Home मोगरा फुलला पाऊस पहावा‌ (Enjoying Rains)

पाऊस पहावा‌ (Enjoying Rains)

पावसाळा हा सृजनाचा, आनंदाचा ऋतू. प्रत्येक माणसाच्या मनात पावसाच्या काही खास आठवणी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या पावसाळ्यातल्या भटकंतीच्या, धबधब्यांच्या, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या, हिरवाईच्या आणि क्वचित निसर्गाच्या कोपाला एकत्र येऊन तोंड देण्याच्याही. जसजसा काळ जातो तसतश्या या आठवणी अधिकच गहिऱ्या होत जातात.

भारतासारख्या कृषीप्रधान देशात आजही ‘सत्ताविसातून नऊ गेली की बाकी शून्य उरते’ हे खरे आहे. ग्रामीण भागात पावसाची अशी एक खास परिभाषा, पावसाविषयी ठोकताळे आहेत. ते जाणून घेण्यात मजा आहे. सध्या पावसाने संततधार धरली आहे. अशा या बाहेरच्या पावसात, सिद्धहस्त लेखिका डॉ. मंजूषा देशपांडे यांचा मनातल्या पावसाविषयीचा ललित लेख ज्याच्यात्याच्या मनातल्या पावसाच्या आठवणी हमखास जाग्या करेल.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

पाऊस पहावा‌ …

पाऊस पहावा, पाऊस अनुभवावा, पण पावसात न भिजता कोरड्या जागेत बसून, खिडकीतून‌ नाहीतर दारातून दिसणाऱ्या पावसाची मजा घ्यावी असं वाटायला लागलं की आपण परिपक्व (म्हातारे) व्हायला लागलोय असं खुशाल समजावं. कालपासून असा बेफाम पाऊस कोसळतो आहे आणि मी घरात बसून पाऊस अनुभवते आहे. आमच्या अंगणातल्या प्रत्येक झाडाच्या पानोपानी थेंब ओघळत आहेत.‌ पंख भिजलेला एखाद दुसरा पक्षी कुडकुड करत, फांद्यांच्यामधून बहुधा किडे शोधतो आहे. रस्त्यावर पाण्याचे ओघळ जणू नाले झालेत. 

आज रविवार म्हणून कदाचित पण रस्त्यावर वर्दळही कमी आहे. आमच्या शेजारी बालवाडी आहे. तेथे आज काहीतरी कार्यक्रम आहे.‌ शाळेत नवीन प्रवेश घेतलेली चिमुकली मुले, त्यांच्या आईबाबांबरोबर आलेली आहेत. फुलाफुलांचे रंगीबेरंगी रेनकोट घालून पावसात भिजत चिवचिवणारी उत्साही मुले पाहून‌ मला ‘हम ना रहेंगे…तुम ना रहेंगे…रहेंगी अपनी निशानियाँ…’ हे गाणं आपसूकच ऐकू यायला लागलंय. 

आमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर झाडोरा आहे. त्याचा पावसातला तजेलदारपणा पाहून मन प्रफुल्लित होते. अनेकदा असा पाऊस कोसळत असला की मी गौड मल्हारातली ‘बरसन लागी… लागी रे बरसन को…’ ही चीज पेटीवर वाजवून गाते. धुंवाधार पावसात माझा आवाज बाहेर पोचत नाही म्हणून बरं ! ती चीज आणि पाऊस माझ्या शरीर मनात पुरा भिनला की मग मला नाचावसं वाटतं. तसे तर काय आकाशात काळे ढग दिसले रे दिसले की माझेही मन नाचायला लागते. बऱ्याचदा मी घरात एकटीच असल्यामुळे वाढत्या वयाला आणि वजनाला न शोभेल अशा हालचालीही मला पावसाच्या तालावर मनसोक्त करता येतात.

भर पावसाचा संबंध माझ्या एकटेपणाशीही आहे. किती पावसाळे गेले असतील सगळ्यांनी मिळून पावसात भजी नाहीतर मिसळ खावी असे झालेलेच नाही. अगदी त्यावेळी घरात इतर कोणी असले तरी सर्वांची मने वेगवेगळ्या प्रतलांवर असतील तर एकत्र आनंद कसा घ्यावा… पूर्वी मला याचे खूप वाईट वाटायचे. पण एकदा कधीतरी असेच विमनस्क होऊन पाऊस पहाताना पावसाच्या थेंबा-थेंबांनी माझ्याबरोबर फेर धरला. तेव्हापासून मला पावसाला ‘जीवलग सखा’ म्हणूनही अनुभवता यायला लागलं.

त्याचीही एक गंमतच आहे. एका वर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच, एका कामासाठी मला वेंगुर्ल्याला जावं लागलं होतं. तिथल्या एका रेस्ट हाऊसमध्ये राहिले होते. मी आदल्या दिवशी एकटीच अगोदर पोचले आणि बाकी सर्वजण दुसऱ्या दिवशी येणार होते. वेंगुर्ल्याचे रेस्ट हाऊस सुंदर होते. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल. त्या दिवशी सकाळपासूनच गदमदत होतं. पाहता पाहता दुपारपर्यंत आकाश‌ ढगांनी काळवंडून गेलं. मोठा वारा सुटला आणि असा वळीव‌ बरसायला लागला की बस !

एकदम माझं लक्ष समुद्राकडे गेलं. समुद्रात पडत असलेल्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला समुद्राच्या लाटा किंचित वर उठून जणू कवेत घेत होत्या. समुद्राची गाज आणि पावसाची रिमझिम यांच्यात जणू नर्तन आणि वादनाची जुगलबंदी चाललेली होती. एवढं सुंदर दृश्य मी तोपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. तसं संगीत कधी ऐकलं नव्हतं… आनंदातिशयाने मला अक्षरशः रडायला यायला लागलं. त्यानंतर मी तळ्यात, नदीत, अनेक जलाशयात पडलेला पाऊस पाहिला. प्रत्येक वेळी पावसाच्या थेंबांनी जमिनीवरच्या पाण्याशी खेळ केला की तो पहायला मला वेगळी मजा येते.‌ कसला तरी अनामिक आनंद होतो.

पावसाचे वेगवेगळे विभ्रम असतात. पहाटेचा धाडधाड कोसळत आपल्याला उठवणारा पाऊस, किर्र रात्री धूमशान उधळणारा पाऊस, दुपारचा झिम्मा खेळणारा पाऊस. संध्याकाळचा, मनातली वादळे शांत झाल्यानंतर मोठ्यांदा रडले की मन कसे परत निवळशंख होते तसा पाऊस. प्रत्येक वेळेचा पाऊस नवा, नवा बहर, नवा कहर माजवणारा आणि नव्याने भिजवणाराही असतो.

मी कॉलेजच्या दिवसात पावसाळ्यात खूप फिरायचे.‌ हळूहळू सगळे सोबती इकडे तिकडे पांगले.‌ गुडघे बोलायला लागले. पावसात डोंगर दऱ्या चालत पालथे घालणे जणू संपूनच गेले.‌ आमच्या ‘कोल्हापूरातला पावसाळा’ हा फार देखणा ऋतू आहे. पावसाळ्याची सुरूवात झाली, की आम्ही गाडी घेऊन पन्हाळ्यावर जातो. तेथे दरीतून वर येणाऱ्या ढगांत विहरतो, मनातल्या मनात मोरांसारखं नाचतो आणि गरम गरम भाकरी आणि पिठलं खाऊन माघारी येतो. मी पूर्वी कधी थोडं लांब गगनबावड्याच्या पलीकडे मोरजाईच्या डोंगरावर पावसात भिजायला जायचे.‌ तिथला पिसाट लागल्यासारखा पाऊस आपल्याशी उभी, आडवी, तिरकी अशी अक्षरशः चहुबाजूंनी प्रेमाची अलाबला घ्यायचा. तसल्या त्या पावसात भिजल्यावर तिथे कुठे तरी मिळालेला गुळाचा गरमागरम चहा  प्यायचा. त्याची चव म्हणजे‌ ‘स्वर्गसुख’! स्वर्गसुख म्हणजे दुसरं काही नसणारंच असं वाटायचं. 

तेव्हा भर पावसात कोल्हापूरच्या आजूबाजूच्या डोंगरदऱ्यात हुंदडणं हा तर माझा छंद आणि अर्थातच परमानंद  होता.‌ इथे जवळच असलेल्या उजळाईवाडी‌पासून बर्की, रामतीर्थ, आंबोली, राऊतवाडी, पळसंबे, दूधसागर आणि कितीतरी धबधबे जणू माझी वाट बघत बसलेत, अशा‌ प्रकारे मी कसंही करून, कोणालाही सोबतीला घेऊन तिथे‌ धडपडत जाऊन यायचे.‌

पावसात आमच्या कोल्हापूरच्या आसपास हिरवीगार लुसलुशीत कोवळ्या गवताची भाताची खाचरं दिसतात आणि जंगले गच्च ओली झालेली असतात. ती आपल्यासाठी त्यांच्या वाटा उघडतात.‌ थोड्याशा सूर्यप्रकाशातही तिथल्या झाडांवरील पानांवर पडलेले बिलोरी थेंब अक्षरश: हिऱ्यामोत्यांसारखे चमकतात.  

मला कॉलेजच्या वयात पावसात गावोगावी फिरल्यामुळे तरणा, म्हातारा, सासू, सुनंचा पाऊस, त्यांची वाहने आणि त्यांचा शेतीकामाशी असलेला संबंध; असा खास ‘पाऊस शब्द संग्रह’ माझ्याकडे भरपूर आहे. पंचांगानुसार दरवर्षी पावसाच्या नक्षत्रानुसार त्याचे वाहन ठरते. त्या नक्षत्राचे त्यावर्षीचे वाहन काय आहे. यावरूनही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. नक्षत्राचे वाहन बेडूक, म्हैस किंवा हत्ती असेल तर भरपूर पाऊस, वाहन जर मोर, गाढव, उंदीर असेल तर मध्यम पाऊस आणि वाहन जर कोल्हा किवा मेंढा असेल तर कमी पाऊस असे ठोकताळे बांधण्यात येतात. वाहन जर घोडा असेल तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जातात. काही नक्षत्रांना तरणा, म्हातारा, सासू, सून अशी नावेही ग्रामीण भागात दिलेली आहेत. पुनर्वसू नक्षत्र म्हणजे तरणा पाऊस, पुष्य नक्षत्र म्हणजे म्हातारा पाऊस, मघा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सासूचा पाऊस, तर पूर्वा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सुनंचा (सुनेचा) पाऊस असे म्हणतात. आश्लेषा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आसळकाचा पाऊस‘ म्हणतात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘रब्बीचा पाऊस‘ म्हणतात. हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्तीचा पाऊस‘ असे म्हणतात. चित्रा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आंधळीचा पाऊस‘ म्हणतात. मिरगाचा पाऊस म्हणजे मृग नक्षत्रावर पडणारा पाऊस त्यावेळी रोपे लावली की ती रूजतातच अशी समजूत आहे. आश्लेषा नक्षत्रात पडतो तो पाऊस त्याचे वाहन गाढव असेल तर खूप पाऊस पडतो. त्याचे वाहन म्हैस असली तरी भरपूर पाऊस पडतो. म्हातारा पाऊस गेल्यावर आसळकाच्या धारा पडतात.

पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पक्षी त्यांची घरटी बांधतात. पक्ष्यांनी घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की पाऊस मध्यम आणि पक्ष्यांनी घरटी झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तवण्यात येतो. कोकिळा आणि पावश्या पक्षी घुमू लागले की लवकरच पाऊस येणार, असा अंदाज वर्तवला जातो, बगळ्याची पांढरी पिसे तपकिरी रंगाची दिसू लागली तर त्यावर्षी पाऊस भरपूर पडणार असे अनुमान लावले जातात. हे नेहमीच खरे ठरतात.

मला पावसात वेगवेगळ्या प्रकारची रोपे गोळा करणे आणि रानभाज्या गोळा करणे याचाही नाद आहे.‌ पावसाळ्यातल्या टाकळा, कुर्डु, शेवळा, शेवग्याचा पाला यांसारख्या रानभाज्या गोळा करून आणल्या की स्वच्छ धुवून खळाखळा उकळाव्या लागतात. त्यातलं पाणी काढून टाकावं लागतं. मग त्या पाल्यात लसूण मिरच्या वाटून त्याला फोडणी घातली की भाजी तयार. कधी कोणी त्या भाजीत बेसनाचं पीठ नाहीतर डाळ घालतं. तशी भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली की मग पावसाळा आपल्या वाटेला जात नाही. मग पावसाळ्याची फक्त मजाच घ्यायची. 

भर पावसाळ्यात कोकण रेल्वेने प्रवास करायचं भाग्य मला अनेकदा लाभलं आहे. पण त्या प्रवासातल्या निसर्गसौंदर्याला हल्ली एक काळी किनार दिसते.‌ पाऊस कितीतरी लोकांची कशी दाणादाण उडवतो हे त्या प्रवासात आता मला दिसायला लागलं आहे. हातावरचं पोट असणारी आणि फूटपाथवर राहणारी माणसं यांची पावसामुळे अतिशय दयनीय स्थिती होते, हे मला आता या वयात प्रकर्षाने जाणवतंय.‌ दूर जंगलात राहणाऱ्या आदिवासी भागातही भर पावसात घरातला दाणागोटा संपलेला असतो. पावसात जंगलात कंद, फळे गोळा करायला जाता येत नाही. अशावेळी घरात असलेल्या पीठात भरपूर प्रमाणात पाणी घालून मीठ, गूळ घालून केलेले माडगे हेच जेवण. त्यात जर पावसाची झड सात आठ दिवस लांबली तर मग माडगेही दूरापास्तच होते.

मी कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून बरीच वर्षे एका झोपडपट्टीत काम करायचे.‌ त्यावेळी तिथल्या मुलांना आणि लोकांना पाऊस म्हणजे संकट वाटायचे. पावसाने त्यांची झोपडी ओली होऊन जायची. पावसात भिजल्यावर घालायला कोरडे कपडे नसायचे, तसे नसेल तर काय होते हे मला तिथे नेहमी जात असूनही कधी जाणवलेलेच नव्हते. ही जाण आली ती, आमच्या पन्हाळा ते पावनखिंडीमार्गे विशाळगड या ट्रेकच्यावेळी. एका रात्री जायचे आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत परतायचे एवढाच तो ट्रेक होता. मी अंगावर जाडजूड रेनकोट आणि पाठीवरच्या सॅकमध्ये दुसऱ्या दिवशी खाण्याचा डबा एवढेच घेऊन अंगावरील कपड्यानिशी त्या ट्रेकला गेले. पन्हाळ्यावरून मसाई पठार आणि पावनगड, असे रस्ता शोधत शोधत निघालो आणि रस्ता चुकलो. गच्च पाऊस, भरून वाहणारे ओढे, सतरा‌ वेळा घसरून पडल्यामुळे अंगावरचा रेनकोट ठिकठिकाणी फाटला होता. बदलायला कपडेच नव्हते. कुठल्या तरी झोपडीत चुलीच्या निखाऱ्यात थोडं शेकायला मिळाले तेवढंच. पण झिम्माड पावसात तेवढ्याने कपडे कुठले वाळायला ! आम्ही तेच भिजलेले कपडे घालून तिसऱ्या दिवशी कसे तरी घरी पोचलो. त्यानंतर सर्दी मागे लागली ती कायमचीच. पावसात भिजल्यावर घालायला कोरडे कपडे नसतील तर काय होते, हे मला अगदी खोल खोल कळले. त्यानंतरच्या प्रत्येक पावसात भिजले तरी आपल्याकडे घरी गेल्यावर कोरडे कपडे असणार आहेत, हा विचार जरी मनात आला तरी ‘सुख’. सुख’ म्हणजे काय ते कळतं आणि मन कृतज्ञतेने भरून येतं !

माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याला घरातल्या सर्वांना घेऊन वर्षा सहलीला जायची फार हौस होती. खरोखरच मला तिचा फार हेवा वाटायचा. खरं तर मीही ज्यांच्याबरोबर आपलं जमतं असे जे कोणी उपलब्ध असतील त्यांच्याबरोबर पावसाळ्यात कुठेतरी फिरून येते पण त्याला अर्थातच मर्यादा असतात.

‘पावसात कुटुंबाबरोबर फिरायला हवं. त्यात पावसातील वेगळी उबही अनुभवायला येत असणार’ असे माझ्या मैत्रिणीला दरवर्षी वर्षा सहलीला जाताना पाहून मला वाटत रहायचं.‌ आज सकाळी ती मैत्रीण घरी आली होती. ती म्हणाली, “यावर्षीपासून आम्ही पावसात कुठंही फिरायला जाणार नाही… असं मी ठरवून‌ टाकलंय” असे म्हणून तिने हुश्श‌ म्हणत कॉफीचा घोट घेतला.

“का ग ?” मी आश्चर्याने विचारले.

तिने सांगितले, ‘वर्षा सहल’ म्हणजे तिच्यासाठी फक्त चिखलात भिजलेल्या कपड्यांचा ढिगारा धुणे आणि वाळवणे. त्यानंतर महिनाभर काढावी लागणारी आजारपणं एवढंच होतं. त्यापुढे ना तिला कधी पावसात भिजायची मजा आली ना कधी आजुबाजूची हिरवाई अनुभवता आली. “असं आहे होय !” आपण विचार करतो त्यापेक्षा वस्तुस्थिती किती वेगळी असते. मला किंचित बरंही वाटलं. “तुला नेहमी आमच्याबरोबर यावेसे वाटायचे ना?” तुझ्या डोळ्यात दिसायचं ते! मैत्रीण माझ्याकडे पहात म्हणाली. माझी मैत्रीण मला चांगलीच ओळखते. “मी वर्षा सहलीला जाऊनही पावसात न भिजता कोरडीच परत येते हे तुला कळू द्यायचे नव्हते… कारण तू घरात राहूनही पावसात चिंब झालेली असायचीस’’. ती माझा हात घट्ट दाबत म्हणाली आणि मग आम्ही दोघीही घरात बसून, कोरड्या कपड्यातही बाहेरच्या पावसात चिंब भिजलो.‌

– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

  1. पाऊस भिजल्या शैलीतील सर्व लेखचं उत्तम
    जमला आहे.या लेखाच्या वाचनाने पावसावरच्या कितीतरी मनात रुजलेल्या कवितांचे स्मरण झाले.
    गावोगावचा पाऊस अशी एक चांगली लेखमाला च अनेक पाऊस प्रेमी लेखकांकडून लिहून घेत येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version