शि.द. फडणीस शंभर वर्षांचे झाले. म्हणजे त्यांचा शताब्दी वर्षांत प्रवेश होत आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1925 चा. त्यांचा आता आतापर्यंत सार्वजनिक कलाजीवनात सहभाग असे; अजूनही व्यक्तिगत गाठीभेटी, संभाषणे करतात. फडणीस यांनी त्यांच्या हास्यचित्रांद्वारे मराठी माणसांच्या मनात हास्य गेल्या शतकाची साठ-सत्तर वर्षे पसरवले, आनंदच आनंद निर्माण केला ! त्यांनी मासिके-दिवाळी अंकांमध्ये, कथा-कादंबऱ्यांसाठी; इतकेच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी मनोवेधक व्यंग/हास्यचित्रे काढली. ती विलक्षण लोकप्रिय झाली. शि.द. यांच्या ‘मिस्कील गॅलरी’ स्वरूपाच्या चित्रांनी मराठी आणि एकूण भारतीय हास्य व व्यंग चित्रकलेत ठसठशीत ठसा निर्माण केला आहे. त्यांची ती चित्रे सोशल मीडियावर निमित्तानिमित्ताने प्रसृत होत असतात, तर त्यांना तसाच व तेवढाच प्रतिसाद लाभतो. अस्सल कलेची ओढ अशी चिरकाल टिकू शकते !
फडणीस यांची खासीयत म्हणजे गोड वळणाच्या रेषा असलेली आणि मथळा नसलेली हास्यचित्रे. त्यात मध्यमवर्गीय जीवनातील घटना/प्रसंग यांचे सूचक चित्र असते. त्यांतील रंगयोजना चित्तवेधक असे आणि ती चित्रे रसिकांशी सरळ संवाद साधत. फडणीस यांची चित्रे त्यांतील रसिकांशी संवाद साधण्याच्या गुणामुळेच भाषा, प्रांत, देश यांच्या सीमारेषा ओलांडून जातात. ती चित्रे त्यामुळे परदेशांतही लोकप्रिय झाली. फडणीस यांच्या चित्रांमागील संकल्पनांचा आणि विचारांचा रोख सतत ताजा व नवनवीन राहिला.
फडणीस हे ‘हंस’ व ‘मोहिनी’ या मराठी मासिकांचा मोठा आधार होते. विशेषत: मोहिनी मासिकाचा दर महिन्याचा अंक फडणीस यांचे नवे चित्र घेऊन येत असे. त्याच रंगरेषा पण नवी कल्पना. त्यामुळे मुखपृष्ठ चित्ताकर्षक ठरे. अंकाच्या आत, पाना-पानावर तर अनेक चित्रांचा नजराणा असे. फडणीस यांना प्रोत्साहन त्या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचे लाभले. अंतरकर चोखंदळ, रसिक व गंभीर अभ्यासू संपादक होते. त्यांनी तरुण फडणीस यांना जाणीवपूर्वक उत्तेजन दिले. फडणीस स्वत:ही कृतज्ञतापूर्वक सांगतात, की ते त्यांचे स्वत:चे हास्यचित्रकला जग संपादक अंतरकर यांच्यामुळे निर्माण करू शकले !
फडणीस यांच्या हास्यचित्रांमध्ये 1950 च्या पुढील दोन दशकांतील मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब मुख्यत: उमटले आहे. त्यांच्या चित्रांत मराठी संस्कृतीच्या प्रतिमा तशा पद्धतीने चित्रित झालेल्या दिसतील. उदाहरणार्थ, डॉक्टराने गायीच्या शेपटीचाच वापर स्टेथास्कोपसारखा – तपासण्यासाठी – करणे, मांजरीने सरळ भय्याकडूनच दूध घेणे अशांसारख्या भन्नाट कल्पना हे त्यांचे वैशिष्टय. त्या कल्पना रोजच्या जीवनाशी निगडित असत. शि.द. यांची रंगसंगतीसुद्धा खास आहे. ती परस्पर विरोधी रंगछटांमधून विकसित झालेली जाणवते. त्या रंगांमधून फडणीस यांचा विनोद अधिक खुलून येतो, चित्राची प्रसन्नता वाढते. शि.द. फडणीस यांच्या चित्रांतून निर्माण होणारे हास्य चिरतरुण व निर्मळ आहे.
रॉबर्ट सॅविग्नॅक या फ्रेंच चित्रकाराच्या चित्रांशी फडणीस यांची चित्रे खूप समांतर जातात. त्या दोघांच्या चित्रांतील साम्य, ती चित्रे भिन्न देशांच्या भिन्न संस्कृतींतील व भिन्न काळांतील असूनदेखील जाणवते आणि अचंबा वाटतो. त्या दोघांचा काळ वीस वर्षांनी वेगवेगळा आहे. सॅविग्नॅक 1940 च्या आसपास फ्रान्समध्ये लोकप्रिय होते. सॅविग्नॅक व शि.द. फडणीस या दोघांनी भौमितिक आकाराला मानवी रूप दिले, ते विलोभनीय ठरले. सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतींमधील व न समजणाऱ्या चिन्हांना ‘लोकल टू ग्लोबल’ करणे हे केवळ प्रतिभावंत साधू शकतात हे त्या दोघांची चित्रे व त्यांतील साम्य बघितले की जाणवते. जगात जेथे माणूस, प्राणी, पक्षी, झाडे आहेत तेथे घाबरणे, अचंबित होणे या व अन्य भावना असणार. हे भावघटक भूक-भक्ष्य व पाणी-निवारा यांच्या इतकेच सर्वत्र सारखे आहेत याचा प्रत्यय फडणीस व सॅविग्नॅक यांची चित्रे एकत्र पाहून येतो. हे खरे, की वेगवेगळ्या ठिकाणी रंगचिन्हांत आणि चित्रांकनात भौगोलिक कारणाने फरक होत जातो, परंतु आधुनिक काळात विज्ञानामुळे ते सर्व मागे पडून घट्ट रचनाकृतिबंध तयार होईल आणि वैश्विक भाषा अस्तित्वात येईल अशी शक्यता फडणीस यांची चित्रे पाहून वाटते.
मला काही चित्रांचा दाखला देऊन सॅविग्नॅक व फडणीस यांच्या चित्रांतील साम्य स्पष्ट करावेसे वाटते. सॅविग्नॅक यांनी साबणाच्या जाहिरातीकरता गाय व तिच्या आचळास जोडलेला मोनसॅवोन साबण असे चित्रांकन केले होते. त्यामधून गायीच्या दुधाच्या मुलायमतेचे गुणधर्म साबणात असल्याचे प्रतीकात्मपणे व्यक्त होत होते. त्यांचे ते काम 1941 साली फ्रान्समध्ये खूप गाजले व ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी केलेली कोकरू व लोकरीची रजई ही जाहिरात, पेन्ग्विन, कुत्रा किंवा विदूषक यांच्याप्रमाणे नाचणारा झेब्रा इत्यादी प्राणी-पक्ष्यांचा वेगवेगळ्या जाहिरातींमधील वापर हा फ्रान्समध्ये लोकांना अतिशय आवडला. सॅविग्नॅक यांनी जाहिरातींना अशी गमतीदार नवीन दृष्टी दिली. चित्रकलेला दिलेली ती ‘कायनाटिक’ जोड त्यांचे काम अजरामर करून गेली. ‘कायनाटिक’ ही संज्ञा ‘डिझाइन’ क्षेत्रात वापरली जाते ती गतिशीलता व्यक्त करण्यासाठी. येथे हास्यचित्रांतून निर्माण होणारे हास्य मनात रेंगाळत राहणे असा अर्थ आहे. योगायोग असा, की फडणीस यांनी त्यानंतर वीस वर्षांनी मराठीच्या क्षेत्रात तसेच काम केले.
मी शि.द. फडणीस यांना सॅविग्नॅक यांची पोस्टर चित्रकला दाखवून विचारले, की तुम्हाला हा चित्रकार माहीत होता का? असल्यास तुम्ही त्यापासून प्रेरित झाला होतात का? फडणीस यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी दिली. ते म्हणाले, “मी त्या चित्रकाराचे काम पाहिलेलेही नाही.” मला गंमत वाटली, की मग हे साम्य कसे काय आले? ती प्रतिभेची कमाल आहे !
मी पुढे शि.द. यांना पिकासो यांच्याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा त्यांचे उत्तर छान होते. ते म्हणाले, “मी त्यांच्या अमूर्त शैलीच्या शोधाने काही काळ प्रभावित झालो होतो. त्याचा माझ्या चित्रशैलीवर परिणामदेखील झाला. पिकासो यांच्या अमूर्त चित्रकलेबद्दल उलटसुलट, बरेवाईट बरेच बोलले जाते. पण मी पिकासो यांना कमी कधी लेखणार नाही.” पिकासो यांच्या चित्रशैलीत दिसणाऱ्या ‘क्युबिझम’संबंधी ते म्हणाले, की “मला कोणत्याच इझमचे वावडे नाही. त्या सर्व चित्रशैलींतून मला नवनवीन दृष्टी गवसत गेली. ती म्हणजे ‘कायनाटिक ह्यूमर’ची. तीच मी वापरतो ! माझ्या चित्रकलेची प्रेरणा वाचक-प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना हास्यानुभव देत राहणे आणि त्यातून आनंद निर्माण करणे ही आहे. मिस्कीलपणा व हास्य हे माझे मुख्य चित्रानुभव घटक आहेत; ‘व्यंग’ हा नव्हे! मी स्वत:ला व्यंगचित्रकार मानत नाही. मी राजकीय व्यंगचित्रकलेत कधीच रमलो नाही, कारण तो माझा पिंड नाही. मला तशा चित्रांसोबत येणारा शब्दबंबाळपणा आवडत नाही, माझी चित्रे मथळाविरहित असतात. मथळाविरहित चित्र भाषा-प्रांत-देश यांच्या सीमारेषा ओलांडून जाऊ शकते. सर्वसामान्य माणसाच्या नित्य जीवनातील हालचाली पकडून, त्यांना चित्रात प्रसंगरूपाने दाखवावे ही माझी कल्पना व तसेच माझे तंत्र आहे. चित्र पाहणारा माणूस त्या प्रसंगातून जात असताना त्याच्या जीवनातील मिस्कीलपणा जाणतो आणि आनंदी होतो. तोच ‘कायनाटिक ह्यूमर’ असतो. मी चित्रतपशिलांसाठी आवश्यक त्या कलाकौशल्याबाबत सजग असतो. मी अभिजात चित्रकलेचे अधिष्ठान मानणारा कलावंत आहे. प्रयोग करत राहणे हा माझा स्वभावधर्म आहे. मी ‘कायनाटिक ह्यूमर’ची प्रत्यक्ष हालचाल करणारी इनस्टॉलेशनदेखील केली आहेत. तीही लोकांना खूप आवडली.”
‘कायनाटिक ह्यूमर’खेरीज ‘व्हिज्युअल गॅग’ (हास्यकारक ठोसा) अथवा ‘व्हिज्युअल स्कॅण्डल’ (हास्यकारक कमरेखाली वार) अशा संज्ञा हास्यचित्रकलेत वापरल्या जातात. म्हणजेच थोडे अतिवास्तववादी परंतु अनपेक्षित चमत्कृतीने हास्य निर्माण करणे. शब्दांवर अवलंबून न राहता चित्रांतून शब्दसंवाद साधणे ! सॅविग्नॅक यांची ‘मोनसाबोन’ साबणाची जाहिरात (चित्र म्हणजे गायीचे आचळ हीच साबणाची वडी दाखवणे) त्यासाठीच प्रसिद्ध आहे. तसेच, ‘फ्रिइगेसीओ’ नावाच्या रेफ्रिजरेटरजवळ एक माणूस उभा आहे व उघड्या दरवाज्यातून त्याचा अर्धा भाग बर्फमय झालेला आहे असे दाखवणे; हे सर्व फ्रान्समध्ये 1940 च्या दशकात तर भारतात/महाराष्ट्रात 1960 च्या दशकात नवीन होते. शि.द. फडणीस यांनी उत्स्फूर्तपणे मराठी चित्रकला आंतरराष्ट्रीय दर्ज्याला नेऊन ठेवली !
– रंजन रघुवीर जोशी 9920125112 joranjanvid@gmail.com