबरीच्या वाट्याला महत्त्वाचे पुरस्कार, वाचकांचे प्रेम आणि समीक्षकांनी घेतलेली दखल असे चौफेर कौतुक लाभले आहे. साहित्य अकादमीने त्यात मानाचा तुरा खोवला आहे.
संजय यांना वडील रामदास वाघ यांच्याकडून समाजसेवा, पत्रकारिता, वाचन आणि लेखन असा समृद्ध वारसा लाभला आहे.
त्यांनी पत्रकारितेत महत्त्वाच्या पदांवर 1990 पासून काम करताना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विविध विषय हाताळले. त्यांच्या लिखाणात समाजविघातक प्रवृत्तीविरूद्धचा रोष; तसेच, शोषितांच्या वेदना व्यक्त होत असतात. त्यांनी प्रसंगानुरूप लेखनासह सद्य स्थितीवरील वात्रटिका आणि विविध स्तंभांचे लेखनही केले आहे. ते ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत उप वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत.
संजय वाघ 9922904072 sanjaywagh92@gmail.com
– किरण भावसार 7757031933 kiranvbhavsar1972@gmail.com
———————————————————————————————-